प्रवर्तन : कालचक्राचे परिवर्तन | पुढारी

प्रवर्तन : कालचक्राचे परिवर्तन

प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर

अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भावुक भाषणाने अनेकांची मने हेलावून गेली असली, तरी त्यामध्ये अनेक आशय दडलेले आहेत. रामसेतू उभारणीच्या काळापासून एक नवे कालचक्र सुरू झाले; तशाच प्रकारची स्थिती वर्तमानात असल्याचे सांगून पंतप्रधानांनी भविष्यातील विकसित भारताचा संकल्प दृढनिश्चयाने आणि सामूहिक सहभागाने पुढे नेण्याचा विचार मांडला आहे. या विकासपर्वातील सर्वसमावेशकता ही रामराज्याच्या संकल्पनेचा आधारबिंदू आहे.

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीमुळे संपूर्ण भारतामध्ये अभ्युदयाचे नवे चैतन्यपर्व उदयास आले आहे. समाजशास्त्रीय दृष्टीने विचार करता 22 जानेवारी 2024 रोजी भारतात एका सांस्कृतिक क्रांतीची पहाट झाली आहे, असेही म्हणता येईल. ही एका सकारात्मक विकासपर्वाची नांदी होय. सामाजिक व सांस्कृतिक घटनांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे श्रेय ऑगस्ट कॉम्ट या विचारवंताकडे जाते. आधुनिक जगामध्ये समाजशास्त्राचा पाया ऑगस्ट कॉम्ट यांनी घातला. त्यांना अभियंता व्हावयाचे होते; पण हेन्ड्री डी. सायमन यांच्या प्रभावामुळे ते तत्त्वज्ञानाकडे वळले. सकारात्मक दृष्टीने विचार हा त्यांचा चिंतनाचा आत्मा होता.

कार्ल मार्क्स, मॅक्सवेल आणि लिबसेट या विचारवंतांनी राजकीय समाजशास्त्र ही ज्ञानशाखा विकसित केली आणि राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या दोघांचा एकत्र अभ्यास करून राजकीय घडामोडींचे ऐतिहासिक, सांस्कृतिक, समाजशास्त्रीय दृष्टीने विश्लेषण करण्यासाठी एक परिमाण म्हणून तिचा विकास करण्यात आला. पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येमध्ये रामलल्लाचे पुनरागमन, श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा याचा राजकीय, समाजशास्त्र दृष्टीने विचार करता, यास सांस्कृतिक क्रांती म्हणणे यथार्थ ठरेल. 1967 साली चीनमध्ये माओ त्से तुंग यांनी जशी नवी सांस्कृतिक क्रांती घडविली, तशाच प्रकारे भारतामध्ये नरेंद्र मोदी यांनी नवा माणूस, नवी संस्कृती घडविण्यास प्रारंभ केला आहे. परंतु, ही क्रांती चीन, रशिया किंवा अमेरिकेचे अंधानुकरण करणारी नाही; तर ती विशाल व समृद्ध परंपरा लाभलेल्या भारतीय संस्कृतीवर आधारलेली आहे. आत्मनिर्भर भारताची उभारणी करणारी आहे.

रामराज्याची संकल्पना : महर्षी वाल्मीकी ऋषींनी रामायण हे संस्कृत महाकाव्य लिहून रामकथा अभिजात साहित्याच्या रूपाने अजरामर केली आहे. यातील दुसर्‍या अध्यायामध्ये भरताने श्रीरामचंद्रास विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नोंदविण्यात आलेली आहेत. त्यामध्ये कल्याणकारी आदर्श राज्याची कल्पना मांडली आहे. अधिकाधिक लोकांचे अधिकतम कल्याण साध्य करण्यासाठी राज्यकर्त्याची कर्तव्ये त्यात नोंदविण्यात आलेली आहेत. राजा, मंत्री, परिषद, कर, रचना, कल्याणकारी उपक्रम, परराष्ट्राशी संबंध इत्यादी अनेक पैलूंची चर्चा त्यामध्ये करण्यात आलेली आहे. महात्मा गांधींनी ‘रामराज्य’ ही संकल्पना रामायणातील याच आदर्श विचारांच्या आधारे केली आहे. त्याच पायावर आधुनिक काळात ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे ब्रीदवाक्य घेऊन विद्यमान शासनाने जी-20 परिषदेची आखणी केली. ‘एक विश्व, एक परिवार, एक भविष्य’ अशी भूमिका घेऊन भारताने आपल्या परराष्ट्र धोरणाची आखणी केली आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास’ हे सूत्र यामध्ये केंद्रस्थानी आहे. तसेच सर्वसमावेशकता हा यातील केंद्रबिंदू आहे. भारतीय संविधानाची सजावट करताना प्रसिद्ध चित्रकार नंदलाल बोस यांनी भारतातील ज्या आदर्श महानायकाची रेखाटने काढली आहेत, त्यामध्ये प्रभू रामचंद्र, सम्राट अशोक यांचा समावेश आहे. श्रीमन नारायण अग्रवाल यांनी 1936 साली लिहिलेल्या ग्रंथामध्ये महात्मा गांधींच्या राज्य विचाराचा परामर्श घेताना रामराज्य कल्पनेची चर्चा केली आहे.

सांस्कृतिक विचार मंथन : मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने पंतप्रधानांनी केलेले भाषण म्हणजे सांस्कृतिक विचार मंथनाचा आदर्श नमुना होय. त्यांचे हे भाषण भारताच्या अमृतपर्वातील विकास संकल्पाचा जाहीरनामाच म्हटला पाहिजे. इतिहासातील प्रत्येक क्षण शाश्वत असतो. चिरंतन असतो आणि तेवढाचा तो गतिमान असतो, राम मनोहर लोहिया म्हणत. पंतप्रधान मोदींनी या भाषणामध्ये प्रत्येक भारतीयाच्या जीवनात राम, कृष्ण व शिव आहे, असे प्रतिपादन केले आहे. देवाकडून देशाकडे आणि रामाकडून राष्ट्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांनी मांडला. प्रत्येक भारतीयाच्या मनात असलेल्या प्रभू रामाविषयीच्या अपार श्रद्धा व आदरभावास अभिवादन करून त्यांनी विचारमंथनास आरंभ केला. या प्राणप्रतिष्ठेपूर्वी त्यांनी 11 दिवस निर्जळी केली. ही तपस्या ऋर्षी परंपरेस साजेशी आहे. पान खत वर
त्यांनी कुठल्याही प्रकारचे आसन निद्रेसाठी वापरले नाही आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जाऊन आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडूतील राममंदिरांचे दर्शन घेतले. जेथून रामसेतू बांधण्यास सुरूवात झाली तेथील पवित्र मंदिरात अनुष्ठान केले. सर्वांना ‘राम राम’ असे अभिवादन करून त्यांनी भाषणास आरंभ केला. शतकांच्या प्रतिक्षेनंतर आज प्रभूरामचंद्र आमच्या घरी आले आहेत, हे त्यांचे भावोद्गार अयोध्येत श्रीराम मंदिराच्या स्थापनेसाठी झालेल्या संघर्षाचे स्मरण करुन देणारे आहेत. सुमारे 500 वर्षांच्या या संघर्षादरम्यान अनेकांनी बलिदान दिले. हौतात्म्य पत्करले. त्यातून हा इतिहासाचा क्षण अवतरला आहे. रामाला प्रत्यक्ष वनवास केवळ 14 वर्षांचा करावा लागला; पण कलियुगात हा वनवास कितीतरी शतकांचा ठरला. या प्रदीर्घ विलंबाबद्दल त्यांनी क्षमा याचनाही केली. ‘रामल्लाला अब टेंट मे नही रहेगे मंदिर मे रहेंगे’ हे पंतप्रधानांचे भावूक वाक्य सर्वांचीच मने हेलावणारे ठरले.

‘राम ही आग नाही, राम ही ऊर्जा आहे; राम हा वाद नाही राम हा उपाय आहे, राम फक्त आमचा नाही, राम सर्वांचा आहे’ ही पंतप्रधानांनी केलेली मांडणी सर्वसमावेशकतादर्शी आहे. रामराज्याच्या संकल्पनेतील ते केंद्रस्थान आहे. भारतीय समाजाच्या प्रगभ व परिपक्वतेची जाणीव करण्याचा आजचा क्षण आहे, हे भव्य राम मंदिर ‘विकसित भारता’च्या उदयाचे साक्षीदार बनेल, असा सिद्धांत मांडून पंतप्रधानांनी या सांस्कृतिक क्रांतीच्या दूरदृष्टीची नवनवीन क्षितिजे स्पष्ट केली.

जीवनाचा अखंड प्रवाह : प्रत्येक युगामध्ये लोकांनी रामाला आपापल्या पद्धतीने शब्दांत अभिव्यक्त केले आहे. त्याचा साकल्याने अभ्यास करुन पंतप्रधान मोदी यांनी एक महत्त्वाची मांडणी केली. ते असे म्हणाले की, ही एका नवीन कालचक्राची सुरुवात आहे. गुलामगिरीची मानसिकता झुगारून उठणारे राष्ट्र, भूतकाळातील प्रत्येक घडामोडीतून हिम्मत धरणारे राष्ट्र अशा प्रकारे इतिहास घडविते. पुढील हजार वर्षापर्यंत लोक या क्षणाबद्दल बोलतील. कालचक्रावर कोरलेल्या या अमीट स्मृतीरेषा आहेत. यातून सांस्कृतिक क्रांतीची छटा स्पष्ट करून त्यांनी नवयुगाच्या प्रासादचिन्हांची आठवण करून दिली.

श्रीरामाच्या प्रतिमेचा संदर्भ देऊन त्यांनी या सांस्कृतिक क्रांतीची बैठक प्रस्थापिक केली. संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय ही मुल्ये समोर ठेवून आम्हाला विकासाचे नवे मन्मंथन घडवावयाचे आहे. त्रेतायुगातील प्रभू रामाच्या आगमनानंतर तुलसीदासांनी लिहिले होते की, ‘प्रभू बिलोकी हरषे पुरबासी’ म्हणजे अयोध्येतील सर्व लोक आाणि देश बांधव आनंदाने भरून गेले. भारतीय संविधानाच्या पहिल्या प्रतिमध्ये श्रीराम उपस्थित आहेत. प्रसिद्ध चित्रकार नंदलाल बोस यांनी त्यांचे रेखाटन काढले; परंतु संविधान अस्तित्त्वात आल्यानंतर भगवान श्रीरामाच्या अस्तित्त्वावरून कायदेशीर लढाई सुरू झाली. पण न्यायाची प्रतिष्ठा जपणार्‍या न्यायव्यवस्थेने न्यायतत्वांचे पालन करत या प्रकरणाचा निकाल दिला. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच प्रभू रामाचे मंदिर हे सनदशीर पद्धतीने बांधलेले आहे, ही बाब स्पष्ट केली.

रामाची व्याख्या ऋषीमुनींनी रमन्ते यस्मिन् इति राम” अशी केली आहे. ज्यामध्ये सर्व काही लीन होते, तो राम सर्वत्र आहे. त्यामुळे राममंदीराची प्रतिष्ठापना हा क्षण केवळ उत्सवाचा नाही तर चिंतन करण्याचा आहे. जगाचा इतिहास साक्षी आहे की, अनेक राष्ट्रे आपल्या इतिहासात अडकतात. इतिहासाच्या गुंफलेल्या गाठी सोडविण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना यश मिळविण्यासाठी मोठ्या समस्यांना सामना करावा लागला. पण भारताने ज्या गांभीर्याने ही इतिहासाची गाठ उकलली आहे त्यावरून हे स्पष्ट होते की आपले भविष्य भूतकाळापेक्षा खूपच सुंदर असणार आहे. सांस्कृतिक क्रांतीचे यश सर्वांच्या समर्पणातून अधिक चमकून दिसते. राममंदिराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्‍यांना भारतीयांच्या सामाजिक भावनेची शुद्धता कळू शकली नाही. शांतता, संयम, सौहार्द आणि समनवय हे भारतीय समाजाचे वैशिष्ट्य आहे. याची प्रचिती म्हणून राममंदीराकडे पाहिले जाईल.

या मंदिरातून भारतीयांना नवी ऊर्जा प्राप्त होईल. समाजातील प्रत्येक घटकाला उज्वल भविष्याच्या प्रत्येक वाटेवर पुढे जाण्यासाठी हे मंदिर प्रेरणा देईल. राम हा आनंदाचे प्रतिक आहे. आता रामायण हा जागतिक परंपराचा उत्सव बनत आहे. राम मंदिरामुळे वसुधैव कुटुंबकम ही भावना जगभर रूजविली जात आहे. भारतीय संस्कृतीमधील अतुट श्रद्धेचे हे प्रतिक आहे. हे मंदिर केवळ देवाचे नाही तर भारताच्या दिशांचे मंदिर आहे. राम ही भारताची श्रद्धा आहे, राम हा पाया आहे, राम हा विचार आहे, राम हा भारताचा कायदा आहे, राम हे भारताचे चैतन्य आहे, राम ही प्रतिष्ठा आहे, शान आहे, सत्प्रवाह आहे. रामचरित्रातील आदर्शांचा आणि जीवमूल्यांचा आधार घेत त्यांचे अनुसरण करुन विकसित भारताची संकल्पना पुढे न्यायची आहे. यासाठी प्रत्येक क्षण राष्ट्र उभारणीसाठी मजबूत करावयाचा आहे, हा विचार पंतप्रधानांनी मांडला आहे.

विसाव्या शतकात वसाहतवादाविरुद्धचा लढा जिंकून देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा स्वातंत्र्य चळवळीतील वीरांनी देशाच्या कारभारात रामराज्याचा आदर्श पाहिला. रामराज्याची लोककल्याणकारी प्रतिमा त्यांच्या मनात केंद्रित होती. रामराज्याकडे सर्वसमावेशक लोकशाही व्यवस्था म्हणून पाहिले असे म्हणता येईल. महात्मा गांधींसाठी आदर्श सुशासनाची व्यवस्था हीच खरी लोकशाही होती. यामध्ये राजा आणि गरीब यांना समान अधिकार असतील. त्यांच्या दृष्टीने रामराज्य हे समतेचे राज्य होते. सत्य आणि धर्म त्याचा आधार होता. ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा संकल्प ‘विकसित भारत’ या मोहिमेतून पंतप्रधानांनी केला आहे. जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांचे अंतिम उद्दिष्ट सर्वजनसुखाय हेच आहे. समाजातील शेवटच्या माणसापर्यंत विकासाचे अमृत पोहोचल्यास रामराज्याची संकल्पना खर्‍या अर्थाने साकार होणार आहे. ही भारताच्या अभ्युदयाची वेळ आहे आणि भारत पुढे जाणार आहे हे या सांस्कृतिक क्रांतीचे सुचिन्ह आहे.

Back to top button