समाजभान : एक होती सोनाली | पुढारी

समाजभान : एक होती सोनाली

सुरेश गुदले

टिकटॉक स्टार, राजकीय नेत्या सोनाली फोगाट यांनी जी जीवनशैली, जी व्यवस्था स्वीकारलेली होती; तिनंच त्यांचा बळी घेतला. कोणत्याही प्रकारच्या टोकाच्या चंगळवादाचा शेवट हा आत्मनाशातच असतो. सोनाली हे एक उदाहरण झालं, इतकंच! इतिहासात डोकावल्यास दिसतील, अगणित सोनाली…

‘नवरीवानी नटून थटून मी तुमापुढं बसते…
अन् सांगा राया… सांगा, मी कशी दिसते..?’

टिकटॉक हा जागतिक दर्जाचा कलाविष्कार पाहत होतो. काही सेकंदात विरेचन. सांस्कृतिक भरणपोषण. बघता बघता खल्लास! डोक्याला ताप नाही. कैकवेळा मूळ कलाविष्काराची कत्तल करून ही निर्मिती होते. ‘मी कशी दिसते?’ हे तुम्ही सांगायचं! तुम्ही म्हणजे अर्थातच पुरुषी मानसिकतेनं. पुरुषी व्यवस्थेनं. सौंदर्याची आमची संकल्पना पारंपरिकच. सौंदर्याच्या संकल्पनेचा प्रारंभ आणि शेवट शरीरापासून शरीरापर्यंतच. त्याचे प्रदर्शन. पुरुषांना आकर्षित करण्यासाठी. त्यामुळेच प्रश्‍न येतो, ‘सांगा, मी कशी दिसते?’ आणि जर तुम्हाला मी चांगली दिसले नाही, तर? मग तुम्हाला चांगली दिसेपर्यंत नटते.. थटते.. सजते.. नाचते.. शृंगारते… तुमच्यासाठी कायपण? ‘पैसा फेको, तमाशा देखो’ अर्थकेंद्रित व्यवस्थेमधील ही बाईची पायरी.

टिकटॉक अभिनेत्री आणि राजकीय पक्षाच्या नेत्या सोनाली फोगाट अशाच एका पायरीवर उभ्या होत्या. अशा पायर्‍यांवर असंख्य सोनाली फोगाट उभ्या आहेत. मुकाट. काल-आज-उद्या. सोनालींचा खून झाला. सध्याचे तरी हेच वर्तमान. त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला, असे भलत्याच घाईत पहिल्यांदा जाहीर केले. विरोधक म्हणतात, ही घाईही संशयास्पदच.

सोनालींचा भाऊ गोव्यात आला. म्हणाला, ‘बहिणीचा खून झालाय.’ यंत्रणा प्रारंभी ढिम्मच. नंतर हलली. एका महिलेच्या मृत्यूनंतर यंत्रणा इतक्या गतीने हलताना आणि संशयितांना गजाआड होताना पाहणे, तसे धक्‍कादायकच. इतर गुन्ह्यांच्या वेळी पोलिसांसह सर्व यंत्रणांची आणि या प्रकरणातील गती चक्‍कीत जाळ पेटवणारीच. वरून आदेश आला… हरियाणाहून आला… दिल्लीहून आला… पक्षातून आला… यांसारख्या चर्चेचा धूर आजही निघतोय. आग असल्याशिवाय धूर नाही निघणार. संशयितांना अटक होते… ते पोपटासारखी कबुलीही देतात…लागलीच पोलिस अधिकारी पत्रकार परिषदही घेतात. असं कसं झालं? …मग सर्वच बळींच्या नशिबी भोगाची अशी ललाटरेषा का नसते? सोनालींचा व्यवस्थेनं घेतलेला शोकात्म बळी हे एक उदाहरण. अशा अनेक सोनालींचे बळी गेलेत.. जाताहेत.. जात राहतील… ही वेदनादायी सल. ठसठसणं काही चुकत नाही.

सोनाली… सिद्धी… स्कार्लेट इत्यादी

कळंगूटच्या जगप्रसिद्ध समुद्रकिनारी सिद्धी नाईक या सुंदर, गरीब तरुणीचा अर्धनग्‍न मृतदेह पहाटे मिळालेला. सोनालीच्या साधारण वर्षभर अगोदरचं उदाहरण. पुराव्याअभावी सिद्धीची फाईल बंद करतो आहोत, असे पोलिसांनी अलीकडेच जाहीर केले. या प्रकरणात बड्या धेंड्यांच्या, राजकीय नेत्यांच्या सहभागाची चर्चा, जी हवेतच विरली. फाईल बंद झाली. सोनालींच्या फाईलला मात्र गतीने पाय फुटले. या विसंगतीमुळंच चक्‍कीत जाळ. सम आर मोअर इक्‍वल. सोनाली काय, सिद्धी काय, स्कार्लेट काय… नावे घेणार तरी किती? सर्वांच्या मृत्यूमध्ये समान धागे. चंगळवाद, उपभोग, ड्रग्ज, संपत्तीची लालसा. त्याच्याच आधारावरील सुखा-सामाधानाच्या संकल्पनांसह जगण्याची आकांक्षा. सध्याचा भवताल पाहता, असे बळी जातच राहतील. काळ सोकावलेलाच आहे, त्यामुळे कैक सोनालींचे बळी ठरलेलेच आहेत. असं होणं खटकतच नाही. स्वीकारलं जातं. ज्यांना खटकतं, ते बदलासाठी घाव घालत राहतात. त्यांचा आवाज आहे; पण कमालीचा क्षीण. तरीही आहे हा आशावाद.

हिप्पींचा डेरा

कोेणत्या व्यवस्थेनं घेतला सोनालींचा बळी? साधं सोप्प एका वाक्यातील उत्तर – त्यांनी स्वीकारलेल्या जीवनशैलीनं. नंतर विश्‍लेषण. अनंत अशा महाकाय अर्थव्यवस्थेनं. टोकाच्या चंगळवादानं. या अर्थव्यवस्थेच्या सोनाली एक बळी. गोव्यातील नाईट लाईफचं अपत्य. काय आहे गोव्यातील नाईट लाईफ? हिप्पी आले गोव्यात, ते 1960 च्या दशकात. एका विनाशाकडं वाटचालीचा हा प्रारंभबिंदू. त्यांचे वर्तुळ खूप मर्यादित. खा-प्या-मजा करा. रात्री-मध्यरात्री. अगदी उत्तररात्रीपर्यंत. इतकेच काय, सूर्योदयानंतरही झिंगाट. विवस्त्रही.
या हिप्पींच्यामुळे गोव्यातील सुशेगाद समुद्र किनार्‍यांना जाग आली. ही जाग किती जीवघेणी असू शकते ते सोनाली, सिद्धी, स्कार्लेट आदींनी दाखवलं. काही नावं बाहेर आलीच नाहीत. बेपत्ताच. किनारपट्ट्यांतील पार्ट्यांमध्ये सदेह बेपत्ता तरुणींना तर वाली कोण? ना जिवंत, ना मृत. मग गेल्या कोठे? किनारपट्टीत पार्टीत ड्रग्जनं मृत्यू होऊनही कागदावर तो शब्दच येऊ दिला नाही. कारण – अर्थकारण. इलेक्ट्रॉनिक नृत्य महोत्सवात ड्रग्जनं किती जणांची इहलोकीची यात्रा संपवली असेल. सांगणे कठीणच…

हिप्पींचे जे वर्तुळ होते, त्यात स्थानिक माणूस नव्हता. चुकून-माकूनचा अपवाद मोजायचा नसतो, तो सिद्धांत नाही होत. हिप्पींचे नाईट लाईफ साधरणत: 1990 च्या दशकानंतर रंगारंग होऊ लागले. ते हातपाय पसरू लागले. त्याची पर्यटकांनाही चांगलीच चटक लागली. हळूहळू राज्याची सर्व किनारपट्टी वाद्यांच्या दणदणाटानं उत्तररात्रीपर्यंत जागू लागली. अर्थकारणानं विलक्षण वेग पकडला. अमली पदार्थ हा मिळमिळीत शब्द झाला. ड्रग्ज या शब्दाला भलताच रुबाब प्राप्‍त करून दिला. कोट्यवधी शब्द किरकोळ झाला. खेळ अब्जावधींचा रंगू लागला.

विधानसभा निवडणुकीत किनारपट्टीतील एक वजनदार नेता निवडणूक रिंगणात होता. त्यांनी जाहीर केलेली स्थावर आणि जंगम मालमत्ता होती, एक अब्ज रुपयांची. बाकीची, दडवलेली विचारायची नाही. ते ड्रग्जच्या व्यवहाराची संबंधित आहेत, असा आरोप विरोधकांनी जाहीरपणे अनेकवेळेला केलेला. ते निवडून आलेत. गेल्या 12 ऑगस्टला गोव्यात 186 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. किनारपट्टीतील पंचांचा भाव नेहमी मोठाच. मोरजी पंचायत. किनारपट्टीची पंचायत.

महाराष्ट्रातील सिंधुदुर्गच्या शेजारच्या पेडणे तालुक्यातील. या पंचायत निवडणुकीत पंच होण्यासाखी एकाने पन्‍नास लाख उधळले. कशावरून? एक माजी मुख्यमंत्र्यांनीच हा आकडा जाहीर केला. आपण हा खर्च म्हणतो, तो पंच त्याला म्हणतो गुंतवणूक. आता गुंतवणूक म्हटले की, नफेखोरी आलीच. एखाद्या अवैध वा दोन नंबरच्या प्रकरणात मांडवली केली की, पैसा वसूल. ड्रग्ज आहे, नानाविध परवाने – एक की दोन. त्यात किनारपट्टी म्हणजे दहा नव्हे, शरीराची वीसही बोटे तुपात! त्यामुळेच प्रश्‍न पडतो की, पडद्यामागे दररोज चालणारा खेळ काय लाखांत असणार आहे थोडाच?

एका प्रख्यात दूरचित्रवाणी वाहिनीवर एक मालिका गाजलेली. विषय होता आंतरराष्ट्रीय गुन्हेगार. इंटरनॅशनल क्रिमिनल्स. ते या गुन्हेगारांच्या मुलाखती दाखवत. अर्थातच चेहरे ओळखता येणार नाहीत, अशी मोडतोड करून. कथित संपादन म्हणूया. काही गुन्हेगारांना ‘गोवा’ आणि ‘ड्रग्ज’ या अनुषंगाने प्रश्‍न विचारलेले. त्यांच जे उत्तर होतं, ते गोव्याचा नशिला – विद्रूप चेहरा पुरेपूर दाखवतं. ‘जगभरात कुठंही मिळत नाही, इतकं भारी ड्रग्ज गोव्यात मिळत,’ असं त्यांचं उत्तर होतं.

भारी म्हणजे अर्थातच विलक्षण नशा आणणारं. बेधुंद करणारं. सोनाली निवास करत असलेल्या हॉटेलमध्ये, नृत्य करताना बारमध्ये तिला असं ड्रग्ज दिलं गेलं. पहाटे साडेचार वाजेपर्यंत पार्टी रंगलेली. साडेचारनंतर दोघा संशयित सहकार्‍यांनी तिला बाथरूममध्ये नेलं. ते तेथे दोन तास होते. त्यानंतर तिला हॉटेलमध्ये नेलं. तेथून रुग्णालयात. तेथे मृत घोषित केलं. महिलांसाठीच्या बाथरूममध्ये दोघा पुरुष सहकार्‍यांनी तिला आणखी ड्रग्ज पाजलं, असू शकतं. बाथरूममध्ये ड्रग्जचेे अंशही सापडले. अर्थातच, ते महाघातक… जीवघेणे…

स्थानिकांच्या सहभागाशिवाय कसं शक्य?

गोव्यातील अशा घटनांचे अन्वयार्थ लावताना बोरूबहाद्दर, दांडकेबहाद्दरांचा एक लाडका सिद्धांत आहे. गोव्यात बाहेरून येणारे म्हणजेच परप्रांतीय लोक, तसेच पर्यटकांमुळे गोव्याची जास्त बदनामी होते, हाच तो लाडका सिद्धांत. खरे तर स्थानिक लोक, पोलिस यंत्रणा आणि राजकीय नेतृत्व यांच्या अभद्र युतीशिवाय ड्रग्जसह कोणताही दोन नंबरचा धंदा उभाच राहू शकत नाही. सोनाली प्रकरणातही पकडलेले दोन ड्रग्ज पेडलर स्थानिक आहेत. गोव्यातील काही गावांमध्ये ड्रग्ज पोहोचल्याची, काही शाळांमध्ये ड्रग्ज पोहोचल्याची चर्चा विधानसभेत होते, याचा अर्थ काय? स्थानिकांच्या सहभागाशिवाय हे कसं शक्य आहे?

पर्यटन, गुन्हेगारी आणि ड्रग्ज

गोव्याचे स्वतःचे असे पर्यटन धोरण अलीकडेच कागदावर अवतरले आहे. त्याची सतत चर्चा होत होती. गोवा म्हणजे बिचेस.. मंदिरे.. चर्चेस..! संपले पर्यटन. हा गोड गोड गैरसमज सर्वदूर आहे. सरकार म्हणते, हा समज बदलणार आहोत. त्यासाठी गोव्याच्या गावागावांमधील अंतर्गत पर्यटनावर सरकार भर देईल, असे किमान एक तप तरी जाहीर केले जाते. आंतरग्राम, वैद्यकीय, साहस, क्रीडा आदी प्रकारच्या पर्यटनांवर भर देऊ आणि दर्जेदार (म्हणजे जास्त खर्च करणारे) पर्यटक वाढतील यासाठी प्रयत्न करू, असंही सरकार म्हणतं. ते जेव्हा होईल, तो ‘सुदिन!’ सध्या गोव्याला, पर्यटनाला ड्रग्जच्या विळख्यातून कसे सोडविणार? वेश्या व्यवसाय आणि गोवा हे चित्र कसे बदलणार? राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांचे निवांत राहण्याचे घर म्हणजे गोवा? यांसारखी आव्हाने ‘आ’ वासून आहेत. या आव्हानांवर सोनाली खून प्रकरणाने पुन्हा एकदा शिक्‍कामोर्तब केले.

सोनाली फोगाटची राजकीय कारकीर्द संपविण्यासाठी, तिची मालमत्ता हडप करण्यासाठी खून केल्याचे संशयितांनी म्हटलेले आहे. मागे वळून तिची राजकीय कारकीर्द पाहिल्यास, हे कारण कितपत खरे असेल याचा संशयच येतो. तसेच संपत्तीच्या कारणांबाबतही. तिचे काही आर्थिक व्यवहार जर संशयितच पाहत असेल, तर मालमत्ता हडप करण्याच्या हेतूविषयी मग प्रश्‍न निर्माण होतात.

हा राजकीय खून आहे का? असेल, तर संबंधित राजकीय व्यक्‍तीपर्यंत पोलिसांचे हात पोहोचू दिले जातील का? ड्रग्जचे विलक्षण व्याप्‍ती असणारे, जबरदस्त आर्थिक ताकदीचे जाळे पोलिसांना भेदू दिले जाईल का? ड्रग्जबाबत आजवर इवल्या इवल्या चिंगळ्या मच्छीच बक्‍कळ पकडलेल्या आहेत. अगदी सोनाली प्रकरण उजेडात आल्यावर लागलीच वीस लाखांवर किमतीचा ड्रग्ज पकडला. काही जणांना गजाआड केलं. हा योगायोग की समयसूचकता? की सापडलेला मुहूर्त? राजकीय खून, संपत्ती आणि ड्रग्ज आदी कोनांतून प्रकरण तडीस लागणार का? यांसारख्या प्रश्‍नांची सकारात्मक उत्तरे अनुभव जमेस धरता मिळणे महाकठीणच.

Back to top button