Interior Designer : ‘इंटेरियर डिझायनर’ मधील करिअरसंधी | पुढारी

Interior Designer : ‘इंटेरियर डिझायनर’ मधील करिअरसंधी

अनिकेत प्रभूणे

गेल्या काही वर्षांमध्ये घराच्या सौंदर्याविषयी आणि त्याच्या वैशिष्ट्यांविषयी अनेक घरमालक जागरूक झाले. आपण राहत असलेल्या घरामधील जागेचा परिपूर्ण उपयोग करून त्याची चांगली सजावट करण्यावर अनेक जण भर देऊ लागले. यामुळे घराच्या अंतर्गत सजावटीसाठी केवळ आर्किटेक्टवर अवलंबून न राहता विशेष इंटिरियर डिझायनर नेमण्याची सुरुवात झाली. घराच्या सौंदर्याकडे, सजावटीकडे बारकाईने लक्ष दिले जाऊ लागल्याने इंटिरियर डिझायनर या करिअरला विशेष मागणी आली असून त्यातील आपल्या कौशल्यानुसार प्रगतीची अमाप संधी उपलब्ध आहे. ( Interior Designer )

इंटिरियर डिझायनर नेमके काय करतो, याविषयी काही जणांच्या मनात शंका असते. आपण नव्या जागेमध्ये शिफ्ट होण्यापूर्वी घर संपूर्ण रिकामे असते, तेव्हा त्याचे व्हिज्युअलायझेशन करणे थोडे कठीण जात असते. अनेकदा आपण सजावटीच्या नावाखाली बाजारात एखादी चांगली दिसेल अशी वस्तू किंवा फर्निचर घरी आणतो. कधी कधी आपल्या तत्कालीक गरजांनुसार आपण फर्निचरची खरेदी केलेली असते, पण त्यामुळे घरामध्ये नुसतीच गर्दी झालेली असते. त्या फर्निचरच्या मांडणीमध्ये सौंदर्य दिसत नाही. नेमका इथेच इंटिरियर डिझायनर उपयुक्त ठरू शकतो.

आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जागेचा पुरेपूर उपयोग करणे, त्या जागेत राहणार्‍यांच्या सर्व गरजा भागतील, अशा पद्धतीने व्यवस्था करणे आणि त्या सर्व व्यवस्थेमध्ये एक सौंदर्यद़ृष्टीही दाखविणे हे इंटिरियर डिझायनरचे मुख्य काम आहे. या कामामध्ये आर्किटेक्टचर, प्रॉडक्ट डिझाईन आणि डेकोरेशनसारख्या शाखांमधील ज्ञानाचाही वापर करत असतो. इंटिरियर डिझायनरला रंगसंगती, थीमवरील डिझाईन आणि त्या व्यवस्थेचा घरात राहणार्‍यांना होणार्‍या उपयोग या सर्वांचेही भान असावे लागते. अशा इंटिरियर डिझायनरच्या हाती घर सोपविल्यानंतर आपले घर सुंदर आणि सुटसुटीत होईल, अशी ग्राहकाची अपेक्षा असते आणि ही अपेक्षापूर्ती करण्याचे दडपणही असते.

गेल्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीने घर सजावटीसाठी इंटिरियर डिझायनरचा वापर वाढला, तसतसे त्यामध्येही काही विशिष्ट शाखा तयार झाल्या. इंटिरियर डिझायनरचे औपचारिक शिक्षण घेत असतानाच किंवा प्रत्यक्ष काम करत असताना यात घर, व्यावसायिक किंवा लँडस्केप डिझायनिंग असे पर्याय उपलब्ध असू शकतात. याहीपलीकडे जात इंडस्ट्रीयल डिझायनिंग आणि अगदी बाथरूम, किचन आणि बेडरूमचे विशेष इंटिरियर डिझायनरही आता मिळू शकतात.

इंटिरियर डिझायनर होण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे कौशल्य म्हणजे तुमच्याकडे समोरच्याचे ऐकून घेण्याचा संयम हवा. ग्राहकाची नेमकी गरज काय, यासाठी तुम्हाला त्याच्याशी व्यवस्थित संवाद साधता येणे आवश्यक आहे. या गरजा समजून घेतल्यानंतरच काय काम करायचे आणि कसे करायचे याचे आडाखे बांधता येऊ शकतात.

त्याशिवाय, त्या जागेचा ग्राहक कशासाठी वापर करणार आहे, त्याचे प्राधान्य कशाला आहे आणि त्याचे बजेट किती आहे, याचाही विचार करणे आवश्यक असते. काही ठिकाणी कामाच्या जागेमध्ये काही बदल करणे गरजेचे असल्यास त्यासाठी आर्किटेक्ट किंवा इंजिनिअर्सशीही चर्चा करावी लागते.

उत्तम संवाद कौशल्याबरोबरच आपल्या डोक्यातील कल्पना आणि ग्राहकाच्या सूचना यांचे एकत्रीकरण करणे ही एक गोष्ट झाली, पण याचं साध्या भाषेतील सूचना अनेकदा प्रत्यक्ष काम करणारे गवंडी किंवा इतर कारागिरांना त्यांच्या नेहमीच्या भाषेत समजावून द्याव्या लागतात. तेही कौशल्य असणे गरजेचे असते.

औपचारिक शिक्षण कुठे?

काही विद्यापीठांमध्ये बॅचलर ऑफ फाईन आटैस् हा चार वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. अहमदाबाद येथे स्कूल ऑफ इंटिरियर डिझायनिंगमध्ये पाच वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रमही शिकविला जातो. यामध्ये प्रवेशासाठी बारावीमध्ये मॅथ्स/बायोलॉजी, फिजिक्स, केमेस्ट्रीसह किमान 55 टक्के गुण असणे गरजेचे आहे. याशिवाय, देशातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये एका वर्षाचा पार्ट टाईम अभ्यासक्रमही उपलब्ध आहे.

इंटिरियर डिझायनिंग या क्षेत्राचा भारतामध्ये वेगाने विस्तार होत आहे. चांगल्या इंटिरियर डिझायनर्सला भारतामध्ये चांगली संधी आहे. नव्याने पास-आऊट झालेल्यांना प्रस्थापित आर्किटेक्ट किंवा फर्म्समध्ये संधी मिळू शकते. खासगी डिझायनिंग संस्था किंवा खासगी क्षेत्रामध्येही इंटिरियर डिझायनरला मागणी आहे. यात स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचीही संधी असते. ( Interior Designer )

Back to top button