बहार विशेष : निकालांचा अन्वयार्थ | पुढारी

बहार विशेष : निकालांचा अन्वयार्थ

रासबिहारी, नवी दिल्ली (ज्येष्ठ राजकीय विश्लेषक)

सलग सातव्यांदा भाजपने गुजरातमध्ये सत्ता संपादित केली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ‘नरेंद्रचा विक्रम भूपेंद्र मोडेल,’ असे म्हटले होते. गुजरातच्या जनतेने मोदींचे हे विधान सत्यात उतरवले आहे. मात्र, हिमाचल प्रदेशातील जनतेने तेथील परंपरेनुसार पुन्हा एकदा सत्तापालट केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने गुजरातमध्ये नवा इतिहास रचला. गुजरात विधानसभेसाठी 2002 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा भाजपने 127 जागांवर विजय मिळवला होता. त्यापूर्वी 1985 मध्ये काँग्रेसने 149 जागांवर विजय मिळवला होता. यंदा हे दोन्हीही उच्चांक मोडीत निघाले आहेत. मोदींचे नाव आणि प्रतिमा तसेच मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे नेतृत्व यांच्या आधारावर भाजपने गुजरात विधानसभेच्या 182 जागांपैकी 156 जागांवर विजय मिळवला आहे. सलग सातव्यांदा भाजपने गुजरातमध्ये सत्ता संपादित केली आहे. माधवसिंह सोलंकी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 1985 मध्ये मिळवलेल्या विजयापेक्षाही दणदणीत विजय भाजपने यंदा मिळवला आहे. विशेष म्हणजे, निवडणूक प्रचारादरम्यान खुद्द पंतप्रधान मोदींनीच ‘नरेंद्रचा विक्रम भूपेंद्र मोडेल,’ असे म्हटले होते. निकालांनी मोदींचे हे वाक्य सत्यात उतरलेले दिसत आहे.

या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे गुजरातमधील तिन्ही बडे नेते पराभूत झाले आहेत. यापैकी ईशुदान गढवी यांना तर ‘आप’ने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे केले होते. याखेरीज ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया आणि पाटीदार समाजाचे नेते अल्पेश कथीरिया यांचाही पराभव झाला आहे. ओवैसींच्या ‘एमआयएम’ने यंदा पहिल्यांदा गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये सहभाग घेतला होता आणि 13 उमेदवार रिंगणात उतरवले होते. परंतु, या सर्वच्या सर्व उमेदवारांना गुजराती मतदारांनी नाकारले आहे.
2017 मध्ये गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने 49 टक्के मते मिळवत 99 जागांवर विजय मिळवला होता. यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या जागा आणि मतांची टक्केवारी दोन्हींमध्येही घसघशीत वाढ झाली आहे. भाजपला यंदाच्या निवडणुकीत मिळालेल्या मतांची टक्केवारी 55.3 टक्के इतकी आहे. गुजरातेत यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची अवस्था 2017 च्या तुलनेत अत्यंत दयनीय झाली. 2017 मध्ये काँग्रेसला मिळालेल्या मतांची टक्केवारी 41.1 टक्के इतकी होती. काँग्रेसने 77 जागांवर विजय मिळवला होता. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ 17 जागांवर विजय मिळवता आला असून, त्यांना मिळालेल्या मतांचा टक्काही घसरून 27 वर आला आहे. गुजरातेत यंदा आम आदमी पक्षानेही विधानसभा निवडणुकांमध्ये जोरदार प्रचारमोहीम राबवली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि या पक्षाचे सर्वेसर्वा असणार्‍या अरविंद केजरीवाल यांंनी तर गुजरातमध्ये सरकार स्थापनेचा दावा केला होता. परंतु, निवडणुकीचे निकाल पूर्णतः याविरुद्ध आले आहेत. आम आदमी पक्षाला केवळ सहा जागा मिळाल्या असून, त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी 12.8 टक्के इतकी आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकांमध्य ‘आप’ने पहिल्यांदा गुजरातच्या राजकारणात प्रवेश केला. त्या निवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांना मिळालेली एकूण मते 24,918 इतकी होती. एकूण मतांच्या तुलनेत हे प्रमाण अर्धा टक्क्याहूनही कमी होते. त्या परिप्रेक्ष्यातून पाहिल्यास यंदा ‘आप’ला मिळालेल्या मतांमध्ये वाढ झालेली दिसत आहे. हिमाचल प्रदेशातील जनतेने तेथील परंपरेनुसार पुन्हा एकदा सत्तापालट केला आहे.

68 सदस्य संख्या असणार्‍या या विधानसभेच्या निवडणुकीत 40 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे; तर भाजपला 25 जागांवर यश आले आहे. हिमाचल प्रदेशात आम आदमी पक्षाला खाते उघडण्यात यश आलेले नाही. सराज मतदारसंघात मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी काँग्रेसचे चेतराम ठाकूर यांंना 20 हजारांहून अधिक मतांनी पराभूत केले आहे. या विजयाने जयराम यांनी सातव्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. तथापि, जयराम सरकारमध्ये मंत्री असणारे डॉ. रामलाल मारकंडा हे लाहोल-स्पीतीतून, सरवीण चौधरी कांगडा जिल्ह्यातील शाहपूरमधून, तर सुरेश भारद्वाज हे सिमला जिल्ह्यातील कसुम्पटी मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. मंडी या जयराम ठाकूर यांचा बालेकिल्ला असणार्‍या जिल्ह्यातील 10 पैकी नऊ मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तथापि, जयराम सरकारमध्ये दुसर्‍या क्रमांकाचे मंत्री असलेल्या महेंद्रसिंह ठाकूर यांचे सुपुत्र रजत ठाकूर यांना धर्मपूरची जागा राखण्यात यश आले नाही. भाजपने यंदा पहिल्यांदाच महेंद्र यांच्या जागी त्यांच्या मुलाला तिकीट दिले होते. एकीकडे भाजप नेत्याच्या मुलाचा पराभव झालेला असताना, दुसरीकडे सिमला ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवणारे माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांचे सुपुत्र विक्रमादित्य सिंह या निवडणुकीत विजयी झाले आहेत. अपक्ष उमेदवार नालागढ आणि बंजार विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

हिमाचल प्रदेशातील सत्ता गमावण्याबरोबरच भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशातील मैनपुरी लोकसभेची जागाही गमावली आहे. त्याचबरोबर पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभेच्या सहा जागांसाठीच्या पोटनिवडणुकांमध्येही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तथापि, उत्तर प्रदेशातील रामपूर आणि बिहारमधील कुढनी विधानसभेची जागा भाजपला आपल्या पारड्यात खेचण्यात यश आले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तसेच देशाचे संरक्षणमंत्री राहिलेले मुलायमसिंह यादव यांचे निधन झाल्यामुळे मैनपुरी लोकसभेची जागा रिक्त झाली होती. समाजवादी पक्षाचे विद्यमान अध्यक्ष आणि 2012 ते 2017 या काळात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले अखिलेश यादव यांनी आपली पत्नी डिंपल यादव यांना या मतदारसंघातून रिंगणात उतरवले होते. 2019 मध्ये डिंपल यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता; पण यंदा त्यांना विजय संपादित करण्यात यश आले आहे. उत्तर प्रदेशातील खतौली विधानसभेची जागा राखण्यातही भाजपला अपयश आले आहे. या जागेवर भाजपच्या उमेदवार श्रीमती राजकुमारी सैनी यांचा राष्ट्रीय लोक दलाचे उमेदवार मदन भय्या यांच्याकडून पराभव झाला आहे.

मागील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचे विक्रम सैनी या जागेवरून विजयी झाले होते; मात्र त्यांना न्यायालयाने अपात्र ठरवल्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली. रामपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे आकाश सक्सेना यांचा मुकाबला समाजवादी पक्षाचे आसीम रजा यांच्याशी झाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात भाजपला विजय मिळाला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत समावादी पक्षाचे फायरब—ँड नेते आझम खान यांनी रामपूरची जागा जिंकली होती. परंतु, त्यांना न्यायालयाने दोषी ठरवल्यामुळे या जागेसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली. आझम खान यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत रामपूर मतदारसंघातून विजय मिळवला होता. परंतु, 2022 मध्ये आमदार बनल्यानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या जागी जून 2022 मध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यावेळी या लोकसभा मतदारसंघात भाजपचा विजय झाला होता. राजस्थानातील सरदारशहर या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अनिल शर्मा, तर छत्तीसगडमधील भानुप्रतापपूर मतदारसंघात काँग्रेसच्या सावित्री मंडावी यांनी विजय संपादित केला आहे. बिहारमध्ये कुढनी विधानसभेच्या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार केदार गुप्ता विजयी झाले आहेत. जेडीयूचे मनोज कुशवाह यांच्याशी त्यांचा मुकाबला झाला. कुढनीमधील विजयाने भाजपने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना जबरदस्त तडाखा दिला आहे. दुसरीकडे, रामपूर विधानसभेतील पराभवामुळे अखिलेश यादव आणि आझम खान यांना धक्का दिला आहे. कारण, भाजपने इतिहासात पहिल्यांदाच रामपूर विधानसभेची जागा जिंकली आहे.

Back to top button