पर्यावरण : दुबईचा प्रलय | पुढारी

पर्यावरण : दुबईचा प्रलय

नीलेश बने

दुबई हे शहर जगातील इतर शहरांपेक्षा वेगळं आहे. त्याचा इतिहास हे स्पष्टपणे सांगतो की, माणसानं निसर्गाच्या मर्यादांना झुगारून देण्याचं केलेलं साहस म्हणजे दुबई. त्यामुळेच दुबईतला पूर म्हणजे माणसाच्या अहंकाराला निसर्गानं दिलेलं उत्तर आहे, हे विसरून चालणार नाही.

दुबई हे माणसानं निसर्गावर मिळवलेल्या विजयाचं शहर आहे. दुबईत पाणी नाही, तिथं विमानानं पाणी आणलं गेलं. दुबईत वाळवंट आहे, तिथं आलिशान इमारती बांधल्या गेल्या. दुबईत प्रचंड उष्णता आहे, तिथं अखंड वातानुकूलित यंत्रणा उभारली गेली. जिथे माणूस राहायला तयार नव्हता, तिथं लाखोंच्या संख्येनं माणसं यायला लागली. माणसानं आपल्या ताकदीच्या जोरावर निसर्गाच्या मर्यादा नाकारून, स्वतःला हवं ते करण्याचा केलेला अट्टाहास म्हणजे दुबई हे शहर आहे.

दुबई या शहराच्या आधुनिकतेचा इतिहास 100 वर्षंही मागे जात नाही. 1960 च्या दशकात हे शहर मोठं होऊ लागलं. तिथं सापडलेल्या खनिज तेलाच्या शोधानंतर या शहराच्या अर्थव्यवस्थेला नवी गती मिळाली. त्यात जागतिकीकरण आणि बदललेले राजकीय संदर्भ याचा फायदा या शहराला लाभला आणि जगातील महत्त्वाचं शहर म्हणून ते विकसित होऊ लागलं. त्यातही तेलावर फार अवलंबून राहून चालणार नाही, हे या शहराला फार लवकर कळलं. त्यामुळे त्यांनी तेलाचा पैसा पर्यटनात आणि सोन्यात गुंतवला.

जागतिकीकरणामुळे जगभरातील लोकांकडे चैनीसाठी आणि पर्यटनासाठी पैसा उपलब्ध झाला होता. त्याचा फायदा दुबईनं उचलला. जगभरातील पर्यटकांना आकर्षिक करण्यासाठी दुबईनं पृथ्वीवरील स्वर्ग उभारण्याचा चंग बांधला. आलिशान राहणीमान, अत्याधुनिक सुखसोयी यासोबत सर्वाच उंच बिल्डिंग, सर्वात मोठं उद्यान, काही मजले उंच असलेली फ्रेम असलेलं म्युझियम, सेव्हन स्टार हॉटेल, डेझर्ट सफारी या सगळ्या गोष्टी उभारून दुबईनं कमीत कमी वेळात जगाचं लक्ष वेधून घेतलं.

पैशानं निसर्ग कसा विकत मिळेल?

खनिज तेलातून आणि सोन्यातून आलेल्या या पैशानं दुबई ही अक्षरशः उजळून निघाली. ज्या वाळवंटात कुणी एक दिवाही लावत नव्हतं तिथं डोळे दीपवून टाकणारा अखंड लखलखाट सुरू झाला. जिथल्या उष्णतेनं लोकांचे बळी जात होते तिथं आता संपूर्ण इमारतीच नव्हे, तर बसस्टॉपही वातानुकूलित होऊ लागले. माणसानं त्याला हव्या त्या गोष्टी पैशानं विकत घेता येतात, हे दुबई जगाला ठणकावून सांगू लागली.

या सगळ्या ऐशआरामाला एक दुसरी काळी बाजूही आहे. आज सर्वाधिक कार्बन उत्सर्जन करणार्‍या शहरांमध्ये दुबई पहिल्या काही शहरांमध्ये येते. नैसर्गिक संसाधनांचा वारेमाप वापर आणि त्यामुळे होणार्‍या तापमानवाढीचे आकडे फार मोठे आहेत. आजपर्यंत जवळपास 1.2 अंश सेल्सिअसनं पृथ्वीचं तापमान वाढलं आहे. हरित वायू उत्सर्जनामुळे हे होतंय हे सर्वांना कळलंय. दुबईतच झालेल्या पर्यावरण परिषदेत याबद्दल चिंता व्यक्त झाली होती.

माणसाच्या या स्वप्नांच्या शहरापुढंचे हे मोठं आव्हान असणार आहे, याचा इशारा त्यावेळीही दिला गेला होता. दरवर्षी दुबईत प्रचंड खर्च करून कृत्रिम पाऊस पाडला जातो. त्यामुळेही पर्यावरणाचा समतोल बिघडतोय, असाही काहींचा दावा आहे. यावेळी आलेला पूरही अशाच काही दिवसांमुळे झालेल्या क्लाऊड सीडिंगमुळे म्हणजे कृत्रिम पावसामुळे आला, असाही एक आरोप केला गेलाय. अर्थात, त्याला अनेक शास्त्रज्ञांनी नाकारलं आहे; पण जागतिक तापमानवाढ हे त्याचं कारण आहे, यावर अनेकांचं एकमत आहे.

दुबईत 16 एप्रिलला नक्की काय घडलं?

कृत्रिम पाऊस वगैरे प्रयोग करूनही दुबईत दरवर्षी साधारणपणे 100 मि.मी. एवढा पाऊस पडतो; पण 16 एप्रिल रोजी 24 तासांत 160 मिलिमीटर एवढा पाऊस पडला. त्यावरून या पावसाची तीव्रता काय असेल, याचा आपल्याला अंदाज लावता येईल. एवढ्या कमी वेळात ढगफुटीसारख्या झालेल्या या पावसानं हे शहर पाण्याखाली गेलं. एवढ्या महाप्रचंड ऐश्वर्यानं नटलेलं हे शहर अचानक हतबल झालेलं जगानं पाहिलं. जगातील सर्वाधिक वाहतूक करणार्‍या विमानतळामधील एक असलेलं दुबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ एक तलाव बनलं. विमानसेवा तर कोलमडलीच; पण रस्ते, मेट्रो सगळंसगळं बंद झालं. स्थानकं, मॉल्स, रस्ते, व्यावसायिक इमारतींमध्ये पाणी शिरलं. दुबईची ही भीषण अवस्था मोबईल, इंटरनेट आणि वृत्तवाहिन्यांमुळे जगभर पोहोचली.

जवळपास दोन वर्षात होतो, तेवढा पाऊस एका दिवसात पडला. त्यामुळे दुबईतलं जनजीवन संपूर्णतः कोलमडलं. एवढ्या पावसाची या शहराला कधीच सवय नव्हती. त्यामुळे एवढ्या पाण्याचा निचरा करणारी ड्रेनेज यंत्रणाच या शहरात नव्हती. दुसरीकडे, दुबईत शहरीकरणाचं प्रमाण प्रचंड मोठं आहे. त्यामुळे हवेतील आर्द्रता शोषून घेण्यासाठी तिथं पुरेशी हिरवाई नाही. त्यामुळे पावसाचं प्रमाण वाढलं, असंही काहींचं म्हणणं आहे.

क्लाऊड सीडिंगमुळे हा पूर आला का?

संयुक्त अरब अमिरात हा पृथ्वीवरील सर्वात उष्ण आणि कोरड्या प्रदेशातील एक भाग आहे. त्यामुळे तिथं पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे. तेथे पाऊस यावा, यासाठी 2002 पासून क्लाऊड सीडिंग वापरून पाऊस पाडण्यात येतो. वाढती लोकसंख्या आणि अर्थव्यवस्थेची पाण्याची गरज पूर्ण करण्यासठी अशा पद्धतीच्या कृत्रिम पावसाशिवाय पर्याय नाही. असाच क्लाऊड सीडिंगचा प्रयोग नुकताच करण्यात आला होता. या क्लाऊड सीडिंमध्ये विमान किंवा हेलिकॉप्टरचा वापर करून ढगांमध्ये सिल्व्हर आयोडाईड किंवा पोटॅशियम आयोडाईडसारखे पदार्थ टाकले जातात. यामुळे ढगांतील आर्द्रतेचं पावसामध्ये रूपांतर होते आणि पाऊस पडतो. काही दिवसांपूर्वी असाच प्रयोग महाराष्ट्रातही करावा का, यासाठी दुबईतील कंपनीशी बोलणी होणार, असेही वृत्त प्रकाशित झाले होते.

या कृत्रिम पावसामुळे काही भागांत पावसाचे प्रमाण वाढू शकते; परंतु यामुळे पर्यावरणीय समस्यादेखील उद्भवू शकतात. पावसाचे पाणी वाहून नेणे, पूर येणे आणि सीडिंग एजंटस्चा पर्यावरणावर होणारा दीर्घकालीन परिणाम, याबाबत अनेकदा चिंता व्यक्त करण्यात आली आहे. दुबईतल्या यावेळच्या पुरात अशा पद्धतीनं झालेल्या क्लाऊड सीडिंगचा दोष नसल्याचंही अनेकांचं म्हणणं आहे; पण शेवटी निसर्गाच्या यंत्रणेत माणसानं केलेल्या अवाजवी हस्तक्षेपाची प्रतिक्रिया निसर्गातून येणारच, असंही काहींच म्हणणं आहे.

जागतिक तापमानवाढ हे पुराचं मुख्य कारण

खरं तर मानवी उत्क्रांतीचा इतिहासच हा नैसर्गिक मर्यादांना दिलेल्या आव्हानांचा इतिहास आहे; पण त्यातही निसर्गाशी जुळवून घेण्याची धडपड अधिक होती. गावाखेड्यातील आयुष्यात जोपर्यंत शेती हा माणसाचा मुख्य व्यवसाय होता, तोपर्यंत निसर्गाशी जुळवून घेण्याची ही प्रवृत्ती कायम होती; पण यांत्रिकीकरणामुळे आणि शहरीकरणामुळे हे चित्र पूर्णपणे पालटलं. माणसानं निसर्गाशी जुळवून घेण्याऐवजी, थेट निसर्गाच्या यंत्रणेलाच आपल्या पद्धतीनं बदलण्याला सुरुवात केली. बाजार हा या यंत्रणेचा आधार बनला; मग कमीत कमी जागेत अधिक लोकसंख्या ही बाजारासाठी आवश्यक घटक बनली. त्यातून शहरं विस्तारत गेली. या शहरांनी निसर्गाचे लचके तोडायला सुरुवात केली. नदी, नाले, खाड्या, समुद्र बुजवले गेले. डोंगर फोडले गेले, जमिनी उकरल्या गेल्या. वातानुकूलित यंत्रांनी घरं, कार्यालये थंड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर कार्बन फेकला जाऊ लागला. आज माणसाला थंड वाटण्यासाठी, तापमानवाढीमुळं पृथ्वीला गरम व्हावं लागतंय.

गेल्या शे-दीडशे वर्षात जे काही झालंय, तो निसर्गावर एका पद्धतीनं केलेला अत्याचारच आहे. जागतिक तापमानवाढ हे त्याचं फलित आहे. आज जगभरातील वैज्ञानिक ही गोष्ट मान्य करताहेत; पण बाजाराच्या ताकदीपुढे या वैज्ञानिकांचा आवाज कुणाच्याही कानापर्यंत फारसा पोहोचत नाही. त्यामुळे निसर्गाला मधूनमधून उग्र रूप धारण करून आपलं प्रलयंकरी रूप दाखवावं लागतंय.

दुबईतला पाऊस आणि त्यानं आलेला महाभयंकारी पूर हे त्याचंच एक उदाहरण आहे. जागतिक तापमानवाढीमुळे झालेल्या हवामान बदलामुळेच हा पूर आल्याचं आता सर्वमान्य होऊ लागलंय.

पर्यावरणाच्या समस्येचं मूळ विषमतेत

दुबईचा पूर ही माणसाच्या फाजील महत्त्वाकांक्षेला निसर्गानं दिलेली चपराक आहे. अर्थात, चंगळवाद हीच जीवनशैली मानणार्‍या अनेकांना हे आजही मान्य होणार नाही; पण निसर्गाच्या व्यवस्थेत किती ढवळाढवळ करायची हे माणसानं ठरवायला हवं, हे सांगणारा हा पूर आहे. चीनमध्येही असाच पूर आला. त्याच्या बातम्या फार कुठे आल्या नाहीत; पण जगभरात हे पूर वाढताहेत. निसर्गाचा समतोल ढासळतोय, हे तर आता स्पष्टपणे दिसू लागलं आहे.

दुबईला पूर आल्याबद्दल एकेठिकाणी चर्चा सुरू होती. तिथं असलेली एक मुलगी म्हणाली, ‘अख्खी दुबई बुडून जायला हवी. लय मस्ती आलीय, दुबईतल्या शेखांना. वाघ-सिंह काय पाळतात, सोन्याची टॉयलेट काय बांधतात नि विमानातून पाऊस काय पाडतात. पैसा हाय म्हणून माणसानं काय, वाटेल तसं पातळी सोडून वागायचं का? कधी ना कधी तरी, उलटेलच की ते त्यांच्यावर.’

निसर्गतः माणसाला असलेल्या असूया, मत्सर आणि दुसर्‍याचं ऐश्वर्य पाहून होणार्‍या, येणार्‍या रागातून आलेली ही प्रतिक्रिया आहे. ज्या मुलीनं ही प्रतिक्रिया व्यक्त केली, ती महाराष्ट्रातील दुष्काळी भागातून आलेली मुलगी आहे. त्यामुळे तिची ही प्रतिक्रिया जागतिकीकरणामुळे आणि वाढत्या शहरीकरणामुळे वाढत असलेल्या विषमतेच्या पार्श्वभूमीवर पाहायला हवी.

श्रीमंतांकडे येणारा उदंड पैसा आणि गरिबांसाठी जगण्याचा संघर्ष हा काही नवा नाही; पण जागतिकीकरणानं त्याचा बाजार मांडलाय. आज शाहपूरमधील खड्ड्यातून पाणी भरणार्‍या आदिवासी पोरालाही, मोबाईलवर बाथटबमध्ये आंघोळ करणारी हिरोईन दिसते. त्याला तसं स्वप्न पडलं तर दोष त्या पोराचा की, त्याच्या हातात मोबाईल देणार्‍या व्यवस्थेचा? हा विचार करायला हवा. हा प्रश्न पन्नास वर्षांपूर्वी आपल्या वडिलांच्या आणि आजोबांच्या पुढ्यात नव्हता; पण तो आज आपल्यापुढे आहे. त्यामुळे त्याचं उत्तर आपल्याला आज शोधावं लागणार आहे. बदलती जीवनशैली, वाढतं शहरीकरण, नैसर्गिक साधनांचा गैरवापर, त्यातून होणारी जागतिक तापमानवाढ, त्यामुळे पडणारा उदंड पाऊस, बुडणारी शहरं, त्याचे होणारे व्हिडीओ आणि त्यातून उमटणारी प्रतिक्रिया हे एक दुष्टचक्र आहे, हे समजून घ्यायला हवं.

माणसाला निसर्गावर मात करायचीय. दुबई हे त्याचंच एक प्रतीक आहे. एकीकडे श्रीमंतांकडे येणार्‍या प्रचंड पैशामुळे निसर्गाची अपरिमित हानी सुरू आहे; दुसरीकडे जागतिक तापामानवाढीमुळे जगभरात अनियमित आणि वाढता पाऊस, न झेपणारे पूर याची साखळी सुरू आहे. माणसानं याचा एक प्राणी म्हणून शांतपणे विचार करायला हवाय; अन्यथा अनेक धर्मग्रंथांनी मानवजातीची अखेर प्रलयात होईल, हे सांगितलेले आहेच!

Back to top button