संशोधन : अंतराळातील ‘बाहुबली’ | पुढारी

संशोधन : अंतराळातील ‘बाहुबली’

भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ने एक नवा इतिहास रचत समस्त भारतीयांना दिवाळी भेट दिली आहे. शनिवारी, 22 ऑक्टोबरच्या मध्यरात्री ‘इस्रो’ने आतापर्यंतचे सर्वांत वजनदार रॉकेट अंतराळात सोडले आणि त्याद्वारे ‘वन वेब’ या ब्रिटिश कंपनीचे तब्बल 36 उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले. गेल्या काही वर्षांत पाश्चिमात्य प्रगत देशही त्यांचे उपग्रह अंतराळात स्थापित करण्यासाठी ‘इस्रो’ला प्राधान्य देत आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे.

समस्त भारतीय दिवाळी सणाच्या तयारीत मग्न असताना आणि फटाक्यांच्या आतषबाजीने, दिव्यांच्या रोषणाईने तेजाळून निघण्यास आसमंत आसुसलेला असतानाच भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ने अंतराळात एक नवा इतिहास रचला. ब्रिटनच्या कम्युनिकेशन नेटवर्क ‘वन वेब’चे तब्बल 36 उपग्रह इस्रोने आपल्या जीएसएलव्ही-एमके-3 या सर्वांत वजनदार रॉकेटद्वारे अंतराळात प्रक्षेपित केले. हे उपग्रह लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये यशस्वीपणे स्थापित करण्यात आले आहेत. लोअर अर्थ ऑर्बिट म्हणजे पृथ्वीची सर्वांत खालची कक्षा. पृथ्वीपासून 1600 ते 2000 किलोमीटर अंतरावर हे क्षेत्र आहे. या कक्षेमध्ये वस्तूचा वेग सुमारे 27 हजार किलोमीटर प्रतितास इतका असतो. त्यामुळे लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये उपग्रह स्थापित करणे अत्यंत आव्हानात्मक असते.

इस्रोचे हे मिशन पूर्णतः व्यावसायिक होते. न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (एनएसएल) या इस्रोच्या व्यावसायिक शाखेने ‘वन वेब’सोबत एक करार केला असून, त्यानुसार ही मोहीम पार पाडण्यात आली. वन वेब ही इंग्लंडमधील खासगी उपग्रह संपर्क क्षेत्रातील एक आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. जीएसएलव्ही-एमके 3 हे रॉकेट अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. 43.5 मीटर लांबीच्या या रॉकेटची सर्वांत मोठी खासियत म्हणजे त्याची वजनवाहू क्षमता. तब्बल 8000 किलो वजनाचे उपग्रह उचलून ते अंतराळात नेऊ शकते. ताज्या मोहिमेमध्ये नेलेल्या उपग्रहांचे वजन सुमारे 5796 किलो इतके होते. इतक्या वजनाचे उपग्रह वाहून नेणारे ते पहिले भारतीय रॉकेट ठरले. एनएसएलने पहिल्याच मोहिमेत यशस्वी कामगिरी केल्यामुळे इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या मोहिमेनंतर इस्रोने आता एक नवे मिशन हाती घेतले आहे. जागतिक बाजारात विश्वासार्ह अंतराळ प्रक्षेपकांची किंवा लाँचर्सची मागणी आज झपाट्याने वाढत आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी इस्रोने भविष्याचा विचार करून कमी खर्चातील आणि व्यावसायिकांना अनुकूल असणारी रॉकेट तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

गेल्या दोन-तीन दशकांमध्ये इस्रोच्या एकामागोमाग एक सर्वोच्च आणि यशस्वी कामगिरीमुळे अंतराळविश्वात संपूर्ण जगातच भारताची मान गर्वाने उंचावली आहे. काही काळापूर्वी उपग्रह प्रक्षेपणात परदेशावर अवलंबून राहिल्यानंतर आज भारत स्वतःच इतका सक्षम झाला आहे की, तमाम विकसित देश भारतातून त्यांचे उपग्रह प्रक्षेपित करत आहेत. भारताच्या अवकाश मोहिमांचा सक्सेस रेट किंवा यशस्वी होण्याचा दर सर्वाधिक असल्यामुळे आज अमेरिकेसारखे महासत्ता असणारे देशही भारताच्या सहाय्याने आपले उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करत आहेत, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. एक काळ असा होता की, अमेरिकेच्या दबावापुढे झुकलेल्या रशियाने भारताला क्रायोजेनिक इंजिन देण्यास नकार दिला होता. प्रक्षेपण यानामध्ये असणारे हे इंजिन म्हणजे अतिवजनाच्या उपग्रहांना अंतरिक्षात पोहोचविणारी अश्वशक्ती क्षमता आहे. आपल्या पीएसएलव्ही म्हणजेच भूउपग्रह प्रक्षेपण यानाचे यश याच इंजिनावर अवलंबून होते.

आपल्या वैज्ञानिकांनी दृढ इच्छाशक्ती दाखवत स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून क्रायोजेनिक इंजिन विकसित केले. इस्रोचे हे स्वदेशी तंत्रज्ञान आता जगभरात अव्वल ठरले आहे. एक काळ असा होता की, जेव्हा अमेरिकेने आपल्या ‘रोहिणी 75’ या रॉकेटच्या प्रक्षेपणाला लहान मुलांचे खेळणे असे संबोधून भारत कधीच रॉकेट बनवू शकत नाही, अशी उपाहासात्मक टिपणी केली होती. एवढेच नव्हे तर अमेरिकेच्या सिनेटने असा दावा केला होता की, अमेरिका भारतीय भूमीवरून कोणत्याही उपग्रहाचे प्रक्षेपण करणार नाही. मात्र, वैज्ञानिकांची जिद्द आणि प्रयत्नांतील सातत्य यामुळे अमेरिका तोंडघशी पडली.

आज भारत रॉकेटनिर्मितीत सक्षमच आहे असे नाही, तर भारताने स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनही बनवले आहे. परिणामी अमेरिकाच नव्हे तर जगातील तमाम विकसित देश भारतातून आपले उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी रांगेत उभे आहेत. आजघडीला जगभरातील आंतरराष्ट्रीय कंपन्या इस्रोच्या माध्यमातून अंतराळ मोहिमा राबविण्यास उत्सुक आहेत. अ‍ॅलन मस्क यांची स्पेस एक्ससारखी कंपनीही यामध्ये समाविष्ट आहे.

अंतरिक्षाच्या क्षेत्रात आज अशी स्थिती आहे की, अमेरिकेसह अनेक बडे देश भारतासोबत व्यावसायिक करार करण्यास इच्छुक आहेत. आजमितीस संपूर्ण जगभरात उपग्रहांच्या माध्यमातून दूरचित्रवाणीचे प्रक्षेपण, हवामानाचा अंदाज आणि दूरसंचार क्षेत्र प्रचंड वेगाने विस्तारले आहे. या सर्व सेवा उपग्रहांवरून संचलित होत असल्यामुळे अवकाशात उपग्रह सोडण्याच्या सुविधांना असलेली मागणी वाढली आहे. या क्षेत्रात रशिया, चीन, जपान आदी देश भारताचे स्पर्धक आहेत. मात्र, ही बाजारपेठ इतक्या तीव्र गतीने विस्तारित होत आहे की, ही मागणी आपल्या स्पर्धक देशांना पूर्ण करता येत नाही. अशा स्थितीत व्यावसायिक पातळीवर भारतासाठी असलेल्या शक्यता विस्तारत आहेत. कमी गुंतवणूक आणि यशस्वितेची हमी ही इस्रोची सर्वांत मोठी बलस्थाने आहेत. त्यामुळेच अंतरिक्ष उद्योगात येणार्‍या काळात भारताची मक्तेदारी प्रस्थापित होण्याची शक्यता आहे.

इस्त्रो पुढच्या वर्षी जून महिन्यात चांद्रयान-3 प्रक्षेपित करण्याच्या तयारीत आहे. या यानामध्ये ग्रहांमधील संशोधनात महत्त्वपूर्ण असलेल्या अधिक शक्तिशाली लूनर रोवरही पाठविण्यात येणार आहे. या बरोबरच पुढच्या वर्षीच्या सुरुवातीलाच गगनयान या पहिल्या मानवासहित अंतराळ मोहिमेची अबॉर्ट मिशनचीही तयारी सुरू आहे. 2029 पर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक निर्माण करण्याचे उद्दिष्ट इस्रोने ठेवले आहे. अमेरिका आणि रशियाने उभारलेल्या अंतरिक्ष स्थानकात युरोपीय महासंघ आणि जपानचाही सहभाग आहे. चीनचे तिआनगोंग-2 हे अंतरिक्ष स्थानक स्वतंत्रपणे काम करीत आहे. या पार्श्वभूमीवर अन्य देशांच्या सहकार्याने अंतरिक्ष स्थानक न उभारता भारत स्वतःचे स्थानक उभारण्याची घोषणा करतो, याकडे जगाने डोळे विस्फारून पाहणे अपेक्षित आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केल्यानंतर अधिक संख्येने मानवाला अंतरिक्षात पाठविणे भारताला शक्य होईल.

प्रसिद्ध शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांनी 53 वर्षांपूर्वी म्हणजे 15 ऑगस्ट 1969 रोजी इस्रोची स्थापना केली होती. ज्या देशात पूर्वी सायकल आणि बैलगाडीवरून रॉकेट इकडून तिकडे नेण्यात येत होती, त्या देशाने आज अंतरिक्षावर कब्जा करण्याची क्षमता प्राप्त केली आहे. 19 एप्रिल 1975 रोजी इस्रोने ‘आर्यभट्ट’ हा स्वदेशी बनावटीचा उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित केला होता. हा प्रवास आज अत्यंत यशस्वी वळणावर पोहोचला असून, जगातील या क्षेत्रातील सर्वाधिक पाच शक्तिशाली देशांमध्ये भारताची गणना केली जात आहे. त्यातही अन्य देशांपेक्षा कमी खर्चात आणि खात्रीशीररीत्या अंतराळ मोहिमा राबवण्याचे कसब केवळ इस्रोकडेच आहे, ही बाब अभिमानास्पदच म्हणायला हवी.

श्रीनिवास औंधकर, अवकाश संशोधन अभ्यासक

Back to top button