बहार विशेष : इंटरनेट एक्स्प्लोअररचा अंत | पुढारी

बहार विशेष : इंटरनेट एक्स्प्लोअररचा अंत

डॉ. योगेश प्र. जाधव

इंटरनेट एक्स्प्लोअरर आता बंद होणार आहे. वेग हे सध्याच्या काळातलं सर्वात किमती चलनी नाणं आहे. त्याच्या कसोटीवर टिकून राहण्यात इंटरनेट एक्स्प्लोअरर अयशस्वी ठरलं, त्याचाच हा परिणाम. काळाची पावले ओळखून स्वतःमध्ये बदल घडवून आणला नाही, स्वतःला अपडेट केलं नाही, तर आपण कालबाह्य होतो हे इंटरनेट एक्स्प्लोअररनेे ठळकपणे अधोरेखित केलंय. भारतात ऐंशीच्या दशकात संगणक आला. साधारण नव्वदीच्या दशकात तो घरोघरी पोहोचू लागला. संगणक खरेदी करण्याची क्षमता असलेल्या शहरी उच्च मध्यमवर्गाने संगणक तुलनेने लवकर आपलासा केला. ‘विंडोज’ या ऑपरेटिंग सिस्टीमसह संगणक विकत घेतला की, त्यात मायक्रोसॉफ्ट टूल्स आणि त्याच्या बरोबर ‘इंटरनेट एक्स्प्लोअरर’ हे वेब ब्राऊजर मिळायचं.

हे ‘विंडोज’चं फ्लॅगशीप ब्राऊजर होतं. संगणक विकत घेताना त्यात आधीच इंटरनेट एक्स्प्लोअरर इन्स्टॉल केलेलं असायचं, त्यामुळे या ब्राऊजरची भारतातच नव्हे, तर जगभरातील संगणक विश्वात मक्तेदारी तयार झाली. भारतात आज जी पिढी चाळीशीच्या घरात आहे, तिने सर्वात पहिल्यांदा इंटरनेट नावाच्या चमत्काराचा वापर केला, तो ‘इंटरनेट एक्स्प्लोअरर’ या वेब ब्राऊजरवरच! एवढंच नव्हे, जागतिकीकरणाचे आणि आर्थिक उदारीकरणाचे परिणाम दिसू लागल्यानंतर, 2000 सालच्या आसपास विशीच्या वयात असलेली तरुण पिढी हळूहळू आपली वैश्विक जाणीव विकसित करू लागली, तेव्हा ती जगाशी स्वतःला जोडून घेऊ पाहात होती. इंटरनेट एक्स्प्लोअरर या पिढीचं जगाशी जोडून घेण्याचं साधन बनला.

हळूहळू खासगी कंपन्या, सरकारी कार्यालये यांनी आपल्या कामकाजात संगणक वापरण्यास सुरुवात केली. त्या प्रक्रियेतही या वेब ब्राऊजरचा वाटा मोठा होता. आऊटलूकसारखं टूल्स वापरून कार्यालयांचं कामकाज चालत असे. त्यामुळे भारतातल्या एका पिढीला इंटरनेट एक्स्प्लोअररची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही, असं म्हणावं लागेल. परवाच आलेल्या एका बातमीनुसार, इंटरनेट एक्स्प्लोअरर आता बंद होणार असल्याचं सांगितलं जातंय. ‘विंडोज’चं हे ब्राऊजर आता तुम्हाला वापरता येणार नाही, कारण कंपनीने ते बंद करण्याचा निर्णय घेतलाय. या बातमीनंतर फारसा गाजावाजा झाला नाही, त्याचं कारण म्हणजे ‘इंटरनेट एक्स्प्लोअरर’ त्याच्या कमी वेगामुळे आणि इतर ब्राऊजर्सशी झालेल्या स्पर्धेत अपयशी ठरल्यामुळे नव्या पिढीच्या खिसगणतीतही नाही. वेग हे सध्याच्या काळातलं सर्वात किमती चलनी नाणं आहे. त्याच्या कसोटीवर टिकून राहण्यात इंटरनेट एक्स्प्लोअरर अयशस्वी ठरलं, त्याचाच हा परिणाम. मोझिला फायरफॉक्स, गुगल क्रोम यांच्यासारख्या वेगवान ब्राऊजर्सचं तगडं आव्हान एक्स्प्लोअररसमोर होतं. एका बाजूला ‘विंडोज’मुळे तयार झालेली मोनोपॉली होती. या मोनोपॉलीच्या जोरावर इंटरनेट एक्स्प्लोअरर टिकून राहील की नाही, या प्रश्नाचं उत्तर काळाने दिलं आहे. ते उत्तर तंत्रज्ञानाच्या विश्वात वावरणार्‍या प्रत्येक कंपनीसाठी नव्हे, व्यक्तीसाठीही मोठं सूचक आहे. काळाची पावले ओळखून स्वतःमध्ये बदल घडवून आणला नाही, स्वतःला अपडेट केलं नाही, तर आपण कालबाह्य होतो हे इंटरनेट एक्स्प्लोअररच्या निवृत्तीने पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झालंय.

1994 साली इंटरनेट एक्स्प्लोअरर सुरू झालं. अवघ्या 9 वर्षांत, म्हणजे 2003 सालापर्यंत जगभरातल्या वेब ब्राऊजर्सच्या एकूण वापरापैकी 95 टक्के वाटा एकट्या इंटरनेट एक्स्प्लोअररकडे होता. अर्थात यामागे दुसरं कुठलं लोकप्रिय वेब ब्राऊजर उपलब्ध नसणं, आणि ‘विंडोज’मुळे तयार झालेली मोनोपॉली, ही दोन महत्त्वाची कारणं होती. आज हे ब्राऊजर बंद होण्याच्या मार्गावर असताना वेब ब्राऊजिंगमधला त्याचा जगभरातील वाटा अवघा 0.62 टक्के इतका उरलाय. इंटरनेट एक्स्प्लोअररची मोनोपॉली असेपर्यंत तर ज्या वेबसाईट डेव्हलप केल्या जायच्या, त्याही एक्स्प्लोअररवर चालू शकतील या उद्देशाने डेव्हलप केल्या जात असत. ब्राऊजिंगच्या विश्वात एकहाती वर्चस्व असल्यामुळे एक्स्प्लोअररमधील कमतरता तोपर्यंत ठळकपणे समोर आल्या नाहीत, पण या क्षेत्रात जसजशा इतर स्पर्धक कंपन्या येऊ लागल्या, तशी इंटरनेट एक्स्प्लोअररला उतरती कळा लागली. 2004 झाली मोझिला फायरफॉक्स नावाचं ब्राऊजर आलं. सुरुवातीचा काही काळ त्याने लोकप्रियता मिळवली. त्यानंतर 4 वर्षांनी, 2008 साली गुगलने क्रोम हे आपलं स्वतःचं ब्राऊजर सुरू केलं. अल्पावधीत ते लोकप्रिय झालं.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे दोन तगडे स्पर्धक मैदानात आल्यानंतरही मायक्रोसॉफ्टने आपलं ब्राऊजर या स्पर्धेत टिकवून ठेवण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. याचा परिणाम अर्थात स्पष्ट होता. ‘गुगल क्रोम’ने अत्यंत कमी काळात वेब ब्राऊजिंगवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आणि इतर ब्राऊजर्सना मागे टाकत आपलं स्थान भक्कम केलं. मायक्रोसॉफ्टने नवीन संगणकात प्रीइन्स्टाल्ड ‘इंटरनेट एक्स्प्लोअरर’ देऊनही इतर ब्राऊजर्सच्या समोर ते टिकू शकलं नाही, याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे वेळोवेळी हे ब्राऊजर अपडेट करण्यात आलं नाही. क्रोमचं उदाहरण घ्यायचं झालं, तर रीलिज झाल्यानंतरच्या दहा वर्षांत गुगलने क्रोम या ब्राऊजरमध्ये तब्बल 70 अपडेट्स केले. त्या तुलनेत पहिल्या 10 वर्षांत मायक्रोसॉफ्टने इंटरनेट एक्स्प्लोअररमध्ये केवळ 4 अपडेट्स केले होते. नव्या बदलांना सामोरं जाण्यासाठी एखाद्या वेब ब्राऊजरमध्ये ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात, त्या उपलब्ध करून देण्यात मायक्रोसॉफ्ट अयशस्वी ठरलं.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या दोन दशकांत स्मार्टफोन्स सामान्य लोकांच्या हातात आल्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात एक प्रकारची अभूतपूर्ण क्रांती घडून आली. आज बलाढ्य दिसणार्‍या फेसबुक, गुगलसारख्या मोठ्या कंपन्या या काळात काय करत होत्या? अशा सर्व कंपन्यांनी या काळात आपली सेवा स्मार्टफोन्सच्या माध्यमातून वापरणं अधिक सोपं कसं होत जाईल, यावर प्रचंड काम केलं. फेसबुकचं मोबाईल अप्लिकेशन, आपण आज स्मार्टफोनवर वापरतो ते गुगल क्रोम ब्राऊजर, या सर्व गोष्टी त्यातून विकसित झाल्या. दुसर्‍या बाजूला उतरती कळा लागलेल्या ‘इंटरनेट एक्स्प्लोअरर’ला स्मार्टफोन्सच्या विश्वात जिवंत ठेण्यासाठी मायक्रोसॉफ्टने कोणतेही बदल केले नाहीत. याचा परिणाम झाला तो असा की, इंटरनेट वापरणारी नवीन पिढी ‘इंटरनेट एक्स्प्लोअरर’पासून दूर गेली. अत्यंत मंदगती, सर्व वेबसाईट्स दाखवू न शकणारं मॉडेल यांच्यामुळे या वेब ब्राऊजरची ओळखच जुनाट आणि कालबाह्य ब्राऊजर अशी बनून गेली.

गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात तंत्रज्ञान विश्वात एक उल्लेखनीय गोष्ट घडली, ती म्हणजे इतिहासात पहिल्यांदा स्मार्टफोनवर होणार्‍या इंटरनेट ब्राऊजिंगने डेस्कटॉप किंवा कॉम्प्युटरवर होणार्‍या इंटरनेट ब्राऊजिंगला मागे टाकलं. स्मार्टफोन्सचा वाढता वापर पाहता ही गोष्ट केव्हातरी होणार हे उघडच होतं. एकीकडे मोबाईलवर इंटरनेट वापरण्याचं प्रमाण वाढलं आणि दुसर्‍या बाजूला मायक्रोसॉफ्टचा स्वतःची मोबाईल इकोसिस्टीम तयार करण्याचा प्रयत्न फसला. विंडोज स्मार्टफोनमध्ये इंटरनेट एक्स्प्लोअरर आणि ‘मायक्रोसॉफ्ट एज’ हे दोन्ही वेब ब्राऊजर्स उपलब्ध करून दिले गेले; पण हे विंडोज फोन अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टीम्ससमोर बाजारात अक्षरशः फिके पडले. परिणामी इंटरनेट एक्स्प्लोअररची पुन्हा एकदा उभारी घेण्याची शक्यताही मावळली.

या सगळ्यातून एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली ती अशी की, एखाद्या क्षेत्रात एखाद्या कंपनीची मक्तेदारी असेल, तर त्या कंपनीचं उत्पादन शक्यतो अयशस्वी होणार नाही असं म्हटलं जातं. ‘इंटरनेट एक्स्प्लोअरर’चा अंत होत असल्यामुळे हा समाज चुकीचा ठरला आहे. ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन उत्पादनात बदल केले नाहीत, नावीन्य आणलं नाही, तर कितीही मोठी मोनोपॉली असलेलं उत्पादनही बाजारात अयशस्वी होऊ शकतं, हा धडा यातून घेता येईल.

Back to top button