चर्चेतलं निओम | पुढारी

चर्चेतलं निओम

सौदी अरेबियामधे निओम हे शहर ताबुक भागात, तर जॉर्डन आणि इजिप्तच्या सीमेजवळ 170 किलोमीटर क्षेत्रात उभारलं जातं आहे. सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हे शहर पूर्णपणे पर्यावरणपूरक असल्यामुळे इथं कोणत्याही प्रकारचं कार्बन उत्सर्जन होणार नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या शहराची बांधणी केली जातेय.

सौदी अरेबियाच्या वाळवंटी भागातील एका प्रकल्पाची सध्या फार चर्चा आहे. इथं एक शहर उभं केलं जातंय. भविष्यात हे शहर व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांसाठी हब बनेल. इथं सगळ्या सेवा रोबोट देतील. हवेत कार चालतील. त्यातून लाखो नोकर्‍या आणि लाखो कोटींची गुंतवणूक केली जाईल. जगातला 10 टक्के व्यवसाय या शहरातून होईल, असं म्हटलं जातं आहे.

2017 ला सौदी अरेबियाची राजधानी रियाध इथं एका परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. सौदी अरेबियातली भविष्यातली गुंतवणूक कशी असावी, याची चर्चा तिथं झाली. याच परिषदेत सौदी अरबचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी सौदी अरेबियासाठी ‘व्हिजन 2030’ मांडलं. सध्या चर्चेतलं निओम शहर या व्हिजनचाच एक भाग आहे.

निओम शब्द नवीन या ग्रीक आणि भविष्य अरबी शब्दातून तयार झालाय. हे शहर सौदी अरेबियाच्या उत्तर-पश्चिमेकडच्या ताबुक भागात, तर जॉर्डन आणि इजिप्तच्या सीमेजवळ असेल. 170 किलोमीटर क्षेत्रात हे शहर उभं करण्यात येतंय. या शहराला ‘द लाईन’ या नावाने ओळखलं जाईल. त्यासाठी सौदी अरेबिया 500 बिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे 37 लाख कोटी इतका खर्च करतंय. 2025 पर्यंत हा प्रकल्प उभा करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलंय.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 29 जानेवारी 2019 ला नियोम नावाच्या एका कंपनीची स्थापना करण्यात आलीय. प्रकल्पात जो पैसा गुंतवला गेलाय, त्यावर पूर्णपणे या कंपनीचं नियंत्रण असेल. नियोम शहराला आर्थिक क्षेत्र म्हणून विकसित करणं कंपनीचा महत्त्वाचा उद्देश आहे. ही योजना घोषित झाल्यावर क्लॉस क्लेनफेल्ड यांना सीईओ करण्यात आलं होतं. पण पुढे ही जबाबदारी नदमी अल नस्त्र यांच्याकडे देण्यात आली.

सौदी अरेबिया तेलाचं उत्पादन घेणारा दुसरा, तर तेलाची निर्यात करणारा जगातला सगळ्यात मोठा देश आहे. हे तेलावरचं अवलंबित्व कमी व्हावं आणि इतर विकासाचे मार्ग शोधता यावेत, हाच मोहम्मद बिन सलमान यांचा उद्देश आहे. त्यासाठी त्यांनी 24 एप्रिल 2017 ला ‘व्हिजन 2030’ची घोषणा केली होती.

अर्थव्यवस्थेकडे बघायचा वेगळा द़ृष्टिकोन, पर्यटन, मनोरंजन, आरोग्य, शिक्षण अशा सार्वजनिक सेवांमधून विकास हा या व्हिजनचा महत्त्वाचा भाग आहे. त्यातूनच आधुनिक शहर विकसित करण्याची संकल्पना पुढे आली. नियोम शहर हा या व्हिजनचा एक भाग आहे.
निओम अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरापेक्षा 33 पट मोठं आहे. यातच एक पाण्यावर तरंगणारं ऑक्सॅगॉन हे 7 किलोमीटरचं छोटं शहरही असेल. त्यात पर्यटन स्थळ, निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं रिसॉर्ट, विमानातळं असं बरंच काही असेल. या शहरामध्ये गुंतवणूक करणार्‍यांची स्वतःची एक न्यायव्यवस्था असेल.

निओम शहराच्या सुरुवातीच्या योजनांमध्ये फ्लाईंग ड्रोन टॅक्सी, मनोरंजन पार्क आणि रात्रीच्या वेळी उजळणारा कृत्रिम चंद्र यांचा समावेश असेल. निओममध्ये रस्ते नसतील, त्यामुळे गाड्यांचा प्रश्नच नसेल. त्यामुळे कार्बन उत्सर्जन होणार नाही. प्रवासासाठी हायपर स्पीड ट्रेनचा वापर केला जाईल. त्यामुळे कुठंही अगदी 20 मिनिटांत प्रवास करणं शक्य होईल.

निओम शहर पूर्णपणे पवनऊर्जा आणि सौरऊर्जेवर चालेल. या शहरात 10 लाख लोक राहतील. 2030 पर्यंत या शहरात 3 लाख 80 हजार रोजगार निर्माण केले जातील. त्याच्या निर्मितीसाठी म्हणून सौदी अरेबियाकडून 100 ते 200 बिलियन अमेरिकन डॉलर खर्च केले जातील. पूर्णपणे सार्वजनिक सेवांवर भर देणारं हे शहर पवनऊर्जा आणि सौरऊर्जेवर चालेल.

येमेनमधल्या लष्करी कारवाया आणि वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार आणि सौदी सरकारचे टीकाकार जमाल खशोग्गी यांची 2018 ला तुर्कीमध्ये हत्या करण्यात आली होती. मध्य-पूर्व राष्ट्रांमध्ये त्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला. त्याचा रोख थेट सौदी अरेबियाच्या मोहम्मद बिन सलमान यांच्यावर होता. यातून बाहेर येण्यासाठी त्यांनी मेगासिटीची योजना आणल्याची टीका त्यांच्यावर होतेय.

वेगवेगळ्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी या प्रकल्पामध्ये सहभागी व्हायला नकार दिला होता. त्यासोबतच हा प्रकल्प जिथं उभा राहतोय, तिथं हुवैती जमात रहायची. या निओममुळे त्यांना विस्थापित व्हायची वेळ आलीय. पण हे 20 हजार लोक कुठं विस्थापित झालेत, हेच माहीत नसल्याचा ठपकाही मोहम्मद बिन सलमान यांच्यावर ठेवण्यात आल्याचं ‘फस्ट पोस्ट’च्या एका वृत्तात म्हटलंय. यावर टीका करणारे आदिवासी कार्यकर्ते अब्दुल रहीम अल यांना ठार करण्यात आलं होतं. त्यावरून लक्ष हटवण्यासाठी या प्रोजेक्टआडून मोहम्मद बिन सलमान स्वतःची प्रतिमानिर्मिती करतायत, असा आरोपही त्यांच्यावर केला जातोय.

अक्षय शारदा शरद

Back to top button