युवक : स्वातंत्र्याचे मोल आणि तरुणाई | पुढारी

युवक : स्वातंत्र्याचे मोल आणि तरुणाई

अविनाश धर्माधिकारी, माजी सनदी अधिकारी

आज भारत हा जगातील सर्वाधिक तरुणांचा देश आहे. ही या देशाची प्रचंड ताकद असून, त्याचे वर्णन लोकसंख्येचा लाभांश असा केला जातो. येणार्‍या 30 वर्षांत या लाभांशाचे नियोजन आणि अंमलबजावणी जर नीट झाली, तर 2045 पर्यंत भारत जगातील क्रमांक एकची अर्थव्यवस्था बनू शकतो. यासाठी जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या स्वतंत्र प्रतिभेचा ठसा उमटवणे, हे व्रत तरुण पिढीने स्वीकारले पाहिजे.

स्वातंत्र्याची 75 वर्षं म्हणजे अमृत महोत्सव… हे शब्दसुद्धा अंगावर सरसरून काटा आणणारे आहेत…हे शब्द प्रेरणा देणारे आहेत… त्याचबरोबर ते पुढच्या जबाबदारीची जाणीव करून देणारेसुद्धा आहेत. एखादी संस्कृती, एखादे राष्ट्र, एखादा समाज याच्या आयुष्यात 75 वर्षं हा काळ पुरेसा कालावधी आहे की, ज्यामध्ये झालेली वाटचाल समजावून घ्यावी आणि पुढच्या वाटचालीसाठी नव्या दमाने मार्गक्रमण करावे. खरंच आपण विचार केला की, 1947 मध्ये आपण कुठे होतो? तर खरोखरंच आज भारतीय असण्याचा आनंद आणि अभिमान वाटावा इतकी वाटचाल देशाने निश्चित केली आहे. एक द़ृष्टिकोन असा घेता येईल की, 75 वर्षांत आपण कुठे पोहोचायला हवे होतो. त्याच्या उत्तरार्थ आपण काहीच केलेले नाहीये, असेही वाटू शकते. पण त्याचबरोबरचा दुसरा द़ृष्टिकोन आहे की, निघालो कुठून आणि त्यातुलनेत आता कुठे पोहोचलो आहोत! म्हणजे 75 वर्षांत भारताने खूप मोठी प्रगती करायला हवी होती, इथले सर्व दारिद्य्र दूर व्हायला हवे होते, 100 टक्के तरुणांना रोजगार मिळायला हवा होता आणि आज भारताचा एक जागतिक आर्थिक महासत्ता म्हणून उदय झालेला असायला हवा होता… ही अपेक्षा स्वाभाविक आहे. त्यामुळं आपण ही उद्दिष्ट्ये पुढील 25 वर्षांत साध्य करण्याचा संकल्प करूया. पण यासाठीचा आत्मविश्वास सरलेल्या 75 वर्षांनी निश्चित दिला आहे, हेही तितकेच खरे!

यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली राष्ट्रीय एकात्मता. हा भारत देश हजारो वर्षं अखंड चालत आलेली एक संस्कृती आहे. त्या संस्कृतीपाशी काळानुसार बदलून नवे रूप धारण करण्याची शक्ती आहे, तो हा नवा भारत! कित्येक जण आजही या भारताला एक राष्ट्र मानत नाहीत. जे मानतात त्यापैकी काहींना वाटते की, भारत हे आधी कधीच राष्ट्र नव्हते; ते 15 ऑगस्टला निर्माण झाले. त्याहून काहींची मजल पोहोचते की, इंग्रजांमुळे भारत राष्ट्र बनले. ज्या आक्रमकांनी पद्धतशीरपणाने देशाचे वाटोळे करून ठेवले, त्यांचेच उदात्तीकरण करणारे इतके विकृत आकलन जगामध्ये दुसरीकडे कुठेही सापडणार नाही.

या भारताचे हे राष्ट्रीयत्व 75 वर्षांमध्ये अधिकाधिक बळकट होत गेले आहे. ज्या सरदार पटेल यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने राजकीयद़ृष्ट्या एकसंध भारत उभा केला, तिथपासून ते स्वातंत्र्यानंतर भारतातून फुटून निघणार्‍या अनेक चळवळी आता एव्हाना भारताच्या राष्ट्रीयत्व, लोकशाही आणि राज्यघटनेच्या चौकटीमध्ये शांतावल्या आहेत. एकेकाळी पेटलेली खालिस्तान चळवळ पाहा. जम्मू-काश्मीरमधील फुटिरतावादी दहशतवाद पाहा. ईशान्य भारतातील अनेक राज्ये, विशेषतः नागालँड, मणिपूर आणि एका टप्प्याला आसाममध्येही भारतापासून फुटून निघण्याच्या चळवळी सुरू होत्या. त्या सशस्त्र चळवळी होत्या. त्यांना जागतिक शक्तींचा पाठिंबा होता. तरीसुद्धा या सर्व चळवळी भारताचे राष्ट्रीयत्व, तिची लोकशाही आणि तिचा मूलाधार असलेली राज्यघटना या चौकटीमध्ये शांतावल्या आहेत.

हा आधुनिक भारताच्या राष्ट्रीयत्वाचा फार मोठा विजय आहे. आपण स्वतंत्र झालो तेव्हा जगातील एकाहून एक प्रचंड मोठे पंडित भविष्य वर्तवत होते की, नेहरूंच्या मागे भारताचे तुकडेतुकडे होतील. भारताला एकसंध ठेवणारे काही नाहीये. पंडितजींचे असामान्य नेतृत्व भारताला सांधून ठेवत आहे. त्यामुळे ते नसतील, तर या देशाचे तुकडे होतील. पण आज बहुधा असे म्हणणारे अस्तित्वहीन झाले आहेत आणि भारताची एकात्मता कायम असून, जाणार्‍या दिवसागणिक ती बळकट होत आहे. या राष्ट्रीयत्वाचा अनमोल ठेवा आहे आपली लोकशाही आणि राज्यघटना. त्या लोकशाहीची पाळेमुळेसुद्धा मुळात सहिष्णू आणि सर्वसमावेशक असलेल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहेत. पण त्याबरोबर राज्यघटनेच्या माध्यमातून आपण बहुपक्षीय संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला.

तो करतानापासून आजपर्यंत अनेक तथाकथित पंडित म्हणत राहतात की, भारतातील लोकशाही टिकणार नाही किंवा भारत या लोकशाहीला योग्य नाहीये. अशा नकारात्मक पंडितांचे सगळे शहाणपण खोडून काढत भारताची लोकशाही, राज्यघटना टिकली आहे आणि ती संपूर्ण तळागाळात, गावागावापर्यंत पोहोचली आहे. भारतीय राज्यघटना सामान्यातल्या सामान्य नागरिकालाही सन्मान प्रदान करणारी आहे. त्याच्या मूलभूत अधिकारांचा सन्मान करणारी आहे आणि त्यातल्या लोकशाहीचे मोल इथल्या सामान्य मतदाराला कळलेले आहे. आपल्या एका मतातून राज्याचे आणि देशाचे राज्यकर्ते कोण असावेत हे ठरवले जाते, ही बाब त्याला समजली आहे.

त्याचबरोबर स्वातंत्र्योत्तर भारताने विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात केलेली प्रगती ही प्रत्येक भारतीयाची मान आनंदाने आणि अभिमानाने उंचवावी अशी आहे. आजच्या तारखेला विज्ञान-तंत्रज्ञानातले असे एकही क्षेत्र नाही की, ज्यात भारत अद्ययावत नाही. एका बाजूला आजही पिळवटून टाकणारे दारिद्य्र, बेरोजगारी, भ्रष्टाचार, जातीयता आहेतच आणि त्यांच्याशी आपल्याला संघर्ष करायचाच आहे. पण हा सगळा बोचरा आणि विषारी वारसा सोबत घेऊनही भारताने विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात केलेली वाटचाल अभिमानास्पद आहे, प्रेरणादायक आहे. भारतीय शास्त्रज्ञ हे या राष्ट्राचे खरे हिरो आहेत. डॉ. होमी जहांगीर भाभा, डॉ. विक्रम साराभाई यांच्यापासून डॉ. जयंत नारळीकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर असे अनेक अत्याधुनिक शास्त्रज्ञ की, ज्यातले एक या देशाचे राष्ट्रपतीही बनले… डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम. यांनी देशाची मान उंचावली आणि अनेक अशक्य टप्प्यांना एतद्देशीय संशोधनाद्वारे सत्य करून दाखवले.

अवकाश संशोधन, आण्विक संशोधन, शेतीविषयक संशोधन अशी किती तरी आनंददायक उदाहरणे सांगता येतील. तेव्हा झालेल्या 75 वर्षांच्या वाटचालीच्या अनेक दुःखद, मर्यादांचे भान ठेवले तरी प्रत्यक्षात आपण जी वाटचाल केली आहे ती आनंददायक आणि प्रेरणादायक आहे. आता आपले काम बनते की, या 75 वर्षांचा वारसा समजावून घेऊन आपल्या करिअरद्वारे त्याला आकार देणे. हे आपल्यापुढचे मुख्य आव्हान आहे. तेव्हा या देशाचे राष्ट्रीयत्व, लोकशाही, राज्यघटना, विज्ञान-तंत्रज्ञान यासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या स्वतंत्र प्रतिभेचा ठसा उमटवणे, हे व्रत तरुण पिढीने स्वीकारले पाहिजे.

एक आनंदाची गोष्ट म्हणजे भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 66 टक्के लोक हे 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. ही या देशाची प्रचंड ताकद असून, त्याचे वर्णन लोकसंख्येचा लाभांश म्हणजेच डेमोग्राफिक डिव्हिडंड असा केला जातो. असा भारत तरुण असणे, ही आपली अवस्था पुढील 30 वर्षं टिकणार आहे. म्हणजेच या 30 वर्षांत लोकसंख्येच्या लाभांशाचे नियोजन जर व्यवस्थितपणाने झाले आणि अंमलबजावणी जर नीट झाली, तर 2045 पर्यंत भारत जगातील क्रमांक एकची अर्थव्यवस्था बनू शकतो. श्रेष्ठ आणि समृद्ध भारत बनू शकतो आणि चीन व अमेरिकेलाही मागे टाकू शकतो. हे केवळ आशावादी अनुमान किंवा आपण भारतीय असल्याबद्दलचा अभिमान नाही, तर 2045 पर्यंत भारत जगातील समृद्ध आणि सशक्त शक्ती बनू शकतो, असे जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही म्हटले आहे. अमेरिकेतील एक मोठा गुंतवणूकदार जॉर्ज सोरस यांनीही म्हटले आहे.

दरवर्षी स्वित्झर्लंडच्या दावोस इथे जगातील श्रीमंत देश आणि गुंतवणूकदार ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या व्यासपीठावर एकत्र भेटतात. त्या फोरमचा अभ्यासपूर्ण अहवालही हेच सांगतो की, 2045 पर्यंत भारतामध्ये जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याची क्षमता आहे. यात गंभीर शब्दक्षमता आहे. क्षमता आहे म्हणजे 2045 पर्यंत आपण पहिल्या स्थानावर पोहोचू, याची शाश्वती नाही. इतिहास असा सरळ रेषेत पुढे सरकत नसतो. जगाच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत की, ते देश जगातील अत्यंत समृद्ध आणि विकसित देश होतील असे वाटले होते. पण त्यांच्या वाटचालीला कुठेतरी पायबंद बसला आणि आज तर त्या अर्थव्यवस्था झगडताना दिसताहेत. म्हणजेच आपल्याला आपली क्षमता लक्षात घेऊन, पण अत्यंत सावधपणे पावले टाकली पाहिजेत.

लोकसंख्येचा लाभांश खरंच भारताला एक श्रेष्ठ आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. 100 टक्के रोजगार आहे. सळसळत्या रक्ताच्या तरुणांना त्यांच्या शिक्षण, व्यक्तिमत्त्व, कुशलता याला साजेसा रोजगार मिळाला पाहिजे. तो मिळाला नाही, तर मात्र तेच सळसळते रक्त अयोग्य, हिंसक गोष्टींकडे वळू शकते. तसे झाल्यास लोकसंख्येचा लाभांश हा उलट आपल्याला विध्वंसाकडे घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे सर्व धोरणांची दिशा 100 टक्के रोजगारनिर्मिती हीच असायला हवी.

येणार्‍या 25-30 वर्षांसाठी तरुणांसाठी तयार नोकर्‍या आव्हान असणार आहेत. आज नवे तंत्रज्ञान अत्यंत वेगाने पुढे येत आहे. हे तंत्रज्ञान नजीकच्या भविष्यात अनेक रोजगार कालबाह्य ठरवणार आहे. तथापि, ही प्रक्रिया पाच ते सात वर्षं राहील आणि त्यानंतर हेच तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माणही करणार आहे. हे लक्षात घेता येत्या पाच-सात वर्षांचा कालखंड अत्यंत आव्हानात्मक असून, तो यशस्वीरित्या पार करता येईल आणि त्यानंतर निर्माण होणार्‍या कोट्यवधी रोजगारसंधींचा लाभ उठवता येईल, अशी शिक्षणव्यवस्था गरजेची आहे. देशातील तरुणाईकडून नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले गेले पाहिजे.

आपल्या वैयक्तिक आयुष्यात प्रत्येक मुलामुलींनी याचे भान ठेवून स्वत:चा दिनक्रमही आखला पाहिजे. स्वतःचे व्यक्तिमत्त्व विकसित केले पाहिजे. तर तो तरुण मुलगा-मुलगी काळाचे आव्हान समर्थपणाने पेलू शकेल. यासाठी सतत नवीन शिकण्याचे कौशल्य अंगी बाणवावे लागेल. भवती घडणारा आणि वेगाने होणारा बदल आत्मसात करावा लागेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स या सर्वांतून आर्थिक, सामाजिक मूलभूत बदल घडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशा वेळी सर्व तरुणांनी आज आता इथेच लक्षात घेतले पाहिजे की, स्वयंरोजगार हेच भविष्यकाळातले उत्तर आहे. मला समर्थपणाने माझ्या पायावर उभे राहिले पाहिजे आणि भविष्यकाळात तर आपण नोकर्‍या शोधणारे नाही, तर नोकर्‍या देणारे बनले पाहिजे. म्हणजेच उद्यमशीलतेची कास धरावी लागेल, तरच वाटचाल उज्ज्वल भवितव्याकडे होईल.

याची त्रिसूत्री प्रत्येक तरुणाकरिता लागूही आहे आणि महत्त्वाची आहे. पहिले सूत्र आहे, ‘स्व’ची ओळख अर्थात नॉलेज ऑफ द सेल्फ. ‘तुझ्या आत डोकावून पाहा. स्वतःचे विश्लेषण कर. तुझी शक्तिस्थानं ओळख. तुझ्या जीवनाची इमारत त्या शक्तिस्थानांवर उभी कर. दुसर्‍यांची तुलना करू नको.’ याला आपल्या भारतीय विचारातील सुंदर शब्द आहे ‘स्व’ची ओळख! दुसरे सूत्र म्हणजे ‘तुझ्या जीवनाचं क्षेत्र ‘स्व’च्या ओळखीनुसार ठरव. सर्व क्षेत्रे, सर्व करिअर्स समान आहेत, सर्व करिअर्स चांगली आहेत. ते करिअर करण्याची गुणवत्ता तुझ्यात असेल, तर तुझ्यासाठी ते करिअर चांगले असेल. त्यामुळं तुझ्यातील गुणवत्ता पाहून करिअर निवड.’ तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे सूत्र म्हणजे, अशा तर्‍हेने निवडलेल्या क्षेत्रामध्ये ‘उत्तम’ आणि ‘प्रतिभावंत’ होणं.

तुम्ही तुमच्या क्षेत्रात ‘उत्तम’ आणि ‘प्रतिभावंत’ असाल तर तुमचे जीवन, आयुष्य यशस्वी होणार. अन्यथा त्या क्षेत्राला वाव कितीही असूनही उपयोग नाही! तेव्हा अंतःकरणावर कोरून ठेवण्याचे शब्द आहेत ‘उत्तमता’ आणि ‘प्रतिभा.’ तरुण पिढीसमोरचे सर्वात मोठे आव्हान हे आहे की, जीवनाच्या आपण निवडलेल्या क्षेत्रात ही ‘उत्तमता’ आणि ‘प्रतिभा’ साध्य करायची आणि ती साध्य करण्यासाठीची ‘तपश्चर्या’ करायची. खरे म्हणजे, निवडलेल्या क्षेत्रामध्ये ‘उत्तम’ आणि ‘प्रतिभावंत’ असणे ही देशभक्ती आहे. ही ‘तपश्चर्या’ प्रत्येक तरुण-तरुणी म्हणजेच समस्त युवापिढी करेल, तर भारत हे राष्ट्र एक समर्थ आणि समृद्ध राष्ट्र म्हणून निश्चितच झेपावलेले दिसेल! आपण सर्व जण ती ‘तपश्चर्या’ करूया.

Back to top button