तरुणांसाठी व्यवसाय संधी | पुढारी

तरुणांसाठी व्यवसाय संधी

जगदीश काबरे

व्यवसायासाठी लागते धाडस, हिंमत, चिकाटी, दूरदृष्टी, महत्त्वाकांक्षा, माणसाची पारख, माणसे जोडण्याची कला, परिस्थितीप्रमाणे स्वतःमध्ये व स्वतःच्या कार्यपद्धतीत बदल करण्याची लवचिकता, उत्तम व्यवहार आणि मार्केटिंगचे कौशल्य. यापैकी प्रत्येकाकडे काही ना काही कोणतेतरी गुण असतातच.

व्यवसायासाठी लागणारा सर्वांत महत्त्वाचा गुण म्हणजे निर्णय घेण्याची व निर्णय राबविण्याची क्षमता. निर्णय चुकेल या भीतीपोटी अनेक जण निर्णय घेण्याचे टाळत तरी असतात किंवा चालढकल तरी करत असतात. तर बर्‍याच वेळा ही जबाबदारी इतरांवर सोपवली जाते. व्यवसायाबद्दल मराठी मनात जी नकारात्मक भावना आहे, ती दूर करणे आवश्यक आहे. अनेक कुटुंबांमध्ये तरुणांमधील निर्णयक्षमता मारली जात असते. कारण मुलांविषयीचे सर्व निर्णय पालक घेत असतात आणि मुलांना ‘होयबा’ बनवून ठेवतात. ही ‘होयबा’ मनोवृत्ती नोकरीसाठी ठीक असली, तरी व्यवसायासाठी नाही.

व्यवसायासाठी लागते धाडस, हिंमत, चिकाटी, दूरदृष्टी, महत्त्वाकांक्षा, माणसाची पारख, माणसे जोडण्याची कला, परिस्थितीप्रमाणे स्वतःमध्ये व स्वतःच्या कार्यपद्धतीत बदल करण्याची लवचिकता, उत्तम व्यवहार आणि मार्केटिंगचे कौशल्य. यापैकी प्रत्येकाकडे काही ना काही कोणतेतरी गुण असतातच. जे लोक मार्केटमध्ये शिरण्याचे धाडस दाखवतात, मार्केटमध्ये उभे राहण्याची जिद्द दाखवतात, मार्केटमध्ये टिकून राहण्याचे कौशल्य दाखवतात त्यांचे व्यवसाय सहसा कधी बुडत नसतात.

व्यवसायासाठी अजून एका गोष्टीची आवश्यकता असते… ती म्हणजे धोका पत्करायची तयारी. जे सदैव सुरक्षित वातावरणात वावरत असतात. त्यांच्यात धोका पत्करण्याची मानसिकता नसते; पण आपण रोजच्या आयुष्यात, पावलोपावली अनेक धोक्यांना सामोरे जात असतो.

धोका हा जीवनाचे अविभाज्य अंग आहे. ‘नो रिस्क, नो रिवॉर्ड’ म्हणजे धोका पत्करल्याशिवाय यश मिळत नाही. व्यवसायामध्ये ‘वाकेन, पण मोडणार नाही’, हे वाक्य महत्त्वाचे ठरते. मला आता जे मिळते आहे यापेक्षा जास्त मिळाले पाहिजे, या मनोवृत्तीनेच आर्थिक प्रगती होत असते. त्यामुळे व्यवसाय करणार्‍या माणसाने नेहमी या अर्थाने ‘असंतुष्ट’ राहिले पाहिजे.

जगात सध्या ज्या गतीने प्रगती होत आहे, तंत्रज्ञान त्या गतीने बदलत आहे. आपण आता करत असलेल्या कामाच्या स्वरूपात खूप बदल घडणार आहेत. त्यामुळे नोकर्‍यांची संख्या कमी होणार आहे आणि अत्यंतिक कौशल्याच्या नोकर्‍याच फक्त शिल्लक राहतील. उर्वरित लोकांना व्यवसाय करावे लागतील आणि व्यावसायिक संधी दिवसागणिक वाढत जातील.

ज्या प्रमाणात तुमचे कौशल्य, त्या प्रमाणात तुम्ही पैसे मिळवू शकाल. पण, ज्या लोकांची पडेल ते काम करायची तयारी आहे आणि जास्तीत जास्त उत्तम काय याचा जे विचार करतात, त्यांनाच या पद्धतीने व्यवसाय करता येईल.

तुम्ही आज जे करत आहात, भले कर्तव्य म्हणून जरी करत असला पण ते मनापासून करा. ते कधीही वाया जात नाही. हा विश्वास असायला हवा. जर तुमच्याकडे काही उत्तम कौशल्य असेल तर तुम्हाला कोणी तुमच्या जागेवरून हलवू शकत नाही. गुणवत्तेला जगात नेहमीच किंमत असते. गुणवत्ता संपादन करायला थोडा वेळ लागतो तो जर तुम्ही शांतपणे काढला, तर तुम्ही नक्कीच आनंदाने जगू शकता आणि आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्हाला शिकणे बंद करता येत नाही.

आर्थिक व्यवहार न समजणे, आर्थिक व्यवहार समजावून घेण्यामध्ये चालढकल करणे, हिशेब ठेवण्याची सवय नसणे, आर्थिक शिस्त नसणे, आर्थिक नियंत्रण नसणे, इतरांवर अतिविश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करणे, ही सगळी आर्थिक निरक्षरतेची लक्षणे आहेत. व्यवसाय हा शेवटी पैशांचा खेळ असतो, तो व्यवस्थित खेळता येणे आवश्यक असते. त्यामुळे आर्थिक साक्षरता वाढवणे गरजेचे आहे.

आता तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि तुमच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नसतील किंवा कमी पडत असतील, तर तुम्ही खालील योजनांचा लाभ घेऊ शकता. अशा परिस्थितीत जाणून घ्या त्या योजनांबद्दल, ज्यातून लोकांना निधी उपलब्ध होऊ शकेल…

मुद्रा योजना

ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी ही योजना खूप प्रभावी ठरली आहे. या योजनेत सरकार लोकांना कमी व्याज आणि कमी अटींसह व्यवसाय सुरू करण्यास देत आहे. यामध्ये शिशू, किशोर आणि तरुण या तीन श्रेणींमध्ये कर्ज दिले जाते.
शिशू मुद्रा कर्ज- 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज 1 ते 2 टक्के वार्षिक व्याजदर.
किशोर मुद्रा कर्ज- 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज 8.60 ते 11.15 टक्के वार्षिक व्याजदर.
तरुण मुद्रा कर्ज- 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज 11.15 ते 20 टक्के वार्षिक व्याजदर.
आतापर्यंत यात 27.28 कोटी खाती उघडण्यात आली असून, 68 टक्के महिलांना कर्ज देण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत 14.02 लाख कोटी रुपये कर्ज देण्यात आले आहे.

स्टँड अप इंडिया योजना

स्टँड अप इंडिया योजनेचा उद्देश नवीन प्रकल्पासाठी किमान एका अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या महिला कर्जदाराला प्रत्येक बँकेच्या शाखेतून 10 लाख ते 1 कोटी रुपयांचे कर्ज देणे आहे. यासोबतच सरकार महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमात आणि ओबीसींमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देत आहे. यामध्ये आतापर्यंत 1 पेक्षा जास्त व्यक्तींना लाभ मिळाला असून, 23,827 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे.

क्रेडिट गॅरंटी फंड योजना

सीजीएस ही एक सरकारी योजनेद्वारे व्यवसाय कर्ज दिले जाते. या योजनेद्वारे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी कर्ज दिले जाते. यामध्ये गॅरंटी कव्हरही देण्यात आले आहे. याद्वारे विविध स्तरांवर कर्ज दिले जाते. योजनेंतर्गत कोणतेही तारण न घेता 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देते.

कौशल्य विकास योजना

या योजनेंतर्गत लोकांना रोजगारासाठी फक्त कर्ज दिले जात नाही, तर ते कौशल्यपूर्ण म्हणून साजरे केले जातात. यामध्ये तरुणांना विविध क्षेत्रातील व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते, ज्यातून ते स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहेत. यासाठी अनेक कौशल्य विकास केंद्रेही सुरू करण्यात आली आहेत.

स्वानिधी योजना

सरकार प्रत्येक वर्गासाठी कर्ज योजना आणत आहे. या योजनेद्वारे देशातील रस्त्यावरील विक्रेत्यांना स्वतःचे काम नव्याने सुरू करण्यासाठी पैसे दिले जात आहेत. यामध्ये लोकांना छोट्या व्यवसायासाठी 10,000 रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते, जे एका वर्षात फेडावे लागते.

इतर योजना

सरकारने स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत, ज्यात व्हेंचर कॅपिटल योजना, एनसीईएफ पुनर्वित्त योजना, डेअरी उद्योजकता विकास योजना, आंतरराष्ट्रीय सहकार्य योजना इत्यादींचा समावेश आहे.

Back to top button