‘आयटीआर’ भरण्याची लगीनघाई | पुढारी

‘आयटीआर’ भरण्याची लगीनघाई

दरवर्षीप्रमाणे सर्वच नोकरदारांना आणि करदात्यांना जुलै महिना जवळ येताच आयटीआर भरण्याचे वेध लागतात. करदाते आता असेसमेंट इअर 2023-24 साठी रिटर्न ऑनलाइन भरू शकतात.

प्राप्तिकर विभागाच्या माहितीनुसार, आयटीआर-1 फॉर्म आणि आयटीआर-4 फॉर्म सध्या ऑनलाइन उपलब्ध आहे. आतापर्यंत हे अर्ज ऑफलाइनवर असायचे. अर्थात प्राप्तिकर विभागाने ट्विट करत या अर्जाची माहिती दिली आहे. करदात्यांना हे अर्ज भरणे सोपे आहे कारण या अर्जात बरीचशी माहिती भरलेली असणार आहे. आयटीआर भरणार्‍यांत सर्वाधिक संख्या ही नोकरदार आणि वैयक्तिक करदात्यांची असते. विनादंड आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. 31 जुलैनंतर दंड भरावा लागेल.

आयटीआर भरण्याची शेवटची तारीख

वैयक्तिक करदाते, एचयूएफ, असोसिएशन ऑफ पर्सन किंवा बॉडी ऑफ इंडिव्हिजुल्स तसेच ज्यांच्या खात्याचे ऑडिट करण्याची गरज नाही, अशांसाठी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे. ज्या व्यावसायिकांच्या खात्यांचे ऑडिट करण्याची गरज आहे, त्यांच्यासाठी आयटीआरची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे.

आयटीआर भरता आले नाही, तर आपण शेवटच्या तारखेनंतर रिटर्न दाखल करत असाल, तर आपल्याला प्राप्तिकर कलम कायदा ‘234 ए नुसार’ कर न भरलेल्या रकमेवर दरमहा एक टक्के दराने व्याज भरावे लागेल. तसेच कलम ‘234 एफ’नुसार 5 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. एकूण उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी असेल तर तो दंड हजार रुपयांचा होईल.

लॉस अ‍ॅडजेसमेंट : आपल्याला शेअर बाजार, म्युच्युअल फंड, प्रॉपर्टी किंवा एखाद्या व्यवसायात नुकसान सहन करावे लागत असेल, तर त्यास कॅरी फॉरवर्ड करू शकतो आणि ते पुढील वर्षाच्या उत्पन्नात अ‍ॅडजेस्ट करू शकतो. ही कृती प्राप्तिकर कमी करण्यात मदत करते. पण यासाठी ‘आयटीआर’मध्ये नुकसानीचा उल्लेख करायला हवा, तरच अ‍ॅडजेस्टमेंटला परवानगी दिली जाते. वेळेच्या अगोदर आयटीआर दाखल करणार्‍यांना अ‍ॅडजेस्टमेंटची मुभा मिळते.

बिलेटेड रिटर्न : शेवटच्या तारखेपर्यंत आयटीआर भरू शकत नसाल आणि त्यानंतर अर्ज भरत असाल, तर त्यास बिलेटेड रिटर्न असे म्हणतात. बिलेटेड रिटर्नमध्ये करदात्यांना दंड आणि व्याज भरावे लागते. मात्र नुकसानीला भविष्यात अ‍ॅडजेस्ट करण्याची परवानगी मिळत नाही. यावर्षी 31 डिसेंबर 2023 पर्यंत बिलेटेड आयटीआर भरू शकतो.

सुभाष वैद्य 

Back to top button