करिअर करा एसएमई बँकिंग क्षेत्रात  | पुढारी

करिअर करा एसएमई बँकिंग क्षेत्रात 

– जगदीश काळे

ए सएमई बँकिंग म्हणजे काय? : एसएमई बँकिंग म्हणजे स्मॉल अँड  मीडियम इंटरप्रायजेस बँकिंग. हे बँकिंग सेक्टर व्यापार्‍यांसाठी काम करते. देशात-परदेशात लहान, मोठा व्यवसाय करणार्‍यांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे काम करते. एसएमई जनरल बिझनेस फायनान्स मार्केट हे मुख्यकामाचे प्रतिनिधित्त्व करते. विशेष म्हणजे भारतात 
सुमारे दोन कोटी 60 लाखांहून अधिक स्मॉल अँड मीडियम इंटरप्रायजेस काम करत आहेत. एका 

सर्वेक्षणानुसार एसएमई भारताच्या जीडीपीत 10 टक्के योगदान देते आणि त्यात एसएमईला निधी देण्याचे कामही एसएमई बँकर करते. • एसएमई बँकर काय करतात? : एसएमई-बँकिंग हे एक बँकेचा मुख्य भाग मानला जातो. त्यात काम करणार्‍या बँकरसमोर अनेक जबाबदारी आणि आव्हाने असतात. एक एसएमई बँकरचे मुख्य काम फंडिंग करणे किंवा कर्जासाठी लहान व्यावसायिकांची  चौकशी करून त्याची विश्‍वासर्हता तपासणे होय. यानंतरच खातरजमा झाल्यावरच व्यावसायिकांना निधी प्रदान केला जातो. व्यवसायाबरोबरच रोजगार निर्मिती करण्यातही एसएमई महत्त्वाची भूमिका बजावते. 

एसएमई बँकरचा निर्णय हा व्यवसायाच्या द‍ृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. 

•रोजगाराची संधी : भारतात सध्या सरकारी बँकांबरोबरच बहुतांशी खासगी बँकांनी देखील एसएमईसाठी वेगवेगळ्या पातळीवर प्लॅटफॉर्म तयार केले आहेत, जेणेकरून लहान आणि मध्यमवर्गातील व्यावसायिकांना त्याचा भरपूर लाभ मिळेल. जसे आरबीआयचे ट्रेडएक्स, स्टेट बँक ऑफ इंडियाचे एसएमई कनेक्ट,चलन पुरवठा, एचडीएफसी एसएमई बँकिंग आदी. याशिवाय अनेक स्मॉल फायनान्स बँक देखील आपल्याकडे सुरू झाले असून जे की चांगल्या रोजगाराची संधी आपल्याला उपलब्ध करून देत आहेत.

•  पात्रता : पदवीधर किंवा कोणत्याही पदवी अभ्यासक्रमाला अंतिम वर्षात शिकत असलेला विद्यार्थी बँकिंग आणि फायनान्ससाठी अर्ज करू शकतो. विद्यार्थ्यांला किमान 50 टक्के गुण असणे गरजेचे आहे. या क्षेत्रातील वाढता विस्तार लक्षात घेता बीएससी (मॅथ-बायोलॉजी), बीए, बीबीए आणि इंजिनिअरिंगचे विद्यार्थी देखील रस घेत आहेत आणि यशस्वी होत आहेत. 

• उत्पन्‍न : जर आपण एसएमई बँकर म्हणून करिअर करत असाल तर आपल्याला प्रारंभी वीस ते तीस हजार वेतन मिळते. त्यानंतर जसजसा कामाचा आणि पदाचा अनुभव वाढत जाईल, तसतसे वेतनात वाढ होईल. ही वाढ साधारणत: दीड ते दोन लाखांपर्यंत पोहोचते. यासाठी आपले कौशल्य वाढवणे गरजेचे आहे आणि बँकेतंर्गत परीक्षाही उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 

•अभ्यासक्रम : ग्लोबल पीजी डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्सचा अभ्यासक्रम एक वर्षाचा असतो. यानुसार बँकिंग ऑपरेशन्स, निधी व्यवस्थापन, ट्रेड फायनान्स, फॉरेक्स, फायनान्स एसएमईसारखे अभ्यासक्रम शिकवले जातात. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्याला संगणकांची प्राथमिक माहिती शकवली जाते. त्याचबरोबर बाजारातील उलाढाल, शेअर बाजार यात कशाप्रकारे काम होते, याची माहिती दिली जाते. विद्यार्थी एक व्यावसायिक बँकर किंवा ट्रेडर कसा होऊ शकतो आणि कोणत्याही आपत्कालिन स्थितीत तो कशाप्रकारे काम करावे, याचेही प्रशिक्षण दिले जाते.  अभ्यास क्रमादरम्यान आपल्याला एसएमई बँकिंगचे बारकावे शिकवले जातात. हा अभ्यासक्रम आपल्या करिअरला पुढे नेण्यासाठी महत्त्वाचे काम करू शकतो. 

प्रमुख संस्था : 

• इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली
• मनिपाल युनिव्हर्सिटी, कर्नाटक
• सिम्बायसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, 

मुंबई  • टीकेडब्ल्यूएस इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स, नवी दिल्ली.
 

Back to top button