चवळीची शेती, लागवड कशी करावी | पुढारी

चवळीची शेती, लागवड कशी करावी

चवळी हे बहुतेकांच्या आहारात वापरले जाणारे कडधान्य असल्यामुळे या पिकाला बारमाही मागणी असते. महाराष्ट्रात विविध भागांत चवळीची लागवड केली जाते. या पिकासाठी मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य ठरते. त्यामुळे पाणथळ, चोपण, क्षारयुक्त जमिनीत या पिकाची लागवड टाळावी.

लागवड करताना उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी. हेक्टरी 5 टन शेणखत अथवा कंपोस्ट खत द्यावे. मृगाचा पाऊस झाल्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. जूनच्या दुसर्‍या पंधरवड्यात पेरणी योग्य पाऊस होताच वाफसा आल्यावर पेरणी करावी. ही पेरणी आपल्याकडे जास्त प्रमाणात केली जाते. या पिकासाठी हेक्टरी साधारणतः 15 ते 20 किलो बियाणे लागते. पेरणी करताना दोन ओळीत 45 सें.मी. व दोन रोपांत 10 सें.मी. अंतर ठेवावे. 1 किलो बियाण्यास 2 ग्रॅम थायरम + 2 ग्रॅम

कार्बेन्डेझीम चोळावे. यानंतर 250 ग्रॅम रायझोबियम जीवाणू संवर्धन 10 ते 15 किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे. चवळी ला 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद या प्रमाणे रासायनिक खताची मात्रा द्यावी. म्हणजेच 125 किलो डीएपी प्रति हेक्टरप्रमाणे पेरणी करताना खत द्यावे. पीक 20-25 दिवसांचे असताना पहिली कोळपणी आणि 30 ते 35 दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. पेरणीनंतर 30 ते 35 दिवस पीक तणविरहीत ठेवावे. या पिकासाठी जमिनीचा सामू उदासीन असावा.

जमिनीमध्ये पाण्याचा साठा उपलब्ध असेपर्यंत पिकाची वाढ चांगली होते. परंतु, पुढे फुले येण्याचा काळ तसेच दाणे भरण्याचा आणि पक्व होण्याच्या कालावधीत पाण्याची कमतरता भासल्यास उत्पादनामध्ये कमालीची घट येते. अशा वेळेस पिकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेमध्ये 2-3 संरक्षित पाणी दिल्यास पिकाची वाढ चांगली होऊन उत्पन्न चांगले मिळते.

– विलास कदम

Back to top button