आईपण भारी देवा! | पुढारी

आईपण भारी देवा!

नंदिनी आत्मसिद्ध

बदलत्या काळात आईचं बाह्य रूपही बदललं. बर्‍याचजणांनी ते स्वीकारलं आहे. तथापि आजही आईकडून विशिष्ट अपेक्षा ठेवल्या जातातच. आईपणाचं ओझं वाटावं, अशा तर्‍हेच्या वर्तनाची, कामगिरीची अपेक्षा पुरी करताना स्त्रियांची दमछाक होत राहते. आई असण्यापलीकडे त्या घरात आणि बाहेरही बरंच काही असतात. आज (दि. 12 मे) जागतिक मातृदिन. त्यानिमित्ताने…

मैं कभी, बतलाता नहीं
पर अंधेरे से डरता हूँ मैं माँ
यूं तो मैं, दिखलाता नहीं
तेरी परवाह करता हूँ मैं माँ
तुझे सब है पता, है ना माँ
तुझे सब है पता… मेरी माँ

‘तारे जमीन पर’ या गाजलेल्या चित्रपटातलं निरेन भट्ट आणि पार्थ भारत ठक्कर यांनी लिहिलेलं हे गाणं मोठं भावस्पर्शी आहे. लहानपणी आईविषयी अशीच भावना प्रत्येकाच्या मनात असते. आई म्हणजे प्रत्येक मुलासाठीचा विसावा, सुरक्षित जागा. अगदी लहानपणी, ‘तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है ओ माँ, ओ माँ’ हे ‘राजा और रंक’ या चित्रपटातलं गाणं घराघरांत लोकप्रिय होतं. पन्नास वर्षांपूर्वीची आई निरागस, भाबडी आणि भोळीच होती. कारण तिला घराबाहेरचं विश्व नव्हतं. हिंदी चित्रपटांचा नायक तर आईला लीलया ‘बनवायचा’ आणि नंतर तिच्या कुशीत शिरून ‘ओ मेरी भोली माँ’ असं म्हणायचा.

‘दीवार’ चित्रपटात अमिताभ बच्चनला शशी कपूर जेव्हा ‘मेरे पास माँ है’, असं म्हणतो, तेव्हा आपल्याकडे ती नाही, या भावनेने अमिताभही कळवळून उठतो. तो संपूर्ण चित्रपट हा मुलगा व आईचं नातं याच संकल्पनेभोवती गुंफलेला आहे. चित्रपटातल्या आईशी नेहमीच उदात्त प्रेमाची जाणीव जोडलेली आढळते. कधी ही आई कर्तव्यकठोर बनते, मुलाला चांगलं वळण लागावं यासाठी ती धडपडत असते. जशी ‘श्यामची आई’ प्रेमळही आहे नि प्रसंगी कठोरही. ‘मदर इंडिया’मधला डाकू बनलेला बिरजू आणि शेवटी त्याला नाईलाजाने गोळी घालणारी आई ही जशी त्यागी, तेवढीच कर्तव्यकठोर आहे. संजय दत्तच्या ‘वास्तव’मध्ये याचंच प्रतिबिंब दिसतं.

पूर्वीच्या य. गो. जोशी, ग. दि. माडगूळकर, महादेवशास्त्री जोशी यांच्या कथांमधली आई ही संसाराला मदत म्हणून घरी शिवणकाम करायची किंवा लोकांकडे धुणीभांडी करायची. ‘मोलकरीण’ या चित्रपटात हाडाची काडं करून ज्याला मोठं केलं, त्या मुलाच्याच घरी मोलकरणीचं काम करणार्‍या आईला बघून थिएटरमधील प्रेक्षक स्त्रिया हुंदके देत पदराने डोळे पुसत असत. भारतीय संस्कृतीत तर सदैव मातृवंदनेचा उल्लेख असतो. देवतांची नावं घेताना, प्रथम ‘मातृदेवो भव’ असं म्हणतात. आधी माता, मग पिता. पती-पत्नींमध्ये आधी पती आहे. पण आई-बापांमध्ये आधी आई येते. माता हे स्त्रीचं उदात्त स्वरूप आहे. साने गुरुजी म्हणतात, भारतीय संस्कृती ही मातृप्रधान संस्कृती आहे. मातेला तीन प्रदक्षिणा घालणं म्हणजे सर्व पृथ्वीला प्रदक्षिणा घालणं होय. आईबापांची सेवा करणं म्हणजे मोक्ष मिळवणं. न मातुः परदैवतम् – आईविना दैवत नाही. आईचं ऋण कधी फिटत नाही. विठ्ठल म्हणजे आई, भारत म्हणजे आई, गाय म्हणजे आई. भारतवर्षात सर्वत्र मतेचा महिमा आहे. कोणताही मंगलविधी असो, आधी आईचा आशीर्वाद, तिला नमस्कार.

अनेकदा आईचं प्रेम व माया या गोष्टी प्रत्यक्षात आई नसलेल्या स्त्रीकडूनही मिळतात. कृष्णाला नाही का यशोदेकडून मातृप्रेम मिळालं! डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म्हणजेच ‘भिवा’ जेमतेम सहा वर्षांचा असताना 20 डिसेंबर 1896 रोजी त्याच्या आईचं छत्र हरवलं. तो आईच्या मायेविना पोरका झाला. वडील रामजी हे पलटणीत सुभेदारपदावर असल्याने कामानिमित्त घराबाहेर त्यांचा बराच वेळ जायचा. भिवाची आत्या, म्हणजे मीराबाई ही भिवाला आईची माया देण्याचा प्रयत्न करत होती. मात्र मीराबाई ही शारीरिक व्याधीने ग्रासलेली दिव्यांग होती. तरीही ती भिवाचं प्रेमाने करत होती. स्त्रीमधली मातृत्वभावना तिच्यातलं वात्सल्य आणि प्रेम नेहमीच जागं ठेवत असते. वर्धा जिल्ह्यातील पिंपरी-मेघे येथील अभिमान साठे यांची मुलगी चिंधी. त्याच जिल्ह्यातील मालेगाव इथल्या श्रीहरी सपकाळ यांच्या घरात ती वयाच्या नवव्या वर्षी त्यांची पत्नी सिंधू म्हणून आली.

आयुष्याच्या कठीण प्रवासात नियतीने सिंधूच्या पदरात टाकलेल्या असंख्य अनाथ मुलांना मातेचं प्रेम देणारी आणि त्यांना हक्काचं घर मिळावं म्हणून अखंड भ्रमंती करणारी सिंधूताई सपकाळ. पण शेकडो अनाथांचं आईपण निभावण्याच्या ओघात आपण पोटच्या मुलीवर कुठेतरी अन्याय केला आहे, याची सिंधूताईंनाही खंत वाटत होती. अखेरच्या काळात आता आपली पोरगीच आपली आई झाली आहे, हा अनुभवही सिंधूताईंनी घेतला. परंतु या एकविसाव्या शतकातच आई, बाबा मला मारू नका, मला जगायचंय. मी तुमचीच कन्या असूनही तुम्ही मला असं दूर का लोटता, असेच जणू उद्गार स्त्रीभ्रूणातून ऐकू येत असतात, ही दुर्दैवाची गोष्ट. स्त्रीभ्रूण हत्या मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात तोच चर्चेचा विषय बनला होता. बहुतेक मातांवर या प्रकारे पोटच्या मुलीला संपवण्याच्या घरच्यांच्या निर्णयापुढे मान तुकवावी लागली होती. मनातून त्या आपल्याला गुन्हेगार मानतच जगत राहिल्या असतील… कदाचित आजही अनेकजणी यातून जात असतील… आईपणाचे असे विलक्षण अनुभवही असतात…

तसे तर अनेकांवर आईचे संस्कार झालेले असतात. जवाहरलाल नेहरूंना घडवलं, ते त्यांच्या आई स्वरूपराणी यांनी. 1930 साली गांधीजींनी असहकारिता आंदोलन आणि दांडीयात्रा सुरू केली, तेव्हा मोतीलाल नेहरूंनी ‘आनंद भवन’ काँग्रेस पक्षाला देऊन टाकलं. त्यावेळी तुम्ही जर खर्‍या अर्थाने भारतमातेवर प्रेम करत असाल, तर घराघरात मिठाचं उत्पादन करा, असं आवाहन स्वरूपराणींनी केलं होतं. स्वातंत्र्य चळवळीतलील लाठीमारात स्वरूपराणीही जखमी झाल्या होत्या. तेव्हा ‘शूर मुलाची आईदेखील काहीशी त्याच्यासारखीच आहे’, असं वाक्य आपला मुलगा जवाहरलालला लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं. मला वडिलांबद्दल प्रेम व आदर होताच; पण थोडी भीतीही वाटायची. पण आईची मला बिलकुल भीती वाटायची नाही. ती माझे सर्व गुन्हे माफ करेल, याची मला खात्री असायची. तिच्या माझ्यावरील अमर्याद प्रेमामुळे मीच तिला उलट डॉमिनेट करायचो, असे खट्याळ अन् निर्मळ उद्गार नेहरूंनी काढले होते.

मात्र हे खरंच आहे की, मुख्यतः समर्पित, त्यागी पतिपरायण आणि देवभोळी या पारंपरिक चौकटीत आपण वर्षानुवर्षं सक्तीने आईला बांधून ठेवलं आहे. ‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता असते’, अशा प्रकारचे संस्कार झाल्यानंतर आपण फक्त पत्नी किंवा माता म्हणून सेवाच करत राहायचं, स्वतःच्या इच्छा-आकांक्षा आणि भावनांवर पांघरूण घालायचं, याची जणू स्त्रियांवर सक्तीच झाली होती. आई ही अशीच वागली पाहिजे, तशीच दिसली पाहिजे, अशाही कल्पना समाजाने जोपासल्या. पण बदलत्या काळात आईचं बाह्य रूपही बदललं. बर्‍याचजणांनी ते स्वीकारलं आहे. तथापि आजही आईकडून विशिष्ट अपेक्षा ठेवल्या जातातच. आईपणाचं ओझं वाटावं, अशा तर्‍हेच्या वर्तनाची, कामगिरीची अपेक्षा पुरी करताना स्त्रियांची दमछाक होत राहते. आई असण्यापलीकडे त्या घरात आणि बाहेरही बरंच काही असतात. मग ‘सुपर वुमन’ किंवा ‘मदर इंडिया’ बनता बनता त्या पार थकून जातात.

आजसुद्धा कोणत्याही कुटुंबात आईच्या मानसिक व शारीरिक आरोग्याकडे अन्य कुटुंबीयांचं मोट्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचा अनुभव येतो. मुलंबाळं, पती, सासू-सासरे यांच्यासाठी प्रथम आईनेच त्याग करावा, अशी सर्वांची अपेक्षा असते. तिच्या छोट्या छोट्या इच्छांना मुरड घालावी लागते. एखाद्या आईने, मी प्रथम माझं पाहणार असं म्हटलं, तर इतरांना शॉकच बसतो. आई असूनसुद्धा ही अशी कशी, अशा प्रतिक्रिया उमटतात. म्हणजे आईने मदर इंडिया बनून देव्हार्‍यातच बसलं पाहिजे, असं सर्वांना वाटतं. बालसंगोपन आणि घराची देखभाल ही विवाहित स्त्रीनेच कली पाहिजे, जरी ती वर्किंग वुमन असली तरीही, असा जणू नियमच असतो. तरी अलीकडे काहीजणी तरी स्वतःचंही ऐकू लागल्या आहेत, हे बघितलं की बरं वाटतं.

आईपणाच्या प्रभावाचा वापर जाहिरातीही चातुर्याने करून घेतात. न्युट्रिशनल फूड किंवा अत्याधुनिक गॅजेटच्या जाहिराती बघा. कुटुंबातील मुलांनी चमकदार कामगिरी करावी, घरातला प्रत्येकजण आनंदी व निरोगी असावा, ही जबाबदारी केवळ आईचीच असते, असं चित्रण त्यातून दिसतं. शिवाय या जबाबदार्‍या उचलताना तिने तरुण, स्लिम व सुंदर दिसावं अशीही अपेक्षा ठेवली जाते. दिल्लीमधील एका मनोविज्ञानविषयक मासिकाने एक पाहणी प्रसिद्ध केली आहे. मुलाचा जन्म होण्याच्या अगोदरपासूनच मॉडर्न मॉम्सवर परफेक्ट मदर होण्याचं प्रेशर असतं. त्यामुळे ही पाहणी केलेल्या स्त्रियांपैकी बर्‍याच स्त्रिया या नैराश्यात होत्या. परफेक्ट पत्नी, आई, बहीण, कन्या आणि सासू बनण्याचं टेन्शन आधुनिक स्त्रीच्या डोक्यावर असतं. भारताच्या आदिवासी पट्ट्यात अर्भक मृत्यूंचं प्रमाण जास्त असल्यामुळे नकोशा गर्भधारणेचं प्रमाण जास्त असल्याकारणाने या स्त्रिया विलक्षण तणावाखाली असतात. शिवाय प्राथमिक आरोग्य सुविधांच्या अभावी बाळंतपणात दगावणार्‍या स्त्रियांचं प्रमाणही तिथे अधिक आहे.

केवळ अशा समस्याच नव्हेत, तर जगताना कसं राहावं, काय परिधान करावं या प्रश्नांभोवती स्त्रियांचं जीवन कायम फिरत असतं. एका फेसबुक पोस्टचा उल्लेख करावासा वाटतो. एका निवृत्तीच्या वयातल्या सुशिक्षित आईनेच ती लिहिली आहे. तिने सोय म्हणून केस कापून बॉयकट केला आणि साडी नेसण्याऐवजी सुटसुटीत झगे घालायला सुरुवात केली. मात्र परदेशी राहणार्‍या आणि मुंबईत राहणार्‍या तिच्या दोन्ही मुलांनी बराच आरडाओरडा केला. असले कपडे नि अवतार तुला शोभत नाही. माझ्याबरोबर येणार असशील तर काही दुसरं घाल, असं एक मुलगा तिला म्हणालाही. त्यावर तिने न रागावता त्याला सांगून टाकलं, ‘क्षमस्व. तुला माझी लाज वाटत असेल, तर तू माझ्या बरोबर बाहेर येऊ नकोस…’ थोडक्यात, आईपण निभावणं हे आजही कठीणच आहे. कारण आईचं बाईपण आणि त्याच्याशी जोडलेल्या इतरांच्या, अगदी मुलांच्याही अपेक्षा या बदलायला तयारच नाहीत.

Back to top button