Congress : काँग्रेसचे भवितव्य काय?

Congress : काँग्रेसचे भवितव्य काय?
Published on
Updated on

तीन दशकांपूर्वी राजीव गांधी यांच्या कार्यकाळात आर्थिक सुधारणांना सुरुवात झाली होती आणि त्याचा लाभ घेणारा वर्ग आज काँग्रेसच्या (Congress) सोबत नाही. अशा स्थितीत पक्षाला आपली विचारधारा आणि कार्यसंस्कृतीची व्याख्या नव्याने मांडावी लागेल.

प्रदीर्घ काळापासून काँग्रेसमध्ये जे वातावरण दिसत आहे, त्यातून एक प्रमुख संकेत असा मिळतो, की राहुल गांधी पक्षात नावीन्य आणू पाहात आहेत, तसेच नव्या ऊर्जेचा संचार करू पाहात आहेत.

या प्रयत्नांत कधी त्यांना फायदा होताना दिसत आहे तर कधी त्यांचे नुकसान होत आहे. कोणत्याही राजकीय पक्षात हे घडणे स्वाभाविक आहे. परंतु काँग्रेसची अडचण अशी आहे की, लागोपाठ दोन लोकसभा निवडणुकांत अत्यंत लज्जास्पदरीत्या पराभव पत्करल्यानंतरही पक्षाच्या संरचनेत कोणताही फरक पडलेला नाही. Congress

साठीच्या दशकाच्या अंतिम वर्षांमध्ये जेव्हा अनेक राज्यांमध्ये बिगरकाँग्रेसी सरकारांची स्थापना झाली होती, तेव्हा दोन वर्षांतच 1969 मध्ये काँग्रेस पक्ष दुभंगला होता. त्यावेळी अनेक महत्त्वाचे नेते काँग्रेसपासून वेगळे झाले होते आणि इंदिरा गांधी यांना नवीन लोकांना बरोबर घेऊन पक्षाची नव्याने बांधणी करावी लागली होती.

आणीबाणीनंतर 1977 च्या निवडणुकीपूर्वी आणि नंतर अनेक नेत्यांनी इंदिरा गांधींपासून फारकत घेतली होती. या नेत्यांमध्ये देवकांत बरुआ यांचाही समावेश होता. त्यांनीच एके काळी 'इंडिया इज इंदिरा अँड इंदिरा इज इंडिया' हा नारा दिला होता.

मोठमोठ्या निष्ठावंत नेत्यांनी काँग्रेस पक्ष त्यावेळी सोडला होता. त्यामुळे आपल्या संकल्पनेनुसार पक्षाची बांधणी करण्यास इंदिरा गांधी यांना उलट चांगली संधी मिळाली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना अशा संधी मिळाली नाहीत. एवढेच नव्हे तर 2014 आणि 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीतील पराभवाची जबाबदारीही निश्चित होऊ शकली नाही.

पक्षाच्या नेतृत्वाकडे कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना देण्यासाठी कोणतेही समर्पक उत्तरसुद्धा नाही. या कारणामुळे प्रत्येक काँग्रेसी कार्यकर्त्याच्या मनात तक्रार आणि नाराजी आहे. माझा अंगुलीनिर्देश केवळ 'जी-23' या नावाने ओळखल्या जाणार्‍या नेत्यांकडे नाही. सर्वसामान्य काँग्रेसजनही पक्षाच्या सध्याच्या स्थितीबाबत कुठे ना कुठे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला दोषी मानतात.

गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यासाठी पक्षाने संमेलन आणि अधिवेशनही आयोजित केलेले नाही. सन 2019 च्या निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा परत घेतला नाही आणि तेव्हापासून सोनिया गांधी काळजीवाहू अध्यक्षा या नात्याने काम करीत आहेत.

परंतु तरीही पक्षाच्या निर्णयप्रक्रियेत राहुल गांधी यांचाच वरचष्मा आजही आहे. सध्या तर संभ्रम निर्माण करणारे जे वातावरण निर्माण झाले आहे, त्याला एक पार्श्वभूमी आहे. पंजाबच्या बाबतीत मल्लिकार्जुन खर्गे, जे. पी. अग्रवाल आणि हरीश रावत या तीन वरिष्ठ नेत्यांच्या अहवालात 18 अजेंडे निश्चित करण्यात आले होते.

या प्रक्रियेत पक्षाच्या प्रत्येक आमदाराचे मत नोंदवून घेण्यात आले होते. त्यानंतर असे सांगितले गेले की, नवज्योतसिंह सिद्धू हे पक्षाचा एक चांगला 'चेहरा' म्हणून उदय पावू शकतात आणि त्यांना प्रदेशाध्यक्ष बनविण्यात आले. त्यानंतर वेगवान घडामोडी घडल्या आणि कॅप्टन अमरिंदरसिंह यांच्याऐवजी चरणजितसिंह चन्नी यांना 'दलित चेहरा' म्हणून मुख्यमंत्री बनविण्यात आले.

परंतु या निर्णयात आमदारांची मते जाणून घेतली गेली नाहीत आणि काँग्रेसी संस्कृतीनुसार, अंतर्गत वाद दडपून टाकण्यात आले. सिद्धू अजूनही आपल्या जुन्या मागण्यांवर अडून बसले आहेत. यामध्ये धार्मिक श्रद्धांना तडा जाण्याशी संबंधित एका मुद्द्याचा प्रामुख्याने समावेश आहे. त्या प्रकरणाच्या तपासी अधिकार्‍याला पोलिस महासंचालक केल्यामुळे सिद्धू बिथरले आहेत.

सध्या पंजाब काँग्रेसमध्ये जो अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे, त्यात राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी यांची काहीही भूमिका नाही, असे म्हणता येते. पंजाबात धार्मिक श्रद्धेचा भावनात्मक मुद्दा आहे. सिद्धू यांनी कर्तारपूर साहिब मार्गाच्या मुद्द्यावरून आघाडी घेतली आहे. बेअदबीचे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न झाला आहे, असे त्यांना वाटते. हा मुद्दा उचलून धरल्यामुळे आपली राजकीय उंची वाढेल, असे त्यांचे मत आहे. याच कारणामुळे सध्याचे संकट निर्माण झाले आहे. (Congress)

आता सिद्धू यांची मनधरणी करून, समजूत घालून त्यांना पुन्हा प्रदेशाध्यक्षपदी विराजमान करणे हाच काँग्रेस नेत्यांपुढील एकमेव मार्ग आहे. तसे झाले तरच पक्षाच्या योजनांची पुढे अंमलबजावणी करणे शक्य आहे. असे केल्यास सिद्धू यांची राजकीय उंची आणखी वाढेल आणि वरिष्ठ नेतृत्वालाही झुकविण्यात सिद्धू यशस्वी झाले, असा संदेश जाईल.

परंतु राजकीय पक्षाच्या द़ृष्टीने निवडणुका जिंकण्यालाच प्राधान्य दिले जाणे अपेक्षित आहे आणि काँग्रेसला ते करून दाखवावे लागेल. असे झाले नाही तर नुकत्याच गमावलेल्या राज्यांच्या यादीत पंजाबचाही समावेश होईल. जर सिद्धूंची नाराजी कायम राहिली आणि ऐन निवडणुकीच्या वेळी त्यांनी आम आदमी पक्षाला साथ दिली तर काँग्रेसच्या हाती काहीच उरणार नाही.

पंजाबातील घटनांचा परिणाम अन्य राज्यांवर, विशेषतः जिथे काँग्रेसची सरकारे आहेत अशा राज्यांवरही पडेल. राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट या दोहोंना सांभाळून घेत वाटचाल करण्याची योजना अयशस्वी ठरू शकते. छत्तीसगडमध्येही सर्व काही आलबेल नाही.

पक्षाच्या केंद्रीय स्थितीकडे पाहायचे झाल्यास वरिष्ठ नेत्यांचा एक असा गट आहे, जो 2014 च्या निवडणुकीनंतरच सर्वोच्च नेतृत्वाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आला आहे. यामुळे काँग्रेसच्या (Congress) विरोधकांना फायदाच झाला आहे. डाव्या पक्षाचा युवा नेता कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये सामील होत असल्याबद्दल माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेस आणि डावी विचारधारा आणि पक्षाचे संपर्क, संबंध तसेच समर्थन यांचा इतिहास खूप जुना आहे.

तीन दशकांपूर्वी राजीव गांधी यांच्या कार्यकाळात आर्थिक सुधारणांना सुरुवात झाली होती आणि त्याचा लाभ घेणारा वर्ग आज काँग्रेसच्या सोबत नाही. अशा स्थितीत पक्षाला आपली विचारधारा आणि कार्यसंस्कृतीची व्याख्या नव्याने मांडावी लागेल. असे झाले तरच पक्ष आपला विस्तार करू शकेल.

पक्षाला मजूर, शेतकरी आणि युवा वर्गाच्या समस्यांचे मुद्दे उचलून धरावे लागतील. या वर्गांची संख्याही खूप मोठी आहे. काँग्रेसला या वर्गामध्ये एक संभाव्य मार्ग दिसत आहे. त्यामुळेच पक्ष डाव्या नेत्यांना आपल्याशी जोडून घेण्याचा प्रयत्न करू पाहात आहे. दहा-पंधरा वर्षांनी प्रत्येक राजकीय पक्षाने आपला विचार आणि कार्यशैली यात बदल करणे अपेक्षित असते. काँग्रेस तीन दशकांपूर्वी राजीव गांधी यांच्या कार्यकाळात आर्थिक सुधारणांना सुरुवात झाली होती आणि त्याचा लाभ घेणारा वर्ग आज काँग्रेसच्या (Congress) सोबत नाही. मध्ये हीच प्रक्रिया सुरू आहे आणि त्यामुळेच पक्षात उलथापालथ होताना दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news