वाईट नजर | पुढारी | पुढारी

वाईट नजर | पुढारी

गौरव अहिरे, नाशिक

ऊसतोडणीच्या हंगामात मुकादमाचा निर्घृण खून झाल्याने ऊसतोडणी कामगारांमध्ये दहशत पसरली होती. कोणालाही मारेकर्‍याबद्दल माहिती मिळत नव्हती. पोलिसही मारेकर्‍याच्या शोधात उसाचे मळे पिंजून काढत होते. मात्र मारेकरी मोकाटच होता. अखेर पोलिसांच्या नजरेत मारेकरी आला आणि त्यास जेरबंद करीत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यापर्यंत पाठपुरावा केला.

जिल्ह्यात परराज्यातील ऊसतोडणी कामगार कुटुंबासह आले होते. हंगामात दोन पैसे मिळतात त्यामुळे ऊसतोडणीसाठी आबालवृद्ध आले. त्यांना घेऊन येणारा नितीन हा मुकादम होता. तोच सर्व कामगारांना पगारही द्यायचा आणि उसनवार पैसेदेखील. त्यामुळे कामगारांचाही नितीनवर विश्वास बसला होता. मात्र अचानक मध्यरात्री नितीनचा खून झाला होता. मारेकर्‍याने त्याच्या पोटात धारदार शस्त्राने वार केल्याने नितीनचा मृत्यू झाला होता. सकाळी ही घटना उघडकीस येताच कामगार वर्गात घबराटीचे वातावरण पसरले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच कामगारांमध्ये चौकशी सुरू केली. मात्र ठोस माहिती मिळत नव्हती. श्वान पथकाने मारेकर्‍याचा माग दुसर्‍या मळ्यापर्यंत दाखवला, मात्र मळ्याच्या बाहेर गेल्यानंतर श्वान घुटमळला. त्यामुळे मारेकरी वाहनाने दुसर्‍या ठिकाणी गेल्याचा अंदाज पोलिसांनी लावला. 

नितीनचा खून झाला त्यावेळी त्याच्या जवळपास एका कुटुंबातील पाच भाऊ आणि त्यांची बहीण राहत होते. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांच्याकडूनही ठोस माहिती मिळत नव्हती. पोलिसांना मारेकर्‍याचा अंदाज येत नव्हता. पोलिसांनी इतर कामगारांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. नितीनचे कोणासोबत वाद झाले होते का, त्याचा स्वभाव, याबाबत माहिती मिळवली. मात्र नितीनचा वाद कोणासोबतच नसल्याचे बहुतेकांनी सांगितले. तसेच नितीनच्या स्वभावाबद्दलही नकारात्मक  माहिती समोर आली नाही. त्यामुळे मारेकर्‍याने नितीनला का मारले हा प्रश्न अनुत्तरीतच होता. त्यातच पोलिसांना माहिती मिळाली की, नितीनकडून पाच भावडांनी काही पैसे उसने घेतले होते, ते नितीन मागत होता. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा पाच भावंड व त्यांच्या बहिणीकडे चौकशी केली. त्यांनी पैसे घेतल्याची कबुली दिली, मात्र नितीनला मारले नाही असे सांगितले. 

पोलिसांनी हरतर्‍हेने प्रयत्न करूनही भावडांसह बहिणीने खून केला नसल्याचीच री ओढली. श्वानानेदेखील खून झाला त्या ठिकाणाहून दुसर्‍या मळ्याचा रस्ता दाखवल्याने नितीनचे मारेकरी हे भावंडे नाहीत हे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी सर्व कामगारांची चौकशी करण्याचे ठरवले. कोणीही कामगार बेपत्ता नसल्याने पोलिसांसमोर पेच निर्माण झाला होता. एक-एक करीत जवळपास सर्व मळे तपासून पोलिस एका मळ्यात गेले. तेथे नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांचे जाळे टाकले. सर्व कामगारांना एकत्र बोलवून तुमच्यापैकीच एक जण नितीनचा मारेकरी आहे असे सांगितले. या ठिकाणी मात्र पोलिसांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला. एक कामगार खाली बघून पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवत होता. पोलिसांनी त्याला ओळखले आणि बाजूला नेत चौकशी केली. त्याने स्वत:चे नाव रवी सांगितले. रवीने सुरुवातीस ‘काही केले नाही’ असाच बचावात्मक पवित्रा घेतला. मात्र पोलिसांच्या प्रश्नांच्या भडिमारासमोर तो टिकला नाही आणि त्याने खून केल्याची कबुली दिली.काही वेळ जमिनीकडे एकटक बघत रवीने घटनाक्रम सांगण्यास सुरुवात केली. रवी आणि नितीनची बहीण कमला यांचे लग्न ठरले होते. ऊसतोडणी झाल्यानंतर दोघेही विवाह करणार होते. दरम्यान, कमलाच्या पाचही भावडांनी नितीनकडून पैसे उसने घेतले होते, मात्र ते परत करू न शकल्याने नितीन त्यांच्याकडे पैशांचा तगादा लावत होता. त्यातच नितीनने पाचही भावडांकडे ‘पैसे देण्याऐवजी कमला द्या’ असा संतापजनक प्रस्ताव ठेवला होता. 

पाचही भावडांचा संताप झाला होता, मात्र पैशांअभावी त्यांनी नमते घेतले. त्याचा गैरफायदा नितीनने घेतला. त्याने संधी मिळेल तेव्हा कमलाला त्रास देण्यास, छेडछाड करण्यास सुरुवात केली. त्या त्रासाला कंटाळून कमलाने याची माहिती रवीला दिली. रवीला हे ऐकून संताप झाला. त्याने नितीनचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. रवीने मध्यरात्री झोपलेल्या नितीनचे तोंड दाबून पोटात विळ्याने वर्मी वार केला. 

त्यातच नितीनचा मृत्यू झाला होता. वासनांध वृत्तीमुळे नितीनला जीव गमवावा लागला, तर संतापी वृत्तीमुळे रवीला जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागली.

Back to top button