मनोरंजन : भारतीय स्त्रीच्या संघर्षाची कथा | पुढारी

मनोरंजन : भारतीय स्त्रीच्या संघर्षाची कथा

‘फायर इन द माऊंटन्स’मध्ये डोंगराळ भागात सोयीसुविधा मिळवण्यासाठी झगडणार्‍या एका आईचा संघर्ष उभा केलाय. विनम्रता रायने साकारलेली चंद्रा ही भूमिका बरीच वेगळी आहे. आई आणि पत्नीच्या कौटुंबिक चौकटीच्या पलीकडे जाऊन एक भारतीय स्त्री ही तिची ओळख जास्त महत्त्वाची ठरते.

‘फायर इन द माऊंटन्स’ हा सिनेमा उत्तराखंडच्या डोंगराळ प्रदेशात वसलेल्या गावात घडतो. दिग्दर्शक अजितपाल सिंगचा हा पहिलाच सिनेमा. याआधी ‘तब्बर’सारख्या लोकप्रिय वेबसीरिजचं दिग्दर्शन करणार्‍या अजितपालने आपला हा पहिलाच सिनेमा वर्ल्ड सिनेमाच्या पंगतीला नेऊन बसवलाय. 2021 च्या सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाला ड्रामा जॉनरसाठी सर्वोत्कृष्ट जागतिक सिनेमाचं नामांकनही मिळालं होतं.

‘तब्बर’मध्ये आपल्या कुटुंबावर आलेलं संकट परतवून लावण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार असलेला बाप प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. ‘फायर इन द माऊंटन्स’मध्ये अजितपालने डोंगराळ भागात सोयीसुविधा मिळवण्यासाठी झगडणार्‍या एका आईचा संघर्ष उभा केलाय. या सिनेमात चंद्रा ही मध्यवर्ती भूमिका साकारणार्‍या विनम्रता रायसोबत चंदन बिश्त, हर्षिता तिवारी, मयंक सिंग इत्यादी सहकलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

उत्तराखंडच्या पिथ्थोडागड जिल्ह्यातलं मुन्सियारी हे गाव उत्तराखंडचं स्वित्झर्लंड मानलं जातं. याच गावात चंद्रा ‘स्विझर्लंड होमस्टे’ नावाचं घरगुती हॉटेल चालवते. हॉटेलच्या चुकलेल्या नावासारखंच चंद्राला तिचं धकाधकीचं, कष्टप्रद आयुष्यही आता अंगवळणी पडलंय. पाय अधू झालेला लहान मुलगा प्रकाश, वयात आलेली मोठी मुलगी कांचन, विधवा नणंद कमला आणि दारूच्या नशेत बुडालेला देवभोळा नवरा धरम, हे चंद्राचं कुटुंब. धरम रूढार्थाने रिकामटेकडा नसला, तरी तो वेगवेगळ्या सरकारी सबसिडींच्या जोरावर करत असलेल्या व्यवसायातून फारसं अर्थाजन होत नाही. होमस्टे चालवण्याबरोबरच चंद्रा गावातल्या बायकांसोबत शेतमजूर म्हणूनही राबताना दिसते. रोजच्या कटकटींवर उपाय म्हणून डोंगरावर असलेल्या आपल्या घरापर्यंत चांगली वाट व्हावी ही मुख्य महत्त्वाकांक्षा मनाशी धरून चंद्रा कणखरपणे आपल्या संसाराचा गाडा हाकताना दिसते.

मुलासाठी लागणारा वैद्यकीय खर्च भागवता भागवता चंद्राच्या नाकी नऊ येतात. तर धरमच्या मते, प्रकाशचं अधूपण हे कुलदेवतेच्या शापामुळे आलंय. त्यामुळे गावातल्या पंडिताला हाताशी धरून तो देवीचा जागर घालू पाहतोय. चंद्राचा विज्ञानावर असलेला विश्वास धरमच्या मार्गातला मोठा काटा ठरतोय. श्रद्धा-अंधश्रद्धेच्या या खेळात नक्की कुणाचा विजय होतो? हे जाणून घेण्यासाठी सिनेमा शेवटपर्यंत पाहणं गरजेचं ठरतं. खरं तर या सिनेमाचा शेवट लेखक-दिग्दर्शक अजितपालने वेगवेगळ्या अर्थांसाठी खुला ठेवलाय. कुणाला तो एका सर्वसाधारण कौटुंबिक नाट्याचा शेवट वाटू शकतो, तर कुणाला त्यात श्रद्धा-अंधश्रद्धेच्या पार्श्वभूमीवर ठळक होणारे पौराणिक संदर्भ दिसू शकतात. अगदीच टोकाचे अर्थ निघत असले, तरी हा शेवट प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहील, याचं कारण म्हणजे चंद्रा! चंद्राची भूमिका साकारणार्‍या विनम्रता रायचा अभिनेत्री म्हणून हा दुसरा सिनेमा.

याआधी तिने अरुणाचली सिनेसृष्टीतले प्रख्यात दिग्दर्शक संगे दोरजी थोंगडोक यांच्या ‘रिवर साँग’मध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. ‘फायर इन द माऊंटन्स’मध्ये तिने साकारलेली चंद्रा ही आई आणि पत्नीच्या कौटुंबिक चौकटीतल्या ओळखीपलीकडे एक भारतीय स्त्री ही तिची ओळख जास्त महत्त्वाची ठरते. आपल्या मुलाचे, प्रकाशचे पाय अपघातात अधू झाल्याने सतत दवाखान्याच्या फेर्‍या मारणारी चंद्रा तिच्या घरापर्यंत रस्ता बनवण्यासाठी झगडतेय. त्यासाठी बाजारभावापेक्षा निम्म्याहून कमी किमतीत पर्यटकांना होमस्टेची सेवा पुरवून ती पै-पै जोडतेय. नवर्‍याच्या देवभोळेपणाला तिचा विरोध आहे खरा; पण कळत-नकळतपणे भारतीय पुरुषप्रधान व्यवस्थेत तिने स्वतःला वाहून घेतल्यामुळे तिचा विरोध एका पातळीनंतर कमजोर होताना दिसतो.

कोवळ्या वयातल्या मुलाचं अकाली अपंगत्व, वयात आलेल्या मुलीची काळजी, विधवा नणंदेची अघोषित असहकार चळवळ, बेवड्या नवर्‍याच्या खर्चिक अंधश्रद्धा, विकासाचा ध्यास नसलेले उदासीन गावकरी त्याचबरोबर वेळोवेळी होणारी आर्थिक, मानसिक आणि शारीरिक पिळवणूक अशा एक ना अनेक गोष्टींना तोंड देत चंद्रा येणारा प्रत्येक दिवस ‘कधी तरी रस्ता होईल’ या आशेवर कसाबसा ढकलत चाललीय.

पायाभूत सोयीसुविधांबद्दल घर, समाज आणि सरकारच्या या उदासीनतेला तोंड देत जगणार्‍या चंद्राच्या मनातल्या भावनांचा एका क्षणी होणारा उद्रेक आपल्याला सिनेमाच्या शेवटाकडे नेतो. बर्फाळ डोंगरात ज्वालामुखीचं प्रतिबिंब भासणार्‍या चंद्राच्या त्या मनोवस्थेला भारतीय समाजात खोलवर रुजलेली अंधश्रद्धा समजायचं की, भारतीय स्त्रियांच्या आदर्शवादी वागणुकीआड दबलेला मानसिक कोंडमारा समजायचं, याचं उत्तर दिग्दर्शकाने सर्वस्वी प्रेक्षकांवर सोडलंय.

खरं तर, एक फॅमिली ड्रामा म्हणून हा सिनेमा श्रेणीबद्ध करणं हे वास्तवातल्या अशा लाखो चंद्रांवर अन्याय करण्यासारखंच आहे. उत्तराखंडचं पहाडी नैसर्गिक सौंदर्य दाखवण्याबरोबर दिग्दर्शक अजितपाल या डोंगराळ भागांमधल्या समस्या अगदी खुबीने प्रेक्षकांसमोर आणून ठेवतो. या समस्या ठळक करण्यासाठी सरकारी विकासकामांच्या प्रचारयंत्रणेला विरोधाभासाच्या स्वरूपात प्रभावीपणे वापरण्यात त्याला यश आलंय. एकीकडे, पर्यटकांचं सगळं सामान आपल्या पाठीवर घेऊन डोंगर चढणार्‍या चंद्राचं आपल्याला कौतुक वाटू लागतं. तोवर पायर्‍यांवर बसलेल्या म्हातार्‍याच्या रेडिओमधून भारताच्या नव्या अवकाश मोहिमेचं कौतुक आपल्या कानावर येऊन आदळतं.

देशातल्या प्रत्येक गावात सर्व सोयीसुविधा पुरवल्याचा दावा करणार्‍या सरकारी प्रचार यंत्रणांचा ढोल आपल्याला ऐकू येतो. त्यावेळी स्क्रीनवर दिसणार्‍या हतबल चंद्राची आशाळभूत नजर त्या प्रत्येक भारतीयाचं प्रतिनिधित्व करत असते. अशा कित्येक चंद्रा आजही जीव मुठीत धरून डोंगर पालथे घालताहेत. वर्षानुवर्षे विकासयोजनांचा स्पर्शही न झालेल्या त्या वाटा तुडवण्यात फिल्मी थरार आणि आनंद शोधणार्‍या सुखासीन पर्यटकांच्या आणि पर्यायाने भारतीयांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचा दिग्दर्शक अजितपालचा हा प्रयत्न स्तुत्यच म्हणावा लागेल.

प्रथमेश हळंदे

Back to top button