नवीन नोकरी मिळवताना… | पुढारी | पुढारी

नवीन नोकरी मिळवताना... | पुढारी

राधिका बिवलकर

कोणत्याही कारणाने नोकरी सोडण्याची वेळ आली तर मानसिक त्रास होणे स्वाभाविक आहे. कारण, या स्थितीचा आर्थिक उत्पन्नावर परिणाम होतो. अशावेळी लवकरात लवकर दुसरी नोकरी पाहण्यासाठी घाई केली जाते. आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी असंख्य तडजोडी करत नवीन नोकरी स्वीकारली जाते. परंतु, प्रत्यक्षात हाती काहीच लागत नाही. या आधारावर संबंधित व्यक्तीची दररोजची जीवनशैली बिघडते आणि ते तणावाखाली येतात. या स्थितीचा मुकाबला करण्यासाठी काही टिप्स् सांगता येतील. यामुळे नवीन नोकरी शोधण्यासही हातभार लागेल. 

आत्मविश्वास डळमळीत नको : नोकरी गेल्यानंतर व्यक्ती भावनिकदृष्ट्या हळवा होतो आणि एकाकी पडल्याची भावना निर्माण होते. अशा स्थितीत आजपर्यंत जे सोबत होते, ते सोडून गेलेले असतात. अशावेळी संबंधित व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचतो आणि हताश होतो. परंतु, अशा गोष्टींवर मात करण्यासाठी आत्मविश्वास कायम ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येक वाईट दिवसानंतर चांगला दिवस हा येतोच, हे लक्षात घ्यावे. अर्थात, त्याचा कालावधी कमी जास्त प्रमाणात राहू शकतो. त्यामुळे या स्थितीला सकारात्मकतेने पाहावयास हवे. सकारात्मक ऊर्जा निर्माण करणार्‍या गोष्टींचे वाचन करावे. आपल्याअंगी प्रेरणा, आत्मविश्वास निर्माण करणार्‍या गोष्टींचा विचार करावा. 

संकटाकडे संधी म्हणून पाहा : आपले आयुष्य शेअरबाजाराप्रमाणे आहे. ते कधीच स्थिर नसते. शेअर बाजाराची काल उच्चांकी तर आज निच्चांकी पातळी असते. परंतु, दीर्घकाळाचा विचार केल्यास शेअर बाजार हा सर्वांनाच लाभदायी ठरला आहे. या आधारावर जीवनातील चांगले वाईट दिवस हे संधी म्हणूनच पाहावयास हवे. विद्यमान नोकरी हा आपला शेवटचा टप्पा नव्हता, हे लक्षात घ्यायला हवे. आपण कोणते काम चांगल्या रितीने करू शकतो, याचा विचार करायला हवे. त्यासंबंधी कामाचा शोध घ्या. जर आपण नोकरी करू इच्छित असाल तर नोकरीचा शोध घ्या, जर व्यवसाय करायचा असेल तर आवडीचा व्यवसाय सुरू करा. 

उणिवांचा शोध घ्या : नव्याने करिअर सुरू करताना तत्पूर्वी सर्वांनी आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. आपल्या अंगी असणार्‍या उणिवा, दोष यांचा शोध घ्या. या उणिवा दूर केल्यास आपल्या प्रगतीतील अडथळे कमी होतील. गरज भासल्यास नवीन कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करा आणि आपली प्रतिभा अधिक उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करा. 

अपडेट राहा : नोकरी गमावल्यानंतरही नवनवीन गोष्टी शिकण्याबाबत आग्रही राहा. सध्याच्या काळानुसार स्वत:ला अपडेट करत राहा. आपल्या कार्यक्षेत्राशी निगडीत नवीन टुल्स, नवीन तंत्रज्ञान, नवीन गोष्टी शिकत राहण्याचा प्रयत्न करा. नवीन नोकरीसाठी आणि नवीन सुरुवात करण्यासाठी अपडेट ज्ञान उपयुक्त ठरेल.

राग नियंत्रित ठेवा : काहीवेळा नोकरी गमावण्यास सहकारीदेखील कारणीभूत ठरतात. त्यामुळे त्या लोकांवर राग येणे साहजिकच असते. मात्र, त्यावर नियंत्रण ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. रागाच्या भरात असा कोणताही निर्णय घेऊ नये की, त्याचा परिणाम करिअरवर होऊ शकतो. संतापाच्या भरात घेतलेल्या निर्णयामुळे आपल्याविषयी नकारात्मक प्रतिमा उभी राहू शकते. या आधारावर नवीन नोकरीचा शोध घेताना अडचणी येऊ शकतात. 

खर्चांवर नियंत्रण : नोकरी गेल्यावर घरची आर्थिक स्थिती बिघडू शकते. अशावेळी नोकरीच्या काळात सुरू असलेला वायफळ खर्च बंद करावा. आवश्यक खर्चाची यादी तयार करून त्यानुसार प्लॅनिंग करा. बजेट नव्याने तयार करून खर्चाला आवर घाला. या स्थितीवर मात करण्यासाठी नोकरीवर असतानाच काही पैसा बाजूला काढून ठेवण्याची सवय अंगिकारावी. त्यास ‘इमजरन्सी फंड’ असेही म्हणतो. साधारणपणे, आपत्कालिन स्थितीत तीन महिने खर्च भागवणारा हा फंड असावा. दोन ते तीन महिन्यांचे वेतन बाजूला काढून ठेवल्यास नवीन नोकरी मिळेपर्यंत या फंडाच्या आधारे घर खर्च चालवणे सोयीचे जाते. याशिवाय अनावश्यक खर्चांना फाटा द्यावा. हॉटेलिंग, फिरायला जाणे, सिनेमा आदी गोष्टी टाळाव्यात.

Back to top button