नारळ लागवड आणि व्यवस्थापन | पुढारी

नारळ लागवड आणि व्यवस्थापन

नारळ हे बागायती पीक असल्याने पाण्याची सोय असल्यास नारळाची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते.

त्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार मशागत करावी लागते. जसे रेताड जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता शेणखताचा वापर करून वठवायला हवी. तर काळ्या चिकट जमिनीत पाण्याचा निचरा होण्यासाठी वाळूचा तसेच सेंद्रिय खतांचा वापर करावयास हवा. त्याचप्रमाणे शेताच्या बांधावर देखील नारळाची लागवड करता येते. त्यासाठी बांधाची रुंदी आवश्यक तेवढी ठेवणे गरजेचे आहे. कोकणात डोंगरउतारावरील जमिनीत पाण्याची सोय आहे तेथे नारळाची यशस्वी लागवड होऊ शकते. सुधारलेल्या खार जमिनीतही नारळाची लागवड करता येते. नदीकाठाच्या जमिनीत पावसाळ्यात पाणी काही काळ आत शिरते. अशा जमिनीत पावसाचा जोर ओसरल्यानंतर म्हणजेच ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये लागवड करावी.

नारळ लागवडीसाठी एक वर्ष वयाची रोपे निवडावीत. रोपांचा बुंधा आखूड व जाड असावा. एक वर्ष वयाच्या रोपांना पाच ते सहा पाने असावीत. रोपे निरोगी व जोमदार असावीत. रोपे खात्रीशीर रोपवाटिकेतून खरेदी करावीत. दोन झाडांमधील अंतर योग्य असणे गरजेचे आहे आणि ते जर नसेल तर नारळ उशिरा लागणे किंवा न लागणे, यासारख्या समस्या दिसतात. पानाचा देठ ते शेंड्यापर्यंत सरळ अंतर 3.25 ते 3.5 मीटर असते. म्हणून दोन झाडांत 7.5 मीटर अंतर असेल तर नारळाच्या झावळ्या एकमेकांत शिरणार नाहीत किंवा एकमेकांना झाकणार नाहीत.

जमीन : ओलिताची सोय असल्यास सर्वच प्रकारच्या जमिनीत नारळ लागवड करता येते. जमिनीच्या प्रकारानुसार मशागत करावी.

संकरित जाती :

टीडी (केरासंकरा) – या जातीची झाडे चार ते पाच वर्षांत फुलोर्‍यात येतात. एका झाडापासून सरासरी 150 नारळ फळे मिळतात. खोबर्‍यात तेलाचे प्रमाण 68 टक्के इतके असते.

टीडी (चंद्रसंकरा) – फळधारणा चार ते पाच वर्षांनी होते. या जातीचे उत्पादन प्रतिवर्षी 55 ते 158 फळे असते, तर सरासरी उत्पादन 116 फळे आहे.

उंच जाती :

वेस्ट कोस्ट टॉल (बाणवली) – पूर्ण वाढलेल्या प्रत्येक झाडापासून सरासरी 80 ते 100 फळे मिळतात. लक्षद्वीप ऑर्डिनरी (चंद्रकल्पा) – पूर्ण वाढलेल्या झाडापासून सरासरी 150 फळे मिळतात. प्रताप – नारळाचा आकार मध्यम, गोल असून, झाड सहा ते सात वर्षांत फुलोर्‍यात येते. या जातीच्या एका झाडापासून 150 नारळ मिळतात. फिलिपिन्स ऑर्डिनरी – नारळ आकाराने फारच मोठे असतात. नारळाचे उत्पादन सरासरी 105 नारळ आहे.

ठेंगू जाती :

रंगावरून ऑरेंज डार्फ, ग्रीन डार्फ आणि यलो डार्फ अशा पोटजाती आहेत. ऑरेंज डार्फ ही जात शहाळ्यासाठी सर्वांत उत्तम आहे.

– डॉ. दादासाहेब खोगरे, विषय विशेषज्ज्ञ

Back to top button