अम्माने शोर मचाया इसलिये… | पुढारी | पुढारी

अम्माने शोर मचाया इसलिये... | पुढारी

 रविकिरण.. मूळचा बिहारचा.. कामाच्या शोधात तो अलीकडेच अलिबागला आलेला… शिंदे आजींच्या मुलीचं लग्न झाल्यानंतर एकट्याच राहायच्या… रविकिरणही शिंदे आजींच्या घराच्या बाजूला भाड्याच्या खोलीत राहायचा.. एकटी आजी असल्याने रविकिरण त्यांना मदत करायचा.. आजींनाही तेवढाच त्यांचा आधार वाटायचा.. आजींची मुलगी वसुधा येऊन-जाऊन असायची.. पण तिच्या संसारामुळे तिलाही फारसा वेळ मिळायचा नाही. मात्र, रविकिरण आजींना मदत करीत असल्याने वसुधालाही फार चिंता नसायची.. असेच एक दिवस आजी आपले दागिने पाहत घरात बसल्या होत्या… तेवढ्यात रविकिरण तिथे आला… दागिने पाहून तो अवाकच झाला… त्याला बघून आजींनी त्वरेने आवरा- आवर केली.. ‘काय रे रवि.. आता कसा काय आलास?’ आजी.. ‘आज लवकर आलो घरी.. कंटाळा आला म्हणलं, अम्माकडे जावं.. तुम कुछ काम कर रही हो क्या?’.. रविकिरणने तिला चाचरतंच विचारलं… ‘अरे काम नाही.. जरा दागिने पॉलिश करून घेईन म्हणते.. आता माझे काही फार दिवस राहिले नाहीत.. पॉलिश करून सगळे दागिने लेकीला देईन म्हणते…’ आजी रविकिरणला सांगत होत्या… ‘मे लेके जाऊँ क्या? आपको क्यू तकलीफ…’, ‘अरे नको.. वसुधा येणार आहे 4 दिवसांनी.. तिलाच सांगेन..’ असं म्हणून आजींनी विषय संपवला.. थोडा वेळ गप्पा मारून रविकिरण आपल्या खोलीत आला.. आणि झोपला…

काही दिवसांनंतर रविकिरणच्या जोरजोरात रडण्याचा आवाज ऐकून गावातील लोक गोळा झाले… समोर पाहतात तर काय.. शिंदे आजी निपचित पडल्या होत्या..  घरातलं सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं… कोणालाच काही कळेना.. कोणीतरी आजींच्या मुलीला वसुधाला फोन करून कळवलं.. एकाने पोलिसांनाही कळविलं.. घटनेचं गांभिर्य लक्षात घेऊन इन्स्पेक्टर वाघमारे आपल्या टीमसोबत आजींच्या घरी पोहोचले.. घराची अवस्था पाहून प्रथमदर्शनी चोरीचा अंदाज पोलिसांनी लावला.. तेवढ्यात वसुधा आली.. आपल्या आईला अशा अवस्थेत बघून तिचं अवसानच गळालं.. आईच्या नावाने ती टाहो फोडायला लागली… थोड्या वेळाने वसुधा शांत झाल्यावर इन्स्पेक्टर वाघमारेंनी तिच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. ‘तुमचा कोणावर संशय? आजींचा खून चोरीच्या उद्देशाने झालाय असा आमचा अंदाज आहे.. त्यामुळे तुमचा कोणावर संशय असेल तर सांगा..’ वसुधा रडत रडतच म्हणाली.. ‘साधी होती हो माझी आई.. कोण का मारेल तिला…’ 

वसुधाची अवस्था पाहून इन्स्पेक्टर वाघमारेंनी चौकशी थांबविली..आजींजवळ बसलेल्या रविकिरणकडे एकदा पाहिलं…‘हे कोण?’ ‘हा आमच्या शेजारी राहतो रविकिरण.. आईला मदत करायचा नेहमी.. हा होता त्यामुळे मलाही फार काळजी नव्हती आईची..’ वसुधाने सांगितलं.. रविकिरणकडे एक कटाक्ष टाकून पोलिस तिथून निघाले… दुसर्‍या दिवशी पोलिस पुन्हा आले आणि त्यांनी आजूबाजूला चौकशी करू लागले.. गावात तसं आजींचं फारसं कोणाशी बोलणं व्हायचं नाही.. पण दोन घरं पुढे राहणार्‍या म्हात्रे काकूंशी आजी नेहमी बोलायच्या, असं पोलिसांना समजल्याने त्यांनी तातडीने म्हात्रे काकूंना चौकशीसाठी बोलावलं..  

‘हं… बोला काकू.. आजींबद्दल आम्हाला खरं सांगा काय ते..’ इन्स्पेक्टर वाघमारेंनी त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.. ‘खूप चांगल्या होत्या हो शिंदे आजी.. वसुधाची खूप काळजी करायच्या.. वसुधाही 2-4 दिवसांतून त्यांना भेटायला यायची.. त्यांचं औषध पाणी वेळेवर करायची.. तिने कधीच आजींना वार्‍यावर सोडलं नाही..’.. म्हात्रे काकू सांगत होत्या.. ‘बरं हा रविकिरण कसा माणूस आहे? आणि तो का इतकी मदत करायचा आजींना?’ इन्स्पेक्टर वाघमारेंनी एकदम विचारलं… म्हात्रे काकू जरा चाचरल्या.. आणि मग बोलायला लागल्या.. ‘साहेब, हा रविकिरण आमच्या गावातला नाहीये.. तो बाहेरून आलाय.. कुठून माहीत नाही.. पण मला काही तो फारसा आवडत नाही… पण तो आजींना खूप मदत करायचा.. म्हणून मी पण काही बोलले नाही आजींना कधी…’

म्हात्रे काकूंचं बोलणं ऐकून इन्स्पेक्टर वाघमारेंच्या मनात संशयाची पाल चुकचुकली.. त्यांनी रविकिरणचा शोध घेण्यास सुरुवात केली.. आजींच्या खुनाच्या दुसर्‍या दिवशीच रविकिरण गाव सोडून निघून गेला असं पोलिसांना समजलं… गावातही त्याच्याबद्दल फारसं कोणाला माहीत नव्हतं.. इन्स्पेक्टर वाघमारेंनी वसुंधाला बोलावून घेतलं.. तिच्याकडे रविकिरणचा मोबाईल नंबर होता.. पण तो बंद लागत होता.. वसुधाने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी रविकिरण जिथे काम करत होता.. तिथून त्याची माहिती काढली… 

बिहारमधल्या त्याच्या गावाचं नाव समजल्याने पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सोपे झाले.. इन्स्पेक्टर वाघमारेंनी त्वरित तिथल्या स्थानिक पोलिसांनी कळवून रविकिरणला ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या.. दोनच दिवसांत रविकिरणच्या मुसक्या आवळून त्याला अलिबाग पोलिस ठाण्यात आणण्यात आलं… इन्स्पेक्टर वाघमारेंनी पोलिसी हिसका दाखविल्यानंतर रविकिरण पोपटासारखा बोलायला लागला… ‘साहाब.. हमको मारना नही था अम्मा को.. सिर्फ उनका जेवर चोरी करना था.. लेकिन रात मे जब हम चोरी करने गये.. तब वो उठके शोर मचाने लग गयी.. इसलिये हम मार डाले अम्मा को…’ 

दुर्दैवाने एका परक्या व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवल्याने शिंदे आजींना आपला जीव गमवावा लागला…

 

Back to top button