एक्स्पोर्ट मॅनेजरचे करिअर | पुढारी | पुढारी

एक्स्पोर्ट मॅनेजरचे करिअर | पुढारी

अपर्णा देवकर

निर्यात हा देशाच्या विकासातील एक महत्त्वाचा भाग होेत आहे. निर्यातीमुळे परकीय चलनात वाढ होते. जागतिकीकरणानंतर जग जवळ आले तशी निर्यातीतही वाढ होत आहे. वाढत्या आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे निर्यात म्हणजेच एक्स्पोर्ट वाढते आहे. त्यामुळे निर्यात व्यवस्थापनालाही महत्त्व आले आहे. त्यामुळेच निर्यात व्यवस्थापकांसाठी संधींची 

कमतरता नाही. 

भारत सध्या निर्यातीतही प्रगतीपथावर असलेला देश आहे. जागतिकीकरणामुळे निर्यातीचा आवाका वाढल्याने सध्या भारतात निर्यात व्यवस्थापन आणि लॉजिस्टिक्स या दोन्हीमधील तज्ज्ञ प्रशिक्षित व्यक्तींची गरज पूर्वीपेक्षा अधिक आहे. भारत व्यापारात त्यातही निर्यातीत अग्रेसर देश असल्यामुळे आयात-निर्यात व्यवस्थापन क्षेत्रातील योग्य व्यावसायिक व्यक्तींना प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. या क्षेत्रात करिअरची भरारी घेण्यास वाव आहे. 

शैक्षणिक पात्रता आणि अभ्यासक्रम : आयात-निर्यात व्यवस्थापनामध्ये पदव्युत्तर शिक्षणही उपलब्ध आहे. त्यामध्ये विविध अभ्यासक्रम आहेत. डिप्लोमा इन एक्स्पोर्ट – इम्पोर्ट मॅनेजमेंट, सर्टिफिकेट कोर्स इन एक्स्पोर्ट – इम्पोर्ट मॅनेजमेंट, मास्टर्स प्रोग्राम इन इंटरनॅशनल बिझिनेस, पीजी म्हणजे पदव्युत्तर अभ्यासक्रमात पीजी इन इंटरनॅशनल मार्केटिंग आदी क्षेत्रात अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. 

आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार सर्टिफिकेट, डिप्लोमा किंवा पदव्युत्तर म्हणजे पीजी डिप्लोमा अशा अभ्यासक्रमांना आपण प्रवेश घेऊ शकतो. निर्यात व्यवस्थापनाशी निगडीत बहुतांश अभ्यासक्रमांसाठी कमीत कमी पदवी उत्तीर्ण पात्रता आवश्यक असते. 

कोणत्याही शाखेचे विद्यार्थी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतात. सर्वोच्च संस्थांमध्ये या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते, तरच प्रवेश मिळू शकतो. लॉजिस्टिक्स संबंधित अभ्यासक्रम करूनही या क्षेत्रात वाव मिळू शकतो. त्यासाठी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर लॉजिस्टिक संबंधित अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. 

संधी कोठे आणि कशा : अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एक्स्पोर्ट किंवा निर्यात व्यावसायिक कंपन्यांमध्ये निर्यात विभागात, एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल, एक्स्पोर्ट हाऊसेस, ट्रेडिंग हाऊसेस, कार्गो क्लिअरिंग अँड हँडलिंग एजंटस्, मेरिन इन्शुरन्स कंपनी, पॅकेजिंग इंडस्ट्री किंवा उद्योग, लॉजिस्टिक कंपन्या आदींमध्ये नोकरीच्या संधी मिळू शकतात. सुरुवातीला अनुभव घेऊन त्यानंतर स्वतःची कंपनीदेखील सुरू करता येते. 

प्रमुख शैक्षणिक संस्था :

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड, नवी दिल्ली आणि कोलकाता www.iift.edu

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एक्स्पोर्ट अँड इम्पोर्ट मॅनेजमेंट, मुंबई www.iieim.org

एशियन कौन्सिल लॉजिस्टिक मॅनेजमेंट, कोलकाता www.asianclm.com

सीआयआय इन्स्टिट्यूट ऑफ लॉजिस्टिक, चेन्नई www.ciilogistics.com

जेके बिझनेस स्कूल, गुडगाव www.jkbschool.org

सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिझनेस, पुणे www.siib.ac.in

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एक्सपोर्ट मॅनेजमेंट, बंगळुरू www.iiem.com

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट मॅनेजमेंट, अहमदाबाद www.iiiem.in 

Back to top button