अर्थवार्ता | पुढारी

अर्थवार्ता

गतसताप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये एकूण अनुक्रमे 180.50 अंक व 623.36 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक 19745 अंक व 66684.26 अंकांच्या पातळीवर बंद झाले. दोन्ही निर्देशांकांमध्ये अनुक्रमे 0.92 टक्के व 0.94 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. सप्ताहादरम्यान निफ्टीने विक्रमी 20 हजारांचा टप्पा पार करण्याचा प्रयत्न केला; परंतु 19887.4 अंकांच्या पातळीपर्यंत पेाहोचून निफ्टी शुक्रवारअखेर माघारी खाली आला. शुक्रवारच्या अखेरच्या दिवशी निफ्टीने 234.15 अंक (1.17 टक्के) व सेन्सेक्सने (1.31 टक्क्यांची) 887 अंक घसरण नोंदवली. सर्वाधिक घटणार्‍या कंपन्यांच्या समभागांमध्ये बहुतांश आयटी कंपन्यांचा समावेश होतो. गतसप्ताहात सर्वाधिक घसरण रिलायन्स इंडस्ट्रीज (-7.37 टक्के), इन्फोसिस (-6.62 टक्के), टीसीएस (-4.16 टक्के), एचसीएल टेक (-3.08 टक्के), टेक महिंद्रा (-2.73 टक्के) या समभागांमध्ये झाली. तसेच सर्वाधिक वाढ कोटक महिंद्रा बँक (5.41 टक्के) एसबीआय (5.25 टक्के), लार्सन अँड टुब्रो (-4.61 टक्के), एनटीपीसी (-4.08 टक्के) या समभागांमध्ये झाली.

देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा 10.82 टक्के घटून 16,011 कोटींपर्यंत खाली आला. मागील 11 तिमाहीतील ही सर्वाधिक मोठी घट आहे. कंपनीचा एकूण महसूल 5.31 टक्के घटून 2 लाख 11 हजार कोटी रुपये झाला. या तिमाहीत आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीमध्ये प्रामुख्याने 31 टक्क्यांची घट झाली. त्यामुळे या क्षेत्रातील व्यवसायातून येणार्‍या महसूलात 18 टक्क्यांची घट होऊन महसूल 1 लाख 33 हजार कोटींवर आला.

रिलायन्स समूहाची आणखी एक कंपनी रिलायन्स रिटेलच्या पहिल्या तिमाहीच्या नफ्यात 19 टक्क्यांची वाढ होऊन नफा 2448 कोटींवर पोहोचला. एकूण महसूलात 19.5 टक्क्यांची वाढ होऊन महसूलखेरीज 69,947 कोटींवर पोहोचला.

भारताच्या ‘यूपीआय’ या यंत्रणेला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता. भारतात ‘यूपीआय स्कॅन कोड’द्वारे व्यवहार करणे सर्वसामान्य झाले आहे. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर काही ठराविक क्रेडिट कार्ड कंपन्यांची मक्तेदारी आहे. भारतातील ‘यूपीआय’ने सर्वप्रथम सिंगापूरमध्ये पाऊल ठेवले. यासाठी डीबीएससोबत करार करण्यात आला. याचप्रमाणे आता फ्रान्समध्येदेखील ‘यूपीआय’ उपलब्ध होणार आहे. सध्या वापरात असलेल्या क्रेडिट कार्डस्वर 3.5 टक्के अधिक जीएसटी शुल्क आकारले जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थानिक दुकानदार कार्ड स्वीकारण्यास टाळाटाळ करतात. ‘यूपीआय’द्वारे हे शुल्क 1 टक्क्यांपर्यंत खाली येण्यास मदत होईल.

देशातील सर्वात मोठी बँक ‘एचडीएफसी बँके’चा पहिल्या तिमाहीतील नफा मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल 30 टक्क्यांनी वधारून 11952 कोटींवर पोहोचला. निव्वळ व्याज उत्पन्न व्याज उत्पन्न (एनआयआय) 21.1 टक्के वधारून 23,599 कोटींवर पोहोचले. एकूण अनुत्पादित कर्जाचे प्रमाण 1.12 टक्क्यांवरून 1.17 टक्के झाले तर निव्वळ अनुत्पादित कर्जांचे प्रमाण (नेट एनपीए) 0.27 टक्क्यांवरून 0.30 टक्के झाले. एचडीएफसी बँकेचे भांडवल बाजारमूल्य तब्बल 151 अब्ज डॉलर्स म्हणजे 12.38 लाख कोटींवर पोहोचले. बाजार भांडवल मूल्याच्या आधारावर एचडीएफसी बँक जगातील 7 व्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक बनली.

देशातील आणखी एक महत्त्वाची खासगी बँक ‘इंडसिंड बँके’चा पहिल्या तिमाहीचा नफा मागील वर्षीच्या तुलनेत 30 टक्के वधारुन 2124 कोटी झाला. निव्वळ व्याज उत्पन्न (छशीं खपींशीशीीं खपलेाश) मध्ये 18 टक्क्यांची वाढ होऊन हे उत्पन्न 4867 कोटी झाले. एकूण अनुत्पादित कर्जांचे प्रमाण 2.35 टक्क्यांवरून 1.94 टक्क्यांवर आले, तर निव्वळ अनुत्पादित कर्जांचे प्रमाण 0.67 टक्क्यांवरून 0.58 टक्क्यांवर खाली आले. नुकतेच बँकेचे प्रवर्तक ‘इंडसिंड इंटरनॅशनल होल्डिंग्स्’ने 1.5 अब्ज डॉलर्स (सुमारे 12 हजार कोटी) उभारून त्याद्वारे बँकेतील स्वतःचा हिस्सा 15 टक्क्यांवरून 26 टक्क्यांवर नेण्याची घोषणा केली.

टाटा समूहाने ‘युनायटेड किंग्डम’मध्ये 4 अब्ज पाऊंड (सुमारे 42,400 कोटी) किमतीचा मोटारगाड्यांची इलेक्ट्रिक बॅटरी सेल प्रकल्प उभारण्याची घोषणा केली. टाटा समूहाची युरोपमधील ‘जॅग्युवार लँड रोव्हर’ या गाड्यांसाठी इलेक्ट्रिक बॅटरी सेल बनवण्याचे काम या प्रकल्पात करण्यात येणार आहे. या स्वरूपाचा प्रकल्प (सुमारे 13 हजार कोटींचा) गुजरातमध्ये उभारण्याची घोषणा टाटा समूहाने केली होती.

देशातील महत्त्वाची जीवन विमा कंपनी एचडीएफसी लाईफचा नफा पहिल्या तिमाहीत 15 टक्के वाढून 11507.88 कोटी झाला.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुंतवूकदार उद्योगसमूह ‘जीक्यूजी पार्टनर्स’ने ‘पतंजलीफूडस्’मध्ये 5.96 टक्के हिस्सा खरेदी केला. एकूण 2400 कोटींना ऑफर फॉर सेल (ओएफएस) द्वारे ही खरेदी करण्यात आली. एकूण 1103.80 रुपये प्रतिसमभाग दरावर 21.5 दशलक्ष समभागांचे हस्तांतरण करण्यात आले.

सरकारी बँक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चा पहिल्या तिमाहीचा नफा मागील वर्षीच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट (95.2 टक्के वधारून) 882 कोटी झाला. निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआय) 38.8 टक्के वधारून 2340 कोटी झाले. एकूण अनुत्पादित कर्जांचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) 3.74 टक्क्यांवरून 2.28 टक्के झाले, तर निव्वळ अनुत्पादित कर्जांचे प्रमाण (नेट एनपीए) 0.88 टक्क्यांवरून 0.24 टक्के झाले.

देशातील महत्त्वाचे पोलाद उत्पादक ‘जेएसडब्ल्यूु स्टील’चा पहिल्या तिमाहीचा नफा तब्बल होऊन 2338 कोटी झाला. कंपनीचा महसूलदेखील 10.83 टक्के वधारून 42213 कोटी झाला.

आदित्य बिर्ला उद्योग समूहाची प्रमुख कंपनी ‘अल्ट्राटेक सिमेंट’चा पहिल्या तिमाहीचा नफा 6.6 टक्के वधारून 1688.45 कोटी झाले. कंपनीचा महसूल 16.97 टक्के वधारून 17737.10 कोटी झाला.

श्रीलंकेत यापुढे भारतीय रुपयाद्वारे व्यवहार होऊ शकणार. श्रीलंकेची रुपयाला विशेष परकीय चलन म्हणून मान्यता. यामुळे रुपया आता आंतरराष्ट्रीय चलन म्हणून अधिकृतपणे गणला जाणार. याचप्रमाणे भारताची ‘यूपीआय’प्रणाली आता सिंगापूर, फ्रान्सनंतर श्रीलंकेमध्येदेखील उपलब्ध होणार.

‘नागरी विमान वाहतूक संचालनालया’ने आर्थिक संकटात सापडलेल्या ‘गो फर्स्ट’ या वाडिया उद्योग समूहाच्या विमान कंपनीला काही शर्तीसह सेवा पुन्हा सुरू करण्यास मंजुरी दिली. सध्या एकूण 15 विमानांसह एकूण 114 दैनंदिन हवाई फेर्‍या करण्यास कंपनीला मान्यता मिळाली.

14 जुलै रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी तब्बल 12.7 अब्ज डॉलर्सनी वधारून 609 अब्ज डॉलर्स झाली. तब्बल 15 महिन्यांनंतर पुन्हा विदेश चलन गंगाजळी पुन्हा 600 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये गंगाजळीने 645 अब्ज डॉलर्सचा विक्रम प्रस्थापित केला होता.

Back to top button