MPSC : तयारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 2 CSAT | पुढारी

MPSC : तयारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 2 CSAT

राज्यसेवा पूर्व परीक्षेमधील सर्वात महत्त्वाचा विषय तसेच पूर्व परीक्षेच्या निकालामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारा पेपर म्हणजे CSAT होय. याचे विस्तृत स्वरूप म्हणजे Civil Services Aptitute Test उमेदवार जेव्हा प्रशासनात काम करतील तेव्हा त्यांना वेगवेगळ्या अडचणींना तसेच प्रसंगांना सामोरे जावे लागते. यासाठी उमेदवाराकडे काही विशिष्ट तार्कीक, बौद्धीक वा प्रसंगावधान, वेळेचे नियोजन यांसारखी कौशल्ये असणे अभिप्रेत असते. ही कौशल्ये तपासण्याचे काम आयोगामार्फत या पेपरच्या माध्यमातून होते. मात्र, या पेपरविषयी बर्‍याच उमेदवारांमध्ये भीतीचे वातावरण असते. किंबहुना जे उमेदवार विज्ञान शाखेचे नाहीत त्यांच्यासाठी हा पेपर म्हणजे तारेवरची कसरत ठरते. मात्र, या पेपरविषयी योग्य ज्ञान व आयोगाचा कल यांच्या जोडीला विशिष्ट तयारीची व नियोजनाची जोड दिल्यास आपणास चांगले गुण प्राप्‍त होतात. याविषयी आपण आज या लेखात चर्चा करू.

पेपरचे स्वरूप व अभ्यासक्रम : 

MPSC साठी हा पेपर गुणवत्ता यादी बनविताना विचारात घेतला जातो तर UPSC साठी मात्र तो फक्‍त पात्रता पेपर म्हणून विचारात घेतला जातो. या गोष्टी उमेदवारांनी स्पष्ट करून घ्याव्यात.

हा पेपर एकूण 200 गुणांसाठी असून 80 प्रश्‍न त्यासाठी विचारण्यात येतात. यासाठी उमेदवाराकडे 2 तास वेळ असतो. जरी 2 तासात फक्‍त 80  प्रश्‍न सोडविण्याचे असले तरीदेखील उमेदवाराची कसोटी असते. यासाठी खालील गोष्टींचा समावेश होतो.

–Comprehension, Interpersonal skills including communication skills, Logical Reasoning and analytical ability, Decision making and problem solving, General Mental ability, Basic Numeracy, Marathi and English Language comprehension skills.  म्हणजेच हा पेपर तांत्रिक स्वरूपाचा असून यासाठी जास्तीत जास्त सराव आवश्यक असतो. मागील काही वर्षांच्या प्रश्‍नपत्रिका व उमेदवारांशी चर्चा केल्यास पुढील गोष्टी निदर्शनास आल्या.या पेपरविषयी उमेदवारांचे बरेच चुकीचे पूर्वग्रह असतात, पेपरविषयी नाहक भीती, दिलेल्या वेळेत पेपर पूर्ण होत नाही, परीक्षेच्या अगोदर फक्‍त 10-15 दिवसांत तयारी करणे, नकारात्मक द‍ृष्टिकोन.अशा प्रकारे आयोगाचा या पेपरकडून काय अपेक्षा आहेत हे उमेदवारांनी समजावून घेणे अनिवार्य ठरते.

पूर्ण पेपरचा विचार केल्यास जवळपास 50 प्रश्‍न हे फक्‍त comprehension  या घटकावर विचारतात आणि उरलेले 30 प्रश्‍न इतर घटकांवर तसेच अंदाजे 3-5 प्रश्‍न हे Decision Making यावर असून यासाठी नकारात्मक गुणपद्धत विचारात घेतली जात नाही. comprehension म्हणजे उतारे सोडविणे त्यासाठी उतारे वाचून त्यातील अर्थ समजावा व उत्तरे द्यावीत, यासाठी वर्तमानपत्रामधील विविध विषयांसाठीचे संपादकीय सरावासासठी वापरावेत. Logical reasoning यासाठी तर्क व अनुमान याचा वापर करावा तसेच बुद्धीमत्ता चाचणी या प्रकारच्या प्रश्‍नांत आकृत्यांविषयीचे प्रश्‍न विचारले जातात तर अंकगणित यामध्ये मूलभूत आकडेमोड व इतर गणितीय कौशल्ये तपासली जातात. उमेदवारांनी उतारे यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यावी ती म्हणजे मराठी व इंग्रजी या विषयांचे ज्ञान तपासण्यासाठीचे अंदाजे दोन उतारे हे फक्‍त त्या संबंधित भाषेतच असतात. मात्र, उरलेले सर्व उतारे अंदाजे आठ ते दोन्ही भाषेत दिलेले असतात.

वरील सर्व चर्चेवरून एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे या पेपरसाठी जेवढा जास्त सराव करू तेवढे जास्त गुण प्राप्‍त होतात.

Back to top button