सिमारूबाची संजीवनी | पुढारी

सिमारूबाची संजीवनी

सिमारूबा (लक्ष्मीतरू) असे वैशिष्ट्यपूर्ण नाव असलेला एक सदाहरित वृक्ष आहे. या वृक्षाची सर्व प्रकारच्या जमिनीत उत्तम वाढ होते. कमी पावसाच्या भागांतही हा वृक्ष तग धरू शकतो. बियांद्वारे किंवा कलम पद्धतीने सिमारूबाची अभिवृद्धी करतात. सिमारूबामध्ये काळ्या रंगाची फळे देणारे आणि पांढरट पिवळ्या रंगाची फळे देणारे असे दोन प्रकारचे वृक्ष आढळतात. सर्वसाधारणपणे काळ्या रंगाची फळे देणारे वृक्ष विपुल प्रमाणात असतात. या वृक्षास साधारण 4 ते 5 वर्षांनंतर बिया येतात.

सिमारूबा या वनस्पतीच्या बियांमध्ये 55 ते 60 टक्के तेल असून त्याचा खाद्यतेलासाठीही वापर करतात. तसेच औद्योगिक क्षेत्रात औषधे, रंग, वंगण, साबण इत्यादी निर्मितीसाठी या तेलाचा उपयोग केला जातो. तेलाच्या पेंडीमध्ये 7.7 ते 8.1 टक्के नत्र, 1.07 टक्के स्फुरद आणि 1.24 टक्के पालाश असून त्याचा सेंद्रिय खत म्हणून वापर करतात. सिमारूबा फळांच्या गरामध्ये साखरेचे 11 टक्के प्रमाण असते. त्यामुळे शीतपेये तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो.

वृक्षाच्या पानात आणि सालीत सिमारूबीन रसायन असते. त्याचा उपयोग डायरिया, कुष्ठरोग, मलेरिया रोगांवरील औषधनिर्मितीसाठी केला जातो. सिमारूबा वृक्षाला फुले मोठ्या प्रमाणात येतात. त्यामध्ये मधमाशीपालनाचा उद्योग चांगल्या प्रकारे करता येतो. सर्व प्रकारच्या जमिनीत उगवू शकणारा सिमारुबा हा सदाहरित वृक्ष असून तो शेतकरी आणि इतरांसाठी संजीवनीच आहे.

Back to top button