राष्‍ट्रीय : अमृतपालच्या अटकेनंतर… | पुढारी

राष्‍ट्रीय : अमृतपालच्या अटकेनंतर...

पंजाब या संवेदनशील राज्यामध्ये खलिस्तानी चळवळीचे पुनरुज्जीवन करू पाहणार्‍या अमृतपाल सिंगला अटक करण्यात पंजाब पोलिसांना यश आले. जगभरातील काही देशांमध्ये खलिस्तानवाद्यांच्या हालचाली नेमक्या कशा पद्धतीने सुरू आहेत, पंजाबमध्ये या शक्तींची पोहोच कुठवर गेलेली आहे, यासारख्या मुद्द्यांची उकल करून घेण्याचे आव्हान येणार्‍या काळात तपास यंत्रणांपुढे असेल.

खलिस्तानवादी विचारसरणीचा प्रचार-प्रसार करून पंजाबमधील शांततेला ग्रहण लावणार्‍या अमृतपाल सिंग याला अखेर पंजाबमधील मोगा येथील रोडेवाल गुरुद्वाराबाहेर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार अटक करण्यात आली. पोलिस ठाण्यावर हल्ला करणे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जीवे मारण्याची धमकी देणे यासह 10 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. गेल्या 36 दिवसांपासून तो फरार होता. रोडेवाला हे जनरल भिंद्रनवाले यांचे गाव आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे या अटकेला एक वेगळे महत्त्व आहे. तसेच ही अटक पंजाब पोलिसांसाठी अत्यंत आव्हानात्मक होती. गुरुद्वाराचे पावित्र्य जपण्यासाठी पोलिसांनी आत प्रवेश न करण्याचा निर्णय घेतला.

यासाठी संपूर्ण गावाला वेढा घातला आणि धार्मिकस्थळाबाहेरच त्याला ताब्यात घेतले. त्यामुळेच अमृतपालच्या अटकेमुळे कोणताही धार्मिक ताणतणाव निर्माण झाला नाही. अशी प्रकरणे प्रचंड गुंतागुंतीची असतात. भिंद्रनवाले यांच्यावर कारवाई करताना भूतकाळाचा संदर्भ नव्हता; पण आता कोणतीही कारवाई करण्यापूर्वी 1984 मध्ये केंद्राच्या हस्तक्षेपामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करावा लागतो. त्याद़ृष्टीने पाहता पंजाब पोलिसांनी, पंजाब सरकारने आणि मुख्य म्हणजे केंद्र सरकारने अत्यंत नियोजनबद्धपणाने आणि अंतर्गत समन्वयातून अमृतपालच्या अटकेचे मिशन यशस्वी केले.

पंजाब हे राज्य केवळ पाकिस्तानच्या सीमांशी संलग्न असल्यामुळे संवेदनशील मानले जात नाही; तर हे राज्य खलिस्तान चळवळीचे केंद्रही होते. 1980 च्या सुमारास, ही मागणी जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्या नेतृत्वाखाली अशाप्रकारे उचलली गेली की, पंजाबमध्ये शतकानुशतके राहणार्‍या हिंदू आणि शिखांमध्ये फूट पडली. मोठ्या संख्येने निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. 1984 चे ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ हेदेखील याच आंदोलनामुळे घडून आले. यामध्ये भारतीय सैन्याला शीख धर्मीयांचे सर्वात मोठे श्रद्धा केंद्र असलेल्या सुवर्ण मंदिरात प्रवेश करावा लागला. राजीव गांधी यांनी ऐतिहासिक लोंगोवाल शांतता करारावर स्वाक्षरी करून शांततेच्या दिशेने जाणीवपूर्वक पाऊल टाकले. यानंतर हिंदू आणि शिखांनी एकमेकांची काळजी घेतली आणि हिंसा आणि द्वेषाची धगधगणारी आग थंडावली. खलिस्तान चळवळीमुळे आर्थिक आघाडीवर मागे पडलेल्या पंजाबने आपली गमावलेली गती पुन्हा मिळवली. 2004 नंतर काँग्रेसला सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान करून शिखांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

कालोघात हिंदू आणि शीख यांच्यातील ‘रोटी-बेटी’चे नाते पुन्हा प्रस्थापित झाले आहे, हे खरे आहे. 2017 मध्ये काँग्रेसने पंजाबमध्ये सरकार स्थापन केले; परंतु अंतर्गत उलथापालथ आणि काही सदोष संघटनात्मक निर्णयांमुळे 2022 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे सरकार गेले आणि दिल्लीत मर्यादित असलेल्या आम आदमी पक्षाचे (आप) सरकार स्थापन झाले. तेव्हापासून मर्यादित अनुभव असलेल्या अशा पक्षाच्या सरकारला संवेदनशील राज्य सांभाळणे कठीण जाईल, अशी दाट भीती निर्माण झाली होती. त्यांचे राजकीय चारित्र्य पाहून ही फुटीरवादी चळवळ पुन्हा डोके वर काढणार असल्याचीही चर्चा होती. अमृतपालच्या प्रकरणाने ती खरी ठरली. पोलिसांच्या तपासातून अमृतपालची क्राईम कुंडली समोर आली आहे.

पंजाबपासून आंतरराष्ट्रीय संबंधांपर्यंतच्या सर्व माहितीचा खुलासा झाला आहे. पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’च्या भारतविरोधी षड्यंत्रातील अमृतपाल हे एक प्यादे आहे. यापूर्वी ‘आयएसआय’ने रिंदा आणि अर्शदीपसिंग डल्ला यांनाही अशाच प्रकारे भारतविरोधी कारवायांसाठी वापरले होते. परंतु, या दोघांच्या माध्यमातून थेट लोकांपर्यंत पोहोचता येत नव्हते. त्यामुळे ‘आयएसआय’ने अमृतपालला तयार केले. जॉर्जियामध्ये त्याला आधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षणही देण्यात आले. यानंतर दुबईमार्गे त्याला भारतात पाठवण्यात आले. भारतात आल्यानंतर अमृतपालने जीन्स-टी शर्ट हा पेहराव सोडून धार्मिक पेहराव करण्याला प्राधान्य दिले.

गतवर्षी 2022 च्या ऑगस्ट महिन्यात अमृतपाल भारतात आला. त्यानंतर दीप सिद्धूच्या ‘वारिस पंजाब दे’ या संघटनेची कमान सांभाळली. तिथून पुढे विविध कार्यक्रमांमधून तो चिथावणीखोर भाषणे देऊ लागला आणि पाहता पाहता त्याच्या समर्थकांची संख्या वाढू लागली. यातून भारतातील तरुणांची माथी भडकावून त्यांना देशविरोधी बनवण्याचे ‘आयएसआय’चे षड्यंत्र किती जोरकसपणाने सुरू आहे, हे लक्षात येते. अमृतपालच्या रूपातून ‘आयएसआय’ने एक नवा प्रयोग करून पाहिला. ‘आयएसआय’च्या एजंटना अमृतपाल पहिल्यांदा दुबईत डोळ्यांच्या उपचारांदरम्यान भेटला होता. या एजंटांमध्ये काही जण पाकिस्तानात राहणारे खलिस्तान समर्थकही होते.

त्यांनी अमृतपालचा फायदा करून पंजाबमध्ये अस्थिरता पसरवता येईल का, याचा अचूक अंदाज घेतला. अमृतपालच्या प्रत्येक हालचालींवर केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांची नजर होती. चार महिन्यांपूर्वीच त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच दिल्लीमध्ये सर्व राज्यांच्या पोलिस महासंचालकांची बैठक पार पडली तेव्हाही पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी अमृतपालचा मुद्दा गांभीर्याने मांडला होता. फेब—ुवारी महिन्यात त्याच्या समर्थकांवर पोलिसांनी खटले दाखल केले. त्यापैकी एका साथीदाराला पोलिसांनी अटक केली; पण त्याला सोडवण्यासाठी अमृतपालने जमावासह अजनाला पोलिस ठाण्यावर तलवारी, बंदुका घेऊन हल्ला केला होता. त्यानंतर अमित शहांना त्याने धमकी दिली होती. या दोन कृत्यांनंतर त्याच्या भोवतीचा फास आवळला गेला. यासाठी केवळ पंजाबच नव्हे, तर अन्य राज्यांच्या पोलिसांनाही अलर्ट करण्यात आले होते. ही अटक करताना आणि अटकेनंतरची परिस्थिती हाताळण्याबाबत पंजाब पोलिसांनी दाखवलेली सतर्कता आणि नियोजन हे निश्चितच उल्लेखनीय आहे.

अमृतपालच्या अटकेमुळे पंजाबमधील तरुणांच्या मानगुटीवर बसलेले खलिस्तानवादाचे भूत लगेच उतरेल असे नाही; परंतु तसा प्रयत्न करणार्‍यांच्या इराद्यांना जबरदस्त धक्का बसला असेल, यात शंका नाही. अमृतपालला अटक करण्यापूर्वी त्याच्या साथीदारांना अटक करून पोलिसांनी अनेक माहिती जमवलेली असल्याने कायद्यातील पळवाटा काढून अमृतपाल सुटण्याच्या शक्यता जवळपास संपुष्टात आल्या आहेत. पाकिस्तानने आखलेल्या एका षड्यंत्राला चपराक देण्यात भारतीय तपास यंत्रणांना यश आले असले, तरी यामुळे गाफील राहून निश्चितच चालणार नाही. कारण, उद्याच्या भविष्यात आणखी एखादा अमृतपाल उदयाला येऊ शकतो. त्यांचा वेळीच बंदोबस्त केला जाणार का, हा खरा प्रश्न आहे.

अनेकदा राजकीय फायद्यांसाठी अशा देशविघातक शक्तींकडून होणार्‍या कृत्यांकडे कानाडोळा केला जातो; परंतु त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते, हे सर्वच राजकीय पक्षांनी लक्षात घेतले पाहिजे. अमृतपालच्या अटकेतून राष्ट्रहितापेक्षा मोठे दुसरे काहीही नाही, हे पंजाब सरकार आणि केंद्र सरकार या दोघांनीही पुन्हा एकदा देशविघातक शक्तींना दाखवून दिले आहे. येणार्‍या काळात अमृतपालकडून जगभरातील काही देशांमध्ये खलिस्तानवाद्यांच्या हालचाली नेमक्या कशा पद्धतीने सुरू आहेत, त्यांचे प्लॅन्स काय आहेत, पंजाबमध्ये या शक्तींची पोहोच कुठवर गेलेली आहे, यासारख्या मुद्द्यांची उकल करून घेण्याचे आव्हान तपास यंत्रणांपुढे आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे विदेशात बसून भारताला अस्थिर करणार्‍या शक्तींचा बीमोड करण्यासाठीची रणनीती ठरवता येणार आहे. त्यामुळेच अमृतपालची अटक हा खलिस्तानी विचारसरणीच्या पुनरुज्जीवनाचा बीमोड करण्याच्या मार्गावरील एक मैलाचा दगड म्हणावा लागेल.

व्ही. के. कौर   

Back to top button