Accident Insurance : वैयक्तिक अपघात विमा कशासाठी गरजेचा? | पुढारी

Accident Insurance : वैयक्तिक अपघात विमा कशासाठी गरजेचा?

Accident Insurance : वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी या आकस्मिक अपंगत्व किंवा मृत्यू या कारणांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून विमाधारकाला आणि त्याच्या कुटुंबीयाला वाचविण्याचे काम करते. अपघातात शरीराचा एखादा अवयव निकामी झाला तरी अशा वेळी विमा पॉलिसी कुटुंबाला एक रक्कम प्रदान करते. या आधारावर अपंगत्वामुळे आलेल्या आर्थिक संकटाचा सामना करता येऊ शकते.

भारतात दर मिनिटाला एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू होतो. ‘एनसीआरबी’च्या अहवालानुसार 2021 मध्ये देशभरात विविध अपघातांत 3.97 लाख जणांचा मृत्यू झाला. बहुतांश पीडित नागरिक (57 टक्के) 18 ते 45 वयोगटातील होते. या दुर्दैवी घटनांत एखाद्याचा झालेला मृत्यू हा केवळ कुटुंबासाठी भावनिक संकटच नसते, तर आर्थिक समस्यांचे कारणही असू शकते. अपघातात, दुर्घटनेत गमावलेल्या प्रियजनांची आपण भरपाई करू शकत नाही. मात्र अपघात विमा कवच हे काही प्रमाणात आर्थिक आव्हानांची तीव्रता कमी करू शकते.

वैयक्तिक अपघात विमा या पीडिताच्या कुटुंबाला आर्थिक कवच देते. अशा प्रकारची सुविधा अन्य कोणत्याही विमा योजनेत नाही. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास जीवन विमा पॉलिसी वारसदारास एकरकमी पैसे देते. जर पॉलिसीधारक जखमी झाला तर त्याच्या उपचारावर येणारा खर्च विमा कंपनीकडून दिला जाते. वैयक्तिक अपघात पॉलिसी ही केवळ दोन प्रकारचे लाभ देत नाही, तर या अपघातात अपंगत्व आले तर पॉलिसीधारकांना पैसेही देते. मग अपंगत्व दहा टक्के असो किंवा 90 टक्के. तसेच ते अपगंत्व कायमस्वरूपी आहे की तात्पुरते, याचा काही फरक पडत नाही. पॉलिसीधारकाला किंवा वारसदाराला विम्याची रक्कम दिली जाते.

वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी ही टर्म इन्श्युरन्सला पर्याय नाही. टर्म पॉलिसी ही आयुष्यभर विमा कवच देण्याचे काम करते. एवढेच नाही, तर रुग्णालयात भरती झाल्यानंतर त्याच्यावर उपचारासाठी करण्यात येणार्‍या खर्चाचे वहन करणारी आरोग्य विमा पॉलिसीदेखील नाही. या दोन्ही योजनेचे उद्दिष्ट्य वेगळे आहे. पण अचानक घडलेल्या घटनांच्या वेळी आर्थिक आधार देण्यासाठी वैयक्तिक अपघात विमा गरजेचा आहे. वैयक्तिक अपघात विम्यातून पुरेसे कवच मिळणे गरजेचे आहे आणि हा विमा आपल्या अन्य आर्थिक योजनांना पर्याय नाही.

Accident Insurance : अपघात विम्याचा हप्ता किती?

वैयक्तिक अपघात विमा हा खूपच कमी पैशात नागरिकांना मिळतो. 25 लाखांचे विमा कवच वार्षिक 1125 रुपये (+18 टक्के जीएसटी) एवढ्या कमी किमतीत मिळते. ओरिएंटल इन्श्युरन्स कंपनीच्या एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, आपण दररोज 45 रुपये मोजून एक लिटर दूध घेतो. परंतु आम्ही एक लाखांचे विमा कवच एवढ्याच रकमेत वर्षभरासाठी देतो. पॉलिसीत अपंगत्वाचा समावेश केला तर हप्त्यात किरकोळ वाढ होते आणि तो अडीच हजार रुपये वार्षिक राहतो. अपघातात आलेल्या अपंगत्वाला विमा संरक्षण असणे गरजेचे आहे आणि अन्य कोणत्याही योजना यास कवच देत नाहीत. वास्तविक, वैयक्तिक अपघात विमा हा जीवन विमा आणि आरोग्य विम्याच्या तुलनेत वेगळा आहे. अपगंत्व कायम किंवा अस्थायी स्वरूपाचे राहू शकते. अपघातात पाय गमावला असेल तर ते कायमस्वरूपी अपंगत्व राहते आणि हाताचे किंवा पायाचे बोट गमावले तर ते अस्थायी अपगंत्व राहते. अशा वेळी दोन्ही प्रकरणातील भरपाईची रक्कम वेगळी राहू शकते कारण या घटनेचा व्यक्तीच्या उत्पन्नावर परिणाम राहू शकतो.

Accident Insurance : 25 लाखांसाठी किती हप्ता?

वैयक्तिक अपघात विम्याचा हप्ता हा खूपच कमी आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यातील आहे. यात आणखी काही गोष्टींचा समावेश केला तर त्याचे अतिरिक्त लाभही मिळतात. साधारणपणे 25 लाखांच्या विमा कवचासाठी दररोज 15 रुपयांपेक्षा कमी पैसे लागतात.

Accident Insurance : विम्याची रक्कम

अपघात विमा घेताना एकदम कमी रकमेची म्हणजे 1 ते 2 लाखांचे कवच घेऊ नका. एवढ्या छोट्या रकमेने विम्याचा उद्देश साध्य होत नाही. किमान वीस ते 25 लाखांचा वैयक्तिक अपघात विमा असणे गरजेचे आहे. अर्थात वार्षिक उत्पन्नाच्या दहा पट रकमेचा विमा उतरवणे गरजेचे आहे. यातील गैरप्रकार थांबविण्यासाठी विमा कंपन्यांकडून कर विवरणपत्राच्या मदतीने उत्पन्नाची माहिती घेतली जाते. आयटीआरमध्ये 9 लाख वार्षिक उत्पन्न असेल, तर 90 लाखांपर्यंत कवच घेता येते. काही विमा कंपन्यांकडून केवळ 25 ते 30 लाखांपर्यंतच कवच दिले जातो. सरासरीएवढे कवच पुरेसे आहे. विमा कंपनी परवानगी देत असेल तर आपण त्याची खरेदी करू शकता.

Accident Insurance : रायडर हवा का?

वैयक्तिक अपघात विम्याला जीवन विमा पॉलिसी किंवा आरोग्य विमा योजनेला जोडून रायडरच्या रूपाने देखील खरेदी करता येऊ शकते. अर्थात, रायडरची खरेदी खूपच स्वस्त आणि सुविधाजनक आहे. अक्षय झुत्सी नावाच्या एका व्यक्तीने जीवन विमा पॉलिसीसह अपघाती मृत्यू, अपंगत्व अन्य रायडर घेतले. दुर्दैवाने अपघातात त्यांनी आपली तर्जनी (इंडेक्स फिंगर) गमावली. ते सहा महिने अंथरुणावर होते; पण जीवन विमा पॉलिसीने काहीही दिले नाही. या उदाहरणाचा दाखल देत विमा अधिकार्‍याने पॉलिसी कागदपत्रातील कलमाकडे लक्ष वेधले. त्यात म्हटले की, एक हात किंवा पाय गमावला तरच अपंगत्वाचा लाभ मिळतो. सहा महिन्यांचे अस्थायी अपंगत्व आणि केवळ तर्जनी गमावल्याने काहीही फरक पडला नाही. दुसरीकडे, एक स्वतंत्र वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी ही नागरिकास सर्वसमावेशक कवच प्रदान करते. विमा उतरवलेल्या व्यक्तीने पायाचा किंवा हाताचा भाग गमावला तर तो नुकसान भरपाईस पात्र आहे. तात्पुरते अपंगत्व आले तरी विमाधारकाला भरपाई मिळू शकते.

Accident Insurance : या चुका टाळा

अपघात विमा उतरवताना विमाधारकाच्या कामाची जागा महत्त्वाची आहे.
बैठे काम आणि फिरतीचे काम यात जोखमीत फरक राहू शकतो. काही व्यावसायिक जसे बांधकाम सुपरवायझर, शॉप फ्लोअर कर्मचारी, ट्रॅव्हलिंग सेल्समन, सुरक्षा कर्मचारी यांची जोखीम अधिक राहते आणि त्यामुळे त्याचा हप्ता अधिक राहतो. सुदैवाने अपघात विम्यात वयाचे कोणतेही बंधन नाही. मग खरेदीदार 18 वर्षाचा असो किंवा 58 वर्षांचा असो, सर्वांना सारखाच हप्ता असतो. म्हणून पॉलिसी खरेदी करताना आपल्या रोजगाराची माहिती योग्य रीतीने नमूद करणे गरजेचे आहे.

Accident Insurance : कशाला कवच मिळत नाही?

मृत्यूचे कारण पुढीलप्रमाणे असेल तर त्यास विम्याचा लाभ मिळत नाही. आत्महत्येचा प्रयत्न करणे आणि त्यात जखमी होणे किंवा स्वत:ला मारून घेणे.
पॉलिसी उतरवण्यापूर्वीच्या जखमा किंवा अपंगत्व.
बाळंतपणाच्या काळात किंवा बाळाला जन्म देताना अपघात झाल्यास.
मद्यपान किंवा अमली पदार्थांचे सेवन केल्याने अपघात झाल्याचे आढळून आल्यास.
कायदा मोडून अपघात झाल्यास. म्हणजे राँग साईडने जाताना अपघात झाल्यास किंवा नो पार्किंगमध्ये गाडी लावल्यानंतर तेथे झाड कोसळल्यास किंवा गाडीची हानी झाल्यास.
साहसी खेळात झालेल्या दुर्घटना.

अपघात विमा उतरवताना विमा कंपनीला कुटुंबाची आणि वैयक्तिक अचूक माहिती देणे गरजेचे आहे. कोणतीही आरोग्य समस्या असेल तर त्याचा उल्लेख अर्जात करायला हवा. शेवटी वारसदाराचे नाव अचूक लिहणे आवश्यक आहे. यात कोणतीही स्पेलिंग मिस्टेक नसावी किंवा बँक खात्यावर असलेल्या नावापेक्षा वेगळे नाव असू नये. या चुकांमुळे विमा कंपनीकडे दावे करताना अडचणी येतात.

Back to top button