सकलजनवादी राजा | पुढारी

सकलजनवादी राजा

प्रा. डॉ. प्रकाश पवार

छत्रपती शिवाजी महाराजांचे क्षत्रियत्व मानव धर्माला प्राधान्य देणारे होते. अहिंसा, शांतता, रयतेचे कल्याण, स्वशासन निर्माण करण्यासाठी क्षत्रियत्वाचा त्यांनी उपयोग केला होता. मानवाचे अस्तित्व धोक्यात आले तेव्हा शिवरायांनी क्षत्रियत्वाचे तेज कृतीतून व्यक्त केले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला यंदा 350 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे यावर्षीच्या शिवजयंतीला विशेष महत्त्व आहे. शिवरायांचे व्यक्तिमत्त्व तेजस्वी स्वरूपाचे आहे. त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आहेत. त्यापैकी सकलजनवादी विचार, नैतिकता, धर्मयुद्ध आणि युद्धधर्माचा समन्वय, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार हे पैलू शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वातील जास्त महत्त्वाचे आहेत. अर्थातच, हे पैलू जिजाऊ आणि शहाजीराजे यांच्याही व्यक्तिमत्त्वांमध्ये व्यक्त झाले होते. आजच्या काळातील लोकशाही विचारांना आणि प्रक्रियेलादेखील शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वातील ही गुणवैशिष्ट्ये नवीन आकार देण्यासाठी महत्त्वाची ठरतात. शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वातील गुणवैशिष्ट्ये भारतीय समाजाची सॉफ्ट पॉवर आहेत.

सकलजनवादी विचार

शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वात सकलजनवादी विचार हा पहिला दुर्मीळ पैलू दिसतो. शिवरायांनी सकलजनांचा एकत्रित विचार केला. यासंदर्भात त्यांच्या जीवनातील निवडक उदाहरणे महत्त्वाची व सहज लक्षात येणारी आहेत. एक, त्यांनी सकलजनांचे ऐक्य आणि एकोपा घडवून आणला. राज्यकतार्र्, सैनिक, रयत, बुद्धिजीवी, व्यापारी अशा विविध वर्गांचे महत्त्व त्यांनी ओळखले होते. या विविध वर्गांचे ऐक्य शिवरायांनी घडवून आणले. दोन, शिवरायांनी स्वराज्याची स्थापना, विस्तार आणि स्थैर्यासाठी सैनिकवर्ग घडविला. याबरोबरच त्यांनी रयत या वर्गाला महत्त्व दिले. रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्याचा राज्यकारभार केला.

शिवरायांनी राज्यकर्त्यावर्गाला शिस्त लावली होती. त्यांनी आपल्या राज्यात त्यांच्या काळातील बुद्धिजीवीवर्ग विकसित केला होता. तसेच त्यांनी पोर्तुगीज व इंग्रजवर्गाकडील व्यापारी संस्कृतीचे महत्त्व ओळखले. शिवरायांचे व्यक्तिमत्त्व विविध वर्गांचा एकत्रित समन्वय घडवणारे होते. तीन, प्रत्येक वर्गाकडील गुण आणि स्वराज्य यांचा ताळमेळ शिवरायांनी घातला. चार, शिवरायांचा मुख्य उद्देश सार्वजनिक कल्याण हा असल्यामुळे त्यांनी समाजातील प्रत्येक वर्गाला स्वराज्यात सहभागी करून घेतले. राजकीय समावेशन हा त्यांच्या सकलजनवादी विचारांचा मुख्य आधार होता. थोडक्यात, शिवरायांनी नदीच्या प्रवाहाप्रमाणे भूमिका घेतली होती. नदी दोन्हीही बाजूच्या समाजांना बरोबर घेऊन वाहते. शिवरायांनीदेखील आपले जीवन सर्व वर्गांना बरोबर घेऊन जाणारे नदीप्रमाणे प्रवाही ठेवले होते.

नैतिकता

छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा दुसरा पैलू नैतिकता हा सॉफ्ट पॉवर या अर्थाने अत्यंत महत्त्वाचा दिसतो. यासंदर्भातील चित्तवेधक उदाहरणे खूप महत्त्वाची आहेत. एक, स्त्रीवर्गाच्या संदर्भात शिवरायांनी उच्च नैतिकतेचा मानदंड निर्माण केला. त्यांनी राज्यकारभाराला सुरुवात करताना स्त्रियांची आत्मप्रतिष्ठा जपण्यासंदर्भात कठोर निर्णय घेतला. एका बाजूला सत्ता आणि दुसर्‍या बाजूला स्त्रियांची आत्मप्रतिष्ठा यातून एकाची निवड करावयाची होती. शिवरायांनी सत्तेला दुय्यम महत्त्व दिले आणि त्यांनी स्त्रियांच्या आत्मप्रतिष्ठेला अव्वल दर्जाचे स्थान दिले. दोन, रायबागन ही स्त्री मोगलांकडून लढत होती. मोगल हे स्वराज्याचे स्पर्धक व विरोधक होते. यामुळे रायबागन यांच्यासंदर्भात एका बाजूला विरोधक (रायबागन) आणि दुसर्‍या बाजूला स्वराज्य असा बाका पेचप्रसंग होता. अशाही पेचप्रसंगात शिवराय यांनी सन्मानाने रायबागन यांना त्यांच्या प्रदेशात पुन्हा पाठविले. तीन, शिवराय तंजावरवरून परत येत असताना यादवड आणि बेलवड येथे एक युद्ध झाले. शिवरायांनी ते युद्ध धर्मयुद्ध या नियमाप्रमाणे लढविले. म्हणजेच शिवरायांनी आणि शिवरायांच्या सैन्यांनी मल्लम्मा यांच्याविरोधात शस्त्राचा वापर केला नाही. मल्लम्मा या महिला होत्या. त्यांच्याविरोधात शिवरायांनी शस्त्र चालविले नाही. हा एक नैतिकतेचा आणि धर्मयुद्धाचा मानदंड ठरतो. चार, शिवरायांनी आपल्या जीवनात सखासखीच्या विचाराला महत्त्व दिले होते. सईबाईंसाठी ‘श्री सखी राज्ञी जयंति’ हा शिक्का तयार करण्यात आला होता. त्यामध्ये सखी ही संकल्पना अधोरेखित केली होती.

धर्मयुद्ध आणि युद्धधर्माचा समन्वय

शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचा तिसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे धर्मयुद्ध आणि युद्धधर्म या दोन तत्त्वांना समजून घेणे होय. हा मुद्दादेखील एक सॉफ्ट पॉवर आहे. शिवरायांच्या जीवनातील घडामोडींचा अर्थ या तत्त्वाच्या आधारे स्पष्ट होतो. उदाहरणार्थ, सातारा, कोल्हापूर, पन्हाळा आणि पन्हाळ्याच्या अवतीभवतीच्या भागाकडे धर्मयुद्ध किंवा मानव धर्म म्हणून पाहत होते. तसेच शिवरायांनी धर्मयुद्ध जिंकण्यासाठी युद्धधर्माचा नियम काही वेळा पाळला. त्यांचे नेतृत्व सामान्यज्ञान आणि विशाल कल्पनाशक्ती यांचा एक दुर्मीळ समन्वय साधत होते. यासंदर्भातील तपशील शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वातील धर्मयुद्ध आणि युद्धधर्म यांची द़ृष्टी स्पष्ट करणारे दिसतात. एक, शिवराय तुळजाभवानीचे भक्त होते. तुळजाभवानी मंदिर त्यांनी प्रतापगड येथे बांधले.

तुळजाभवानी या प्रतीकाचा एक अर्थ अहिंसा आणि दुसरा अर्थ अहिंसेसाठी साहस व शौर्य असा त्यांनी घेतला होता. कारण, स्त्री स्वरूपातील देवता शांततेच्या काळात पुजल्या जातात. आदिमातेची पूजा शांततेच्या काळात केली जात होती. परंतु, याबरोबर रयतेच्या कल्याणासाठी, शांततेसाठी, सामाजिक सलोख्यासाठी, अहिंसा चिरंतन टिकविण्यासाठी साहस आणि शौर्य या गुणांची प्रेरणा तुळजाभवानी देते. हे तत्त्व शिवरायांच्या जीवनचरित्राचा अत्यंत महत्त्वाचा भाग ठरते. दोन, शिवरायांनी प्रथम सातत्याने अहिंसेचा मार्ग वापरला होता. तोरणा, राजगड, सिंहगड, पुरंदर हे चार किल्ले प्रथम घेताना त्यांनी वाटाघाटी आणि मतपरिवर्तनाला महत्त्व दिले होते. तेव्हा त्यांनी रक्तविहीन क्रांती घडवून आणली होती. जावळीच्या मोरे यांनी दत्तक घेतला होता. त्या दत्तक व्यक्तीस पाठिंबा शिवरायांचा होता. परंतु, स्वराज्याच्या विरोधात मोरे गेल्यानंतर तणाव निर्माण झाला.

शिवरायांनी पन्हाळ्यावर प्रथम सत्ता 28 नोव्हेंबर 1659 रोजी मिळविली. तेव्हादेखील त्यांनी पन्हाळा किल्ला चर्चा, वाटाघाटी आणि मतपरिवर्तन या मार्गांनी घेतला होता. असे अनेक तपशील लक्षात घेऊन राजाराम शास्त्री भागवत यांनी शिवरायांनी रक्तविहीन क्रांती केली होती, असे वर्णन केले आहे. तीन, शिवरायांनी अनियंत्रित हिंसेला नाकारले होते. अनियंत्रित क्षत्रियत्व ही संकल्पना शिवरायांना मान्य नव्हती. शिवरायांनी क्षत्रियत्वाचा पुरस्कार केला होता. परंतु, शिवरायांचे क्षत्रियत्व मानव धर्माला प्राधान्य देणारे होते. अहिंसा, शांतता, रयतेचे कल्याण, स्वशासन निर्माण करण्यासाठी क्षत्रियत्वाचा त्यांनी उपयोग केला होता. मानवाचे अस्तित्व धोक्यात आलेे तेव्हा शिवरायांनी क्षत्रियत्वाचे तेज कृती आणि कार्यक्रमांतून व्यक्त केले होते. थोडक्यात, तुकाराम महाराजांच्या, ‘दया तिचे नाव भूतांचे पाळण आणिक निर्दालन कंटकांचे’ या अभंगातील आशय शिवरायांनी व्यवहारात उतरविला होता. यामुळे शिवराय शक्यतो धर्मयुद्ध या पद्धतीने लढत राहिले. परंतु, धर्मयुद्ध अडचणीत आले तर शिवरायांनी व्यवहारवादी युद्धधर्म स्वीकारला.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार

शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वातील चौथे महत्त्वाचे वैशिष्ट्य विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार हे ठरते. शिवरायांनी सातत्याने जुन्या परंपरांपेक्षा नवीन प्रगत परंपरा सुरू केल्या. त्यांनी प्रगत परंपरांची बाजू घेतली. हा शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू म्हणजे सॉफ्ट पॉवर ठरतो. यासंदर्भातील निवडक उदाहरणे महत्त्वाची आजही आदर्श ठरणारी आहेत. एक, शिवरायांच्या काळात थोरला दुष्काळ पडला होता. थोरल्या दुष्काळामुळे लोक हतबल झाले होते. जिजाऊ आणि शिवरायांनी हतबलता बाजूला ठेवली. त्यांनी शेतीला पाणी उपलब्ध करून दिले. त्यांनी शेतीसाठी छोटे बंधारे बांधले. यासंदर्भातील उदाहरण देहू गावाजवळील सांगुर्डे हे एक गाव आहे. दुसरे उदाहरण म्हणजे पाषाण येथे त्यांनी तळ्याची व्यवस्था केली. दोन, समुद्र शास्त्र समजून घेऊन शिवरायांनी आरमाराची उभारणी केली.

आरमाराची उभारणी हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या पुरस्काराचेच उदाहरण आहे. तीन, शिवरायांच्या काळात बांधकाम झाले. बांधकाम या क्षेत्रातील शास्त्रीय ज्ञान त्यांनी उपलब्ध करून दिले होते. बांधकामाच्या क्षेत्रातील शास्त्रीय ज्ञान म्हणजेच विज्ञानाचा पुरस्कार ठरतो. चार, शिवरायांच्या काळात किल्ल्यांवर पाणी साठविण्यासाठी तळ्यांची व्यवस्था करण्यात आली. तळ्यांमध्ये पाणी साठविण्याचे तंत्र त्यांनी उपलब्ध केले होते. जिऑलॉजीसारख्या विद्याशाखेप्रमाणे हे ज्ञान होते. पाच, शिवरायांनी अंधश्रद्धा आपल्या जीवनात आणि सार्वजनिक जीवनात पाळल्या नाहीत. शिवरायांनी सातत्याने विवेकी भूमिका घेतली होती.

लहान मुलाच्या जन्मावेळी त्यांनी विवेकी द़ृष्टिकोन विकसित केला होता. मूल उलटे जन्मास आले. या घटनेचा अर्थ त्यांनी मोगल साम्राज्याला ते उलटे करेल, असा लावला होता. थोडक्यात, शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वातील हे पैलू भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांनाही महत्त्वाचे वाटले होते. तसेच महात्मा फुले, राजाराम शास्त्री भागवत, न्यायमूर्ती रानडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादी परिवर्तनवादी विचारवंतांनाही महत्त्वाचे वाटत होते. आजच्या काळातदेखील शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वातील हे पैलू आपणास द़ृष्टी देणारे आहेत. समाजाला कालसुसंगत आकार देण्यासाठी उपयुक्त ठरणारे आहेत. या अर्थाने शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वातील गुणवैशिष्ट्ये ही एक सॉफ्ट पॉवर आहे.

Back to top button