Learning ability : सतत नवं शिकण्याची क्षमता कशी वाढवाल? | पुढारी

Learning ability : सतत नवं शिकण्याची क्षमता कशी वाढवाल?

मानसी जोशी

प्रत्येकजण सदासर्वकाळ विद्यार्थीच असतो. कारण आपण सतत काही ना काही शिकतच असतो. सर्व गोष्टींची माहिती सर्वांना असणं शक्य नाही, म्हणूनच आपण नवनव्या गोष्टी आत्मसात करत असतो. हे सतत नवं शिकण्याची क्षमता कशी वाढवाल? ( Learning ability ) 

विज्ञान क्षेत्रातल्या माणसाला कलेतली माहिती असतेच असे नाही. तसेच कलेतल्या माणसाला विज्ञान क्षेत्रातले किंवा आर्थिक क्षेत्रातले सर्व ज्ञान असेलच असे नाही. म्हणूनच जेव्हा शक्य असेल, तेव्हा माणसाने सतत नवे शिकण्याचा प्रयत्न करायला हवा. नव्या क्षेत्रातल्या घडामोडी जाणून घ्यायला हव्यात. त्यातली आव्हाने, बारकावे पाहायला हवेत. त्यामुळे केवळ आपल्याला ज्ञानच मिळते असे नाही, तर आपल्यातला आत्मविश्वासही वाढतो. कोणत्याही कार्यक्रमात, सभेत आपण त्या विषयावर ठामपणे बोलू शकतो. पण हे शिकण्याचा अनेकांना कंटाळा असतो. त्यासाठी मनाची तयारी लागते. स्वत:ची क्षमता वाढवावी लागते. पण प्रश्न असतो, तो ही क्षमता कशी वाढवायची याचाच.

काहीही शिकण्याची तयारी ठेवा

मनाशी असे काही ठरवून ठेवू नका. मला आता आर्थिक घडामोडींचीच माहिती घ्यायचीय, जे समोर येईल ते वाचत जा. ज्या व्यक्तीकडून माहिती, ज्ञान मिळू शकते त्याच्याकडून बिनधास्त ते घ्या. त्याला न लाजता काही प्रश्न विचारा. आपल्याला हे माहीतच नाही, हे दाखवायला अजिबात घाबरू नका. काहीही शिकण्याची तयारीच तुम्हाला तुमच्या क्षमता विकसित करायला मदत करील.

अधिक माहितीचा हव्यास ठेवा

एखाद्या विषयाची माहिती घेत असाल, तर केवळ समोरचा देतोय तेवढ्यावरच समाधान मानू नका. त्याला त्या क्षेत्रातले प्रश्न विचारा. त्याच्या द़ृष्टीने ते बाळबोध असतीलही, पण तुम्हाला ते अधिक माहिती देणारे असतात. त्यामुळे बिनधास्त विचारा. सतत अधिक माहिती घेण्याचा स्वभाव तयार करा. विशेषत: चालू घडामोडी, तंत्रज्ञान, विज्ञान या क्षेत्रात विपूल माहिती असते. त्याचे बारकावे जाणून घ्या.

प्रत्यक्ष अनुभव घ्या

एखाद्या विषयाची माहिती घेतलीत आणि त्यात प्रत्यक्ष कामाची संधी असेल, तर ती अनुभवून पाहा. उदाहरणार्थ तुम्हाला टीव्ही दुरुस्त करण्याचे तंत्र केवळ माहितीच्या आधारे शिकून उपयोगाचे नाही, त्यासाठी तुम्ही ते हाताळणेच जास्त गरजेचे आहे. किंवा एखादा छोटा रोबो तुम्हाला बनवायचा असेल अथवा स्वयंपाकघरात काही पदार्थ बनवायचा असेल, तर तो फक्त पुस्तकांत वाचून बनवता येणार नाही. त्यासाठी प्रत्यक्षच त्याची तयारी करायला हवी ना?

स्मरणात ठेवा

जे ज्ञान घेतलेय, ज्याची माहिती घेतलीय. ती स्मरणात राहिली, तरच त्याचा उपयोग. एकदा ती माहिती घेतली आणि तुम्ही विसरून गेलात, तर त्याचा उपयोग शून्य. म्हणूनच माहिती घेतल्यावर त्याचं चिंतन करा. त्यावर मनातल्या मनात विचार करा. त्यातून स्वत:लाच काही प्रश्न विचारा. त्यामुळे ती माहिती तुमच्या डोक्यात अधिक पक्की होऊन बसते.

तुमची एक स्टाईल असू द्या

शिकवण्याची काहींची अशी एक स्टाईल असते. तशीच तुमची शिकण्याचीही एक स्टाईल तयार करा. ज्यातून समोर शिकवणारा कोणीही असो, माहिती देणारा कोणीही असो, त्याला ती माहिती देताना अधिक माहिती द्यावे असेच वाटायला हवे. उदाहरणार्थ एखादी माहिती घेताना तुमच्या हातात पॅड आणि पेन असेल, तर समोरच्याला अधिक उत्साह येतो.

शिवाय आपली माहिती लिहून घेतली जातेय असे पाहिल्यावर ती देणाराही ती योग्य आणि कोणतीही अतिशयोक्ती न करता देतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला शिकण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीही उपलब्ध आहेत. तुम्ही व्हिज्युअलीही सीडी, डीव्हीडी, पेन ड्राइव्हच्या माध्यमातून शिकू शकता किंवा वेळ नसेल, तर इतर काम करताना फक्त ऐकूही शकता. अशी विविध माध्यमे सध्या बाजारात उपलब्ध आहेत. त्यातून काही कौशल्ये आत्मसात केलीत, तर नवं शिकण्यातली मजा वाढेल. ( Learning ability ) 

Back to top button