क्रीडा : महाराष्ट्राची महिला कुस्ती परंपरा | पुढारी

क्रीडा : महाराष्ट्राची महिला कुस्ती परंपरा

आज सर्वच क्षेत्रांत महिला अग्रभागी आहेत. आजच नव्हे तर इतिहासातील सर्व काळात महिलांना देशात मानाचे स्थान होते. रामायण, महाभारत कालखंडात महिलांचे स्वयंवर रचले जायचे. म्हणजेच आपला पती कोण असावा हा सर्वस्वी निर्णय महिलांच्या हाती असायचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जिजाऊसाहेबांनी तर हिंदवी स्वराज्यासाठी महिलांचे संघटन केले होते.

स्वातंत्र्य हवे तर पुरुषांनीच हातात तलवार घ्यावी असे कुठे नाही, स्त्रीसुद्धा स्वातंत्र्यासाठी हातात तलवार घेऊ शकते हे आपल्या कृतीतून जिजाऊसाहेबांनी दाखवून दिले होते. शिवाजीराजे पन्हाळगडी वेढ्यात अडकले असताना, आग्र्‍यात नजरकैदेत असताना देखील आईसाहेब स्वतः चिलखत घालून रणांगण गाजवायला सिद्ध झाल्याची नोंद इतिहासात सापडते.

महाराष्ट्रात आजच्या घडीला राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कला, क्रीडा यांसह समाजातील सर्वच क्षेत्रांत स्त्रिया अग्रेसर आहेत. कुस्तीसारख्या पुरुषप्रधान खेळात सुद्धा स्त्रियांनी इतिहास निर्माण केला आहे.

आज कित्येक महिला मल्ल आपल्या झुंझार खेळीने जनमानसाच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. महाराष्ट्राला मल्लविद्येची देदीप्यमान मल्ल परंपरा आहे. मात्र महिलांचा या क्षेत्रात येण्याचा कल फारसा दिसून येत नाही. पण ज्या ज्या मुली आज कुस्तीसारखा खेळ आपल्या करिअरचा भाग म्हणून निवडत आहेत, त्यांना सरकारी पाठबळाची गरज आहे.

महाराष्ट्रातील अनेक महिला खेळाडू आहेत. त्यांना शासकीय नोकरीत समावून घेतले तर त्या कुस्तीकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन त्यात यश मिळवतील.

सांगलीमध्ये पहिला महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नुकतीच झाली. गेली दोन वर्षे कुस्तीच्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय संघटनेत घडत असलेल्या घडामोडींचा जवळचा साक्षीदार मी स्वतः आहे. अगोदर 60 वर्षे जुनी असणारी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद भारतीय कुस्ती संघाने बरखास्त केली. नवे पदाधिकारी कामाला लागणार इतक्यात जुन्या संघटनेने न्यायालयात धाव घेऊन बंदीवर स्थगिती आणली. त्यामुळे अस्थायी समिती महाराष्ट्रात काम करू लागली. कोथरूड महाराष्ट्र केसरीलासुद्धा अस्थायी समितीनेच मान्यता दिली होती. तदनंतर भारतीय कुस्ती संघच बरखास्त झाला. उत्तरेतील मल्लांनी थेट भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बि—जभूषण सिंग यांच्यावर आरोप केले. हे घडत असताना महाराष्ट्रात अस्थायी समिती नियुक्त गट व जुना कुस्तीगीर गट असे मोठे राजकारण सुरू झाले. दोन्ही संघटना राज्यस्तरीय अनेक स्पर्धांचे अधिकृत आयोजक आपणच आहोत, असे सांगून काम करू लागली, ज्याचा एक भाग म्हणजे सांगलीतील महिला महाराष्ट्र केसरी. राज्यातील जिल्हा तालीम संघ आणि महानगरपालिका असे 44 संघातील अंदाजे 450 महिला कुस्तीगीरांनी या स्पर्धेसाठी हजेरी लावली.

महिला महाराष्ट्र केसरी गटात कोल्हापूर जिल्ह्यातील वैष्णवी कुशाप्पा, शिरोळ येथील कोल्हापूर शहराचे प्रतिनिधित्व करणारी अमृता पुजारी. यजमान सांगली जिल्ह्यातून तुंगची प्रतीक्षा बागडी, सातारची धनश्री मांडवे, नगरची आंतरराष्ट्रीय पदक विजेती भाग्यश्री फंड, त्याचबरोबर पुण्याची कोमल गोळे या प्रमुख नावासह इतर अनेक महिलांचा सहभाग होता. पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान प्रतीक्षा बागडीला मिळाला.

कुस्तीमध्ये महिला हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच यशस्वी होताना दिसतात. साहजिकच महिला कुस्तीगीरांची संख्या कमी आहे. म्हणून आजच्या घडीला त्यांना कुस्तीमध्ये करिअरची संधी आहे. जिथे मुलांना अनेक फेर्‍या अनेक दिगग्ज मल्लांच्यासोबत खेळाव्या लागतात तिथे केवळ काही फेर्‍यांनंतर राज्य, राष्ट्रीय पातळीवर मुली जाऊ शकतात. या गोष्टीची पालकांनी जरूर दखल घ्यावी असे वाटते.
कुस्ती हा खेळ तसा मनगट मस्तीचा. नाजूक रुसव्या-फुगव्यांना इथे काही अर्थ नसतो. त्यामुळे ज्या मुलींना कुस्ती हा करिअरचा खेळ निवडावा असे वाटते, त्यांना झोकून देऊन व्यायाम करावा लागेल. सकस आहार घ्यावा लागेल, योग्य झोप घ्यावी लागेल व यांसह वस्तादांचा मार सुद्धा खावा लागेल.

या सर्व गोष्टींची तयारी करून मगच हा खेळ निवडा. कारण एकदा तुम्ही हा विषय निवडला आणि कालांतराने यातून निवृत्ती घेतली तर तुमचे पूर्वीचे आयुष्य जसेच्या तसे मिळेल याची खात्री नाही. कारण कुस्तीमध्ये जास्त ऊर्जेचा आहार, प्रामाणिक कष्ट यामुळे शरीर पुरुषाप्रमाणे टणक बनू लागते, सौंदर्यावर परिणाम दिसतो. त्यामुळे कुस्ती करत असताना योग्य गुरू, मार्गदर्शकांची निवड करणे हेसुद्धा महत्त्वाचे असते.

कारण कुस्ती निवृत्तीनंतर तुम्हाला लग्न करून संसार सुद्धा करणे हा महाराष्ट्रीयन संस्कृतीचा भाग असतो. तुमचे सौंदर्यसुद्धा टिकणे हे तुम्ही खात असलेल्या खुराकावर अवलंबून असते. कुस्तीनंतर वजन बेफाम वाढू शकते. यासाठी आहार, व्यायाम शास्त्र यांची माहिती असणारा गुरू जरूर असावा. ही अट पुरुषांना लागू नाही. कारण पुरुषांची कुस्ती कारकीर्द वयाच्या 11 वर्षांपासून ते 15 वर्षे असते, तिथून पुढे कितीही वर्षे तो त्याच्या कर्तृत्वावर आपला फॉर्म टिकवू शकतो. मात्र मुलींची कुस्ती कारकीर्द 5 ते 8 वर्षे इतकीच असते आणि यानंतर वैवाहिक जीवन. त्यामुळे महिला मल्लांनी या गोष्टीची जरूर काळजी घ्यावी. पण या क्षेत्रात मुलींना तेजस्वी आदर्श निर्माण करण्याची चांगली सधी आहे हे लक्षात घ्यावे लागेल.

आज गीता फोगटसारखी महिला पैलवान डीवायएसपीसारख्या क्लास वन पदावर केवळ कुस्तीमुळे पोहोचली आहे. अनेक मुली पोलिस दलात आहेत. त्यामुळे कुस्तीमध्ये महिलांना नक्कीच सुवर्णसंधी आहे. महिला कुस्तीमध्ये कोच महिला असणे सर्व दृष्टीने आवश्यक आहे, असे मला वाटते. जिथे महिला कुस्ती सेंटर आहे तिथे केवळ महिलाच कोच असणे हे गरजची बाब आहे. पण, अनेक ठिकाणी सराव करताना महिला मल्लच नसल्याने नाईलाजाने मुलांच्या सोबत सराव करणे मुलींना भाग पडत आहे. ही जशी फायद्याची बाब आहे तशीच तोट्याचीसुद्धा आहे. तोटा एवढ्यासाठी की, ज्या वयात मुली कुस्तीकडे येतात ते वय म्हणजे त्यांच्या मनात अनेक भावभावनांचा गुंता सुरू होण्याचे वय असते. त्यामुळे साहजिकच नकळत त्यांच्या हातून चुका घडण्याची शक्यता असते व त्या चुका पुढे जाऊन जटिल समस्या बनतात. पालकांनी जो द़ृष्टिकोन ठेवून त्यांना कुस्तीमध्ये घातले असते ते ध्येय दूरच राहते व इतर समस्या सोडवता सोडवता नाकीनऊ येते.

अशा अनेक महिला पालकांच्या तक्रारी मला येतात. पण त्यावर उघडपणे भाष्य करणे ना पालकांना शक्य आहे ना मला. यावर केवळ एकच उपाय की मुलींना याची जाणीव अगोदर करून द्यावी, असे मला वाटते. त्यासाठी त्यांची मने समजून घेणारी महिला कोच त्या त्या सेंटरवर उपलब्ध करून देणे ही काळाची गरज बनली आहे.

आज अनेक सेंटर अशी आहेत, जिथे पुरुष कोचनी अनेक आंतरराष्ट्रीय महिला पैलवान घडवल्या. मात्र प्रत्येक ठिकाणी असे होईलच असे नाही.

या सर्वांचा अभ्यास करून महिला कुस्तीगीरांनी कुस्ती निवृत्तीनंतर कुस्तीच्या दीर्घ आभ्यासाकडे जरूर लक्ष द्यावे.
शासकीय कोर्समध्ये करिअरची सुवर्णसंधी आहे.
प्रत्येक महिला कुस्तीगीरांनी आपापल्या परीने यासाठी योगदान देणे गरजेचे आहे तर भविष्यात महाराष्ट्रातून अनेक महिला कुस्तीगीर घडतील अशी खात्री वाटते!

गणेश मानुगडे 
मल्लविद्या अभ्यासक 

Back to top button