मनपात तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न | पुढारी | पुढारी

मनपात तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न | पुढारी

कोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा

महापालिकेत गुरुवारी दुपारी एका तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. अखेर अग्‍निशामक दलाचे जवान व पोलिसांनी त्याला रोखले. आनंदा कृष्णात करपे (रा. कसबा बावडा) असे त्याचे नाव असून तो शेतकरी आहे. नगररचना विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे आपण कर्जबाजारी झालो आहोत. वारंवार मागणी करूनही अधिकारी टीडीआर देण्यास दिरंगाई करत आहेत. आयुक्‍तांना भेटून निवेदन देऊन पाठपुरावा केला, तरीही टीडीआर मिळालेला नाही. परिणामी, आपल्यासमोर मरण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे त्याने महापालिका अधिकार्‍यांना सांगितले. या घटनेमुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली.

करपे याने यापूर्वी आयुक्‍तांना निवेदन देऊन आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानुसार करपे दुपारी बाराच्या सुमारास महापालिकेत आला. त्याच्याजवळ  बाटल्या होत्या. अग्‍निशमन दलाचे जवान त्याच्या पाळतीवर होते. त्याची नजर चुकवून तो महापालिका इमारतीत तिसर्‍या मजल्यावर गेला. जवान त्याच्या मागे गेले. अखेर जवानांच्या हाती लागू नये म्हणून तो पळून गेला. महापालिका इमारतीतून रस्त्यावर आला. अगिशामक दलाचे जवान येताच त्यांना पाहून करपे पुन्हा पळून गेला. सुमारे अर्धा कि.मी. पळून गेल्यानंतर जवानांनी त्याला पाठलाग करून पकडून आणले. तोपर्यंत पोलिसही महापालिकेत आले. करपे याची आयुक्‍त डॉ. मल्‍लिनाथ कलशेट्टी यांच्याशी भेट घालून दिली. त्यानंतर करपे याला पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल ताब्यात घेतले.

करपे याने यापूर्वी आयुक्‍त डॉ. कलशेट्टी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की रि. स. नं. 943/अ/2/2 ई वॉर्ड या मिळकतीमधील 30.00 मी. रुंद रस्त्याने बाधित क्षेत्राचा टीडीआर स्वरूपात मोबदला मिळण्याची मागणी केली होती. त्या प्रस्तावास 10 मे 2019 ला फर्स्ट स्टेज मंजुरी दिली. त्यास अनुसरून लेटर ऑफ इंटेन्टद्वारे सहायक संचालक यांनी अटी व शर्तींची पूर्तता करण्याविषयी कळविले. तसेच उपशहर अभियंता यांच्या मार्गदर्शनासाठी रस्ते विकसन करण्याविषयी नमूद केले होते. टीडीआर नियमावलीत मिळकतधारकाने रस्ते करून देण्याची तरतूद नसतानाही 75 लाख 79 हजार 434 रु. रकमेचे रस्ते विकसन आमच्यावर लादले. परंतु, मोबदला मिळेल या आशेने आम्ही ते विकसन पूर्ण केले, तरीही महापालिकेने कब्जेपट्टीने ते क्षेत्र ताब्यात न घेतल्याने व वेळीच मोबदला न दिल्याने आम्ही आर्थिक संकटात सापडलो आहोत.

शासनाच्या जलसंधारण विभागाच्या 3 मे 2018 च्या निर्णयानुसार कलम 11 मध्ये ब्ल्यू लाईन क्षेत्रात विकसनाच्या बाबत जलसंधारण विभागाच्या परवानगीची गरज नाही, तरीही पाठपुरावा केल्यास आम्हाला जलसंधारण विभागाचा नाहरकत दाखला मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे तोंडी सांगण्यात आले. टीडीआर मागणीसाठी विकास आराखड्यातील आरक्षित क्षेत्र अधिग्रहण करणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. सर्व नियमांचे व नियमबाह्य अटींचे पालन करूनही आरक्षित क्षेत्राची कब्जेपट्टी व मोबदला देण्याची कार्यवाही न करून आमची फसवणूक केली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

आत्मदहनाची स्टंटबाजी…

करपे याला अग्‍निशामक दलाच्या जवानांनी पकडून महापालिकेत आणले. अग्‍निशामक दलप्रमुख रणजित चिले यांनी त्याला पेट्रोलच्या बाटल्या कुठे आहेत, माझ्याकडे दे… असे सांगितले. त्यावर करपे याने कुठल्या पेट्रोलच्या बाटल्या, असा प्रतिप्रश्‍न केला. तसेच त्या पेट्रोलच्या बाटल्या नव्हत्या, पाण्याच्या बाटल्या होत्या, असे सांगितले. महापालिकेतून पळून जाताना त्या बाटल्या रस्त्यात कुठेतरी पडल्याचेही त्याने सांगितले. एकूणच वातावरण बघता करपे याने आत्मदहनाची स्टंटबाजी केल्याची चर्चा अग्‍निशामक दलाचे जवान व पोलिसांत सुरू होती. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठीच त्याने स्टंटबाजी केल्याची शक्यता व्यक्‍त केली जात होती.

Back to top button