श्वासागणिक स्वत:मध्ये बदल करा | पुढारी | पुढारी

श्वासागणिक स्वत:मध्ये बदल करा | पुढारी

तान्हाजी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणारे शरद केळकर यांचा अभिनयातील प्रवास सोपा नव्हता. सदोष आवाजामुळे त्यांना मालिकेतूनही काढले गेले होते. मात्र, त्यांनी मेहनत घेतली आणि स्वत:मध्ये बदल घडवून आणला. आज त्यांची गणना यशस्वी कलाकारांत होते. ग्वाल्हेरसारख्या शहरातून मुंबईत यशाची पायरी चढणारे शरद केळकर यांनी अनेक चढउतार पाहिले. तरीही त्यांनी हार मानली नाही. 

मुंबईला सुरुवातीच्या काळात दहा बारा जणांसह एका टू बीएचके फ्लॅटमध्ये राहणारे शरद केळकर यांना काम मिळत नव्हते. कारण ते अडखळत बोलत होते. प्रारंभीच्या काळात जाहिराती करायचे. सरावातून त्यांनी अडखळत बोलण्यावर मात केली आणि अभिनयात आमूलाग्र बदल केला. याबाबत त्यांनी त्यांचे काही अनुभव शेअर केले. ते म्हणतात, जेव्हा मी लहान होतो, तेव्हा अडखळत बोलण्याचा त्रास होता. कालांतराने मला एक टीव्ही मालिका मिळाली. पहिल्या पाच दिवसात मला एक किंवा दोनच संवाद बोलायचे होते. मात्र, सहाव्या दिवशी मला एक पानच हाती दिले. मी वेड्यासारखा दिवसभर सराव करत होतो. तरीही जेव्हा कॅमेरा समोर आला, तेव्हा मी गडबडून गेलो आणि पुन्हा अडखळत बोलू लागलो. सुमारे 30 रीटेक केल्यानंतर ती भूमिका माझ्याकडून काढून घेण्यात आली. 

मी खूप निराश झालो. मला संधी मिळत होती, पण ती मला घेता येत नव्हती. कालांतराने माझ्या उणिवांवर मी मात करायला शिकू लागलो. श्वास घेण्याची पद्धत मी बदलली आणि त्याचा अभ्यास करत राहिलो. आज मला अभिनयाबरोबर आवाजाचे देखील कौतुक होत आहे. 

शरद केळकर हे फिजिकल एज्यूकेशनमध्ये पदवीधर आहेत. ते 23 वर्षांचे असताना त्यांना लवकरात लवकर काम करायचे होते. आईसाठी जीवन सुसह्य करण्याची त्यांची इच्छा होती. लहानपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यांच्या आईने त्यांना लहानाचे मोठे केले. कालांतराने ते एका क्लबमध्ये जिम इन्स्ट्रक्टर बनले. तेथे अडीच हजार रुपये मिळत होते. यादरम्यान, मुंबईत एका नातेवाईकाकडे गेले असता त्यांना रॅम्पवर चालण्यासाठी 5 हजार रुपये मिळाले. मॉडेलिंगदेखील चांगले काम आहे. एमबीएनंतर त्यांनी एका टेलिकॉम कंपनीत काम सुरू केले. परंतु, त्यांना मुंबईत जाण्याची इच्छा होती. मुंबईत नशिबाची परीक्षा पाहू असे ठरविले. आईनेदेखील परवानगी दिली. मॉडेलिंगमध्ये काम मिळाले नाही तर फिटनेस इंडस्ट्रीत काम करू, असे त्यांनी ठरविले. 

उणिवांवर मात

शरद केळकर म्हणतात, की जेव्हा एखादा मुलगा अडखळत बोलत असेल तर त्याला त्रास देऊ नका. लहानपणी केळकर यांना अनेकजण खूप चिडवायचे. जेव्हा तो बोलण्याचा प्रयत्न करायचा, तेव्हा लोक त्याला गप्प करायचे. त्यामुळे शरद यांना कधी कधी संताप अनावर व्हायचा आणि ते लोकांना मारायचे आणि चावा घ्यायचे. काही दिवसांनी त्यांनी श्वासावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आणि बोलण्यात सुधारणा झाली. 

स्वत:ला बांधून घेतले नाही : करिअरच्या पहिल्या पाच वर्षापर्यंत मी टेलिव्हिजनवर केवळ रोमान्स करत होतो. 2004 मध्ये काम आणि पैशासाठी संघर्ष केला. सुरुवातीला सीआयडी मालिकेत पोलिसाची भूमिका दिली. ही मालिका खूपच लोकप्रिय ठरली होती. मात्र, तु आता कन्फर्ट झोनमध्ये आहेस, असे लोक केळकर यांना म्हणू लागले. त्यामुळे ही मालिका त्यांनी तीन महिन्यात सोडली. त्यांना एकाच ठिकाणी थांबायचे नव्हते. पुढे जायचे होते. 

Back to top button