रॉकेट बॉईज : भारतीय वैज्ञानिकांची प्रेरणादायी गोष्ट | पुढारी

रॉकेट बॉईज : भारतीय वैज्ञानिकांची प्रेरणादायी गोष्ट

‘रॉकेट बॉईज’ ही वेबसिरीज होमी भाभा आणि विक्रम साराभाईंच्या भारावलेपणाची, झपाटलेपणाची, आग्रहाची आणि मैत्रीची गोष्ट आहे. ती प्रेरणादायी आहे, रोमांचक आहे, तशीच तिला दुःखाची एक किनारही आहे. पटकथा, अभिनय, दिग्दर्शन, चित्रीकरण सगळंच उत्तम आहे. जीम सरभ, ईश्वाक सिंह, अर्जुन राधाकृष्णन आणि रजत कपूर यांनी होमी भाभा, विक्रम साराभाई, तरुण ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि पंडित नेहरू यांच्या व्यक्तिरेखा साकारताना कसलीही कसर सोडली नाही. रजीना कॅसांड्रानं तर मृणालिनी साराभाईंच्या भूमिकेत जीव ओतला आहे. तिची नजर काय बोलते! सलीम-जावेदचे संवादही फिके पडावेत अशी  सोनी लिव्हवरची ही मालिका पाहताना अनेक ठिकाणी अंगावर रोमांच येतात, मन भरून येतं, क्वचित प्रसंगी डोळ्यांच्या कडा ओलावतात. त्याचं श्रेय खर्‍या ‘रॉकेट बॉईज’ना जातं. होमी भाभा, विक्रम साराभाई आणि ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचं आयुष्य अफलातून होतं. त्याची गोळाबेरीज केली की, भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचा आलेख डोळ्यासमोर उभा राहतो.

होमी भाभा यांनी भारताच्या ‘अणू’ कार्यक्रमाला जन्म आणि आकार दिला, तसा साराभाईंनी ‘अवकाश’ कार्यक्रमाचा पाया घातला. पुढे सतीश धवन, डॉ. कलाम यांनी साराभाईंच्या दूरद़ृष्टीला ‘अग्निपंख’ दिले. त्यात इतर अनेक वैज्ञानिकांचा महत्त्वाचा वाटा होता. अर्थात, मालिकेत सर्वांचा समावेश नाही.

वैज्ञानिकांची ओळख अनेकवेळा त्यांनी काय शोध लावले यावरून ठरते. भाभा, सारभाई केवळ प्रयोगशाळेत प्रयोग करून, शोधनिबंध छापत बसले असते तरी वैज्ञानिक म्हणून त्यांची ख्याती पसरलीच असती. पण यांनी विज्ञानाला प्रयोगशाळेतून बाहेर काढून कामाला लावलं, हे त्यांचं मोठेपण. विज्ञानातल्या मूलतत्त्वांचा अभ्यास करून त्यांनी तंत्रज्ञान निर्माण केलं. ते तंत्रज्ञान देशाला बलवान करण्यासाठी कसं वापरता येईल, याचा ध्यास घेतला. त्यासाठी माणसं निवडली. घडवली. संशोधन आणि तंत्रज्ञान विकसित करणार्‍या इस्त्रो, टीआयएफआर, पीआरएल सारख्या संस्था उभ्या केल्या. आयआयएम अहमदाबादची स्थापनापण साराभाई यांनीच केलीय. या माणसांनी आणि संस्थांनी भारताचा वैज्ञानिक इतिहास घडवला.

भाभा आणि साराभाई यांनी भविष्य कित्येक वर्षं आधीच पाहिलं होतं. घराघरांत वीज हवीच, हवामानाचे अंदाज बांधावे लागतील, दूरच्या नातेवाइकांसोबत किंवा मित्र-सहकार्‍यांसोबत चटकन संपर्क करता यावा म्हणून फोन लागतील, इंटरनेट लागेल. गुगल मॅपसारखी नेव्हिगेशनची साधनं नसतील तर पत्ते कसे शोधणार, सीमेवर सैन्य हालचाल कसं करू शकेल, हे त्यांना काळाच्या कितीतरी पुढे राहिल्याने जाणवलं होतं.

महत्त्वाचं म्हणजे शत्रू किंवा प्रतिस्पर्धी राष्ट्राएवढे आपण बलशाली नसू तर त्यांना आपल्यावर चढाई करताना स्वतःचंही नुकसान होऊ शकतं, याची जरातरी धास्ती का वाटेल? या प्रश्नांनी त्यांना, विशेषतः होमी भाभा यांना पछाडलं होतं. तेव्हा देशासमोर नागरिकांच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षणाच्या मूलभूत गरजा भागवण्याचं आव्हान होतं. त्या काळात सॅटेलाईट्सची निर्मिती, अवकाश कार्यक्रम, अणुऊर्जा प्रकल्प आणि अण्वस्त्रांच्या निर्मितीचा त्यांनी आग्रह धरला.

भारत अण्वस्त्रसज्ज देश झाला, तर अमेरिका किंवा चीनसारखे आपल्यावर हल्ला करण्याचं धाडस करणार नाहीत यावर भाभा ठाम होते. त्यासाठी त्यांनी टीका सहन केली, विरोध पत्करला, राजकारण केलं, आर्थिक मदत आणि तांत्रिक मदत उभी केली. तसं पाहिलं तर ‘रॉकेट बॉईज’च्या निमित्तानं भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातलं राजकारण सर्वांसमोर आलं.

‘रॉकेट बॉईज’ भाभा आणि साराभाईंच्या भारावलेपणाची, झपाटलेपणाची, आग्रहाची आणि मैत्रीची गोष्ट आहे. ती प्रेरणादायी आहे, रोमांचक आहे, तशी तिला एक दु:खद किनारपण आहे. भाभांचा संशयास्पद मृत्यू, साराभाईंचं अकाली निधन; दोघांच्याही आयुष्यातले वैयक्तिक, कौटुंबिक ताणतणाव या सार्‍यामुळे भाभा-साराभाईंची कहाणी अद्भुत असली तरी अधुरी आहे. निखिल अडवाणी आणि टीमनं सोनेरी इतिहासाला लाभलेली ही दुर्दैवी किनार पार्श्वसंगीतातून सतत अधोरेखित केलीय.

मालिकेत एक उणीव आहे. खरं तर चूक म्हणायला पाहिजे. भाभांच्या कथेला नाट्यमय बनवण्यासाठी एक व्हीलन उभा केलेला आहे. विमलेंदू चक्रवर्ती यांनी नेहमीप्रमाणे भूमिका छान वठवली आहे. त्यांनी साकारलेलं रझा मेहदी हे पात्र निव्वळ काल्पनिक आहे. पण ते डॉ. मेघनाथ साहा यांच्याशी मिळतंजुळतं आहे. साहा समकालीन आणि महान वैज्ञानिक होते. सायक्लोट्रॉनचा त्यांनी शोध लावला. भाभांप्रमाणेच त्यांनीही महत्त्वाच्या संस्था उभ्या केल्या. ते संसदेत निवडून गेले.

हे सगळे तपशील रझा मेहदीच्या व्यक्तिरेखेतपण आहेत. पण रझा मेहदीप्रमाणे साहा मुस्लिम नव्हते. कम्युनिस्ट पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढले नसावेत. भाभा आणि साहा यांच्यामध्येे वैचारिक मतभेद होते. पण इथे रझा मेहदीला भाभांचा शत्रू आणि सीआयएचा हस्तक म्हणून रंगवलंय. मेघनाथ साहाच्या व्यक्तिरेखेशी मिळताजुळता ‘रझा मेहदी’ भाभांच्या संशयास्पद मृत्यूसाठी सीआयएला मदत करतो, असं काहीसं चित्र बराच काळ उभं करणं, हा सिनेमॅटिक लिबर्टीचा अतिरेक आहे. नायकाचं मोठेपण दाखवण्यासाठी किंवा गोष्टीत नाट्यमयता आणण्यासाठी व्हिलन निर्माण करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. केवळ नाटक किंवा सिनेमात नाही, खर्‍याखुर्‍या आयुष्यातही आपण कुणाला न कुणाला व्हीलन बनवतो. प्रत्यक्षात असा व्हीलन अस्तित्वात नसला तरी कल्पनेत त्याला जन्माला घालून आपण त्याच्यासोबत लढत बसतो. त्याच्याशिवाय आपल्या आयुष्यात रंगत येत नाही. निखिल अडवाणी आणि टीमनेपण तेच केलंय.
विज्ञानकथेत काल्पनिक व्हीलन निर्माण करण्याची आणि त्याला धर्म, व्यवसाय आणि राजकीय विचारसरणीची पुटं चढवण्याची गरज नव्हती. बैलगाडीतून आणि सायकलीवर रॉकेटचे सुटे भाग नेऊन, हाताने रॉकेट उचलून, ते उडवणं पुरेसं थरारक नाही का? भल्या मैफलीत दोन ट्रक कोळसा नेऊन, अंगठीच्या डबीत थोरियमच्या दगडाचा तुकडा देशाच्या पंतप्रधानाला कुणी भेट देतं, ही घटना रोमांचक नाही?

आपला अंतराळ कार्यक्रम गुंडाळून ठेवून कष्टकरी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी एक वैज्ञानिक आपल्या आयुष्याची पाच वर्षं देतो, हे नाट्यमय नाहीतर काय आहे? खर्‍याखुर्‍या विज्ञानकथेला काल्पनिक व्हीलन हवाच का? हा प्रश्न मालिकेच्या निर्मात्यांना पडला नाही किंवा त्यांना त्याला महत्त्व द्यावं वाटलं नाही. एवढी एक कमतरता सोडली, तर ‘रॉकेट बॉईज’ कमाल आहे! कोणत्याही विज्ञानप्रेमीला माहेराची आठवण करून देईल अशी.

होमी भाभा, विक्रम साराभाई आणि ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचं आयुष्य अफलातून होतं. त्यांच्या जीवनपटातून भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचा आलेख डोळ्यासमोर उभा राहतो. होमी भाभा यांनी भारताच्या ‘अणू’ कार्यक्रमाला जन्म आणि आकार दिला, तसा साराभाईंनी ‘अवकाश’ कार्यक्रमाचा पाया घातला. पुढे सतीश धवन, डॉ. कलाम यांनी साराभाईंच्या दूरद़ृष्टीला ‘अग्निपंख’ दिले. ‘रॉकेट बॉईज’ ही भारतीय शास्त्रज्ञांची प्रेरणादायी, रोमांचक गोष्ट आहे.

कल्याण टांकसाळे

Back to top button