कंपनी सेक्रेटरी : सन्मानजन्य करिअर! | पुढारी

कंपनी सेक्रेटरी : सन्मानजन्य करिअर!

अवंती कारखानीस

कोणत्याही कंपनीत कंपनी सेक्रेटरीची जबाबदारी जोखमीची असते. त्याला कंपनीशी निगडित नियम आणि कायद्यात होणार्‍या बदलाची माहिती असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कंपनी सेकेटरीचे संवादकौशल्य देखील चांगले असणे गरजेचे आहे. काळानुसार बाजारात कंपनी सेक्रेटरीची मागणी वाढत चालली आहे. आजकाल युवकांत कंपनी सेके्रटरी म्हणून करिअर करण्याची क्रेझ वाढू लागली आहे. कारण, या क्षेत्रात करिअर करताना मान-सन्मानाबरोबरच कमाई देखील चांगली होते. कोणत्याही कंपनीला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी कंपनी सेक्रेटरीचा मोठा वाटा असतो. कंपनी सेक्रेटरीला कंपनी सचिव असे देखील म्हटले जाते. 

भारतात पाच कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या कंपनीत कायमस्वरूपी कंपनी सचिव किंवा कंपनी सेक्रेटरीची नियुक्ती करणे अनिवार्य आहे. म्हणूनच देशात कोट्यवधींची उलाढाल करणार्‍या कंपनीचे संचालक मंडळ, कौन्सिल, असोसिएशन, फेडरेशन, अ‍ॅथॉरिटी किंवा आयोग या पात्र कंपनी सेक्रेटरीचा शोध घेताना दिसतात. भारतात उद्योग व्यवसायाच्या वाढत्या पसार्‍यामुळे कंपनी सेक्रेटरीची मागणी वाढत चालली आहे. त्याचवेळी कंपनी सेक्रेटरीच्या मागणीत देखील वाढ झाली आणि त्यात सतत भर पडत आहे. कंपनी सेक्रेटरीच्या जबाबदारीबाबत आणखी माहिती जाणून घेऊ या. 

कंपनी सेक्रेटरीची जबाबदारी

* कंपनी सेक्रेटरी हे खासगी क्षेत्रातील कंपनी आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्थेतील उच्च पद मानले जाते. 

* कंपनी सेक्रेटरीला कंपनीची कायदेशीर आणि प्रशासकीय जबाबदारी सांभाळण्याचे काम असते. 

* कंपनी सेक्रेटरी हा बोर्ड ऑफ गव्हर्नन्स, शेअरधारक, सरकार आणि अन्य एजन्सीत ताळमेळ बसवण्याचे काम करत असतो. 

* कंपनी सेक्रेटरी हा संचालक आणि चेअरमनला आवश्यक सूचना देतो आणि त्यांना जबाबदारीबाबत माहिती देण्याचे काम करतो. ही जबाबदारी पाळताना कंपनीतील वातावरण चांगले राहील आणि कंपनीच्या विकासाला चालना कशी मिळेल याबाबत तो सजग असतो.

* कंपनी सेक्रेटरीला कॅपिटल मार्केट, कॉर्पोरेट लॉ, सुरक्षा कायदा आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्सचीदेखील माहिती असते. त्यामुळे कंपनीच्या कायदेशीर निर्णयातदेखील त्याचा हस्तक्षेप असतोे.
* कंपनी सेक्रेटरीला मॅनेजमेंट आणि फायनान्समध्ये प्रावीण्य असावे लागते. त्यामुळे तो कॉर्पोरेट प्लानर आणि रणनीती मॅनेजरच्या रूपाने काम करत असतो. 
* तसे पाहिले तर एक कंपनी सेक्रेटरीची जबाबदारी ही कायद्याचे पालन करण्याबरोबरच कंपनीला कौशल्याने पुढे नेण्याचीही असते. 

कंपनी सेक्रेटरीचे वेतन

कंपनी सेक्रेटरीवर मोठी जबाबदारी असते. तो कोणत्याही कंपनीतील प्रमुख हिस्सा मानला जातो. म्हणूनच वेतन देखील जबाबदारीनुसार असते. सरकारी आणि खासगी कंपन्यांत सुरुवातीला कंपनी सेक्रेटरीचे वेतन दोन ते तीन लाखांच्या आसपास असते. तो मल्टिनॅशनल कंपनीत पाच ते सहा लाख वेतन घेऊ शकतो. जसजसा अनुभव वाढेल तसतशी कंपनी सेक्रेटरीची सॅलरीदेखील वाढत जाते. यात अनुभव आल्यानंतर वार्षिक 15 ते 20 लाखांपर्यंत वेतन जाते. याशिवाय कंपनी सेक्रेटरी हा सल्लागार म्हणून देखील व्यवसाय करू शकतो. त्यात तो चांगली कमाई करतो. अशावेळी एका सुनावणीसाठी तो 20 ते 25 हजारापासून 70 ते 75 हजारांपर्यंत वेतन मिळू शकते. कंपनी सेक्रेटरीचे काम खूपच महत्त्वाचे आणि जोखमीचे असते. त्याला कंपनीशी निगडित वेळोवेळी नियमात होणार्‍या बदलाची माहिती असणेदेखील गरजेचे असते. 

त्याचबरोबर कंपनी सेक्रेटरीचे संवादकौशल्य चांगले असणे गरजेचे आहे. काळानुसार कंपनी सेक्रेटरीला मागणी वाढली असून त्याची व्याप्तीही रुंदावत चालली आहे. 

Back to top button