इंधन खर्च बचतीसाठीचा सूक्ष्म विचार कसा करावा?  | पुढारी

इंधन खर्च बचतीसाठीचा सूक्ष्म विचार कसा करावा? 

कोणतेही इंजिन किंवा ट्रॅक्टर तयार करणार्‍या कंपनीकडून ते कसे वापरायचे, याची माहिती असलेली पुस्तिका दिली जाते. या पुस्तकात दिलेल्या निर्देशांनुसार यंत्राचा वापर आणि देखभाल केल्यास कमी खर्चात यंत्र अधिक काळ सेवा देते. ही पुस्तिका अनुभवाच्या आधारे तयार केलेली असते. त्यामुळेच ट्रॅक्टर किंवा अन्य यंत्राचा वापर सुरू करण्यापूर्वी ही मार्गदर्शक पुस्तिका बारकाईने वाचावी आणि त्यात दिलेल्या सल्ल्यानुसार यंत्राचा वापर आणि देखभाल करावी. 

इंधनाची टाकी आणि इंधनवाहक नळी यांच्या मधून सेकंदाला एक थेंब एवढी जरी इंधनगळती होत असेल, तरी महिन्याकाठी 50 लिटर इंधन वाया जाते. त्यामुळे इंधनाची गळती कधीच होऊ देऊ नये. प्रत्येक जोड व्यवस्थित आहे ना, याची सतत पाहणी करावी. जर कुठून तेलगळती होत असेल, तर तिथे नवीन पॅकिंग वॉशर टाकून पुन्हा घट्ट जोडणी करावी. त्यामुळे तेलाची गळती नक्की थांबेल. इंजिन सुरू करताना विशिष्ट आवाज येत असेल, तर इंजिनात हवा प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात जात आहे, असा त्याचा अर्थ असतो. असे असल्यास डिझेल अधिक प्रमाणात लागते. अशाप्रकारचा आवाज येताच इंजिनची फेरजुळणी करून घ्यावी आणि इंधन वाचवावे.

इंजिनातून मोठ्या प्रमाणावर काळ्या रंगाचा धूर निघत असेल, तरी डिझेल अधिक प्रमाणात खर्च होत असल्याचेच ते निदर्शक असते. इंजेक्टर किंवा इंजेक्शन पंपमधील बिघाड हे त्यामागील कारण असू शकते. त्यामुळे छोट्या इंजिनाच्या बाबतीत 150 तास वापरानंतर आणि ट्रॅक्टरच्या बाबतीत 600 तास काम करवून घेतल्यानंतर इंजेक्टरची तपासणी करून दुरुस्ती करावी. तरीसुद्धा काळा धूर अधिक निघत असेल, तर इंजेक्शन पंपची दुरुस्ती करणे आवश्यक ठरेल. इंजेक्शन पंप आणि इंजेक्टरची जुळणी व्यवस्थित असेल, तर इंजिनातून काळा धूर जास्त प्रमाणात येणार नाही. त्याचप्रमाणे इंजिन थंड असताना लगेच त्याच्याकडून काम करून घेणे योग्य ठरत नाही. त्यामुळे डिझेल अधिक प्रमाणात खर्च होते. 

इंजिन सुरू केल्यानंतर लगेच काम सुरू करू नये. इंजिनचे तापमान 60 अंशांपर्यंत झाल्यानंतर वापर केल्यास इंजिनाच्या भागांची झीज कमी प्रमाणात होते आणि डिझेलचीही बचत होते. काम सुरू असताना इंजिनाची गती वाढविली तरी वाढत नसेल, तर पिस्टन रिंग किंवा त्यालगतच्या भागात बिघाड आहे, हे ओळखावे. या भागांची अधिक झीज होण्यामुळेही अधिक डिझेल जळते. अशी स्थिती येताच लगेच दुरुस्ती करून घेतल्यास इंधन कमी प्रमाणात खर्च होते. काम सुरू नसताना इंजिन सुरू ठेवले तर ताशी एक लिटर डिझेल खर्च होते. इंजिनातील सेल्फ स्टार्टर, बॅटरी आदी घटक सुस्थितीत ठेवावेत, जेणेकरून इंजिन विनासायास सुरू होऊ शकेल. हवेबरोबर धूळ इंजिनात शिरून आतील सुट्या भागांची झीज वाढते. त्यामुळे अधिक इंधन खर्च होऊ लागते. म्हणूनच अगदी स्वच्छ हवा इंजिनात जायला हवी. त्यासाठी एअर फिल्टर सतत स्वच्छ करावा. इंजिनमधील डिझेल फिल्टर अस्वच्छ असल्यास इंजिनच्या कामात अडथळा येतो. हे अडथळे दूर करण्याच्या प्रयत्नांत अधिक डिझेल खर्ची पडते. त्यामुळे नियमित कालांतराने डिझेल फिल्टर बदलणे चांगले. जर इंजिनात दोन फिल्टर लावलेले असतील, तर दोन्ही एकाचवेळी बदलू नयेत. नियमित तास काम केल्यानंतरच हे फिल्टर आलटून पालटून बदलावेत. ट्रॅक्टर चालवत असताना ब्रेक लागून राहत असतील, तर डिझेल अधिक प्रमाणात खर्च होते. त्यामुळे ट्रॅक्टर सुरू झाल्यानंतर ब्रेक लागून राहिलेला नाही, याची खात्री करावी. 

कामाचे स्वरूप पाहून ट्रॅक्टरच्या योग्य गिअरचा वापर करावा. योग्य गिअरमध्ये ट्रॅक्टर असताना एक तृतीयांश अ‍ॅक्सलेरेटरचा वापर करून धूर अजिबात निघत नाही. जर धूर निघत असेल, तर खालचा गिअर टाकून डिझेलची बचत करावी. ट्रॅक्टरचे टायर गुळगुळीत झाले असतील, तर ते घसरतात आणि डिझेलचा खर्चही वाढतो. त्यामुळे गुळगुळीत झालेले टायर लगेच बदलावेत. ट्रॅक्टरच्या टायरमध्ये हवा कमी असली, तरी डिझेल अधिक जळते. त्यामुळे मार्गदर्शक पुस्तिकेत दिलेल्या प्रमाणात चाकात हवा भरावी. अधिकांश ट्रॅक्टरच्या पुढील चाकात 2.5 किलोग्रॅम प्रतिचौरस सेंटिमीटर, तर मागील चाकात 1.2 किलोग्रॅम प्रतिचौरस सेंटिमीटर इतका हवेचा दाब ठेवण्यास सुचविलेले असते. जर गुळगुळीत न झालेला टायर हवेचा योग्य दाब असतानाही घसरत असेल, तर चाकावर अतिरिक्त वजन ठेवून किंवा टायरमध्ये पाण्याचा वापर करून तो घसरणार नाही याची काळजी घेता येते. 

काम सुरू नसताना मोकळा ट्रॅक्टर शेतात फिरवला, तरी डिझेलचा खर्च वाढतो. त्यामुळे कोपर्‍यात ट्रॅक्टर वळविण्यास अधिक शक्ती खर्ची पडणार नाही, अशारीतीने ट्रॅक्टर शेतात चालवावा. असे केल्यास म्हणजेच रुंदीच्या बाजूने काम न करता लांबीच्या बाजूने काम केल्यास शेतात ट्रॅक्टर अधिक तास काम करू शकेल आणि ट्रॅक्टरचा कामाविना होणारा वापर वाचेल. लांबी आणि रुंदी यात 2ः1 या प्रमाणात काम केल्यास कमी डिझेल खर्चात अधिक काम पूर्ण करता येते. नव्या उच्च गुणवत्ता असलेल्या मोबिल ऑईलचा वापर करून आपण डिझेलचा वापर कमी करू शकतो. अशाप्रकारे वेगवेगळे उपाय योजून आपण ट्रॅक्टर आणि डिझेलवर चालणारी अन्य कृषी उपकरणे व्यवस्थित चालविल्यास इंधनाचा खर्च वाचून शेतीतील फायदा वाढू शकतो. 
– सत्यजित दुर्वेकर

Back to top button