दुहेरी लाभाच्या योजना घेताना… | पुढारी

दुहेरी लाभाच्या योजना घेताना...

शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंड योजनांवर लक्ष ठेवणार्‍या ‘सेबी’ने अलीकडेच म्युच्युअल फंडना बंडल्ड स्किम देण्यास मनाई केली. म्हणजेच काही म्युच्युअल फंड योजनांवर एकाचवेळी दोन सुविधा देऊ करतात. गुंतवणुकीबरोबरच विमा कवचही. पण आता केवळ गुंतवणूकच होईल. परिणामी दीर्घकाळासाठी एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करत असाल, तर म्युच्युअल फंड कंपन्या यापुढे आपल्याला मोफत रूपात जीवन विमा कवच देणार नाही.

सध्या आर्थिक जगतात बंडल्ड योजनांचा भडिमार आहे. मात्र त्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याचे बारकावे समजून घेणे गरजेचे आहे.

दोन प्रकारचे बंडलिंग

बंडलिंग म्हणजे एकाचवेळी दोन योजना देणे. या दोन्ही योजना दोन प्रकारे दिल्या जातात. पहिला प्रकार म्हणजे एखाद्या मूळ योजनेत आणखी एका योजनेचा ग्राहकांना मोफत रूपात लाभ देणे. उदाहरणार्थ, क्रेडिट कार्डबरोबर ग्राहकांना दिले जाणारे व्यक्तिगत विमा कवच तसेच बँकेतील मुदत ठेवीतील रकमेएवढी जीवन विमा कवच देणे. दोन्ही प्रकरणांत विमा योजनेचा हप्ता ही कंपनी किंवा बँक भरते अथवा प्रमुख योजनेत त्याची किंमत सामील केलेली असते.

दुसर्‍या प्रकारात कंपनी एकाचवेळी अनेक प्रकारची उत्पादने किंवा फायदे ग्राहकांना देते. उदाहरणार्थ आपण गृहकर्ज घेतो, तेव्हा बँक आपल्याला टर्म इन्श्युरन्स घेण्याचा सल्ला देते. ही रक्कम कर्जाच्या रकमेएवढी असते आणि काळापरत्वे ती रक्कम कमी होत जाते. त्यामुळे दुर्दैवाने कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँकेचे पैसे सुरक्षित राहतात. व्यक्तिगत विमा पॉलिसी असेल आणि अपघातामुळे रुग्णालयात उपचार घ्यावे लागले, तर त्याच्या उपचाराचा खर्च विमाधारकास मिळतो. या सर्व प्रकरणात वेगळा हप्ता वसूल केला जातो.

जीवन विम्याला बाजाराच्या गुंतवणुकीशी जोडणारी युनिट लिंक्ड इन्श्युरन्स प्लॅन (यूलिप) ही सर्वात लोकप्रिय बंडल्ड स्किम म्हणून ओळखली जाते. बंडल्ड स्किम एकाचवेळी अनेक गोष्टी देतात. यामुळे आपल्याला अनेक सुविधा मिळतात आणि वेळ व पैसादेखील वाचतो. ग्राहकांना एकाच योजनेत दोन फायदे मिळतात. दोनदा अर्ज भरणे किंवा दोनदा केवायसी करण्याऐवजी एकदाच सर्व प्रक्रिया पार पाडावी लागते. अनेकदा तर या उत्पादनातील खर्चाचा काही भाग कंपनी स्वत: भरतात.

फायदे कमी

बंडल्ड योजनेत एकापेक्षा अनेक योजना असल्या तरी यातून मिळणारे फायदे मर्यादित आहेत. एका अर्थाने बंडल्ड स्किम ही ग्राहकांच्या प्राथमिक गरजा भागविण्यासाठी पुरेशी आहे, असे म्हणता येणार नाही. यात आणखी एक अडचण म्हणजे ग्राहक एकाच वेळी दोन योजनांत अडकतो. दोन्ही योजनांपैकी एक योजनेने अपेक्षेप्रमाणे परतावा दिला नसेल, तर ते बंद करताना ग्राहकाला संपूर्ण योजनेवरच पाणी सोडावे लागते म्हणूनच बंडल्ड स्किम घेण्यापूर्वी विचार करायला हवा.

छुपे नियम

कधी कधी मोफत योजना या काही अटींसह येतात. उदा. विमा कवचाचा लाभ एका ठरावीक वयानंतर मिळत नाही. कंपन्यांकडे मोफत योजना या कधीही बंद करण्याचा अधिकार असतो आणि काहीवेळा त्या बंददेखील केल्या जातात. बंडल्ड स्किममध्ये फायद्याचा कालावधी आणि प्रमाण यात काही अटींचा समावेश केलेला असतो. या अटींमुळे ग्राहक अडचणीत येऊ शकतो म्हणूनच बंडल्ड स्किमच्या योजनांचे आकलन करायला हवे. यासाठी एक उदाहरण जाणून घेऊ. बहुतांश क्रेडिट कार्डच्या अन्य सुविधेत अपघात किंवा सामान हरविण्याचा विमा कार्डधारकाला मिळतो. पण अनेक प्रकरणात विम्याचा लाभही दिला जात नाही आणि तसा उल्लेखही केलेला असतो. याबाबतची ग्राहकाने माहिती मिळवणे गरजेचे आहे.

बंडल्ड स्किम कितपत उपयुक्त

आपल्याला उपयुक्त वाटत असेल तरच ‘टू इन वन’ स्किम घेण्याचा विचार करायला हवा. व्यक्तिगत अपघात विम्यात जादा हप्ता भरला तर रुग्णालयात उपचार घेताना त्याचा लाभ मिळू शकतो. बंडल्ड स्किममधील विमा रक्कम ही 50 हजारांपासून पाच लाखांपर्यंतच असू शकते आणि ती पुरेशी नाही. एका अर्थाने वेगळा आरोग्य विमा घेणे हिताचे राहू शकते. याप्रमाणे कोणत्याही स्थितीत रुग्णालयात भरती झाल्यास विमाधारकाला त्याचा संपूर्ण लाभ मिळेल. बंडल्ड स्कीम खरेदी केल्यानंतर आपण निर्धास्त राहू शकत नाही कारण त्यातून मिळणारे लाभ कमीच असतात.

जगदीश काळे 

Back to top button