युवक नेतृत्व अभ्यासक्रम | पुढारी | पुढारी

युवक नेतृत्व अभ्यासक्रम | पुढारी

युवक हे समाजाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून ओळखला जातो. परंतु युवकांना पुरेशा संधी समाज निर्णय प्रक्रियेत दिल्या जात नाही. अपरिपक्वता, अनुभव शून्यता आणि कार्यक्षमता इ. प्रश्न युवकांबाबत उपस्थित करून त्यांना समाज निर्णय प्रक्रियेतून बाहेर केले जात असते. त्यामुळे अक्षम्य  हेळसांड, नकार आणि अविश्‍वास युवकांविषयी व्यक्‍त केला जातो. आजच्या माहिती व तंत्रज्ञानाचा महाविस्फोट झालेल्या युगात युवकच मोठ्या प्रमाणावर सामाजिक बदलांचा केंद्रबिंदू झाला आहे. युवकांच्या विशिष्ट गरजा व क्षमता यांच्याकडे विशेष लक्ष्य देण्याचा द‍ृष्टिकोन सध्या जगभरातील शासन निर्माते, शासनकर्ते  आणि समाज समूह यांनी स्वीकारल्याचे दिसून येते.

वर्ल्ड बँकेच्या शाश्‍वत विकास उद्दिष्ट 2017 नुसार जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 42 टक्के लोकसंख्या 25 वर्षे वयोगटातील युवकांची आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या 2014 च्या रिपोर्टनुसार, भारत हा सर्वाधिक युवकांची लोकसंख्या असणारा देश आहे. चीनपेक्षा थोडीच लोकसंख्या कमी असून 356 मिलियन्स 25 वर्षे वयोगटातील युवक लोकसंख्या सध्या देणगी मानली जाते. या आकडे चकित करणार्‍या, युवकांना ‘लोकसंख्या शास्त्रीय लाभांश’ (Demographic Dividend) म्हणून स्वीकारले जात आहे. अशा युवकांकडून अर्थव्यवस्थेला संभाव्य लाभ होऊन कृतिशील कार्यक्षम रोजगारनिर्मिती शक्य आहे. कामाची संधी, उत्पन्न निर्मिती यासारख्या क्रियेतून सामाजिक व आर्थिक विकास साधून उज्वल भविष्याची स्वप्ने पाहणे सहज शक्य आहे.

आजचा युवक तंत्रज्ञानाकडे विनाशक नव्हे, तर नवनिर्मितीकारक या उद्देशाने कृती करत आहे. त्यामुळे माहिती संपर्क जाळे वापरून  विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग करून मानवाचे अनेक प्रश्‍नांची सोडवणूक करण्यात युवक अग्रभागी आहे. समाजात यशस्वी होण्यासाठी मऊ किंवा मृदू कौशल्य (Soft Skills) व तंत्रज्ञानाच्या वापरासाठी कठीण कौशल्य (Hard Skills)  यांची सांगड तरुणांनी घातल्यास त्यांना समाजात आपले नेतृत्व सिद्ध करता येईल. आज भारतातील अनेक युवक परदेशात जाऊन आपली कार्यक्षमता सिद्ध करीत आहे. मायक्रोसॉफ्ट, गुगल, सिटी बँक इ. जगप्रसिद्ध कंपनीच्या प्रमुख कार्यकारी अधिकारीपदी भारतीय वंशाच्या नागरिकांची झालेली नेमणूक ही युवकांची उद्यमशीलता व नेतृत्व विकास झाल्यामुळेच  केली गेली असल्याचे दिसते.

केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या  ‘राष्ट्रीय युवा सशक्‍तीकरण कार्यक्रम’ (RYSK) अंतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. नेहरू युवा केंद्र संगठन (NYKS) राष्ट्रीय युवा संगठन (NYC) राष्ट्रीय विकास कार्यक्रम युवक व किशोरवयीन विकास (NPY-D), आंतरराष्ट्रीय सहकार्य (International Co-operation -IC), युवक वसतिगृह (YH), राष्ट्रीय युवक नेतृत्व विकास कार्यक्रम  (NYLP), राष्ट्रीय शिस्त योजना (NDS), राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि राजीव गांधी राष्ट्रीय युवक विकास संस्था (RYNIYD) असे उपक्रम यशस्वी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित युवकांची आवश्यकता भासणार आहे.

ही गरज ओळखून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, मुंबई व छ. शाहू इन्स्टिटयूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च (सी सायबर) कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवक नेतृत्व आणि सामाजिक बदल’ हा सर्टिफिकेट व डिप्लोमा प्रोग्रॅम मुंबईशिवाय प्रथमच दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरात सुरू करण्यात आला आहे. सर्व वयोगटातील कुठल्याही शाखेचा 12वी उत्तीर्ण विद्यार्थी- विद्यार्थिनींना या इंग्रजी माध्यमाच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येईल.  सर्टिफिकेट प्रोग्राम अंतर्गत पहिल्या सत्रात युवक ओळख आणि मानवी विकास, नागरीकत्व आणि सहभाग, युवकांचे धोरण, उपक्रम, योजना  आणि सेवा, शिक्षण आणि उपजीविका, युवकांची शाश्वत नेतृत्व कौशल्य, सामाजिक विकासासाठी सहभागी शिक्षण पद्धती असे सहविषय आहे. तर पुढील 6 महिन्यांतील दुसर्‍या सत्रात ‘युवक आणि लैंगिकता’, ‘युवक आणि गुन्हेगारी’ हे विषय व प्रात्यक्षिक स्वरूपात प्रकल्प अहवाल असे विषय समाविष्ट करण्यात आले आहेत.

या अभ्यासक्रमातून युवकांमध्ये मानवी आत्मसन्मान, सामाजिक न्याय, अहिंसा, लोकशाही सहभाग, शाश्वतता, समानता, विविधता, लोक केंद्रितता, भेद विरहीतता या सारख्या मूल्यांचा विकास होणार आहे.

अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर विदयार्थ्यांना शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी आणि इतर संस्थांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. शिक्षण क्षेत्रासोबतच, आरोग्य, पोषण, आहार, क्रीडा, हक्क, विकास, आर्थिक क्षेत्रात विविध स्तरावर काम करण्याची संधी उपलब्ध होईल.

Back to top button