आव्हान जमिनीचे आरोग्य टिकवण्याचे! | पुढारी

आव्हान जमिनीचे आरोग्य टिकवण्याचे!

भावी काळात जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय, रासायनिक आणि जैविक खतांचा एकात्मिक वापर, पाण्याचा वाजवी वापर, जमिनीतील निचरा या बाबींवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणे गरजचे आहे. त्यामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक आरोग्य सुधारून पीक उत्पादन शाश्वत करण्यास मदत होईल, यात शंका नाही.

स्वातंत्र्यानंतर भारतात अन्नधान्य उत्पादन वाढीसाठी तीन प्रमुख बाबींवर भर देण्यात आला. त्यामध्ये सुधारित जाती, रासायनिक खते, कीटकनाशके/बुरशीनाशके आणि पाणीपुरवठा यांचा समावेश होतो. भारतातील शेतीमध्ये सिंचन क्षेत्र वाढविण्याला मर्यादा असून बहुतांश क्षेत्र वर्षावलंबी आहे. त्यामुळे पाणीपुरवठा वाढवून शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी मर्यादा आहेत.

म्हणून सुधारित जाती आणि रासायनिक खतांच्या वापरावर अधिक भर देऊन वाढत्या लोकसंख्येला लागणारे अन्न उत्पादन करण्यात आले. तथापि, अलीकडील काळात वरील बाबींमुळे उत्पादनातील वाढ शाश्वत व पर्यावरणप्रिय होत नसल्याचे आढळून आले. त्यास जमिनीचे अनारोग्य कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे.

त्यामुळे भविष्यकाळात मानवाच्या अन्न सुरक्षेला धोका होण्याची शक्यता वाढू लागली आणि अशा स्थितीत उत्पादनवाढ करण्याच्या वरील बाबींपैकी रासायनिक खतांचा, रोग/कीडनाशकांचा व पाण्याच्या वापराचा शाश्वत उत्पादनासाठी पुनर्विचार होण्याची गरज भासू लागली. पारंपरिक शेतीमधील शाश्वत उत्पादनाची साधने व पद्धती यांचा विचार सुधारित तंत्रज्ञानाच्या जोडीला करण्याची गरज भासू लागली.

हरितक्रांती व जमिनीचे आरोग्य

हरितक्रांतीच्या वरील तीन प्रमुख बाबींमुळे इच्छित फायदा निश्चित झाला. परंतु, जमिनीची उत्पादकता व त्यातील सातत्य टिकवून ठेवण्याकडे दुर्लक्ष झाले आणि उत्पादनवाढीमुळे स्तब्धता दिसू लागली. शास्त्रीय अभ्यासाअंती अशाश्वत परिस्थितीत जमिनीचे अनारोग्य जबाबदार असल्याचे द़ृष्टिपथास आले.

जमिनीचे आरोग्य हे त्या जमिनीच्या घटकांच्या नैसर्गिक संतुलनावर अवलंबून राहते. जमिनीच्या या गुणधर्मामध्ये रासायनिक गुणधर्म, भौतिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म यांचा समावेश होतो. त्यातील जैविक गुणधर्म संवर्धन करण्याकडे हरितक्रांतीच्या काळात विशेष लक्ष पुरविण्यात आले नाही.

साहजिकच जमिनीतील नैसर्गिक जैविक संपदा बर्‍याच अंशी घसरली. अशा परिस्थितीत वाढीव रासायनिक खतांनासुद्धा प्रतिसाद कमी होऊ लागला. कारण, बरीचशी अन्नद्रव्ये रासायनिक खतांतून उपलब्ध स्वरूपात आणण्यासाठी जैविक संपदा मोठ्या प्रमाणात असणे अत्यावश्यक असते. शिवाय काही जैविक घटक स्वतंत्ररीत्या जमिनीमध्ये नत्र स्थिर करण्याच्या कार्यात कार्यरत असतात.

हरितक्रांतीच्या काळामध्ये सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये पुरविण्याकडे विशेष लक्ष दिले गेले नसल्यामुळे जौविक घटकांचे असंतुलन होऊन रासायनिक क्रिया आणि भौतिक गुणधर्म यावर अनिष्ट परिणाम होणे साहजिकच होते. अशा स्थितीत उत्पादनवाढीच्या हव्यासापोटी वाढीव खतांच्या मात्रांना प्रतिसाद न मिळाल्याने अधिक रासायनिक खते टाकण्याकडे कल वाढला व जमिनीच्या आरोग्याची परिस्थिती पुन्हा बिघडण्यास हातभार लागला.

एकात्मिक पीक पोषण महत्त्वाचे

वरील सर्व परिस्थितीमुळे सेंद्रिय पदार्थांचा वापर वाढविण्याच्या संदर्भात सर्व पातळीवरून प्रयत्न सुरू झाले. सेंद्रिय पदार्थांच्या व रासायनिक खतांच्या एकात्मिक वापरामुळे रासायनिक खतांमध्ये बचत होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे सेंद्रिय पदार्थांचे महत्त्व लोकांना पटले. परंतु, केवळ सेंद्रिय पद्धतीने पिकांचे पोषण करण्यामध्ये मर्यादा असल्याने रासायनिक खतांचा काही प्रमाणात वापर आवश्यक ठरतो, असे बर्‍याच पिकांच्या बाबतीत सिद्ध झाले.

भौतिक गुणधर्म व जमिनीचे आरोग्य

जमिनीच्या जैविक गुणधर्माबरोबरच भौतिक गुणधर्मांना तेवढेच महत्त्व आहे. किंबहुना भौतिक गुणधर्मावरच जैविक गुणधर्म अवलंबून राहतात. जमिनीच्या जडणघडणीला पीक उत्पादनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण, जमिनीची जडणघडण योग्य राहण्यासाठी मातीचे मूळ कण एकत्रित नैसर्गिकरीत्या बांधले गेल्याने लहान कणांचे मोठ्या कणांमध्ये बांधणी होऊन जमिनीतील पाण्याचे व हवेेचे प्रमाण योग्य राहते व असे योग्य हवा आणि पाण्याचे संतुलन जैविक प्रक्रिया व जमिनीचा निचरा सुधारते.

अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात आणि पिकांची वाढ व उत्पादन वाढण्यास मदत होते. जमिनीची जडणघडण सुधारण्यासाठी सेंद्रिय खतांचा महत्त्वाचा सहभाग असतो. साहजिकच जमिनीची पाणीधारण क्षमतासुद्धा वाढते. जमिनीचा निचरा सुधारल्याने क्षारांचे प्रमाण वाढण्यास प्रतिबंध होतो.

रासायनिक गुणधर्म व जमिनीचे आरोग्य

रासायनिक गुणधर्मामध्ये जमिनीचा सामू, जमिनीतील पदार्थ, प्रमुख दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये व क्षारता यांचा समावेश होतो. बहुतांश जमिनीमध्ये सामूचा परिणाम अन्नद्रव्य उपलब्धतेवर होत असतो. उदा. आम्लधर्मीय जमिनीमध्ये लोह, तांबे, मँगेनीज ही मूलद्रव्ये विपूल प्रमाणात मिळतात. कॅल्शियम, बोरॉन, फॉस्फरस, मॅग्नेशियम अशा अन्नद्रव्यांचा अभाव असतो.

या उलट अल्कधर्मी जमिनीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम यांचे विपूल प्रमाण असते, तर लोह, मँगेनीज, तांबे, जस्त अशा अन्नद्रव्यांचा अभाव आढळू शकतो. जमिनीतील कर्ब पदार्थांचे प्रमाण, जमिनीची सुपीकता व जडणघडण दर्शविते, तसेच नत्र या प्रमुख अन्नद्रव्याचा कर्ब हे जमिनीतील प्रमुख स्रोत असते. जमिनीचा अयोग्य सामू योग्य परिस्थितीत आणण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचे महत्त्व सर्वमान्य आहे.

फॉस्फरससारख्या काही अन्द्रव्यांची उपलब्धता जमिनीतील आम्ल सामूमुळे तसेच अल्क सामूमुळे कमी होते. कारण, उपलब्ध स्वरूपातील स्फुरद, लोह आणि अ‍ॅल्युमिनीयम आम्ल जमिनीमध्ये स्फुरद स्थितीकरणास जबाबदार असतो. परंतु, स्फुरद विरघळणारी जैविक खते सेंद्रिय खतांच्या एकात्मिक वापरास महत्त्व आहे. जमिनीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त क्षार साठून राहिल्यास उगवणीपासून ते पिकाच्या वाढीपर्यंत अनिष्ट परिणाम होतो. जमीन अन्न घटकांनी मुबलक असूनसुद्धा अशा परिस्थितीत पिके वाढू शकत नाहीत.

ही परिस्थिती कमी पावसाच्या प्रदेशात व भारी चिकण मातीच्या जमिनीमध्ये अधिक आढळते. ज्या ठिकाणी समुद्राचे पाणी शेतात येऊन क्षार साचतात त्या ठिकाणी क्षारांचा वाईट परिणाम होतो. सातत्याने जमिनीतून पाण्याचे बाष्पीभवन होत असताना केशाकर्षणाने असे क्षार पृष्ठभागावर येऊन साठतात. आच्छादनाचा वापर करून याला काही प्रमाणात प्रतिबंध करता येतो. रासायनिक खतांचा आणि पाण्याचा अतिवापर व निचर्‍याचा अभाव यामुळे वरीलप्रमाणे घटक जमिनीच्या अनारोग्यास जबाबदार राहतात.

हवा आणि पाण्याचे प्रमाण

जमिनीचे आरोग्य भौैतिक, जैविक व रासायनिक गुणधर्माबरोबरच त्यातील हवा व पाण्याच्या प्रमाणावर अवलंबून राहते. योग्य प्रमाणात हवा आणि पाणी मुळांच्या कक्षेत राहिल्यास पिके जोमाने वाढतात. कारण, अशा परिस्थितीत अन्नद्रव्याची उपलब्धता, मुळाचे कार्य, जैविक घटकांचे कार्य जोमाने होते.

जमिनीच्या एकंदर पोकळीमध्ये सर्वसाधारणपणे 50 टक्के ओलावा व 50 टक्के हवा असणे आदर्शवत समजले जाते. उपलब्ध पाण्याचे शोषण 50 टक्के घट होईपर्यंत सुलभतेने होते. त्यानंतर पिकाच्या प्रकारानुसार ताण पडण्यास सुरुवात होते. जमिनीमध्ये पाणी साठून राहिल्यास पिकांकडून पाणी व अन्नद्रव्ये शोषणास अडथळा निर्माण होऊन पिकांची वाढ थांबते व बहुतांश पिके पिवळी पडू लागतात. म्हणून जमिनीमध्ये पाणी देण्याबरोबरच निचरा होणे गरजेचे असते.

जमिनीचे तापमान व आरोग्य

जमिनीमध्ये योग्य तापमान राहणे हे जमिनीच्या जैविक, रासायनिक व भौतिक आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. अतिथंड किंवा अतिउष्ण हवामानात जमिनीचे तापमान कमी-जास्त होऊन वरील गुणधर्मांमध्ये असंतुलन होते आणि पिकांच्या वाढीवर परिणाम होतो. जमीन सातत्याने उबदार ठेवल्यास वरील सर्व घटकांचे संतुलन ठेवण्यास मदत होते.

– प्रसाद पाटील

Back to top button