अरब जगतात इस्रायलचा शिरकाव | पुढारी

अरब जगतात इस्रायलचा शिरकाव

अरब प्रदेशात आपली ओळख एक लष्करी सत्ता अशी असण्याऐवजी एक शांतताप्रिय देश अशी असावी, यासाठी प्रिन्स झायेद प्रयत्नशील आहेत. अमिरातीने इस्रायलशी संबंध प्रस्थापित करण्यास कोणत्याही अरब देशाने विरोध केलेला नाही. उलट, अमिरातीच्या माध्यमातून इस्रायलशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न अन्य अरब देश करण्याची शक्यता अधिक आहे.

इस्रायली पंतप्रधानांनी संयुक्‍त अरब अमिरातीला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. अरब राष्ट्रांशी चांगले संबंध स्थापण्यास इस्रायलने गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू केले आहेत पण इजिप्त व जॉर्डन या देशांपलीकडे अन्य अरब राष्ट्रांशी इस्रायलचे संबंध प्रस्थापित झाले नव्हते. पण आता बहारीन आणि संयुक्‍त अरब अमिरात यांच्याशी इस्रायलने मैत्री संबंध स्थापन केले आहेत. गेल्या वर्षी 15 सप्टेंबर रोजी इस्रायलने अब्राहम कराराअंतर्गत संयुक्‍त अरब अमिरातीशी मैत्रीसंबंध प्रस्थापित केले. आता इस्रायली पंतप्रधानांनी अमिरातीचा दौरा करून या मैत्रीसंबंधांवर शिक्‍कामोर्तब केले आहे. इस्रायल सौदी अरबशीही संपर्क ठेवून आहे व मैत्रीसंबंध स्थापण्याच्या प्रयत्नांत दोन्ही देश आहेत.

इस्रायलला जशी अरब जगतात मैत्रीसंबंध निर्माण करण्याची इच्छा आहे, तशीच इच्छा इस्रायलशी संबंध प्रस्थापित करण्याची अरब जगताचीही आहे व अशा प्रयत्नांना अमेरिकेचा आशीर्वाद आहे. अरब देशांत संयुक्‍त अरब अमिरात हा एक प्रगत देश आहे. बहुतेक सर्वच इस्लामी देशांत इस्लामी कट्टरवाद फोफावत असताना अमिरातीचे राष्ट्रप्रमुख महंमद बिन झायेद यांनी सर्वसमावेशक धोरण अवलंबले आहे. अमिरात हे सात इस्लामिक देशांचे मिळून बनलेले संयुक्‍त राष्ट्र असले, तरी तेथे अन्य सर्व धर्मीयांचे स्वागत होते. कारण या देशाची अर्थव्यवस्था बाहेरून येथे कामासाठी येणार्‍या लोकांवर अवलंबून आहे. अरब जगतात अमिरात हा एक अत्यंत संपन्‍न असा राष्ट्रसमूह आहे. त्यामुळे अमिरातीचा अरब जगतात दबदबा आहे. या देशाची आर्थिक प्रगती अशीच कायम राखायची असेल तर देशात व सभोवतालच्या प्रदेशात शांतता नांदणे आवश्यक आहे, असे अमिरातीच्या प्रमुखांना वाटते. त्यामुळे प्रिन्स झायेद यांनी सीरिया, इराण व तुर्कस्तानबरोबरच्या संबंधातला तणाव कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. खरे तर इराणविषयी सर्व अरब जगतात संशयाचे वातावरण आहे. इराण अरब जगतावर वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करीत आहे, असे अरब जगतात मानले जाते. तरीही अमिरातीच्या प्रमुखांनी इराणबरोबरचे संबंध सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

इस्रायल व अरब अमिरातीने एकमेकांच्या देशात यापूर्वीच दूतावास सुरू केले आहेत. अमिरातीने बहारीन व इस्रायल यांच्या नौदलाबरोबर लालसागरात संयुक्‍त कवायतीही केल्या आहेत. इस्रायल व अमिरातीत व्यापारी संबंधही सुरू झाले आहेत. आता अमिरात जॉर्डनमध्ये एक मोठे सौरऊर्जा केंद्र उभे करीत असून, येथून निर्माण होणारी वीज जॉर्डन इस्रायलला देणार आहे. त्याबदल्यात इस्रायल जॉर्डनला 20 हजार टन पाण्याचा पुरवठा करणार आहे.

इस्रायल व अमिरात यांच्यात चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेऊन मध्यस्थी केली. डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष असताना त्यांनीच दोन्ही देशांत अब्राहम करार घडवून आणला. यामागे अमेरिकेचा हेतू हा होता की, अरब जगतातील शांततेची आपली जबाबदारी कमी करून हे काम अरब जगतातील देशांवरच टाकणे. अमिरात व सौदी अरब हे दोन्ही देश आर्थिकद‍ृष्ट्या संपन्‍न असल्याने ते ही जबाबदारी घेऊ शकतात. अमिरातीने ही जबाबदारी घेतल्यानंतर हे ताडले आहे की, या भागातील देशांत संघर्षाचे वातावरण राहिले तर कुणाचाच फायदा होणार नाही, त्यामुळे सर्व देशांचे परस्परांशी चांगले संबंध असणे आवश्यक आहे. त्यामुळेच प्रिन्स झायेद यांनी तुर्कस्तानचा दौरा केला व त्या देशात एक हजार कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत असलेल्या तुर्कस्तानला ही मदत दिलासादायक वाटली. याचा परिणाम दोन्ही देशांतला ताण कमी होण्यात झाला.

अमिरातीकडे आर्थिक सत्ता आहे, त्यामुळे त्याचा अरब जगतात दबदबा आहे. पण केवळ आर्थिक बळाबरोबरच आवश्यक ते लष्करी बळ प्राप्‍त करणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन अमिरातीने आपली लष्करी शक्‍तीही वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी अमिरात फ्रान्सकडून 80 राफायल विमाने व 12 हेलिकॉप्टर्स घेणार आहे. याशिवाय अमेरिकेकडून एफ-35 जातीची विमाने घेण्याचा करार अमिरातीने केला आहेच.

अमिरातीच्या स्थापनेला यावर्षी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात अमिरातीत कोणताही धार्मिक संघर्ष झाला नाही अथवा धार्मिक कट्टरतावादाला थारा मिळाला नाही. अमिरातीने अन्य इस्लामी देशांशी केवळ धर्माच्या आधारावर संबंध स्थापण्यापेक्षा आर्थिक निकषावर संबंध स्थापण्यास प्राधान्य दिले. पाकिस्तान हा समधर्मी देश असूनही अमिरातीचे पाकिस्तानपेक्षा भारताशी अधिक चांगले संबंध आहेत. अमिरातीत मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक काम करतात, त्यामुळे अमिरातीत मंदिर बांधण्यासही अमिरातीच्या प्रशासनाने अनुमती दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनीही अमिरातीचा दौरा केला आहे.

अरब प्रदेशात आपली ओळख एक लष्करी सत्ता अशी असण्याऐवजी एक शांतताप्रिय देश अशी असावी, यासाठी प्रिन्स झायेद प्रयत्नशील आहेत. अमिरातीने इस्रायलशी संबंध प्रस्थापित करण्यास कोणत्याही अरब देशाने विरोध केलेला नाही. उलट, अमिरातीच्या माध्यमांतून इस्रायलशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न अन्य अरब देश करण्याची शक्यता अधिक आहे.

– दिवाकर देशपांडे

Back to top button