मोटार विम्याच्या किरकोळ रकमेसाठी दावा का नको?, जाणून घ्या अधिक | पुढारी

मोटार विम्याच्या किरकोळ रकमेसाठी दावा का नको?, जाणून घ्या अधिक

प्रसाद पाटील

आपण मोटार खरेदीचा विचार करत असाल, तर त्याचा विमा उतरविणे गरजेचे आहे. याशिवाय विमा पॉलिसी लॅप्स होण्याच्या अगोदर तिचे नूतनीकरण करणे देखील बंधनकारक आहे. आपण किरकोळ रकमेसाठी सतत दावा करत असाल, तर आगामी काळात आपल्याला अडचण येऊ शकते.

ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचा आपण आरोग्य विमा उतरवतो, त्याचप्रमाणे मोटारीचादेखील विमा असतो. एखाद्या दुर्घटनेत गाडीची हानी झाल्यास किंवा आपल्यामुळे समोरील व्यक्तीच्या गाडीचे काही नुकसान झाले असेल, तर त्याची भरपाई या विम्यातून मिळते. शिवाय वर्षभरात कोणताही दावा केला नाही, तर विमाधाकारकाला ‘नो क्लेम बोनस’ही मिळतो. तो वर्षागणिक वाढत जातो. मात्र, अट एवढीच की, दावा केलेला नसावा. मात्र, आपण किरकोळ रकमेसाठी सतत दावा करत असाल, तर आगामी काळात आपल्याला अडचण येऊ शकते.

किरकोळ रकमेसाठी दावा का नको?

मोटारीचा विमा उतरवताना तीन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. पॉईंट ऑफ क्लेमवरील अतिरिक्त कपात, नो क्लेम बोनसचे लाभ आणि पॉलिसीच्या काळात दाखल केलेल्या दाव्याची संख्या. विमा कंपनीकडे केलेल्या प्रत्येक दाव्यात एक अनिवार्य कपात लागू केली जाते आणि त्याचे पालन ‘इर्डा’ नियमानुसार करावे लागते. ही कपातपात्र रक्कम वेगवेगळ्या वाहनांसाठी वेगवेगळी राहू शकते आणि ती खासगी मोटारीसाठी हजार ते दोन हजारांपर्यंत राहू शकते. याशिवाय आपण पॉलिसीच्या काळात एखादा दावा करत असाल, तर ‘नो क्लेम बोनस’ शून्य होते आणि आगामी काळात नूतनीकरणाच्या वेळी मिळणारी सवलत बंद होते. नूतनीकरणाच्या वेळी विमा कंपनी मागच्या पॉलिसीच्या काळात केलेल्या दाव्याची संख्याही तपासते आणि परिणामी नूतनीकरणाचा हप्ता हा अधिक राहू शकतो. म्हणूनच या तीन स्थितीचे आकलन करता, दुरुस्तीपोटी किरकोळ येणार्‍या खर्चासाठी दावा करण्याचे टाळले पाहिजे.

25 हजारांपेक्षा कमी खर्च असेल तर दावा नको का?

आपण दावा न करण्याच्या स्थितीत नो क्लेम बोनसचा लाभ घेत असेल, तर कमी मूल्याच्या खर्चापोटीच्या दाव्यापासून दूर राहिले पाहिजे. उदा. दाव्याची रक्कम सहा हजार रुपये असेल आणि आपण दावा केला नाही, तर नूतनीकरणात नो क्लेम बोनस हा 3500 रुपयांचा मिळतो. आपण दावा केला, तर कंपनीकडून कपात केली जाते आणि ती दोन हजार रुपयांपर्यंत असते. आपल्याला 3500 रुपयांचा नो क्लेम बोनस मिळत असेल आणि आपण दावा केला नाही, तर त्याचा फायदा मिळेल. कारण आपण नो क्लेम बोनस हा सुरक्षित ठेवलेला असतो. आपण दावा करत असाल, तर पुढच्या वर्षी नो क्लेम बोनसचा बेनिफिट मिळणार नाही. त्यानुसार आपला नवा हप्तादेखील वाढेल.

विमा कंपनी पोर्ट केल्यास

मोटारीचा नव्या विमा कंपनीकडून विमा उतरवला तरी कंपनी व्यक्तिगत पातळीवर जोखमीचे मूल्यांकन करते. तसेच दाव्याचा अनुभव आणि मागील विमा कंपनीकडून घेतलेल्या दाव्याची संख्या यानुसार हप्ता निश्चित करते. त्यामुळे कंपनी पोर्ट केली तरी हप्ता कमी राहतो, असे नाही. कोणतीही कंपनी विम्याचे नूतनीकरण करत असताना जुन्या पॉलिसीचा आधार घेतेच.

नो क्लेम बोनसचा बेनिफिट

आपण मागच्या वर्षी कोणताही दावा करत नसेल, तर नो क्लेम बोनस हा 20 टक्के असेल. दुसर्‍या वर्षी त्यात वाढ होऊन 25 टक्के, तिसर्‍या वर्षी 35 टक्के, चौथ्या वर्षी 45 टक्के आणि पाचव्या वर्षी 50 टक्के होतो. सलग पाच वर्षे कोणी क्लेम केला नसेल, तर कमाल 50 टक्के नो क्लेम बोनस मिळतो. मागच्या काळातील दाव्याची स्थिती पाहता, विमा कंपनी आपोआप विमाधारकाला ‘नो क्लेम बोनस’ प्रदान करते.

मोटार जुनी असेल तर..?

गाडी नवी असो किंवा जुनी, विमा कंपनी विमा उतरवताना आयडीव्ही आणि दाव्याचे आकलन करते. यानुसार वाहन मालकाकडून विम्याची रक्कम घेते. एखाद्या दुर्घटनेत गाडी पूर्णपणे नष्ट होत असेल किंवा चोरीला गेली असेल, तर अशा वेळी आयडीव्हीचा विचार केला जातो. दाव्याची रक्कम ही एकूण हानी किंवा चोरीच्या रूपातून केली जात असेल, तर आयडीव्हीची रक्कम दिली जाते. आयडीव्ही म्हणजे विमा कंपनीने निश्चित केलेली गाडीची रक्कम. ती दरवर्षी कमी होत जाते. खरेदी मूल्यांपेक्षा आयडीव्ही कमी असतो.

एका वर्षात किती दावे?

भारतात विमा कंपनीने मोटार विम्यानुसार एका वर्षात कमाल दाव्यांची संख्या निश्चित केलेली नाही. बेसिक पॉलिसीनुसार दाव्याच्या संख्यांना कोणतिही मर्यादा आखून दिलेली नाही. मात्र, झिरो डिप्रिसिएशनचा लाभ मिळविण्यासाठी क्लेमची संख्या ही वेगवेगळ्या विमा कंपन्यांनुसार वेगळी राहू शकते. बेस प्लॅन आणि अ‍ॅड ऑननुसार एकदाच दावा मानला जातो.

Back to top button