शेतात करा गाळमातीचा वापर | पुढारी

शेतात करा गाळमातीचा वापर

पावसाळ्यात मातीचे कण मोकळे होऊन पाण्याच्या प्रवाहाबाहेर वाहून पाणी साठवण तलावात जातात. अशा ठिकाणी अनेक वर्षे सातत्याने गाळ साठत असल्यामुळे पाणी साठवण तलाव, पाझर तलाव, नाला बांध, शेततळी, लघू आणि मध्यम कमी होत म्हणून अशा गाळाचा उपयोग शेतीसाठी केल्यास तलावांची पाणी साठवण्याची क्षमताही वाढते आणि शेतजमिनीची प्रतही सुधारली जाऊ शकते.

गाळमातीचे फायदे :

1) गाळमातीचे पिकांना पोषक अन्नद्रव्ये आणि चिकण मातीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतातील पिकांच्या वाढीसाठी फार उपयोगाची असते.

2) गाळमातीच्या वापरामुळे हलक्या आणि मध्यम जमिनीची कमी असलेली सुपीकता वाढविता येते.

3) गाळमातीच्या वापरामुळे जमिनीची ओलावा साठवण क्षमताही वाढते.

4) योग्य प्रमाणात गाळमातीच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब, उपलब्ध स्फुरद आणि पालाश अन्नद्रव्यांचे प्रमाण जादा दिसून आले आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून शिफारशीत खत कमी करता येणे शक्य होते.

गाळमाती वारताना घ्यायवयाची काळजी :

1) चुनखडीयुक्त गाळमाती शेतात पसरविण्यासाठी वापरू नये.

2) ज्या गाळमातीचा सामू 8.5 पेक्षा जास्त आणि विद्युत वाहकता 2.5 डेसी सायमन प्रती मीटरपेक्षा जास्त आहे, अशी गाळमाती शेतात पसरू नये.

3) फळबाग लागवड करताना गाळमाती खोदलेल्या खड्ड्यात किंवा शेतात उतारास आडवे चर खोदून त्यामध्ये भरावी.

4) हलक्या आणि कमी पाणी साठवणक्षमता असलेल्या जमिनीत प्रामुख्याने गाळमाती वापरावी. तसेच शेतजमिनीत गाळमाती वापरताना चिकणमातीच्या प्रकारानुसार गाळमात्रा निर्धारित करावी.

5) जास्त प्रमाणात गाळमातीचा वापर केला गेल्यास अशा जमिनी पाणथळ किंवा चोपण होण्याचा धोका संभवतो.

– रंगनाथ कोकणे

Back to top button