अंजीर लागवड फायदेशीर | पुढारी

अंजीर लागवड फायदेशीर

शक्तिवर्धक, पित्तनाशक आणि रक्तशुद्धी करण्याचे गुण असल्यामुळे अंजीर हे औषधी फळ म्हणून ओळखले जाते. औरंगाबादजवळील दौलताबाद भाग, नाशिक आणि पूर्व खान्देश जिल्ह्यात या फळझाडाची थोडी-फार लागवड होते. अलीकडे सोलापूर, उस्मानाबाद येथे अंजिराची लागवड शेतकरी करू लागले आहेत. त्यावरून अंजीर हे दुष्काळी भागासाठी उत्तम पीक ठरू शकेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अंजीर हे एक उंबरवर्गीय फळ आहे. अंजिराचे शास्त्रीय नाव फायकस कॅरिका असे आहे. फायकस कॅरिका हे एक मोठ्या आकाराचे झुडूप असते. हे झाड प्रामुख्याने नैऋत्य आशिया आणि पूर्व भूमध्य विभागात आढळते. हे झाड साधारणत: तीन ते दहा मीटर उंच वाढते. याचा दांडा करड्या रंगाचा असतो. अंजिराचे फळ – तीन ते पाच सेंटिमीटर लांबीचे असते.

हे फळ कच्चे असताना त्याची साल हिरवी असते, तर ते पिकू लागल्यावर त्याचा रंग अंजिरी होऊ लागतो. अंजीर हे फळ इराण आणि इतर भूमध्य सागरी भागात नैसर्गिकरीत्या उगवते. त्यामुळे तेथील लोकांचे ते मुख्य खाद्य-फळ आहे. याचबरोबर ऑस्ट्रेलिया, चिली, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिकेतील कॅलिफोर्निया ऑरेगॉन, टेक्सास व वॉशिंग्टन राज्यांमधेही अंजिराचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

हे फळ हजारो वर्षे माणसाच्या खाद्यजीवनात महत्त्वाचे स्थान टिकवून असून ते अत्यंत पौष्टिक समजले जाते. आपल्याकडे अंजीर हे कमी पाण्यावर येणारे काटक फळझाड म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर अंजिराचे अनेक औषधी गुणधर्मही आहेत. ताज्या अंजिरामध्ये 10 ते 28 टक्के साखर असते. त्यातून चुना, लोह व ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वे यांचा उत्तम पुरवठा होतो. अंजीर हे सौम्य रेचक असून शक्तिवर्धक, पित्तनाशक व रक्तशुद्धी करणारे असल्यामुळे अंजिरांना नेहमीच चांगली मागणी असल्याचे दिसते. अंजिराला उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते. त्यामुळे महाराष्ट्रात त्याची लागवड करण्याला वाव आहे.

या पिकाला ओलसर, दमट हवामान घातक ठरते. अगदी हलक्या माळरानापासून मध्यम काळ्या व तांबड्या जमिनीपर्यंत अंजीर लागवड शक्य आहे. भरपूर चुनखडी असलेल्या तांबूस काळ्या जमिनीत अंजीर उत्तम वाढते. चांगला निचरा असलेली एक मीटरपर्यंत खोल असलेली कसदार जमीन अंजिरासाठी उत्तम ठरते; मात्र या जमिनीत चुन्याचे प्रमाण असावे.

खूप काळ्या मातीची जमीन अंजिरांच्या लागवडीसाठी अयोग्य ठरते. खोलगट आणि निचरा नसलेल्या जमिनीत हे झाड योग्य त्या प्रमाणात वाढू शकत नाही. अंजिराच्या अनेक जाती आहेत. त्यात सिमरना, कालिमिरना, कडोटा, काबूल, मार्सेल्स आदी जाती प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रात मुख्यत: पुणे भागातील ‘पुना अंजीर’ नावाने प्रसिद्ध असलेल्या जातीची लागवड अधिक केली जाते.

अंजिराची रोपे कलमाने तयार केली जातात. यासाठी खात्रीच्या बागायतदाराच्या रोगमुक्त बागेतील जोमदार वाढीची झाडे निवडून त्यातील दर्जेदार फळे देणारी झाडे निवडावीत. अशा झाडावरील 1.25 से.मी. जाडीच्या आठ ते बारा महिने वयाच्या फांद्या कलमासाठी निवडतात. लावण्यासठी फाटे करताना फांदीच्या तळाचा भाग व शेंड्याकडील कोवळा भाग छाटून टाकावा व मधला भाग रोपे तयार करण्यासाठी वापरावा.

फाटे कलम तीस ते चाळीस से.मी. लांब असावेत. त्यावर किमान चार ते सहा फुगीर व निरोगी डोळे असावेत. कलमांचा तळाचा काप डोळ्याच्या काहीसा खाली घ्यावा आणि घरचा काप डोळ्याच्या वर अर्धा सेंटिमीटर जागा सोडून घ्यावा. दोन्हीही काप गोलाकार घ्यावेत. फाटे कलम गादी वाफ्यावर 30 बाय 30 सें.मी.वर किंवा दोन डोळे मातीत जातील अशी लावावीत. कलमे किंचीत तिरपी करावीत.

अंजीर लावण्यापूर्वी कलमाच्या बुडांना एखादे मूळ फोडणारे संजीवक लावले, तर मुळ्या लवकर फुटतात. अंजिराची लागवड साधारणपणे पावसाळ्यापूर्वी मे महिन्यात करणे योग्य ठरते. प्रमाणित अंतरानुसार लागवड केल्यास हेक्टरी 400 झाडांची लागवड होऊ शकते. चांगली माती, पोयटा, शेणखत, रासायनिक खते, सिंगल सुपर फॉस्फेट अर्धा किलो प्रतिखड्डा व थायमेट 10 जी बांगडी पद्धतीने वापरून पावसाळ्यापूर्वी खड्डे भरून घ्यावेत. जून, जुलैमध्ये जमिनीत पाऊस पडून भरपूर ओल झाल्यावर अंजिराची मुळे फुटलेली रोपे या खड्ड्यांमध्ये लावावीत.

रोपावर भरपूर पाने फुटलेली असल्यास फक्त 2 ते 3 पाने ठेवून बाकीची पाने खोडाला इजा न होता काढून टाकावीत. खड्ड्यात मधोमध रोप लावून पाण्याची चूळ द्यावी. नंतर कलम रुजेपर्यंत तीन-चार दिवसांनी गरजेनुसार पाणी द्यावे. अंजिराच्या झाडांची नीट व जोमाने वाढ होण्यासाठी लागवडीच्या सुरुवातीच्या काळात नियमित खते द्यावीत. एक वर्षाच्या झाडाला साधारणपणे 1 घमेले शेणखत व 100 ते 150 ग्रॅम अमोनियम सल्फेट पुरेसे होते.

दरवर्षी हे प्रमाण वाढवीत नेऊन 5 वर्षे वयाच्या झाडांना 4 ते 5 घमेली शेणखत व 1 किलो अमोनियम सल्फेट द्यावे. लहान झाडांना खते नेहमी पावसाळ्याच्या सुरुवातीला घालावीत. पाच ते सहा वर्षे वयाच्या झाडास 600 ग्रॅम नत्र, 250 ग्रॅम स्फुरद व 250 ग्रॅम पालाश दिल्याने फळे चांगल्या प्रतीची मिळतात. अंजिराच्या झाडाला फार पाणी लागत नसले, तरी झाड फळावर आल्यावर ऑक्टोबर ते मे महिन्यात नियमित पाणी द्यावे. जुलै व ऑगस्ट हा काळ झाडाच्या विश्रांतीचा असतो. फळे लागून वाढत असताना पाण्यात हयगय होऊ देऊ नये. कारण, त्यामुळे फळांच्या आकारावर अनिष्ट परिणाम होतो.

फळे पिकू लागल्यानंतर मात्र अतिशय कमी पाणी द्यावे. कारण, अधिक पाण्याने फळाची गोडी कमी होते. फळ तोडणे पूर्ण झाल्यावर झाडाचे पाणी बंद करावे. अंजिराच्या झाडांवर साधारणपणे तांबेरा, भुरी या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. हिवाळ्यात हवामान दमट राहिले, तर नोव्हेंबर ते फेब्रुवारीअखेरपर्यंत तांबेरा हा रोग पानावर तांबाड्या ठिपक्यात आढळून येतो. नंतर हे ठिपके काळे पडून पाने गळतात. पाने गळून पडल्यामुळे साल उघडी होते व उन्हामुळे सालीवर करपल्यासारखे चट्टे पडतात.

त्यामुळे फांद्या कमजोर होऊन फांद्यावरील फळे न पोसता गळून पडतात. उन्हाळ्यात गळणारी अंजिराची पाने गोळा करून जाळून टाकावीत. अंजिराला दोन वेळा फळ बहार येतो. पावसाळ्यात येणार्‍या बहाराला ‘खट्टा’ आणि उन्हाळ्यात येणार्‍या बहाराला ‘मीठा बहार’ म्हणतात. खट्टा बहारातील फळे जुलै किंवा ऑगस्टमध्ये तयार होतात. परंतु, ती अत्यंत बेचव असतात. त्यामुळे त्यांचा जेली करण्याकरिता उपयोग केला जातो.

मीठा बहारातील फळे मार्च, एप्रिलमध्ये तयार होतात. फळांचा दर्जा व उत्पन्न चांगल्या प्रतीचे मिळते व बाजारभावसुद्धा चांगला मिळतो.अंजीर सुकविण्यासाठी ‘पुना अंजीर’ ही जात सर्वोत्कृष्ट मानली जाते. साधारणपणे दुसर्‍या वर्षापासून अंजिरास थोडी-थोडी फळे येऊ लागतात. परंतु, फळाचे उत्पादन झाडे उत्तम पोसेपर्यंत घेऊ नये. चौथ्या वर्षापासून उत्पादन घेण्यास हरकत नाही. झाडे सात-आठ वर्षांची झाल्यावर उत्पादन चांगले येते. उत्तम काळजी, मशागत, खते दिली, तर एका झाडापासून 25 ते 40 किलो फळे मिळतात.

– सत्यजित दुर्वेकर

Back to top button