मोबाईल नंबर | पुढारी | पुढारी

मोबाईल नंबर | पुढारी

डी. एच. पाटील, म्हाकवे

आकाश भरून आलं होतं. वारा मात्र गायब झाला होता. अंगाची लाही लाही होत होती. गेले चार दिवस सखातात्याला पाऊस हुलकावणी देत होता. आज मात्र आभाळाचा ढंग वेगळाच वाटत होता. झाडांची पानं मृतदेहासारखी स्तब्ध होती. उन्हाचा चरका मात्र जोरात होता. पाण्याचा डुरा बघून वितभर जीभ बाहेर काढून पळणारी कुत्री पाण्याच्या झर्‍यामध्ये शिरत होती. तात्यानं एक वेळ आभाळाकडं बघितलं. तसं पठाराकडील बाजूस विजेचा जोराचा लखलखाट झाला अन् ती कडाडली. ‘आयला, ही बया कुठंतरी पडली असणार,’ असं म्हणून तात्यानं समोरची कुर्‍हाड उचलून खोपीच्या म्होरं टाकली. बाहेर बघत त्यानं चिलीम भरली. चिलीम दोन्ही पायांच्यामध्ये धरून त्याने काडी पेटवली. तोंडात चिलीम धरून तो ओढू लागला. चिलमीतून निघणारा धूर त्याचा नातू रामा कौतुकानं बघत होता. ‘आजा, पप्पा चिलीम ओढत नाहीत, सिगारेट ओढतात. तुम्ही का ओढत नाही?’ असा त्यानं प्रश्‍न केला. तसा तात्या म्हणाला, ‘सत्तरी गाठली, आता कुठली सिगारेट?’ असं म्हणत त्यानं पुन्हा बाहेर पाहिलं. ‘पूर्वेकडील बाजूस आभाळ भरून आलं होतं. अकोळ, ममदापूरला पाऊस पडत असणार, आता इथं यायला कितीसा वेळ?’ तो उठला. ‘म्हातारी घरला येईपर्यंत दोन पाण्याच्या घागरी तरी आणूया’ म्हणून त्यानं घागरी घेतल्या.

सोनाराची विहीर जवळच होती. लहानपणापासून तात्या या वरलीवरच राहायचा. अगदी नवीन लग्‍न होऊनही तात्या वाडीवर यायचा. तो विहिरीजवळ गेला. तशी एका मोठ्या वानरानं आंब्याच्या झाडावर उडी मारून हुक्‍की दिली. तसं थोड्याशा अंतरावर असणार्‍या झाडावरही वानरांनी गलका केला. त्यामुळे पिकलेले दोन चार आंबे खाली पडले. तात्यानं घागरी खाली ठेवल्या. चार आंबे गोळा करून तो पुढच्या आंब्याच्या झाडाकडं गेला. तो पुढे जाईलं तसं त्याला आंब्याची हाव सुटली. तो बर्‍याच अंतरावर आला. शेजारीच चौगुल्याची विहीर होती. जवळून जाताना त्याचं लक्ष विहिरीत गेलं अन् त्याला काहीतरी जाणवलं. विहिरीत एक पोत्याचं गठूळं दिसत होतं. ते पाहत असतानाच वीज कडाडली अन् जोरात पावसाचं थेंब पडू लागलं. तीन-चार थेंब  तात्याच्या डोक्यात-तोडांवर पडले तसा तो माघारी वळला. खोपीत येऊन त्यानं आंब्यानं भरलेला धोतराचा सोगा रिकामा केला अन् नातवाला घेऊन त्यानं गाव गाठलं. पाऊस जोरात कोसळत होता. वळीवच तात्याला आडवा तिडवा झोडपू लागला. हातात नातवाला धरून तात्यानं घरं गाठलं. शनिवार असल्यानं सुट्टीवर असलेल्या आणि आता झोपलेल्या आपल्या मुलाला त्यानं उठविलं. तात्याच्या मुलानं पोलिस पाटलांचं घर गाठलं. माहिती मिळताच पोलिस पाटलांनी पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांना घेऊन पोलिस पाटील विहिरीवर आले. विहिरीतील पोत्याचं गठूळं बाहेर काढलं. पंचाच्या समक्ष पोतं सोडण्यात आलं. पोत्यामधून एका महिलेचा मृतदेह बाहेर पडला. मृतदेह कुजला होता. मात्र विहीर शेतवडीत असल्याने लोकांचा फारसा संपर्क नव्हता. मृतदेहाचं लचकं जलचरांनी तोडलं होतं. पंचनामा करून मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी सुरुवात केली. गावातील बरीच मंडळी जमली होती मात्र मयत स्त्री गावातील नव्हती. त्यामुळे पोलिसांनी  आजूबाजूच्या गावांत चौकशी केली. अंधार पडू लागला होता. वळवाचा तडाखा आता शांत झाला होता. तात्यानं मात्र आज वस्तीवर जाणं टाळलं. त्याच्या मनात अनामिक भीती लागून राहिली होती. चार दिवस होऊनही मृतदेहाची ओळख पटली नव्हती; त्यामुळे पोलिसांनी बेवारस म्हणून मृतदेह दहण करण्याचा विचार पक्‍का केला. शेवटचा काही पुरावा मिळतो का हे पाहण्यासाठी विहिरीचा परिसर शोधण्याचा पोलिसांनी निर्णय घेतला. सखातात्याला सोबत घेऊन पोलिस घटनास्थळाचा परिसर शोधू लागले. शोध घेत असताना विहिरीच्या बाजूला एका कागदावर काहीतरी आकडे लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली. चिठ्ठीतील नंबर हा काय सांगतो यावरून तपासाची चक्रे फिरणार होती. पोलिसांनी तो नंबर पुन: पुन्हा पाहिला. त्यावरून तो कुणाचा तरी मोबाईल नंबर असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

पोलिसांनी त्या क्रमांकावर फोन लावला. मात्र तो बंद अवस्थेत होता. दोन दिवसानंतर तो मोबाईल चालू झाला. पोलिसांनी लोकेशन तपासले. ते एका मोबाईल शॉपीचे ठिकाण होते. दुकानदाराकडे चौकशी केल्यानंतर त्याने ‘महादेव खतकर नावाची व्यक्‍ती मोबाईल दुरुस्त करण्यासाठी देऊन गेला असून ते सीमकार्ड घेऊन गेला आहे.’असे सांगितले.

पोलिस पत्ता घेऊन तिथे पोहचले. पोलिसांना पाहताच महादेव घाबरला, ‘साहेब, काय झाले?’ असा प्रश्‍न त्याने केला. पोलिसांनी मोबाईल नंबर दाखविताच तो आपलाच असल्याचे त्याने  कबूल केले. हा आपला नंबर पद्मजा गवळी हिला दिला असल्याचे सांगितले.

पद्मजा गवळी ही भाजीवाली खेड्यातील भाजी घेऊन शहरात विकत होती. महादेवच्या शेतातील भाजीपाला तो  पद्मजाला देत होता. त्यामुळेे ओळख झाली होती. त्या दिवशीही ती गडबडीत होती. ‘परभणीला जायचे आहे’ असे म्हणत होती. पोलिसांनी पद्मजाविषयी बाजारपेठेत चौकशी केली मात्र पद्मजाचे रेकॉर्ड खराब असल्याचे समोर आले. पहिल्या पतीची दोन मुले सोडून ती पळून आली होती. दुसर्‍या पतीबरोबरही तिचे फार काळ पटले नाही. त्यालाही सोडून ती परभणीत राहत होती.

परभणीत आल्यानंतरही तिचे इश्काचे खेळ सुरूच होते. परंतु अनैतिकतेला नियती कधीतरी तडाखा देतेच! तिचा इश्काचा खेळ रंगात आला होता. आजकाल ती मकबुल नावाच्या व्यापार्‍याबरोबर फिरताना दिसत होती. मकबुल तिच्या सौदर्यावर घायाळ झाला होता. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचा खेळ रंगात आला होता.

बाजारपेठेतून तिच्या संपकार्र्त आलेल्या सर्वांना पोलिसांनी उचलले. प्रत्येकाची चांगलीच धुलाई केली. मात्र प्रत्येकानं आपण तिच्याकडून पैशाला लुबाडलो गेलो असल्याची कहाणी सांगितली. पैैसा संपला. खेळ संपला. त्यामुळे मकबुलवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले. ‘आपले नाजूक संबंध होते मात्र आता आपण तिच्या संपर्कात नाही’ हे तो सांगू लागला. पाहुणचार देऊनही तो कबूल होत नव्हता. पोलिसांनी साध्या वेशामध्ये बाजारात पाळत ठेवली. मात्र तिथेही काहीच हाताला लागेना. मात्र पोलिसांनी चिकाटी सोडली नाही. 

तीन दिवस पोलिस बाजारात फिरत होते. आज पुन्हा वळवाचा पाऊस दिसत होता. सोसाट्याचा वारा बाजाराची दैना उडवत होता. विजेने सलामी दिली अन् पाऊस कोसळू लागला. व्यापार्‍यांनी मारलेल्या टपरीत बाजारातल्या माणसांचे घोळके उभारले होते. त्यात पोलिसही होते. तेवढ्यात एक संभाषण पोलिसांच्या कानी पडले, ‘अरं, त्या पदमीचं मारेकरी सापडंना म्हणे.’

‘सापडत्यात. जात्यात कुठं? मकबुलला ठेचा म्हणावं, बघा कसं वकतंय. त्यादिवशी बेणं गाडीवरनं घेऊन गेलतं तवापासनंच गायब हाय ती.’ पोलिसांना काय समजायचं ते समजलं. सायंकाळ होत आलेली. पाऊस थोडासा उघडला होता. 

पोलिसांनी रात्रीच मकबुलला पुन्हा स्टेशनला आणलं. चांगला ठोकला. मार असह्य झाल्याने, ‘साहेब, मीच मारलं तिला…’ असं म्हणून ओरडू लागला. ‘पद्मजा बाजारात यायची. भाजीपाला विकायची. माझ्या टेम्पोमधून वेगवेगळ्या बाजारात ती फिरायची. त्यातूनच आमची ओळख झाली. आम्ही प्रेमात पडलो. ती मला लग्‍नाची घाई करू लागली मात्र माझ्या बायकोला मी तलाक देऊ शकत नव्हतो, त्याचा मला पश्‍चाताप होऊ लागला अन् मी तिला संपवण्याचा निर्णय घेतला.’

‘त्यादिवशी तिला मी गाडीवरून घेऊन जंगलात गेलो. तिथे आमची पुन्हा बाचाबाची झाली. मी तिचा गळा आवळला. माझ्या गाडीत असणार्‍या पोत्यातच तिचा  मृतदेह कोंबला अन् पोते घेऊन दुसर्‍या गावात पोहचलो. रात्र झाली होती. एक आडवस्ती मला माहीत होती. तेथून पुढे असणार्‍या विहिरीत पोते टाकून मी पसार झालो.’

‘तू पसार झालास अन् सापडलाही.  प्रत्येक गुन्हेगाराला वाटतं आता माझा गुन्हा पचळा. पण कायद्याचे हात नेहमीच लांब असतात. तुझ्या कर्माची फळे आता तुला भोगावीच लागणार.’

असं म्हणून पोलिसांनी त्याला कोठडीत टाकला. रितसर गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयाने त्याला शिक्षा ठोठावली.

Back to top button