MPSC : महाराष्ट्र  गट ‘क’ सेवा परीक्षा -2020 | पुढारी

MPSC : महाराष्ट्र  गट ‘क’ सेवा परीक्षा -2020

प्रा. सुजित गोळे

प्रस्तुत परीक्षेमार्फत गट ‘क’ संवर्गातील पुढील तीन पदे भरण्यात येतात. दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कर सहायक, लिपिक टंकलेखक इ.

अर्हता :

1) शैक्षणिक : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने विहीत केलेली समतुल्य अर्हता. उमेदवारास मराठी लिहिता, वाचता व बोलता येणे अनिवार्य आहे. तसेच पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे उमेदवार हे पूर्व परीक्षेस पात्र राहतील. मात्र, मुख्य परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

2) या व्यतिरिक्त प्रत्येक पदानुसार काही विशिष्ट अर्हता खालीलप्रमाणे :

अ) दुय्यम निरीक्षक :
पुरुष उमेदवार : उंची किमान 165 सेंमी (अनवाणी). छाती-किमान 79 सेंमी आणि फुगवून 5 सेंमीचा जास्तीचा फरक.
महिला उमेदवार : उंची – किमान 155 सेंमी (अनवाणी), वजन – किमान 50 कि. ग्रॅ.

ब) कर सहायक व लिपिक टंकलेखक यासाठी टंकलेखन अर्हता.
कर सहायक : मराठी-30 व इंग्रजी-40 शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
लिपिक टंकलेखक : मराठी-30 याचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र अथवा शासनाने घोषित केलेले समकक्ष प्रमाणपत्र.
इंग्रजी – 40 याचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र अथवा शासनाने घोषित केलेले समकक्ष प्रमाणपत्र.

परीक्षेचे टप्पे :

टप्पा पहिला : पूर्व परीक्षा :

प्रस्तुत तीनही पदांसाठी एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाते. यासाठी उमेदवारांना आपण कोणत्या पदांसाठी इच्छुक आहोत यासंबंधी माहिती/विकल्प द्यावे लागतात. पूर्व परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असल्याने एक चतुर्थांश नकारात्मक गुण पद्धती अस्तित्वात असते. पूर्व परीक्षेत जे उमेदवार पास होतात, त्यांना मुख्य परीक्षेस पात्र करतात.

टप्पा दुसरा : मुख्य परीक्षा

मुख्य परीक्षेमध्ये एकूण दोन पेपर असतात. यापैकी पेपर क्रमांक 1 हा सामाईक घेण्यात येतो. त्या अनुषंगाने सर्व पदांसाठी सदर पेपर एकाच दिवशी व एकाच वेळी घेण्यात येतो. मात्र, पेपर क्रमांक 2 हा पदाची कर्तव्ये व जबाबदारी लक्षात घेऊन स्वतंत्र प्रकारात होतो.

अशा प्रकारे प्रत्येक पदासाठी पेपर क्र. 1 व पेपर क्र. 2 यांचे गुण एकत्र करून स्वतंत्र निकाल जाहीर केला जातो.

प्रस्तुत परीक्षेत सर्वाधिक गुण धारण करणार्‍या उमेदवारांच्या एकूण गुणांच्या खालीलप्रमाणे किमान गुण प्राप्त करणारे उमेदवार शिफारशीसाठी पात्र असतील.

1) अमागास – किमान 35 शतमत, 2) मागासवर्गीय – किमान 30 शतमत, 3) विकलांग – किमान 20 शतमत, 4) अत्युच्च गुणवत्ताधारक पात्र खेळाडू – किमान 20 शतमत, 5) माजी सैनिक – किमान 20 शतमत.

अशा प्रकारे उमेदवारांची निवड केली जाते.

Back to top button