शिक्षण : काय सांगतो दहावीचा निकाल? | पुढारी

शिक्षण : काय सांगतो दहावीचा निकाल?

गेल्या दहा वर्षांतील दहावीचे निकाल पाहिल्यास संपूर्ण शिक्षण प्रक्रियेमध्ये बदल करण्याची गरज आहे. कारण, लेखन, वाचन, संभाषण, गणन या मूलभूत क्रियाही येत नसताना विद्यार्थ्यांना 80-90 टक्के मार्क पडताहेत. याचा अर्थ शिक्षण पद्धतीमध्ये निश्चितपणे दोष आहे. याबाबत समग्र विचारमंथन करण्याची आणि विद्यार्थ्यांना काही मूलभूत प्रक्रिया शिकवण्याची गरज आहे.

महाराष्ट्र राज्याचा यंदाचा दहावीचा निकाल 93.83 टक्के लागलेला आहे. प्रत्यक्षात हा निकाला उत्तम आहे. परंतु, तरीही समाजामध्ये या निकालाविषयी विनाकारण नकारात्मक वातावरण पसरलेले आहे. बारावीपाठोपाठ दहावीच्या निकालातही घसरण, दहावी उत्तीर्णात घट, अशा स्वरूपाचे मथळे यास कारणीभूत ठरले आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांतल्या निकालाची तुलना करून यंदाच्या निकालाचा अन्वयार्थ काढला आहे. परंतु, दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत काही सवलत मिळालेली होती. तो निकाल अंतर्गत मूल्यमापनावर दिलेला होता. त्याचप्रमाणे गेल्यावर्षी 75 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होती. त्यामुळे त्यावेळी निकालाचे प्रमाण यावर्षीच्या निकालापेक्षा तीन टक्क्यांनी जास्त होते. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे यावर्षीचा निकाल कमी किंवा निराशाजनक आहे, असं म्हणणं चुकीचं आहे. यंदाचा निकाल उत्तमच आहे.

निकालाचा तपशील पाहिल्यास, राज्यातील एकूण 151 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळालेले आहेत. दुसरीकडे, सुमारे 6,844 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. गैरप्रकारांचे प्रमाण अत्यंत कमी म्हणजे फक्त साडेतीनशे आहे. राज्यातील 66 हजार 578 विद्यार्थ्यांना 90 टक्के गुण मिळाले आहेत. हा तपशील पाहिल्यानंतर कोण म्हणेल हा निकाल निराशाजनक आहे?

माझं तर मत असे आहे की, पूर्वी पास झालेल्या विद्यार्थ्यांची दहावीनंतरची कामगिरी पाहिल्यास हा निकाल खूप सढळ हाताने लावलेला आहे, असे जाणवते. अर्थात, सढळ हाताने म्हणताना मूल्यमापनात कोणत्याही प्रकारची गडबड एसएससी बोर्डाने केलेली नाही, हेही खरं आहे; पण इयत्ता दहावीचा अभ्यासक्रम मर्यादित आहे, अत्यंत सोपा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये गुण कसे मिळवायचे याचे तंत्र उत्तमरीत्या आत्मसात झालेलं आहे. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप गेली दहा वर्षे तेच आहे.

खासगी अध्ययन वर्गाचे म्हणजेच क्लासेसचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. तेथेे परीक्षेमध्ये कसे उत्तम यश मिळेल, या द़ृष्टीने विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते. त्याद़ृष्टीने विद्यार्थ्यांना अनुभव देतात. त्यामुळे दहावीमधील उत्तीर्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि विद्यार्थ्यांना मिळणार्‍या टक्केवारीचे प्रमाणही वाढत आहे. आणखी एक मुद्दा म्हणजे, 93 टक्के निकाल ज्यावेळी लागतो आणि सुमारे 67 हजार विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळतात. दरवर्षी 60-70 हजार विद्यार्थी 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणारे असतील, तर तेवढे रँगलर महाराष्ट्रामध्ये भविष्यकाळात तयार झाले पाहिजेत; पण प्रत्यक्षात तसे काहीही दिसत नाही.

बारावीमध्येच किंवा बारावीनंतर होणार्‍या सीईटी किंवा जेईई या परीक्षांमध्ये या रँगलरची गुणवत्ता दिसून येते आहे, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे यंदाच्या दहावीच्या निकालावर फारसे अवलंबून राहू नये. आपल्या मुलाला 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत, यावरून आपला पाल्य अतिहुशार आहे, त्याचे शैक्षणिक करिअर अत्यंत उत्कृष्ट होईल, अशी मानसिकता ठेवून, आशा ठेवून खूप मोठ्या प्रमाणात त्यावर खर्च करावा का, याचाही विचार यानिमित्ताने पालकांनी करण्याची गरज आहे. या निकालाची दुसरी बाजू म्हणजे, यंदा सात टक्के (94 हजार) विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहेत. ही संख्या नक्कीच कमी नाही. या अनुर्त्तीण विद्यार्थ्यांना कौशल्य विकसनासाठी पात्र अशा स्वरूपाचा शेरा गुणपत्रिकेवर दिला जातो. त्यामुळे या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनीही निराश होण्याचे कारण नाही. त्यांनी एवढे लक्षात ठेवावं की, आपल्याला कुठला तरी कौशल्य विकसनाचा अभ्यासक्रम निवडण्याची गरज आहे. आयटीआयमध्ये अशाप्रकारचे अभ्यासक्रम आहेत. या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षेचा फॉर्म भरावा आणि आयटीआयमध्ये कौशल्य विकसनाच्या कोर्सला प्रवेश घ्यावा, जेणेकरून त्यांचं नुकसान होणार नाही. असा सकारात्मक विचार अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी करणे गरजेचे आहे.

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना समाजाने समजून सांगण्याची आवश्यकता आहे. गेल्या दहा वर्षांतील एसएससी बोर्डाच्या निकालाचे प्रमाण पाहिल्यानंतर असे जाणवते की, आपल्या संपूर्ण शिक्षण प्रक्रियेमध्ये बदल करण्याची गरज आहे. आज विद्यार्थ्यांना लेखन, वाचन, संभाषण, गणन या मूलभूत क्रियाही येत नसताना 80-90 टक्के मार्क पडतात. याचा अर्थ शिक्षण पद्धतीमध्ये निश्चितपणे दोष आहे. विद्यार्थ्यांना काही मूलभूत प्रक्रिया शिकवण्याची गरज आहे. विशेषत:, अकरावीच्या शास्त्र शाखेमध्ये असलेल्या प्राध्यापकांशी माझी अनेकवेळा चर्चा झालेली आहे. अकरावीचे शास्त्र शाखेचे प्राध्यापक असे म्हणतात की, 90 टक्के मार्क मिळालेल्या विद्यार्थ्याला साध्या साध्या गणितातल्या प्रक्रिया किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यातील उदाहरणे येत नाहीत. त्यांची कॅलक्युलेशन अ‍ॅबिलिटी (गणितीय क्षमता) अजिबात तयार झालेली नसते.

त्यामुळे आम्ही आधी फाऊंडेशन कोर्स तयार करतो आणि तो विद्यार्थी फाऊंडेशन कोर्समध्ये पारंगत झाल्यानंतर अकरावी शिकवायला सुरुवात करतो. याचा अर्थ दहावीपर्यंतच्या शिक्षण पद्धतीमध्ये कुठे तरी दोष आहे. हा दोष शिक्षकांमध्ये आहे, असे अजिबात नाही. शाळांमध्येही दोष आहे, असे नाही; पण मूल्यमापनाची प्रक्रियाच अशी आहे की, ती गुणांना पोषक आहे. क्लासेसचे प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि त्यांनी परीक्षेमध्ये गुण मिळवण्याचं तंत्र आत्मसात केलेले आहे. संबोध शिकवण्यापेक्षा सराव करून घेणे, जुन्या दहा प्रश्नपत्रिका सोडवून घेणे यावर भर देऊन विद्यार्थ्यांना भरमसाट मार्क मिळवण्याचा शॉर्टकट शिकवला जात आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम समजला आहे किंवा नाही, हे कोणाच्याही लक्षात येत नाही. सर्वच समाजाने, शासनाने आणि सर्व संस्थाचालकांनी यावर विचार करण्याची गरज आहे.

प्रत्येक वर्षी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलून प्रश्नांची काठिण्य पातळी वाढवता येईल का, याचा विचार व्हायला पाहिजे. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होतील आणि कोणालाही 100 टक्के मार्क मिळणार नाही, अशा स्वरूपाची प्रश्नपत्रिका तयार करण्याची गरज आहे. यासाठी शासनाने, एसएससी बोर्डाने शिक्षकांसाठी वर्कशॉप घेऊन समाजामध्ये हा द़ृष्टिकोन समजून सांगून परीक्षेचे स्वरूप दरवर्षी बदलते असावे, असा निर्णय घेतला पाहिजे. आज समाजातील ज्येष्ठ, वयोवृद्ध व्यक्ती सातत्याने असे म्हणतात की, आमच्या वेळेला 60-65 टक्के निकाल लागत होता आणि 60 टक्क्यांच्या वर मार्क पडले तरी खूप मार्क पडलेले आहेत, असे वाटायचे. आज त्याच्या नेमकी उलट प्रक्रिया घडते आहे.

या दोन प्रक्रियांचा अभ्यास केल्यानंतर निश्चितपणे विचाराला खतपाणी घालण्याची गरज आहे, असं मला वाटतं. शेवटचा मुद्दा म्हणजे, दहावीचा निकाल ही काही करिअरची फूटपट्टी नाही. दहावीचे गुण ही काही भविष्यकाळातली यशाची नांदी आहे, असे अजिबात नाही. दहावी हा शैक्षणिक वाटचालीतील एक टप्पा आहे. दहावीपर्यंत विद्यार्थ्यांना भाषा, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, कार्यानुभव, कलाशिक्षण, आरोग्य शिक्षण, क्रीडा या सर्व प्रक्रियांचे ज्ञान करून देणारी शैक्षणिक व्यवस्था आहे. या शैक्षणिक व्यवस्थेपुरतेच दहावीकडे पाहणे गरजेचे आहे. भविष्यकाळात 60 टक्क्यांचा विद्यार्थीसुद्धा कठोर परिश्रम, धाडस, आत्मविश्वास, प्रयत्न यांच्या आधारे कोणत्याही अभ्यासक्रमामध्ये उत्तम यश मिळवू शकतो. त्यामुळे दहावीला जे गुण मिळालेले आहेत ते आपल्यासाठी उत्तम आहेत, असे प्रत्येकाने आनंदाने समजावे; पण आज 85 टक्के गुण मिळवलेला विद्यार्थीही नाराज होतो.

हे चुकीचे आहे. 88-90 टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे पालकही लाखो रुपये देऊन मॅनेजमेंट कोट्यामधून अकरावीसाठी प्रवेश घेतात, हेही चुकीचे आहे. विद्यार्थ्याने 88 टक्के गुण मिळवणे हा त्याचा मान आहे; पण प्रत्यक्ष पालक डोनेशन भरून त्याचे अ‍ॅडमिशन घेतात तेव्हा तो एकप्रकारे विद्यार्थ्याचा अपमानच ठरतो. पालकांनी या द़ृष्टिकोनातून निकालाकडे पाहावे. आपल्या पाल्याची क्षमता सिद्ध झालेली आहे, तो कोणत्याही महाविद्यालयामध्ये, तो कोणत्याही अभ्यासक्रमामध्ये, कोणत्याही पद्धतीमध्ये, कोणत्याही कौशल्यामध्ये उत्तम प्रगती करेल हा आत्मविश्वास दहावीच्या निकालाने, आपल्या पाल्याच्या गुणवत्तेने सिद्ध झालेला आहे. या विचाराने पालकांनी निकालाकडे पाहावे.

डॉ. अ. ल. देशमुख,
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

Back to top button