Repo rate : रेपो रेट बदलाचे परिणाम | पुढारी

Repo rate : रेपो रेट बदलाचे परिणाम

व्यापारी बँकांना रिझर्व्ह बँक ज्या दराने कर्ज पुरवठा करते, तो दर म्हणजे रेपो दर होय. यामध्ये व्यापारी बँका आपल्याकडील प्रतिभूती (Securities) आधारे कर्ज घेत असतात. साहजिकच रेपो दर वाढला की, पुढे व्यापार बँका आपल्या ग्राहकांना जो कर्जपुरवठा करतात, त्यामध्ये वाढ करतात व कर्जे महाग होतात.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 8 फेब्रुवारी 2023 रोजी पुन्हा एकदा रेपो रेट 0.25 टक्केने वाढवला. महागाई नियंत्रणासाठी रेपो रेट वाढवण्यासाठी चलन समितीच्या 6 पैकी 4 सदस्यांनी पाठिंबा दिला व चलनविषयक धोरण महागाई नियंत्रणास प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट झाले. या संदर्भात रेपो रेट नेमका काय असतो व त्यातून महागाई नियंत्रित होते का, त्याचे देशाच्या विविध क्षेत्रांवर आणि व्यक्तिगत पातळीवर कोणते परिणाम होतात, याची माहिती केवळ सैद्धांतिक द़ृष्टीनेच नव्हे, तर व्यावहारिक द़ृष्टीने महत्त्वाचे ठरते.

आपला रुपाया आंतरराष्ट्रीय बाजारात स्थिरता टिकवून ठेवणारा व अंतर्गत पातळीवर विविध क्षेत्राला पुरेसा चलनपुरवठा व्हावा, या भूमिकेतून दर दोन महिन्यांतून चलन धोरण जाहीर करते. यासाठी रेपो दराचे हत्यार वापरले जाते. व्यापारी बँकांना रिझर्व्ह बँक ज्या दराने कर्ज पुरवठा करते, तो दर म्हणजे रेपो दर होय. यामध्ये व्यापारी बँका आपल्याकडील प्रतिभूती (Securition) आधारे कर्ज घेत असतात. साहजिकच रेपो दर वाढला की, पुढे व्यापार बँका आपल्या ग्राहकांना जो कर्जपुरवठा करतात, त्यामध्ये वाढ करतात व कर्जे महाग होतात. आता कर्ज घेणारे व्याजदर वाढल्याने कर्ज मागणी कमी करतात व त्यातून एकूण मागणी कमी होऊन भाववाढ नियंत्रित होते, असे गृहीत आहे.

वाढत्या व्याज दराचे स्वरूप

भाववाढ नियंत्रणासाठी रेपो रेट 9 ऑक्टोबर 2022 पासून सातत्याने वाढवला असून, 4 टक्केवरून 22 मे 2022 रोजी 4.4 टक्केनंतर 8 जून 2022 रोजी 4.9 टक्के तर 5 ऑगस्ट 2022 मध्ये 5.4 टक्के करण्यात आला. हाच दर 30 सप्टेंबर 22 मध्ये 5.9 टक्के झाला, तर 7 डिसेंबर रोजी 6.25 टक्के करण्यात आला. आता तो 8 फेब्रुवारी 2022 पासून 6.5 टक्के करण्यात आला. एकूण व्याज दरातील ही वाढ 2.5 टक्के इतकी मोठी असून, परिणामी कर्जाचे मासिक हप्ते 19 टक्क्याने वाढले आहेत!

व्याज दरातील ही वाढ पुढील काळात जर नैसर्गिक आपत्ती युद्ध, चीनची अर्थव्यवस्था खुली करण्याचे धोरण यात वाढ झाल्यास वाढवावे लागतील. हे जरी खरे असले तरी तज्ज्ञांच्या मते, व्याज दर आता शिखरावर असून तेथे स्थिरावतील व नंतर घटणे शक्य आहे. एकूण 2023 मध्ये भाववाढ 5.3 टक्के राहणार असून रिझर्व्ह बँकेस महागाई दर 2 ते 6 टक्केच्या पातळीत नियंत्रित करण्याचे उद्दिष्ट साध्य होणार आहे.

परिणामाचे सप्तर्षी

वाढता रेपो रेट व त्यातून अर्थव्यवस्थेवर होणारे परिणामदेखील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंदाजपत्रकात मांडलेल्या सप्तर्षीप्रमाणे असले तरी, खर्‍या अर्थाने ते सप्तर्षी (त्रास देणारे) आहेत. वाढते व्याज दर मर्यादित घटकांना फायद्याचे, तर अनेकांना त्रासदायक असतात.

1) विकास दरात घट

वाढते व्याजदर विकास दर किंवा राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा वेग कमी करते. विकास प्रकल्पासाठी खासगी क्षेत्रातील उद्योजकामार्फत जी कर्ज उभारणी केली जाते, ती फायद्याच्या गणितावर अवलंबून असते. व्याज दर वाढले की नफा घटतो किंवा खर्च वाढतो. परिणामी, गुंतवणुकीचा निर्णय पुढे ढकलला जातो. यातून पुढे प्रकल्पाच्या खर्चाने वाढणारा रोजगार, उत्पन्न हे सर्व घटतात. बेरोजगारी वाढते. बाजारात किमती वाढल्याने मागणी घटते.

2) शेअर बाजारात पडझड

व्याज दरातील वाढ शेअर बाजारात नवी पडझड निर्माण करते. रेपो रेट वाढीस देशाच्या भांडवल बाजाराचा संवेदनशील सूचकांस नकारात्मक प्रतिसाद देतो, याचे कारण म्हणजे वाढत्या व्याजदराने कर्जाचा भार वाढून नफा घटतो. नवे विकास प्रकल्प येण्यापेक्षा चालू प्रकल्पावर खर्च कपात करणे अधिक फायद्याचे ठरते. भविष्यातील खर्च वाढ, नफ्यातील घट ही त्या कंपन्या कितपत कर्जबारी आहेत यावर ठरत असल्याने व बहुतांश कंपन्यांच्या कर्जाचा वापर विस्तारास करत असल्याने शेअर्स किमती घसरतात.

3) कर्जाचा मासिक हप्ता वाढ

अनेक ग्राहकांनी वाहन खरेदी, घर खरेदी किंवा अन्य वस्तू खरेदीस कर्ज घेतलेले असते. याचे मासिक हप्ते व्याजदर वाढीने वाढतात. एक तर कर्जहप्ता पूर्वी 5000 असेल, तर तो 5500 होईल किंवा कर्ज फेडणेस 6 वर्षे ऐवजी 6.5 वर्षे द्यावी लागतील. वाढत्या कर्ज हप्त्याने सर्वसामान्य कर्जदाराचे घरगुती बजेट कोसळले.

4) म्युच्युअल परतावे घटतात

वाढत्या व्याज दराने शेअर बाजार घसरला की, त्याचे परिणाम म्युचल फंडात ज्यांनी गुंतवणूक केली आहे त्यांच्या गुंतवणुकीवर होतात. त्यांचा परतावा घटतो. यामध्ये सुरक्षितता अधिक पसंत करणारे कर्जरोखे प्रकारात गुंतवणूक करणारेदेखील नुकसानीत जातात. व्याजदर व कर्जरोखे मूल्य यांचा परस्परविरोधी संबंध असतो. व्याज दर वाढल्याने कर्जरोख्याचे मूल्य घटते व नुकसान होते.

5) ठेवीदारांची दिवाळी

वाढत्या व्याज दराचा आनंद ठेवीदार किंवा मुदतठेवी (FD) असणार्‍या वर्गास होतो. रेपो दरातील वाढीबरोबर आता मुदत ठेवीवरील व्याज दर वाढले असून स्टेट बँक 6.75 टक्के, आयसीआयसीआय 7 टक्के, अ‍ॅक्सिस बँक 7.26 टक्के, तर इंडसइंड बँक 7.5 टक्के व्याज देत आहे. काही बँका 8 टक्क्यांपर्यंत ठेवीवरील व्याज वाढवले आहेत. खरे तर महागाई किंवा भाववाढीच्या स्वरूपात होणारे नुकसान हे वाढीव स्वरूपात मिळणार्‍या फायद्यापेक्षा अधिक असते. वाढीव उत्पन्न हे ‘चलनभम्र’ (Money Illusion) करणारे असते.

6) बचत वाढते?

वाढत्या व्याज दराने बचतीला प्रोत्साहन मिळते व बचत वाढ होते, असा तर्क मांडला जातो. पूर्वीपेक्षा अधिक व्याज उत्पन्न मिळणार असल्याने खर्च कमी करून बचत वाढवली जाते. पण याची दुसरी बाजू म्हणजे वाढत्या व्याज दराने घटणारी गुंतवणूक अनेकांचे उत्पन्न व बचत घटवणारी असते. एकूण परिणाम उत्पन्न वाटप विषमतेवर ठरते. विषमता उत्पन्नातील जेवढी अधिक तेवढ्याच प्रमाणात बचत वाढ होईल.

7) खर्चावर परिणाम

वाढत्या व्याज दरातून भांडवली खर्च व सर्वसाधारण खर्च या दोन्हींवर परिणाम होतो. खर्चाचे निर्णय पुढे ढकलले जातात. जसे घर खरेदीचा निर्णय व्याजदर वाढल्याने रद्द केला जाईल किंवा थांबवला जाईल पूर्वी घेतलेल्या कर्जावर द्यावे लागणारे अधिक व्याज भरण्यास इतर खर्चास कात्री लावली जाते.

प्रा. डॉ. विजय ककडे

Back to top button