कांदा लागवड : पाणी किती अंतराने द्यावे? जाणून घ्या अधिक | पुढारी

कांदा लागवड : पाणी किती अंतराने द्यावे? जाणून घ्या अधिक

बेभरवशाच्या पावसामुळे पिके धोक्यात आली आहेत. काही ठिकाणी अतिपावसामुळे हानी झाली आहे, तर काही ठिकाणी पावसाने ओढ दिल्यामुळे संकट ओढावले आहे. शेतकर्‍यांकडे पाण्याचा अल्प प्रमाणात का होईना राखीव साठा असतो. परंतु, या साठ्याचा केव्हा आणि कसा उपयोग केला म्हणजे त्याचा पिकांना जास्तीत फायदा होऊ शकतो, हे माहीत असणे गरजेचे आहे.

कांद्याची मुळे जमिनीत वरच्या 10 ते 12 सें.मी. थरामध्ये असतात. त्यामुळे कांद्याच्या पिकाला नियमित पाणीपुरवठा फारच आवश्यक असतो. कांद्याच्या रोपांना मूळ धरल्यानंतर पाण्याची गरजही वाढते. कांदा पोसायला लागल्यानंतर पाण्याचा ताण पडू देऊ नये. कारण, या काळात पाण्याचा खंड पडला आणि त्यानंतर पाणी पुन्हा सुरू केले, तर कांद्यात जोडकांद्याचे प्रमाण वाढते आणि कांद्याच्या वरच्या पापुद्य्राला तडा जातो. नंतर असे कांदे गिर्‍हाईक पसंत करीत नाहीत. अशा कांद्याची साठवणूक क्षमता कमी असते. याशिवाय अशा कांद्याला काढणीनंतर लगेच कोंब येतात.

कांद्याच्या पिकाला एकदम जास्त पाणी दिल्यास पात काढते, माना जाड होतात; मात्र कांदा लहान राहतो. कांद्याच्या पिकाला द्यावयाचे पाण्याचे प्रमाण आणि दोन पाण्यांतील अंतर हे पिकाच्या वाढीची अवस्था, लागवडीचा हंगाम आणि जमिनीचा प्रकार यांवर अवलंबून असते. म्हणून लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. त्यानंतर खरीप हंगामात पावसाच्या पडण्यानुसार जमिनीचा मगदूर आणि हवामान लक्षात घेऊन पाणी द्यावे. रब्बी हंगामात 10 ते 12 दिवसांनी तर उन्हाळी हंगामात 7 ते 8 दिवस अंतराने पाणी द्यावे. सर्वसाधारणपे खरिपात 4 ते 5 पाळ्या, रांगडा हंगामात 12 ते 14 पाळ्या लागतात.

ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास पाण्याची 30 ते 35 टक्के बचत होते आणि उत्पन्‍नात 20-30 टक्के वाढ होतेे. तसेच कांद्याची वाढ पूर्ण होऊन माना पडू लागल्यानंतर काढणीपूर्वी 20 -25 दिवस अगोदर पाणी देणे बंद करावे. त्यामुळे कांद्याच्या पातीतील रस कांद्यात उतरून कांदा घट्ट होतो आणि पापुद्रा सुकून काढणीच्या वेळी कांद्याला इजा होत नाही आणि असा कांदा साठवणुकीत चांगला टिकतो; पण जर कांदा काढणीपर्यंत पिकाला पाणी देणे सुरू राहिर्लेें तर कांदा सडतो, त्याची मान जाड राहते, नवीन कोंब निघू लागतात आणि असा कांदा साठवणीत जास्त काळ टिकत नाही.

Back to top button