जीवाणू खते वापरा | पुढारी

जीवाणू खते वापरा

द्विदल पिकांच्या मुळांवरील गाठींमध्ये नत्र स्थिर करणार्‍या जीवाणूंना रायझोबियम जीवाणू असे म्हणतात. हे जीवाणू शेंगवर्गीय झाडांच्या मुळामध्ये प्रवेश करून सहजीवी पद्धतीने झाडाच्या मुळावर गाठी तयार करतात आणि या गाढीमध्ये राहून परस्पर एकमेकांच्या फायदेशीर भागीदारीने झाडांना नत्राचा पुरवठा करतात. म्हणूनच तूर, मूग, उडीद इत्यादी कडधान्य पिकांची पेरणी करताना पेरणीपूर्वी रायझोबियम जैविक खताची बीज प्रक्रिया करणे महत्त्वाचे असून 25 ग्र्रॅम प्रतिकिलो याप्रमाणे रायझोबियम जैविक खताचा वापर करावा.
जीवाणू संवर्धन वापरण्याचे फायदे

1) बियाण्याची उगवण लवकर आणि जास्त प्रमाणात होते.

2) पिकास नत्राचा सतत पुरवठा होत असल्याने रोपांची जोमदार वाढ होते.

3) या जीवाणूंनी जमिनीत सोडलेल्या बुरशीरोधक द्रव्यामुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि जमिनीद्वारे होणार्‍या मुळांच्या रोगांचे प्रमाण कमी होते.

4) जमिनीचा पोत सुधारतो.

5) रासायनिक नत्र खतांची साधारणपणे 25 टक्के बचत होते. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो.
जीवाणू संवर्धन वापरण्याची पद्धत

1) एक लिटर गरम पाण्यात 125 ग्रॅम गुळाचे द्रावण तयार करावे.

2) वरील द्रावण थंड झाल्यावर त्यातील पुरेशा द्रावणात 200 ते 250 ग्रॅम जीवाणू संवर्धन मिसळावे.

3) 10 ते 12 किलो बियाणे स्वच्छ फरशीवर, प्लास्टिक किंवा ताडपत्रीवर पातळ थरात पसरवून त्यावर तयार तयार संवर्धनाचे मिश्रण शिंपडावे आणि हे मिश्रण हलक्या हाताने बियाण्यास चोळावे.

4) बियाण्यास प्रथम बुरशीनाशकाची प्रक्रिया करून नंतर नत्र उपलब्ध कलन देणारे रायझोबियम, स्फुरद विरघळविणारे जीवाणू खत यांचे मिश्रण करून बियाण्यास लावावे.

जीवाणू संवर्धक वापरताना घ्यावयाची काळजी

1) जीवाणू संवर्धनाचे पाकीट सूर्यप्रकाश आणि उष्णता यापासून दूर ठेवावे. ते नेहमी सावलीतच ठेवावे.

2) जीवाणू खत लावलेले बियाणे रासायनिक खतात किंवा इतर औषधांमध्ये मिसळू नये.

3) बुरशीनाशके किंवा कीटकनाशके बियाण्यास लावायची असल्यास अशी प्रक्रिया अगोदर पूर्ण करून शेवटी जीवाणू खत लावावे.

4) पाकिटावर जी अंतिम तारीख दिली असेल त्यापूर्वीच जीवाणू खते वापरावीत.

5) खरे तर एका गटातील पिकांचे रायझोबियम जीवाणू दुसर्‍या गटाला उपयोगी पडत नाहीत. म्हणूनच त्या गटातील जीवाणू हे त्याच गटात मोडणार्‍या पिकांकरीता वापरावे. चुकीचे वापरले गेल्यास त्याचा पीक वाढीवर परिणाम दिसत नाही. त्यासाठी जीवाणू खत पाकिटावर नमूद केलेल्या विशिष्ट पिकांकरिताच वापरावे.

– विनायक सरदेसाई

Back to top button