क्रीडा : विश्वचषकातले अजरामर तारणहार | पुढारी

क्रीडा : विश्वचषकातले अजरामर तारणहार

निमिष वा. पाटगावकर

मॅक्सवेलचे द्विशतक ही या विश्वचषकातील एक सर्वोत्तम खेळी ठरली आहे. अशीच अविस्मरणीय खेळी 1983 च्या विश्वचषकात कपिलदेवने केली होती. मॅक्सवेल आणि कपिलदेव यांच्या खेळीची तुलना करणे चुकीचे होईल; पण त्यातले साधर्म्य बघितले तर कपिलनेही त्यावेळी सही बात सही वक्त पकडून केली आणि भारताला तारले होते.

अमिताभ बच्चन यांच्या त्रिशूल सिनेमात एक प्रसिद्ध संवाद आहे…. सही बात को सही वक्त पर किया जाए तो उसका मजा ही कुछ और है, और मैं सही वक्त का इंतजार करता हूं. क्रिकेटमध्येही अगदी नेमके असेच असते. अनेक फलंदाज खोर्‍याने धावा काढतात, गोलंदाज बळी मिळवतात. पण ते ज्या संघासाठी करतात, त्या संघाला आपले उद्दिष्ट पार करता आले नाही तर ती सही बात असली तरी सही वक्त नसतो. यामुळेच गेल्या मंगळवारी वानखेडेवर ग्लेन मॅक्सवेलने जी खेळी केली, ती या अभिताभच्या संवादासारखी ठरते. अफगाणिस्तानला उपांत्य फेरीची स्वप्ने पडायला लागली होती आणि का नाही पडणार? 292 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 7 बाद 91 असताना असे असे काही घडेल याची कुणी कल्पनाही केली नव्हती.

मॅक्सवेलचे द्विशतक म्हणूनच विश्वचषकातील एक सर्वोत्तम खेळी ठरली आहे. आपल्या पाच वेळा विश्वचषक विजेत्या संघावर अफगाणिस्तानकडून पराभूत व्हायची वेळ येत आहे आणि आपल्या उपांत्य फेरीच्या प्रवेश निश्चितीसाठी मला संघाला जिंकून देणे गरजेचे आहे हे जाणून मॅक्सवेल खेळपट्टीवर उभा राहिला. खरं तर तो शारीरिकरीत्या पूर्ण कोलमडून गेला होता. त्याच्या दोन्ही पायात वळ आले होते, कंबरेत उसण भरली होती, डाव्या पायाच्या हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवू लागला होता. समोर कर्णधार पॅट कमिन्स उभा होता. मॅक्सवेलने कमिन्सला आता माझ्याने शक्य नाही तेव्हा मी निवृत्त होतो सांगून कमिन्सची परवानगीही मिळवली होती. पण त्याच वेळी ऑस्ट्रेलियाचे फिजिओथेरपिस्ट निक जोन्स यांनी आपले कौशल्य पणाला लावले.

ऑस्ट्रेलियाला जिंकायला जेव्हा पंचावन्न धावा हव्या होत्या, तेव्हा मॅक्सवेल मैदानात अक्षरश: धारातीर्थी पडला. प्रेक्षकांच्या काळजाचाही एक क्षण ठोका चुकला. आजकाल कुठल्याही व्यावसायिक खेळाडूचा फिटनेस चांगलाच असतो. पण मुंबईच्या सध्याच्या प्रदूषणयुक्त हवेत आणि जोडीला गर्मी आणि आर्द्रतेच्या विळख्यात क्रिकेट खेळायला फिटनेसबरोबर या हवेत खेळपट्टीवर उभे राहायचा मनोनिग्रह गरजेचा असतो. निक जोन्स यांनी मॅक्सवेलला जिथे क्रॅम्प येत होते तिथे मसाज दिलाच; पण त्याहून जास्त बहुमूल्य समुपदेशन केले. कुणीही क्रिकेटपटू विचार करेल. अजून हेजलवूड आणि झाम्पा खेळायचे बाकी होते. त्यांना मैदानात येऊन जितक्या धावा करता येतील तितक्या करू देत आणि पुन्हा गरज वाटली तर थोडी विश्रांती घेऊन मॅक्सवेल पुन्हा मैदानात उतरेल.

कमिन्सचीही हीच विचारसरणी होती. निक जोन्स यांनी मॅक्सवेल आणि कमिन्स दोघांना समजावून सांगितले, मॅक्सवेलसाठी सर्वात योग्य काय असेल तर मैदानात उभे राहणे. एकदा तो आत गेला तर त्याचे सर्व शरीर असहकार पुकारेल आणि पुन्हा गरज पडली तरी तो मैदानात उतरू शकणार नाही. याउलट झोपलेल्या अवस्थेतून त्याला उभे केले तर रक्तप्रवाह पुन्हा पायात चालू होईल. त्याचे धावणे पूर्ण थांबवून त्याने खेळावे, हा सल्ला जोन्स यांनी दिला. मॅक्सवेल आणि संघासाठी तो पूरक होता. मॅक्सवेलने या धावा एका जागी उभे राहून पाच षटकार आणि पाच चौकारांच्या सहाय्याने काढल्या. अफगाणिस्तानच्या कुठल्याही डावपेचांचा अभाव त्याच्या पथ्यावर पडला. त्याला जेव्हा वाकता येत नाही तेव्हा चेंडूचा टप्पा पुढे ठेवून त्याला चेंडूपर्यंत पोहोचायला कष्ट करायला लावायला हवे होते. पण अफगाणी गोलंदाजांनी चेंडू बॅटच्या टप्प्यात येतील अशी खिरापत वाटली. कदाचित दुसर्‍या कोणाही संघाविरुद्ध हे जमले नसते. अर्थात फिजिओचे कल्पक समुपदेशन आणि अफगाणी गोलंदाजांची मदत मॅक्सवेलच्या खेळीचे श्रेय किंचितही हिरावून घेऊ शकत नाही. कारण त्याने सही बात को सही वक्त गाठला होता, जो संघासाठी गरजेचा होता.

विश्वचषकात संघासाठी गरजेची, पण अशीच अविस्मरणीय ठरलेली खेळी अर्थातच 1983 च्या विश्वचषकातील झिम्बाब्वेविरुद्ध कपिलदेवची. मॅक्सवेल आणि कपिलदेव यांच्या खेळीची तुलना करणे चुकीचे होईल. पण त्यातले साधर्म्य बघितले तर कपिलनेही त्यावेळी सही बात सही वक्त पकडून केली आणि भारताला तारले. मॅक्सवेल इथे उकाड्यात उभा होता तर कपिल देव टर्नब्रिजवेल्सला बोचर्‍या थंडीत खेळला होता. म्हणजे दोघांनाही आपापल्या सवयीच्या प्रतिकूल असे हवामान होते. भारताला 1983 च्या विश्वचषकात अंडरडॉग्ज म्हणायचे धाडस फक्त ऑस्ट्रेलियाच्या किम ह्यूज यांनी केले होते. आज आपण नेदरलँडस्च्या संघाचेही पंचतारांकित हॉटेलमध्ये सुवासिनींनी ओवाळत स्वागत करतो. आपल्या ‘अतिथी देवो भव’चा तो भागही असेल; पण तेव्हा भारतीय संघ लंडनला विमानतळावर उतरला तेव्हा मागून तेव्हाच आलेल्या वेस्ट इंडिज संघासाठी वाट करून द्यायला सांगितली होती. वर टोमणाही होता, नाऊ द रिअल टीम कम्स. कपिलदेवच्या मनात आपल्या देशाला वारंवार हिणवले जाण्याचा तो राग खदखदत होता.

भारताचा बाकीचा संघ जे काही साखळी सामने असतील ते खेळू, जिंकलो तर ठीक; नाही हरणे काही नवीन नाही, या भावनेने इंग्लंडला गेला होता आणि आपण काही बाद फेरी गाठणार नाही, याच विश्वासाने पुढे अमेरिकेला फिरायला जायचे प्लॅनिंगही केले होते. कपिलदेव मात्र विश्वचषक जिंकायच्या उद्देशाने गेला होता. तेव्हा ना कोणी प्रशिक्षक, ना समुपदेशक, ना कोणी फिजिओथेरपिस्ट संघाबरोबर असत. आजच्या डिजिटल युगातील अद्ययावत अ‍ॅनालिटिक्सचा तेव्हा जन्मही झाला नव्हता. भारताने आपल्या गटातला पहिला वेस्ट इंडिजचा सामना चक्क जिंकला होता. दोन वेळा विश्वविजेत्या द रिअल टीमला हरवले होते. त्यानंतर दुबळ्या झिम्बाब्वेलाही हरवले होते. पण पुढे ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजकडून दारुण पराभव स्वीकारला होता. भारतासारखेच झिम्बाब्वेला कुणी खिजगणतीत धरत नव्हते. स्पर्धेतील कमकुवत संघाला ही टोचणी नेहमीच सहन करावी लागते. या विश्वचषकातही जरी अफगाणिस्तान आता कमकुवत नसला तरी नवोदित असल्याने जोपर्यंत त्यांनी तीन सामने जिंकले नव्हते तोपर्यंत त्यांची दखल कुणी विशेष घेत नव्हते. तेव्हा कपिलदेवचा संघ गटातील परतीच्या सामन्यात दुसर्‍या कमकुवत संघ झिम्बाब्वेकडूनही हरला असता तर पहिला विजय नक्कीच नशिबाचा वाटला असता. 5 बाद 17 असा लाजिरवाणा धावफलक असताना कपिल मैदानात आला आणि त्याने इतिहास घडवला. बिन्नीबरोबर 60, मदनलाल बरोबर 62 आणि किरमाणीबरोबर नाबाद 126 अशा भागीदार्‍या कपिलने केल्या. कपिलच्या या पवित्र्यानेच झिम्बाब्वे गळपटून गेले आणि हा सामना भारतासाठी विश्वचषक जिंकायचे स्वप्न वास्तवात उतरवू शकतो हे दाखवणारा ठरला.

क्रिकेट सामन्यात रेकॉर्ड होणे हे खेळाडूच्या किंवा देशाच्या द़ृष्टीने अभिमानास्पद असते. पण काही खेळी अशा असतात, त्या स्पर्धेचा नूर पालटवणार्‍या असतात. 1979 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजची अवस्था 4 बाद 99 असताना व्हिव्हियन रिचर्डस्ने केलेली शतकी खेळी वेस्ट इंडिजला विश्वचषक देऊन गेली. 1999 च्या विश्वचषकात जेव्हा द. आफ्रिकाविरुद्ध जिंकायला 272 हव्या असताना ऑस्ट्रेलिया 3 बाद 48 होते. हर्षल गिब्जने जेव्हा स्टीव्ह वॉचा झेल सोडला तेव्हा वॉ त्याला डिवचायला म्हणाला, सन, यू हॅव्ह ड्रॉप्ड द वर्ल्ड कप आणि वॉ ने खरे करून दाखवले. याच 1999 च्या विश्वचषकात सचिन तेंडुलकर आपल्या वडिलांवर अंत्यसंस्कार करून परतला आणि त्याने शतक ठोकले, जे भारतीय संघासाठी पुढील वाटचालीत प्रेरणादायी ठरले.

एखाद्या संघाला संजीवनी द्यायला या अशा खेळी नक्कीच उपयुक्त असतात. कारण विश्वचषकात खरी कामगिरी असते ती उपांत्य आणि अंतिम फेरीत. 2003 च्या विश्वचषकात आपण सलग आठ सामने जिंकून अंतिम सामना हरलो आणि 2019 च्या एकाच विश्वचषकात रोहित शर्माने पाच शतके ठोकूनही ऐन मोक्याच्या वेळी उपांत्य फेरीत सगळेच कोसळल्याने त्या पाच शतकांचा उपयोग नव्हता. उपांत्य आणि अंतिम सामन्यात ज्या संघाचे खेळाडू उस वक्त का इंतजार करके सही बात सही वक्त ला करतात तेच विश्वचषक जिंकतात. भारताने यंदाही उपांत्य फेरी गाठली आहे आणि भारताची संजीवनी आहे ती आपली गोलंदाजी.ऑस्ट्रेलियाने तब्बल पाच वेळा विश्वचषक जिंकला आहे तेव्हा त्यांना मोठे सामने जिंकायचे कसब इतर कोणत्याही संघापेक्षा जास्त चांगले आहे. ग्लेन मॅक्सवेलच्या झंझावाती खेळीने संक्रमणातून बाहेर पडलेल्या ऑस्ट्रेलियाला उपांत्य सामन्यासाठी नक्कीच विशेष ऊर्जा मिळेल.

Back to top button