अर्थवार्ता | पुढारी

अर्थवार्ता

गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांक एकूण अनुक्रमे 181.45 अंक व 673.84 अंकांची घसरण दर्शवून 17412.9 अंक तसेच 59135.13 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये एकूण 1.03 टक्के, तर सेन्सेक्समध्ये 1.13 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. या सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स घटण्यामध्ये प्रामुख्याने अमेरिकन निर्देशांक कारणीभूत ठरले. अमेरिकेत आयटी कंपन्यांसोबत व्यवहार करणारी सिलिकॉन व्हॅली बँक आर्थिक अडचणीमध्ये सापडली. रोखे गुंतवणुकीत नुकसान सोसावे लागल्याने फेडरल रिझर्व्हकडून डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्प (एफडीआयसी) रिसिव्हरशिप नियमावलीअंतर्गत बँकेवर कारवाई करण्यात आली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अब्जपती अतिश्रीमंतांवर 25 टक्क्यांपर्यंत कर लादण्याचा इरादा जाहीर केला. तसेच कॅपीटल गेन टॅक्स 20 टक्क्यांवरून 39.6 टक्क्यांपर्यंत नेण्याचा विचार मांडला. यामुळे पुढील दहा वर्षांत 3 ट्रिलियन डॉलर कर नुकसानीची भरपाई होण्याचा अंदाजदेखील वर्तवला. या सर्वांचा परिणाम एकत्रितपणे निफ्टी तसेच सेन्सेक्स घटण्यामध्ये झाला. या सप्ताहात सर्वाधिक घटणार्‍या समभागांमध्ये येस बँक (-9.84 टक्के), टेक महिंद्रा (-5.83 टक्के), बजाज फायनान्स (-4.56 टक्के) यांचा, तर सर्वाधिक वाढ दर्शविणार्‍या समभागांमध्ये अदानी पोर्ट (15.89 टक्के), गेल (7.40 टक्के), एनटीपीसी (4.93 टक्के) यांचा समावेश झाला. रुपया चलन या सप्ताहात डॉलरच्या तुलनेत स्थिर राहिले. रुपया या सप्ताहात 0.1 टक्के मजबूत होऊन 82.04 रुपये प्रतिडॉलर स्तरावर बंद झाला. 10 वर्षे कालावधीच्या सरकारी रोख्याचा भाव शुक्रवारच्या सत्रात 7.4321 टक्क्यांवर पोहोचला. जानेवारी महिन्यात भारताचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी इंडेक्स) 5.2 टक्क्यांवर पोहोचला. खाण उद्योग, विद्युतनिर्मिती क्षेत्राने यामध्ये सवाधिक वृद्धी दर्शवली.

सरकारी कंपनी एमटीएनएल आणि बीएसएनएल या दूरसंचार कंपन्यांचे एकत्रिकरण केले जाणार. यासाठी एमटीएनएलचे समभाग विविध भांडवलबाजारातून ‘डिलिस्ट’ करण्यासाठी सरकारतर्फे प्रक्रिया सुरू. सध्या एमटीएनएलमध्ये कार्यरत असणार्‍या 350 कर्मचार्‍यांना बीएसएनएलमध्ये सामावून घेतले जाणार. ‘एमटीएनएल’ कंपनीच्या सुमारे 12 हजार कोटी किमतीच्या जागा ‘बीएसएनएल’कडे हस्तांतरित केल्या जाणार. पुढील दोन वर्षांत या दोन कंपन्यांचे एकत्रिकरण (Merging) होणे अपेक्षित आहे.

अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अ‍ॅथॉरिटी नावाची परदेशी गुंतवणूकदार कंपनी भारतीय स्टार्ट अप कंपनी ‘लेन्सकार्ट’मध्ये 500 दशलक्ष डॉलर्स गुंतवण्याची शक्यता. याच सप्ताहात करार घोषित होण्याची शक्यता. या करारपश्चात लेन्सकार्टचे मूल्य (Valuation) सुमारे 4 अब्ज डॉलर्सपर्यंत (32 हजार कोटी) पोहोचवण्याचा अंदाज. लेन्सकार्टचे सीईओ पीयूष बन्सल यांनी मागील वर्षी जुलैमध्ये लेन्सकार्ट लवकरच ‘आयपीओ’द्वारे भांडवल बाजारात उतरणार असल्याची माहिती दिली होती.

आणखी एक स्टार्टअप बायजू कंपनीची उपकंपनी आकाश 250 दशलक्ष डॉलर्सचा निधी उभा करण्यासाठी प्रयत्नशील. कर्न्व्हटिबल नोटस्च्या माध्यमातून निधी उभा केला जाणार. कर्न्व्हटिबल नोटस्च्या माध्यमातून निधी उभा केला जाणार. कर्न्व्हटिबल नोटस्च्या गुंतवणूकदारांना आयपीओमधील लिस्टींग प्राईसमध्ये 20 टक्क्यांची सूट मिळणार. 2021 मध्ये ‘बायजू’ने ‘आकाश’ या कंपनीला 950 दशलक्ष डॉलर्सना (सुमारे 7 हजार कोटी) खरेदी केले होते. यापूर्वी ‘टीपीजी’ गुंतवणूकदार कंपनी बायजूमध्ये 300 दशलक्ष डॉलर्स गुंतवणार होती; परंतु ‘टीपीजी’च्या गुंतवणूक नियमावलीमुळे (Investment Compliance) हा व्यवहार रखडला.

रिलायन्स रिटेल व्हेन्चर्सची उपकंपनी रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्टस कँपा कोला शीतपेय लवकरच बाजारात आणणार. शीतपेय बाजाराचा आकार 2019 च्या आकडेवारीनुसार 67 हजार 100 कोटींचा असून 2030 पर्यंत 1 लाख 47 हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे.

अदानी समूहाने 7374 कोटींचे कर्ज मुदतीआधी परत केले. आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक बँकांकडून घेतलेल्या या कर्जाची परतफेड एप्रिल 2025 मध्ये होणे अपेक्षित होते. फेबु्रवारीपासून आतापर्यंत अदानी समूहाने 2.01 अब्ज डॉलर्स किमतीची तारण समभागांच्या बदल्यात उचललेली कर्जे परत केली आहेत. 31 मार्चपर्यंत तारण समभाग बदल्यात घेतलेली सर्व कर्जे परत करण्याचा अदानी समूहाचा प्रयत्न आहे. मागील सप्ताहात अमेरिकेच्या जीक्यूजी गुंतवणूकदार उद्योग समूहाने अदानी उद्योगसमूहात 1.9 अब्ज डॉलर्स (सुमारे 15 हजार कोटी) गुंतवले. नुकतेच ‘जीक्यूजी’ उद्योग समूहाचे प्रमुख राजीव जैन यांनी अदानी समूहातील हिस्सेदारी वाढवण्याचे सूतोवाच केले.

रिलायन्स कॅपीटलच्या लिलावाच्या दुसर्‍या फेरीस ‘एनसीएलएटी’ या न्यायाधिकरणाने वैध ठरवले. या निर्णयाविरोधात पहिल्या लिलाव फेरीतील विजेता टोरंट समूहाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. टोरंट समूहाने पहिल्या फेरीत रिलायन्स कॅपिटलला खरेदी करण्यासाठी 8640 कोटींची बोली लावली. परंतु, मुदतीपश्चात हिंदुजा समूहाने 9000 कोटींची बोली लावली. यामुळे हिंदुजा समूहाची बोली वैध धरता येणार नसल्याचे प्रतिपादन टोरंट समूहाकडून करण्यात आले.

रशियाकडून होणारी खनिज तेलाची आयात फेबु्रवारी महिन्यात विक्रमी पातळीवर. फेबु्रवारी महिन्यात रशियाकडून दरदिवशी 1.6 दशलक्ष बॅरल्स खनिज तेलाची भारतात आयात. इराक आणि सौदी अरेबियाकडून होणार्‍या एकत्रित आयातीपेक्षा अधिक आयात रशियाकडून करण्यात आली. युक्रेन युद्धापूर्वी रशियाकडून भारताला पुरवला जाणार्‍या खनिज तेलाचा हिस्सा केवळ 1 टक्का होता. युद्धापश्चात एक वर्षानंतर भारतात आयात होणार्‍या खनिज तेलापैकी 35 टक्के तेल रशियाकडून आयात करण्यात आले. रशियाकडून मिळणारे खजिन तेल बाजारभावापेक्षा कमी किमतीत मिळत असल्याने स्थानिक तेलशुद्धीकरण कंपन्यांच्या नफ्यात भर पडली.

टाटा मोटर्सची उपकंपनी ‘टाटा टेक्नोलॉजी’ लवकरच ‘आयपीओं’च्या माध्यामातून भांडवल बाजारात उतरणार. टाटा टेक्नोलॉजी ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून 23.6 टक्के हिस्सा म्हणजे 95.7 दशलक्ष समभाग विकेल. टाटा मोटर्स 81.1 दशलक्ष समभाग (20 टक्के हिस्सा), तर अल्फा टीसी होल्डींग 9.7 दशलक्ष समभाग (2.4 टक्के हिस्सा), टाटा कॅपीटल 4.9 दशलक्ष समभाग (1.20 टक्के हिस्सा) विकणार आहे.

मुदतीआधी कर्ज फेडून गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्याच्या हेतूने अदानी समूह अंबुजा सिमेंटमधील 450 दशलक्ष समभाग म्हणजे सुमारे 5 टक्के हिस्सा विकण्याची शक्यता. सध्याच्या किमतीनुसार 5 टक्के हिस्सा विक्री केल्यास प्रवर्तकांना 3780 कोटींचा निधी उभा करता येईल. अदानी अंबुजा सिमेंटमध्ये 63.2 टक्के, तर एसीसी सिमेंटमध्ये 56.7 टक्के हिस्सा बाळगतात.

देशातील महत्त्वाची एफएमसीजी कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हरच्या एमडी व सीईओपदी 27 जूननंतर रोहित जावा यांची नियुक्ती घोषित. 10 वर्षे प्रमुखपदी राहिल्यानंतर संजीव मेहता निवृत्ती स्वीकारणार.

सलग चार आठवडे घट दर्शवल्यानंतर 3 मार्च रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी अखेर 1.45 अब्ज डॉलर्स वधारून 562.40 अब्ज डॉलर्स झाली.

Back to top button