वायुदलाला ‘प्रचंड’ बळ | पुढारी

वायुदलाला ‘प्रचंड’ बळ

कारगिल युद्धाच्या वेळी शत्रूवर प्रहार करणार्‍या लढाऊ हेलिकॉप्टरची उणीव प्रकर्षाने भासली होती. अखेर 22 वर्षांनी ‘प्रचंड’च्या आगमनाने ती भरून निघाली आहे. अतिशीत, अतिउष्ण आणि अतिउंच या तिन्ही ठिकाणी ‘प्रचंड’ उपयुक्त ठरणारे आहे. संरक्षण क्षेत्रातील स्वदेशीकरणाचा हा नवा अध्याय अभिमानास्पद आहे.

भारतीय संरक्षण दलासमोर गेल्या काही वर्षांपासून दोन प्रमुख आव्हाने होती. एक म्हणजे, संरक्षण दलाचे आधुनिकीकरण आणि दुसरे म्हणजे, संरक्षण साधनसामग्रीची आयात कमी करणे. खरे पाहता, या दोन्ही आव्हानांचे उत्तर एकच आहे, ते म्हणजे संरक्षण साधनसामग्रीतील आत्मनिर्भरता. स्वातंत्र्यानंतर भारताने कृषी क्षेत्रात मोठी झेप घेत अन्नधान्योत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होण्यात यश मिळवले. आज भारत देशातील अन्नधान्याची गरज भागवण्याबरोबरच जागतिक निर्यातदार बनला आहे. अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रातही भारतातील प्रतिभावंत संशोधक, शास्त्रज्ञांच्या प्रयत्नातून असेच स्वावलंबित्व मिळवले.

एकीकडे अशी स्थिती असताना, दुसर्‍या बाजूला संरक्षण साधनसामग्रीची आयात करणारा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा आणि आशिया खंडातील क्रमांक एकचा देश अशी भारताची ओळख अनेक वर्षे राहिली. यासाठी अब्जावधी रुपयांचे परकीय चलन मोजावे लागत असल्यामुळे याचा सरकारी तिजोरीवरही परिणाम होत राहिला. याचा अर्थ संरक्षण साहित्याचे देशांतर्गत उत्पादन होतच नव्हते, असे नाही; परंतु मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, साधनसामग्री ही परदेशातून आयात केली जात होती. रशियासारखा देश भारताचा प्रमुख संरक्षण साधनसामग्रीचा पुरवठादार राहिला. इस्रायलकडूनही भारतात मोठ्या प्रमाणावर संरक्षण साधनसामग्रीची आयात केली जात असे. परंतु, गेल्या सात-आठ वर्षांमध्ये या परिस्थितीत झपाट्याने बदल होत गेला आहे.

विशेषतः, ‘मेक इन इंडिया’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प संरक्षण क्षेत्राशी जोडण्यात आल्यानंतर देशांतर्गत संरक्षण साधनसामग्रीनिर्मितीवर जास्तीत जास्त भर देण्याची प्रक्रिया गतिमान झाली. यासाठी विविध देशांशी भारताने तंत्रज्ञान हस्तांतरणाचे करार केले. या क्षेत्रातील सरकारी कंपन्यांची कार्यक्षमता वाढवली. खासगी गुंतवणूक वाढवली. याचे सुपरिणाम आता दिसू लागले असून, भारताची संरक्षण आयात बर्‍याच अंशी कमी झाली आहे. विशेष म्हणजे, भारत आज दक्षिण आशियातील संरक्षण साधनसामग्रीची निर्यात करणारा देश म्हणून पुढे येत आहे. गेल्या पाच वर्षांत भारताची संरक्षण क्षेत्रातील निर्यात 334 टक्क्यांनी वाढली आहे. जगभरातील तब्बल 75 देशांना भारतातून या साधनसामग्रीची निर्यात केली जात आहे. यामध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र, बुलेटप्रूफ जॅकेट आणि हेल्मेट, आर्मर शिल्ड, बंदुकीचे सुटे भाग, ध्रुव हेलिकॉप्टर, डॉर्नियर यांचा समावेश आहे.

भारतात संरक्षण उपकरणांचे स्वदेशीकरण 68 टक्क्यांवर पोहोचले आहे. नौदल आपल्या 95 टक्के गरजा देशातूनच पूर्ण करत आहे. हवाईदल लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, वाहतूक विमाने आणि ड्रोनचे स्वदेशी उत्पादन करण्यास उत्सुक आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरू झाल्यापासून स्वदेशीकरणाची प्रक्रिया अधिक गतिमान बनली आहे. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या या वाटचालीत अलीकडेच एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे, ते म्हणजे ‘प्रचंड’ नामक लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (एलसीएच) भारतीय हवाईदलात नुकतेच दाखल झाले आहे.

या स्वदेशी हेलिकॉप्टरमुळे हवाईदलाची ताकद अनेक पटींनी वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मार्चमध्ये झालेल्या बैठकीत अशाप्रकारची 15 हेलिकॉप्टर बनविण्यासाठी 3,887 कोटी रुपये आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 377 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. यापैकी 10 हेलिकॉप्टर हवाईदलाला आणि 5 हेलिकॉप्टर ही सैन्याला देण्यात येणार आहेत. येत्या काही वर्षांत दोन्ही दलांना 160 एलसीएचची गरज आहे. सैन्यालाच 95 हेलिकॉप्टर लागणार आहेत. ही हेलिकॉप्टर उंच भागात तैनात केली जाणार आहेत. या हेलिकॉप्टरमधील 45 टक्के सामग्री पूर्णतः भारतीय बनावटीची आहे. येत्या काळात हे प्रमाण 55 टक्क्यांवर जाईल.

हिंदुस्थान एरोनॉटिक्सने ही हेलिकॉप्टर तयार केली आहेत. या लढाऊ हेलिकॉप्टरचे वजन 5.8 टन इतके असून यामध्ये दुप्पट शक्तीची इंजिन लावण्यात आली आहेत. अन्य लढाऊ हेलिकॉप्टरच्या तुलनेत प्रचंड हे हलक्या वजनाचे आहे. या हेलिकॉप्टरचा वेग ताशी 270 किलोमीटर इतका असून त्याची लांबी 51.1 फूट तर उंची 15.5 फूट इतकी आहे. हवाई दलात समाविष्ट होण्यापूर्वी हे हेलिकॉप्टर लडाख आणि वाळवंटावरून उडताना दिसले आहेत. चीन सीमेजवळ असलेल्या परिसरातही ते उडताना दिसले आहेत. याचा वापर युद्धात तसेच देशातील बंड आणि बचाव कार्यात केला जाऊ शकतो.

या हेलिकॉप्टरचे वैशिष्ट्य म्हणजे 16,400 फूट उंचीवरुन ते लक्ष्यावर हल्ला करु शकते. विशेष म्हणजे हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्रे, सध्याच्या युद्धप्रणालीत प्राधान्याने वापरले जाणारे ड्रोन यांचे हल्ले परतवण्याची क्षमता या लढाऊ हेलिकॉप्टरमध्ये आहे. अतिउंच भागातील रणगाडे, बंकर नष्ट करण्याची क्षमता यामध्ये आहे. याखेरीज हिमालयातील अतिउंचीवर कमालीच्या थंड वातावरणातही ती कार्य करू शकतात; तसेच राजस्थानातील लाही लाही करणार्‍या उष्ण वातावरणातही ती प्रभावीपणाने कार्य करु शकतात. तसेच रात्री आणि दिवसा अशा दोन्हीही प्रहरात ‘प्रचंड’चा वापर करता येणे शक्य आहे. ‘प्रचंड’मधील कॅननमधून एका मिनिटात 750 गोळ्या झाडल्या जाऊ शकतात. वायुदलात दाखल झाल्यानंतर लवकरच रशियन हेलिकॉप्टर्सच्या जागी ‘प्रचंड’चा वापर सुरू होईल.

भारताने मध्यंतरी अमेरिकेडून अपाचे आणि चिनुक यांसारखी अत्याधुनिक हेलिकॉप्टर्सची खरेदी केली होती. परंतु आता स्वदेशी तंत्रज्ञानावर अधिक भर दिला जात आहे. भारत लवकरच इंडियन मल्टी रोल हेलिकॉप्टर अणि हेवी लिफ्ट हेलिकॉप्टरही विकसित करत आहे. तसेच साठ आणि सत्तरच्या दशकातील चेतक आणि चीता या हेलिकॉप्टर्सची जागा घेण्यासाठी स्वदेशी लाईट युटिलिटी हेलिकॉप्टर (एलयूएच) तयार करण्यात येत आहे.

1962 मध्ये भारताने परदेशी भागीदारीतून चेतक हे दोन टन वजनाचे पहिले हेलिकॉप्टर बनवले होते. 1977 मध्ये पर्वतीय उंच क्षेत्रात उपयुक्त ठरतील अशा चीता हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यात आली. मध्यम आणि अधिक वजनदार हेलिकॉप्टर्ससाठी रशिया आणि अमेरिका या दोन देशांवर प्रामुख्याने भारताचे अवलंबित्व होते. पूर्वीच्या काळी देशात फक्त रशियातूनच हेलिकॉप्टरची आयात केली जात होती. यामध्ये एमआय-8, एमआय17 यांचा समावेश होता. पण आता रशियाकडून होणारी खरेदी जवळपास बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी भारत आता अमेरिकेकडून खरेदी करत आहे. पण येत्या काळात ही आयातही शून्यावर आणण्याच्या दिशेने भारत पावले टाकत आहे. भारतीय नौदल सध्या आपल्या युद्धनौकांवर सात हेलिकॉप्टर्स तैनात ठेवत असून त्यातील पाच हेलिकॉप्टर्स विदेशातून आयात केलेली आहेत. विशेषतः विमानवाहू युद्धनौका विक्रांत आणि विक्रमादित्य यांवर असणार्‍या हेलिकॉप्टर्सबाबत भारताचे परावलंबित्व अधिक आहे. यासाठी अमेरिकेकडून सी-किंग हेलिकॉप्टरची खरेदी करण्यात आली आहे. भविष्यात विक्रांतवर कमोव आणि सी-किंग यांच्या जोडीला स्वदेशी बनावटीचे ध्रुव हेलिकॉप्टरही तैनात करण्यात येईल.

प्रचंड’चा विचार करता काश्मीरमधील एलओसीवर चालणार्‍या दहशतवादी कारवाया आणि ईशान्येकडील राज्यांमधील उग्रवादी कारवाया यांवर प्रहार करण्याच्या दृष्टीने हे लढाऊ हेलिकॉप्टर महत्त्वाचे ठरणार आहे. या हेलिकॉप्टरमुळे हिमालयीन क्षेत्रात भारताची सामरीक ताकद वाढणणार आहे. 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धाच्या वेळी सैन्याला अधिक उंचीवरील शत्रूच्या स्थानांवर हल्ला करणार्‍या हेलिकॉप्टरची उणीव प्रकर्षाने भासली होती. त्यावेळी ‘प्रचंड’सारखे हेलिकॉप्टर भारतीय वायुदलात सामील असते तर उंच पर्वतराजीतील पाकिस्तानी सैन्याचे बंकर नेस्तनाबूत करता आले असते. अखेर 22 वर्षांनी ही उणीव दूर झाली आहे. भारतीय वायूदलाला तीन प्रमुख वैशिष्टे असणारे हेलिकॉप्टर हवे होते. एक म्हणजे जास्तीत जास्त शस्रास्रांसह दारुगोळ्याचा भार उचलण्याची क्षमता असणारे, दुसरे म्हणजे इंधन साठवणूक क्षमता अधिक असणारे जेणेकरुन जास्तीत जास्त काळ हवेत राहून शत्रूवर मारा करता येणारे आणि तिसरे म्हणजे अतिउष्ण आणि अतिशीत अशा दोन्ही वातावरणात चालणारे. प्रचंडमध्ये ही तीनही वैशिष्ट्ये असल्याने वायुसेनेचे सामर्थ्य वाढणार आहे.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

Back to top button